संघाच्या गोष्टी भाग ३

Submitted by satishb03 on 23 April, 2016 - 04:27

संघाच्या गोष्टी भाग (३)

सावरकरांची तसबीर फोडल्याच्या कारणास्तव , धीरज गुंजाळ यास कुत्त्यासारखे धुतल्यानंतर त्याने सेनापतीपदाचा हव्यास सोडून सेनापतीपदाची माला पुनःश्च एकवार माझ्या गळ्यात घातली ..व सर्व गुरुजानास सांगितले का बोवा वाघमाऱ्याने ती फोडायला सांगितली जेणेकरून माझे देखील कौतुक होईल व मग ..इथे तो थांबला . पुन्हा शिक्षकांनी विचारले , मग पुढे काय ? वाघमारे मला , सुलभाला देण्यासाठी चिठी लिहून देणार होता म्हणून मी ती फोडली असे म्हणून तो थांबला ..घनगंभीर वातावरणात दोन थपडा लगावून त्याला खाली बसविले गेले .व मला मुख्याध्यापकाच्या खोलीकडे चलण्याचे सुतोवाच केले . नेतृत्व तथा जबाबदारी स्वीकारण्यास मी कधीच नकार देत नसल्याने मी हे आव्हान पेलले . अत्यंत दमदार पावले टाकीत भगतसिंगास आठवीत मी ऑफिसकडे चालू लागलो..ऑफिसमध्ये पोचल्यानंतर वर्तक म्याडम , पेंडसे म्याडम, गीते सर कुलकर्णी म्याडम सर्वांनी घेराव घालून , तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थ्याला हे शोभते का ? असे मुर्खासारखा का वागलास ? शेजारी उभे असलेले कोंढाळकर सर (आडनावावर जाऊ नका ते मांग जातीचे होते ) म्हणाले जाव द्याना , फोडली तं फोडली त्याच्यानी काय बिगाडतय ? कळकुटेच झाल्ते न्हवं फोटू ? नवे घ्यायचा चानस दिलाय पोरांनी घ्या नवे ..काढा पाच पाच रुपय.. माझे पेशल दहा घ्या..सबंध शिक्षक वर्ग त्यांच्या अंगावर खेकसला ..व त्यांना बाहेर जाण्याची अति नम्र विनंती करता झाला ..ते खी खी हसत तंबाखू मळत बाहेर चालते झाले ..
पुन्हा माझ्याकडे वळत विचारणा झाली , बोल का असे वागलास ? अत्यंत शांतपणे मी त्यांना म्हटले आपल्या संध्याकाळच्या बौद्धिकवर्गास सुरुवातीस श्लोक म्हटला जातो . ‘की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने’ गीते सर किंचाळले , त्याचा इथे काय संबंध ? मुर्खा तसबीर फोडायला का सांगितलेस ? तेच तर सांगतोय सर . गुंजाळच्या मनात भय फार दाटलेले आहे .ते कमी करण्यासाठी मी त्याला तसबीर फोडायला सांगितले ..या खुलाश्यावर काहीच न कळता ते शांत बसून राहिले ..माझ्यावर प्रेम करणारे जोगळेकर सर जवळ येऊन म्हणाले ..तुझ्यासारख्या हुशार मुलाने सावरकरांवर राग धरणे बरे नाही , मग पुढे त्यांनी सावरकरांचे दलितांबरोबरचे सामुदायिक भोजन..अस्पृश्यता निवारण वगैरे गोष्टी सांगून मला सावरकर थोर असल्याचे मानावयास जोर देऊन इतरही अधिक काही सांगू लागले ..मी त्यांना म्हटले ते काहीही असो सावरकरांमुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत ..एव्हाना कुलकर्णी व वर्तक म्याडम ढसा ढसा तांब्याभर पाणी प्याल्या होत्या..तांबट सर मुतून आले होते ..कोंढाळकर पुन्हा येऊन बसले होते ..जोगळेकर सर म्हणाले तू जन्माला यायच्या कैक वर्ष आधी सावरकर मरण पावलेत , ते कशा दुखावतील तुझ्या भावना ? मी म्हटले ते मी सांगू शकत नाही ..ठीक आहे पुन्हा असे करू नकोस ..आणि संध्याकाळी शाखेत आपण बोलू या. मी होय म्हटले ..
एक कानाखाली देखील न खाता मी सहीसलामत वर्गात येऊन बसलो ..वासंती माझ्याकडे यावेळी चोरून न पाहता खुलेआम पाहत होती ..वर्गही पाहत होता ..आम्ही डोळ्यातून हसलो. शाळा सुटली.संध्याकाळी शाखेत जायची वेळ झाल्याने मी मांगाचा लक्ष्या व वडराचा गुंजाळ यांच्या घरी त्यांना सोबत आणण्यासाठी गेलो तेंव्हा गुंजाळ म्हटला , तुझ्या व शाखेच्या आईची गांड..मला अपशब्द रुचत नसल्याने मी तीव्र नापसंती दर्शवित त्यास सुलभाला शाखेत गेलेलं आवडतं , पाह्य ब्वा विचार करून . असे म्हणून निमूट चालता झालो ..तर धावत गुंजाळ माझ्या मागे आला ..व माझ्या खांद्यावर रेलून , मारलेल्या सर्व शिक्षकांना म्याडमला आईमाईवरून अत्यंत आचकट विचकट खवूट स्वरूपाच्या शिव्या देऊ लागला ..च्यायला लय मारलं र, ह्यामा ध्यांगा फोका करू लागला ..मी त्याचे सात्विक सांत्वन करून त्याला तिखटजाळ रशावरून गुळचिंच आमटीवर आणले . तो नॉर्मल झाला .शाखेत संध्याकाळच्या बौद्धिक वर्गात सावरकर चरित्र सांगितले गेले . बौद्धिकवर्ग मला कधीच आवडत नसल्याने खो खो , कबड्डी व लंगडीपाणी यानंतर मी बौद्धिक केवळ मन लाऊन ऐकत असल्याचा अभिनय करीत असे..

