अरे संसार संसार

Submitted by सई केसकर on 25 April, 2016 - 05:54

हल्ली खूप लोक मला माझं लिखाण बंद का झालं याबद्दल विचारतात. आणि जास्त डिटेलमध्ये जाऊन त्यांचा (आणि माझा) मौल्यवान वेळ घालवण्यापेक्षा एका शब्दात उत्तर देणं जास्त सोप्पं. लग्न. आपल्या ओळखीत असे अनेक लोक असतात ज्यांच्या कपाटात गिटारच्या वह्या, कवितांच्या डायऱ्या, ट्रेकचे फोटो आणि असे बरेच काही गुंडाळून ठेवलेले छंद सापडतील. त्या सगळ्या छंदांचं गुंडाळीकरण, लग्न (आणि संसार) या शब्दातच बहुधा झालेलं असतं. अर्थात असे कित्येक लोक आहेत जे "अगेन्स्ट ऑल ऑड्स" आपली कला जिवंत ठेवतात. पण ते मुळात माझ्यासारख्यांपेक्षा जास्त सरस असतात. पण माझी कला हरवलेली बिलकुल नाही. हेच सांगण्यासाठी मी वेळात वेळ काढून हा लेख लिहू घातला आहे.

कसंय ना, पूर्वी कसं म्हणायचे, अमुक अमुक राजा हा युध्द "कलेत" पारंगत होता. शस्त्रकला, युध्दकला, वक्तृत्व कला या सगळ्या पूर्वी कला मानल्या जायच्या. आणि यात लोक 'निपुण' असायचे. पण तेव्हा युद्ध आणि संसार वेगवेगळे असायचे. राण्यांना सेपरेट महाल, दास दासी असल्यामुळे या सगळ्या कला वेगळ्या ठिकाणी दाखवायला लागायच्या. हल्ली युध्दकला ही संसारातच वापरावी लागते. तसंच तह, करार, हे सुद्धा आता नॉर्मल संसारात इनकॉरपोरेट झालेत. त्यातच जर एखादं अपत्य झालं तर या सगळ्या कलांचा फुललेला पिसारा हा संसारातच वापरावा लागतो.

कला संसारत लेटंट हीट चे काम करते.एखाद्या पदार्थाचे तापमान न वाढता तो जेव्हा उर्जा ग्रहण करतो तेव्हा त्याला लेटंट हीट असे म्हणतात. मात्र या प्रकारात पदार्थ नुसता टाइम पास करत नसून, अंगभूत बदलत असतो. तसाच संसार देखील कलाकारांचं कलेचं प्रदर्शन थांबवून, त्यांच्यातील कलेचा त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपयोग करून घेतो.

जसं की आता माझी लेखणी व्हॉट्सॅपवर जास्त चालते. आपणच कसे बरोबर आहोत हे नवऱ्याला पटवून देणे हे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे आणि जास्त अवघड आहे. त्यामुळे कधी कधी नवराच मला सल्ला देतो की आता तू काहीतरी कम्प्युटरवर लिही, ब्लॉग वगैरे, नाहीतर अंगठ्याला कार्पेल टनल होईल उगीच. लेखनात जसं मध्ये मध्ये, "आपलं हे काय चाललंय, याचा काहीच उपयोग नाही" अशी भावना यायची तशीच इथेही येते. पण जसं पूर्वीचं लेखन आणि आत्ताचं यातील गुणात्मक फरक दिसू लागतो, तसा पूर्वीचा नवरा आणि आत्ताचा, यातही थोडा थोडा फरक जाणवू लागतो.

पूर्वी असं फेसबुकवर वगैरे जळजळीत स्टेटस टाकून त्यावर (जगभर पसरलेल्या लुख्या विद्यार्थ्यांशी) वाद घातल्यावर आपण किती फ़ेमिनिस्ट आहोत असं वाटायचं. पण आता आठवड्यातून एकदा घरकामाच्या प्रोसिजरचं फ़ेमिनिस्टिक कॅलिबरेशन करावं लागतं. यात
"माझे बाबा काहीच करायचे नाहीत घरात. तरी मी करतो"
"मी आज सकाळी उठून बाळाला चेंज केलं"
"माझी झोप पूर्ण झाली नाही"
"मी बाकीच्या नवऱ्यांपेक्षा जास्त काम करतो"
या आणि अशासारख्या अनेक वाक्यांना कुठल्याही प्रकारची कृतज्ञ प्रतिक्रिया जाणीवपूर्वक न देता, "बरं मग?" अशी प्रतिक्रिया देणे येते. यासाठी स्टेट्स शेयर करण्यापेक्षा आणि त्यावर वादविवाद करण्यापेक्षा खूप जास्त कष्ट पडतात. आणि ही वाक्य उच्चारली जात असताना, जर आपली सासू असेल, तर या प्रत्येक वाक्यानंतर मनाच्या भिंतीवर, कुणीतरी टोकदार नख पुन्हा पुन्हा घासत आहे अशी भावना सहन करत शांतपणे, "बरं मग?" म्हणावं लागतं.

