दिवस बदलले तरी
'Middle Class' जात नाही
आणि त्याचं आम्हाला
काहीही वाटत नाही.
दुधाची साय, तुपाची खरवड
तिळाची वडी, पुरणाची पोळी,
आईच्या जेवणाची सर
पिझ्झाला येत नाही.
हॉटेलात गेले तरी
मेनूवर 'दर' दिसत राही
रिक्षा केली तरी
मीटरवरून नजर हटत नाही.
पाहुण्याला 'चहा' सोडून
कोल्ड्रिंक विचारत नाही.
उपवास केला नाही तरी
चिकन खाणं जमत नाही.
जीन्स घातली तरी
साडीची हौस सुटत नाही.
घरातून निघताना आजही
पाया पडायला विसरत नाही.
शो रुमचे दर पाहून
पाय ठेववत नाही.
केली खरेदी जास्त
तर झोप येत नाही.
नाताळ साजरा केला,
'विश' केले 'मदर्स डे'ला,
तरी वाढदिवसाला आईने
ओवाळनं सुटत नाही.
घर कितीही मोठ्ठ असो,
सगळे असताना, गप्पा मारत
हॉलमध्ये, ओळीने झोपण्यासारखी मजा
कशातच येत नाही.
पैसा असो पैसा नसो
स्वभाव जात नाही.
सुंभ जळला तरी
पीळ जळत नाही.
आणि त्याचं आम्हाला
काहीही वाटत नाही.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
छानचं अजून एक .... कॉफी
छानचं
अजून एक ....
कॉफी कितीही प्यायली तरी
चहाची सर तिला येत नाही
आणि बशीतला चहा
फुर्र करत पितानाची मजा
चहाच्या मगाला ओठ लावून येत नाही!!!