ते श्रावणातले मोठे प्रसन्न दिवस होते .आणि सोमवारी वासंती तिच्या लहान बहिणीसह महादेवाच्या मंदिरात यायची हे मला माहित असल्याने सावरकर प्रकरणानंतरच्या एका सोमवारी सकाळी दहा वाजता मी लक्ष्या व गुंजाळला कल्टी मारून एकटाच मंदिराबाहेर थांबलो . मी आदल्या रात्रीचे डल्याचे कालवण भाकर चुरून खाऊन गेलो असल्याने ,महादेवाची कृपा नको पण अवकृपा तरी का ? म्हणून आत जाणे टाळून बाहेरच थांबलो होतो ..तर वासंती आली ..अगदी सहज माझ्याकडे आली व हसून मला म्हणाली आत येतोस ? मी म्हटलं येतो . शेटं तुटो वा पारंबी महादेवाला भिऊन हा चान्स घालवणे मला परवडणारे न्हवते..पोटात आनंद आणि डल्या एकाचवेळी आनंदाच्या ढुश्या देऊ लागल्या ..महादेव दर्शन वगैरे झाल्यावर तिने विचारले , का फोडायला सांगितलीस सावरकरांची तसबीर ? मी म्हटले तुझ्यामुळे , ती म्हटली कसे काय ? मग मी तिला जे शिक्षकांना सांगितले न्हवते ते सत्यकथन केले ..तिला मागील महिन्यात झालेल्या शाळेच्या वर्धापन दिनाची याद करून दिली ..

तर त्याचे असे झाले होते वर्धापन दिनानिमित्त येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांसमोर व्हावयाच्या कार्यक्रमाच्या जय्यत तयारीत वर्तक म्याडमने तिला मुख्य गायिका म्हणून निवडले होते . तुझा आवाज खूप जाड आहे असे म्हणून मला सपशेल नाकारले होते ..मांस खाल्ल्याने असे होते . पुढच्या वर्षी पाहू वगैरे ...तर तेही मी सहन केले . असो ..वासंती व इतर मुलेमुली जयोस्तुते जयोस्तुते हे गाणे गाणार होती .त्या गाण्याची शाळेत जय्यत तयारी चाललेली होती. दिवस मोठे आनंदाचे चालले होते . गाण्यात भागी न होण्याचे हलाहल एव्हाना मी पचवले होते . असो . त्या गाण्यातील एका कडव्याने मात्र मोठा घोळ घातला ..व सावरकरांविषयी माझ्या बालमनात अप्रीती निर्माण झाली.. सराव करते वेळी कुणाच्याही लक्षात न येता मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी गाण्यातील या कडव्याने गहजब केला , “हे अधमरक्तरंजिते सुजन पूजिते श्रीस्वतंत्रते..तुजसाठी मरण ते जनन ..तुजवीण जनन ते मरण” या मूळ कडव्यात गाण्याच्या ओघात वासंतीकडून व तिच्या टीमकडून थोडासा बदल झाला , ते लोक सहज गायले .. “तुजसाठी जनन ते मरण ,,तुजवीण मरण ते जनन ..” हाय अल्लाह ! मोठा गहजब झाला ..भाषणाच्या वेळी कट्टर सावरकर भक्त असलेल्या प्रमुख पावण्याने या गाण्याची तयारी केलेल्या सर्व शिक्षकांची जहरी खिल्ली उडवली ..वर्तक म्याडमला शाळेतल्या फरशा पोटात घेतील तर बरे असे सीतामायीच्या दुःखाजवळ जाणारे दुःख झाले ..
दुसऱ्या दिवशी भर वर्गात वासंतीला उभे करून वर्तक म्याडम गीते सर कुलकर्णी म्याडम ताड ताड बोलले ..वासंती लाल लाल झाली ..मला हे मुळीच देखविले नाही ..मी काळानीळा व्हायच्या बेताला आलो ..आणि सर लोकांना कालचा अभ्यास घ्या म्हणून वासंतीची सुटका केली ..कशाला लिहावीत असली अवघड गाणी सावरकरांनी म्हणून जोगळेकर गुरुजीस पिडले तर त्यांनी अजून एक्स्ट्रा देशभक्ती सांगून मला पिडले ..मग मी विषय थांबवला .या प्रकरणाचा कडता आपल्या पद्धतीने काढायचा असे ठरवून मोहीम आखली . व तीस यश देखील आले ..

वासंतीसाठी केलेले हे सर्व मी शाब्दिक दृष्ट्या अत्यंत संक्षिप्त स्वरुपात वासंतीला सांगितले. आदल्या रात्री यहुदी सिनेमा पहिला असल्याने चेहऱ्यावरचे भाव माझे बरेचसे कष्ट कमी करून गेले ..वासंती खूप गोड हसली . मला आजदेखील तिचे हसणे आठवते ..व भोवताली टपटप पारिजात पडत असल्याचा भास होतो .

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घ्या तुमच्या शेपटीवर लेखकाने दणकून पाय दिल्यावर बोंबलत आहात आणि दुसर्‍यांना काय स्वॉरी बोलतात.
अवघ्या ३ कथेत "खुळ" लागले वाटते Rofl

तुमच्यासारखे मला नाहियेत १० आयडी अन आमचा एकच अवतार सुरुये इथे Wink
तरीही, मला काय झोंबल नाही ह्यात!

तुम्हीच सांगा ह्यात झोंबल्यासारखे, कोणास काय वाटेल?

कमी मोजलात की हो.
नुसते विचारले. तुम्हाला झोंबले का? नाही ना. पण तुमच्या काही विशिष्ट विचारसरणीच्या मित्रांना मात्र जोरदार झोंबले आहे. हे प्रतिसादावरून दिसून आले. आता तुम्हाला ते दिसणार नाही ही गोष्ट वेगळी Wink

घ्या. आपणच आपलं काहीही मानुन घ्यायच अन लिहीत सुटायचं Biggrin तरीही, तुम्हीच सांगा ह्यात झोंबल्यासारखे, कोणास काय वाटेल?

अगदिच टूकार आणि 3rd Class लेखन आहे.
>>

प्रसाद,

नेमकं काय टूकार न 3rd Class लेखन आहे हे आपणं लिहाल का?

“तुजसाठी जनन ते मरण ,,तुजवीण मरण ते जनन ..” हाय अल्लाह ! मोठा गहजब झाला ..भाषणाच्या वेळी कट्टर सावरकर भक्त असलेल्या प्रमुख पावण्याने या गाण्याची तयारी केलेल्या सर्व शिक्षकांची जहरी खिल्ली उडवली ..वर्तक म्याडमला शाळेतल्या फरशा पोटात घेतील तर बरे असे सीतामायीच्या दुःखाजवळ जाणारे दुःख झाले ..>> कसला हसलो... Biggrin Biggrin Biggrin