खुरटी झुडपं

Submitted by जव्हेरगंज on 26 April, 2016 - 03:02

एका अवाढव्य शिळेला टेकून जरावेळ बसलो. त्याची तिरपी सावली अंगावर पडली. रखरखत्या आयुष्यात ओलावा दाटला. मग भरुन घेतली माती ओंजळीत, अन उधळून दिली आभाळात. थोडी डोळ्यात पण घुसली. मग झोळीनंच तोंड पुसलं अन उभारलो ठार वेड्यासारखा. पाठीत उसण भरली. गडद वीज खोल आभाळात जाऊन चमकली. ऐन दुपारी डोळ्यापुढं अंधारी आली. जीव घामाघुम झाला. एक पाय वाकवून हाडं मोडली तेव्हा कुठं उभारी आली. मग झोळी पाठीवर टाकून चालायला लागलो.

त्या हिरव्या सपाट मैदानावर म्हटलं तर गवत तसं फारसं नव्हतं. खुरटी झुडपं मात्र बक्कळ. दूरवरचे डोंगरमाथे आभाळाला भिडणारे. उतारावरुन खाली घसरत गेलेल्या नागमोडी पायवाटा. अन झाडपाल्याची समृद्ध जमीन.

मी चालत गेलो अनवाणी त्या पवित्र भूमीवरुन. तुडवल्या रानवाटा अन बेमालूम सुखाचा हिशोब मांडला. या धवल धुक्यातून जाता जाता तृप्तीच्या स्मशानात जाण्याची आस लागून राहिली.

त्या सुपीक पठारावर शेवटी एक झोपडं दिसलंच. एवढ्या उन्हाचं तिष्ठत बसलेलं. गावकुसाच्या बाहेर. दूरवर. एकलंच. गर्द झाडीत भिताडाच्या भेगाभेगात जिव्हाळा घेऊन लपलेलं.

"ओंजळभर पाणी दे गं माय " म्हणत पडवीत बसलो. झोळी बाजूला ठेवली अन अगदीच थकून गेलो.
आतून एक तलम वस्त्रातली स्त्री बाहेर आली. थंडगार पाण्याची बाटली हातात ठेवून जराशीच हसली. अन "आज लवकर आलास?" म्हणत आत निघून गेली.
फ्रिजमधले ते थंडगार पाणी जरा जास्तच थंड होते. घोटभर पिऊन बाटली टेबलावर ठेवली. शूज काढून टिव्ही ऑन केला. बाथरुमध्ये जाऊन शॉवर घेतला. मग प्रसन्न मनाने गॅलरीत जाऊन दूरवर पसरत गेलेल्या झोपडपट्ट्या बघत सिगारेट पेटवली.

"आज भाजीला काय करु रे? भरीत करू तुझं आवडतं? की पनीर मसाला? की आपलं नेहमीचंच, पावभाजी?" तिनं आतून विचारलं.
"चालेल काहीही !" एव्हाना मी उड्डाणपुलावरच्या वाहनांची लखलखती येजा निरखत होतो.
कंटाळा आल्यावर आत आलो. सोफ्यावर बसून रिमोटच्या बटनांशी खेळत बसलो. एकही चॅनल बघण्यासारखा वाटत नव्हता. मग उठून लॅपटॉप उघडला अन प्रोजेक्ट वर्क करत बसलो.

तिनं जेवायला हाक दिली. आज तिनं दुधखीर केली होती. तुप टाकून. अन सोबतीला भरलं वांगं. तिची बडबड चालूच होती. सिरीयलच्याच गप्पा त्या. नेहमीच्याच. त्या ऐकत सुग्रास जेवलो.
पाटपीट करत पुन्हा गॅलरीत गेलो अन परत येऊन बेडवर पुस्तक चाळत पडलो. सिंकमध्ये भांडी टाकून तीही आली.
"आज पाऊस पडणार बहुतेक" लाईट ऑफ करत बेडवर पडली.
"हु" करत मी पुस्तक बाजूला ठेऊन दिले.
डोळ्यावर झापड आली.
पाऊस?
साला पाऊसही कधीकधी बुचकळ्यात टाकतो. रात्रीचा येतो अन काळाखोत मिसळून जातो. सुट्या सुट्या पारंब्यात जीव ओलाचिंब होतो.

काळ्याभोर अंधाराला हुलकावणी देत त्यादिवशी पाऊस आलाच. जगदंबेच्या पायऱ्या विसळून गावशिवारात गेला. आडोश्याच्या पाखरांना भिजवत जरा वेळ विसावला. चिखलझडीतून वाट काढत मग छपरावर येऊन कोसळला.
मग भिताडावरुन ओघळत राहिला. रातभर.

"सोबराबायचं खळं कसलं झिंबाट झालयं वो " झापडं उघडून बाहेर डोकावत ती म्हणाली. अन उघड्यावरच्या पाऊसधारा बघत मी आतल्या आत गारठून गेलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

???

कथा मलाही कळली नाहीये

पण जव्हेरगंज, शक्यतो इतक्यात उलगडून सांगू नका ही विनंती.
परत एकदा वाचून पाहणार आहे.
कृपया धन्यवाद

गावाकडच्या झोपड्यातल्या माणसाला स्वप्नं कशाची पडतात तर तलम वस्त्र, फ्रिज, रिमोट, शॉवर, लॅपटोप ई. ई.
खुरटी झुडुपं म्हणजे छोटी माणसं (म्हणजे आवाकाच छोटी असलेली) आणि त्यांची स्वप्नं देखिल खुजी...

असं काहीसं आहे का हे?

आता कथा उलगडंलीत तरी चालेल जव्हेरगंज Happy

बाबांनो ही कथा नाही आहे हे एक ललित आहे.

पावसाच वर्णन छान जमल. मला पावासाची वर्णन वाचायला नेमीच आवडतात. पण तू जे वर्णन केलेस ते खूपच लवकर आटोपत घेतलस. " रात्रीचा येतो अन काळाखोत मिसळून जातो" हे वाक्य आवडल.

सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे!
उलगडा करण्याचा प्रयत्न करतो, बघा आवडला तर.

कथानायक एके दिवशी ऑफिसहून घरी येताना त्याच्या नेहमीच्या फँटसीत रमतो. त्याची फँटसी काय आहे हे वरती आलेले आहेच. पण जेव्हा तो घरी पोहोचतो तेव्हा फँटसीतून बाहेर पडून तो वास्तवात येतो. रात्री झोपताना त्याची बायको त्याला नकळत पावसाचा विषय देऊन जाते. मग कथानायक तो विषय घेऊन पुन्हा त्याच्या फँटसीत रममान होतो. इतकच.

आभारी आहे Happy

Happy मस्त

नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात अस काहीस मोकळ आणि जास्त डोक्याला ताप नको ... हाय तेवढ पुरे हाय .. अस काहीस का? कधी कधी "खुरट्या झुडुपांच" जीवन आवडत.. कमी आशा -अपेक्षा असलेल.