लिखाण जसं तेच तेच वाटू लागतं, तसा संसारही घिसापिटा वाटू लागतो. पण दुर्दैवाने रायटर्स ब्लॉक सारखा संसार ब्लॉक कधीच होत नाही. संसार मुळातच आपल्या खूप पुढचा असतो. त्याच्या हाती आपल्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या लोकांचे बळी गेलेले असतात. त्यामुळे आपल्याला कितीही संसार सोडावासा वाटला तरी आपल्याला संसार सोडत नाही. शेवटी मग आम्ही नवरा बायको लग्न केल्याबद्दल एकमेकांचं सांत्वन करू लागतो. त्यातही आता नाविन्य आलंय. लग्न नवीन असताना अशी कंटाळ्याची फेज आली की आम्ही, "तुझ्यामुळे तुझ्यामुळे" करून एकमेकांवर ढकलायचो. आता अशा फेज मध्ये आम्ही सबंध विश्वाचा विचार करतो. की आपण म्हणजे या संसाराच्या यज्ञात एक तुपाचा थेंब वगैरे. अगदीच बोर झालं तर, उभय पक्षांच्या आयांवरून एखादं झणझणीत भांडण करतो. पण भांडण हा संसार रिसेट करायचा चुकीचा मार्ग आहे हे देखील आता आमच्या लक्षात येऊ लागलंय. आणि मुळात सुख-कंटाळा-भांडण-सुख या काल्चाक्रातून मुक्ती हीच संसाराची खरी शिकवण आहे असं आम्ही आता मानू लागलो आहोत.

संशोधन कलेचे देखील नवीन पैलू संसाराने दाखवून दिले आहेत. मी आणि माझ्या काही मैत्रिणी आता आमच्या सगळ्यांच्या नवऱ्यांच्या आणि सासवांच्या (गुण) दोषांवर उत्तम रिव्यू पेपर लिहू शकू. संसारात पडल्या पासून माझा मानसशास्त्राचा व्यासंगदेखील कलेकलेने वाढला आहे. विविध पुस्तकं वाचून माझ्या असं लक्षात आलंय की आपण सगळेच थोडे थोडे मनोरुग्ण आहोत. आधी निरागसपणे मी दुसऱ्यांचे वेड शोधायचे. आता मात्र मला पक्की खात्री पटली आहे की मीच सगळ्यात जास्त वेडी आहे. अशा अध्यात्मिक घटका आल्या की कौतुक वाटतं, पूर्वीच्या विचारवंतानी वानप्रस्थाश्रमाचा सिकवेन्स इतका चपखल कसा बसवला असेल. पण त्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की सरायीताला जंगलात जाण्याची काय गरज? मन इतकं शांत झालं पाहिजे की संसाराच्या गोंगाटात जंगलच मनात आणता आलं पाहिजे.

तुम्ही तुमच्या संसारात शंभर टक्के सुखी असाल तर हा लेख तुमच्याबद्दल बिलकुल नाही. आणि जे लग्न करून प्रचंड सुखी झालेत (अशांच्या मी नित्य शोधात असते) त्यांच्यासाठी हा लेख लागू नाही. पण संसार इतका फूलप्रूफ सुखी असता तर एका अविवाहित प्रोड्यूसरनी त्यावर इतकी कमाई केलीच नसती. संसारातील खाचा आणि खड्डे, त्यातून येणारे चांगले वाईट अनुभव यामुळेच लग्न, या सतत चालू राहणाऱ्या संथ प्रवाहात, थोड्या लाटा वगैरे अनुभवायला मिळतात. नाहीतर नुसता इकडे सेल्फी, तिकडे सेल्फी, माझा हब्बूडी, माझी वायफी असं खोटं खोटं प्रदर्शन उरेल. संसारात पडल्यामुळे तरुणपणी आपण शाहरुख खान आहोत असं वाटणाऱ्या लोकांना आपण आता इरफान खान झालोय असं वाटू लागतं. पण हा बदल किती चांगला आहे हे ज्याला कळलं त्याचाच बेडा पार!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संसारात पडल्यामुळे तरुणपणी आपण शाहरुख खान आहोत असं वाटणाऱ्या लोकांना आपण आता इरफान खान झालोय असं वाटू लागतं. पण हा बदल किती चांगला आहे हे ज्याला कळलं त्याचाच बेडा पार!>> अगदी बरोबर!!!

पंचवीशीत हे वाक्य फार पोकळ वाटते पुढे अजून एक दशक गेले की बरे झाले लग्न केले संसारात पडलो मुले झाली ह्यावर लोक जाम खूष असतात आणि आयुष्य पुढे जगण्यासाठी तेच त्यांचे एक प्रेरक स्थान असते. एकदा जीव सदाशीव ही म्हण कमालीची खोटी आहे. जराही तथ्य नाही वाटत.

मस्त लिहीले आहे. पण तुमच्यातला स्पार्क जाउ देउ नका. बोगस आहे हे संसार करणे. लिव्ह फॉर युवर सेल्फ. किड्स डू जस्ट फाइन. दे नीड अ हॅपी मॉम. Happy

सई भारी लेख. Happy लिहित जा. लिहिण्यातूनही आपले ट्रान्झीशन दिसतं. एकटे असताना लग्न झाल्यावर आणि मुलं झाल्यावर आपल्यात काय बदल झाले ते या लेखातून दिसत राहत. आधी मैत्रिणींच्या सासुंचे गॉसिप, नवऱ्याच्या तक्रारी, मुलांचे कौतुक बोअर वाटत असेल आणि आता आपणही त्यात भाग घेत असू तर, यू आर इन राईट प्लेस. Happy
आमचा इरफान खान झालाय. आता आम्ही लढण्यापेक्षा नवीन लढाया शोधत राहतो. नोकरी बदलणे, घर बदलणे इ.

छान !
विद्या.

मस्त खुसखुषीत मंगला गोडबोले वळणाचा लेख.
संसार यज्ञात आहुती देणे म्हनजे डुइंग युअर टाइम. Happy

प्लीज डोंट टेक माय जंगल अवे !

मी वाट बघत असते की मी रिटायर कधी होइन ह्याची.
लोकं जेव्हा चाळिशी पार केल्याबद्दल दु:खी होतात ते मला सम्जतच नाही.

मी वाट बघत असते की मी रिटायर कधी होइन ह्याची. >>>> शुम्पी +१. Happy

एंजॉय सई. अजून प्रेमात आहात एकमेकांच्या . अभी तुमने देखा ही क्या है. Wink

अतिशय तीव्र प्रेम, आवेग वगैरे
प्रेम
नैराश्य आणि प्रचंड राग. (एका मैत्रिणीने ' त्याला कुटून काढावं इतका राग येतो गं' असं म्हणून मला चकित केलं होतं. जगातली सर्वात थंड व्यक्ती ती हीच असं माझं तोपर्यतं मत होतं)
हताशपणा
कंटाळा
वैताग आणि चडफड
एकमेकांकडे शक्य तेवढं दुर्लक्ष करणे
शेवटी वीसेक वर्षांनंतर आपणच चक्रम आहोत आणि पदरी पडलं आणि पवित्र झालं फेज ...

या सगळ्या मज्जेत मुलं आणि आई-वडील (उभय पक्षांचे) यांच्या फोडण्या असतातच. या जंजाळातून उभयपक्षी आदर आणि समजूतदारपणा टिकवुन ठेवणे ही खरी कला. असो.
संसार असार आहे, तरी ओखली में सीर दिया है तो मुसल से क्या डरना.

Raina!! Hilarious. Sorry me English madhe reply kartey Karan I am on my phone.
Kutun kadhava asa mala pan khup wela vatun gelay. Thanks for sharing. Happy

आई ग्गं... मस्तच लिहिलयस, सई.
फार फार रिलेट झालंय. मधला तो पॅरा तर थेटम थेट!
<<लिखाण जसं तेच तेच वाटू लागतं, तसा ....>>

>>संसार ब्लॉक कधीच होत नाही

हे वाचून जाम हसले. आणि ते खरंच आहे Wink मस्त लिहिलंस मनोगत Happy

Pages