जीव नांगरटीला आलाय

Submitted by जव्हेरगंज on 28 April, 2016 - 01:48

ही खरंतर कविता म्हणून लिहायला घेतली होती, पण गद्द्यासारखी झालीय म्हणून इथे टाकतोय.

======================================================================

उनाचं नुसतं मजी नुसतं तापत हुतं
घंघाळभर पाण्यानं भागंना
आता हिरीतंच खुपशी घालावी म्हूण
खळ्यावर आलू

बांधावर फिरताना जवा
सोग्यानं त्वांड पुसलं
तवा म्होरल्या वावरात मला
ऊसाचं कांडं रवताना
उफाड्याचं सामान दिसलं

आभाळाची पाखरं भिरीभिरी हाणत
पायताणं तिकडं वळावली
मग दगडं घेऊन गोफणीत
जवारीवरं भिरकावली

तसं म्होरलं वाफं सोडून
सामान मधल्या आळ्याकडं आलं
कंबरचा काष्टा काढून
निऱ्या सावरत ताठ उभं झालं

तोबरा भरुन म्या
पानाचा इडा तिच्याम्होरं धरला
"खाणार का इडा बिगर सुपारी,
रंगणार मातुर नंबरी "
काताचा खडा तोंडात टाकत
म्या तंबाकूची चिमूट दाढत सोडली
आन पिचकारी मारत म्हणलो
"ऊस पाण्याला म्हाग "

तसं सामान बांधावर आलं
कमरंवर हात ठिवून लाल व्हटानं म्हणलं
"पाटील, येरवाळीच काय काढलंय ही,
येवढ्या उनाचं वाड्यात पडावं, गपगार झोपावं "
"मग हिकडचा वाफसा कुणी काढावा गड्या, जीव नांगरटीला आलाय "
शेवटच्या पानावर चुना माखत आम्ही पटका काढला.

तसं सामान फडात शिरलं
हिकडंतिकडं बघून आमीबी सरसावलो
येवढ्या उनाची नांगरट काढायची मजी खायचं काम न्हाय

"म्होरल्या बाजारला कमरबंद करायचा" आसं सामान जवा म्हणलं
तवा मला ते लै म्हंजे लैच आवाडलं
======================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy