एका राजाची क्रूर कहाणी - किंग लीअर! (शेक्सपीअरच्या ४००व्या पुण्यतिथीनिमित्त)

Submitted by भास्कराचार्य on 23 April, 2016 - 01:09

विल्यम शेक्सपीअर! आजपासून बरोब्बर ४०० वर्षांपूर्वी, २३ एप्रिल १६१६ रोजी स्ट्रॅटफर्ड-अपॉन-एव्हन गावी ह्या अवलियाने अखेरचा श्वास घेतला आणि त्या एव्हन नदीला आणि त्या चिमुकल्या गावाला जगाच्या नकाशावर अजरामर करून सोडले. इंग्लिशचा हा कविकुलगुरू. त्याच्या साहित्यिक मूल्यांविषयी लिहीण्याची माझी प्रज्ञा नाही, आणि त्याच्या चरित्राविषयी लिहीण्याचा माझा अभ्यास नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल लिहील्या गेलेल्या अमाप लेखांमध्ये माझीही एक भर म्हणून गेल्या वर्षी पाहिलेल्या 'किंग लीअर' ह्या त्याच्या नाटकाच्या प्रयोगाबद्दल लिहायची इच्छा झाली.

माझी शेक्सपीअरशी ओळख तशी तारूण्यातली. वूडहाऊसला 'द फाईनेस्ट ऑथर सिन्स शेक्सपीअर' अशी पदवी काही समीक्षकांनी दिल्याचे कळाल्यापासून मी हा शेक्सपीअर 'दिसतो कसा आननी' असा विचार करायला लागलो, आणि त्याला अनेकानेक रूपांत भेटूनसुद्धा खरेतर ते मला अजून कळलेलेच नाही. त्याची नाटके वाचून वा ऐकून संपल्यावर त्या एका सन्नाट्यात काही क्षण बसलो असताना 'शब्दांवाचून कळले सारे' अशी स्थिती ह्या शब्दांच्या स्वामीबद्दलही होते. त्याचे शब्द विरून गेल्यावरही आपल्याशी बोलतात. पण तसे फक्त वाटते. कारण पुढचे नाटक, पुढची गोष्ट तयारच असते, आणि तिच्या सुरवातीलाच आपल्याला त्याची प्रतिभा नव्याने जाणवते. कुठेतरी कधीतरी शांत बसलो असताना हा अवचित आपल्याशी बोलायला लागतो, आणि 'आय अ‍ॅम नॉट व्हॉट आय अ‍ॅम' ची नव्याने जाणीव करून देतो.

शेक्सपीअरची नाटके बघायला त्यामुळेच मी फार उत्सुक असतो. खूप वेळा नाही बघता येत ती, पण जेव्हा येतात, तेव्हा भयंकर आनंद देऊन जातात. ते शब्द समोरचा नट आपल्याच डोक्यातल्या आवाजात म्हणतोय की वेगळ्या, कुणाला उद्देशून म्हणतोय, नटांची वेशभूषा ... एक ना दोन! माझ्या सुदैवाने 'कॉमनवेल्थ शेक्सपीअर कंपनी' दर उन्हाळ्यात बोस्टनच्या कॉमन्सवर एका नाटकाचा मोफत प्रयोग करते. हिरवळीवर पहुडत लोकांच्या मंत्रमुग्ध थव्यांबरोबर शाम की ठंडी हवा खाते खाते ती मजा लुटण्याचा आनंद काही वेगळाच! आता फक्त लंडनच्या थिएटरमध्ये जाऊन असा एकतरी प्रयोग बघायचा आहे, म्हणजे बकेट लिस्टवरून एक गोष्ट उडवता येईल. गेल्या वर्षी त्यांनी किंग लीअरच्या प्रयोगाची घोषणा केली आणि मी जिभल्या चाटत उन्हाळ्याची वाट बघायला लागलो. (तशीही बोस्टनकरांना उन्हाळ्याची वाट बघायला फार कारणे लागत नाहीत.)

किंग लीअर हे नाटक 'अप देअर विथ द बेस्ट' आहे. कुसुमाग्रजांमुळे मराठी माणसाला हॅम्लेट जरा जास्त माहीत असेल, पण हे नाटक माझ्या फेवरीट तीनपैकी आहे. (सर्वोत्तम स्थान हे माझ्या मनःस्थितीनुसार संगीतखुर्ची खेळत असते.) कथा आताच सांगत नाही, पण माझ्या प्रयोगाच्या वर्णनातून काही गोष्टी उघड होतील. हा स्पॉइलर अ‍ॅलर्ट समजावा.

मी बागेत पोहोचलो, तेव्हा गर्दी फार जमली नव्हती. त्यामुळे एक खांब पकडून मी पथारी पसरली. हा खांब रंगभूमीपासून जरा दूर होता, पण ध्वनियंत्रणेच्या जवळ होता. माझ्यापुढे कोणीही खाटा टाकून पसरले नसल्याची दक्षता मी घेतलेली होती, त्यामुळे दिसायला फारशी अडचण नव्हती. बागच असल्याने मुले इकडून तिकडे धावत होती, पडत होती. प्रेमी युगुलांची मध्येच कुठेतरी कुजबूज चालू होती. प्रेट्झेल-हॉटडॉगवाल्यांच्या गाड्या मस्त मैफिल जमवून बसल्या होत्या. मध्येच वारा पडला, की लोक रुमालाने वारा घेत होते. त्यामुळे मला उगाच भारताची आठवण येत होती. असा समाँ तर मोठा झकास जमला होता. हळूहळू प्रयोगाची वेळ जवळ येत गेली आणि मग प्रयोगाची घोषणा झाली. प्रेक्षकांवरचे स्पॉटलाईट्स बंद झाले आणि रंगभूमीवरचे लागले. हळूहळू बोलणी त्या संधिकालाच्या प्रकाशासारखीच मंदावत गेली आणि मग एकदम संगीत सुरू होऊन नाटकातली सगळीच पात्रे त्यांच्या प्रस्तावनेच्या संगीतिकेसारख्या गाण्यावर नाचू लागली.

मी लीअरच्या पात्राला बघायला उत्सुक होतो. ह्या राजाच्या पात्रातून शेक्सपीअर आपल्यापुढे संताप, मग्रूरी, हतबलता अशा अनेक भावभावनांचे पेले ओततो आणि आपण त्या नशेत डुंबत राहतो. हॅम्लेटसारखाच हा राजा गुंतागुंतीचा. तो भार उचलायला नटही तसाच ताकदीचा हवा. पत्रकात मी 'विल लायमन' हे नाव वाचले होते. अमेरिकेत राहणार्‍यांना 'The Most Interesting Man in the World' च्या कमर्शियलचा आवाज म्हणून हा माहीत आहे. रंगभूमीवर त्याने त्या गाण्यात पकडलेली लय पाहून मला उगाच जरा बरे वाटले. ('हा का नारद, वशाट मेलो'ची पाळी टळली!)

लीअरच्या कथासूत्राविषयी काय लिहू? ही गोष्ट आहे पालकांच्या मुलांपुढील अगतिकतेची, ही गोष्ट आहे जगात अंतर्भूत असलेल्या अन्यायाची, ही गोष्ट आहे नियतीसमोर झुकलेल्या राजाची, ही गोष्ट आहे माणसाच्या आत दडलेल्या निर्दयतेची, ही गोष्ट आहे आयुष्यात यादृच्छेने प्रत्येकालाच डसणार्‍या दु:खाची, आणि तरीही प्रत्येकाला मायेने जवळ घेणार्‍या प्रेमाचीही ही गोष्ट आहे; आणि ह्याहूनही अजून बर्‍याच कशाकशाची ही गोष्ट आहे. इंग्लिश राजा लीअरला गोनेरील, रेगन, आणि कॉर्डेलिया अशा तीन मुली. नाटकाच्या प्रारंभी तो आपले राज्य ह्या तिघींमध्ये वाटून टाकायच्या बेतात असतो. परंतु त्यानंतर त्या आपला नीट सांभाळ करतील का, असा त्याला प्रश्न पडतो. म्हणून तो त्या तिघींना बोलवून प्रत्येकीला तिचे राजावरचे प्रेम विशद करायला सांगतो. थोरल्या दोघी गोनेरील आणि रेगन आपले प्रेम वाढवून-चढवून सांगतात, परंतु तिसर्‍या कॉर्डेलियाला मात्र आपले प्रेम काही असे शब्दांत सांगता येत नाही. ती बिचारी

" Unhappy that I am, I cannot heave
My heart into my mouth. I love your majesty
According to my bond; no more nor less. "

एवढेच म्हणते. त्यामुळे रागाच्या भरात राजा तिला बेदखल करून राज्याची वाटणी इतर दोघींमध्ये करतो. ह्याचा त्या सर्वांनाच कसा फटका बसतो, ह्याची ही कथा. पण हे म्हणणे म्हणजे २००१ ची कोलकाता टेस्ट तिच्या स्कोअरबोर्डने डिफाईन करण्यासारखे आहे. ह्या कथेला राजाचे सरदार ग्लुस्टर आणि केंट, त्यांची मुले, पलीकडच्या फ्रान्सचा राजपुत्र असे अनेक पदर आहेत एवढेच सध्या म्हणतो.

आमच्या प्रयोगाची सुरूवात तर मोठ्या झोकात झाली. पहिल्या अंकात लीअरच्या प्रश्नातून त्याला वाटणारी असुरक्षितता, कॉर्डेलियाचे त्याच्यावर असणारे निरतिशय प्रेम, ग्लुस्टरच्या अनौरस एडमंडला वाटणारी चीड हे सगळे त्या नटांनी पुरेपूर दाखवले. विल लायमनचा आवाज ऐकून मी अमिताभ आणि नसीरुद्दीनची क्षमा मागून त्यांना माझ्या ऐकण्यातील सर्वोत्तम आवाज ह्या बिरुदावरून नाईलाजाने खाली उतरवले. ह्या माणसाच्या आवाजाला काही बंधच नाही. ते राजेपण त्याने आपल्या देहबोलीतून आणि आवाजातून जे दाखवले की यंव रे यंव! त्याच्या त्या दोन कारस्थानी मुली, ती भाबडी कॉर्डेलिया, " Why bastard? wherefore base? ... Why brand they us With base? with baseness? bastardy? base, base? " म्हणत आपल्या अनौरसत्वामुळे भडकलेला तो कावेबाज एडमंड ... सगळा संच अगदी तंबोर्‍याच्या तारा मनापासून जुळाव्या तसा जुळून आला होता. पहिल्या अंकाच्या शेवटी गोनेरील आणि रेगन आपले रंग हळूहळू दाखवायला लागून निवृत्त राजाला त्याचा लवाजमा कमी करायला सांगतात, ही गोष्ट दुनियेत कुठेकुठे कधीकधी घडली असेल कोणास ठाऊक!

दुसर्‍या अंकात हीच गोष्ट पुढे चालू होते. खरेतर किंग लीअरची अवस्था विषारी दात काढलेल्या नागासारखी आहे, परंतु त्याची जाणीव त्याला अजून झालेली नाही. त्यामुळे दुसरा अंकभर तो फुसफुसत राहतो. हे फुसफुसणे विल लायमनने अक्षरशः दाखवले. त्याच्या आवाजाची एक पट्टी उतरली होती, पण तरी अजून तो राजाच होता. तिकडे त्या एडमंडची ग्लुस्टर आणि त्याच्या औरस एडगरबरोबर चालू झालेली कारस्थाने शिगेस पोहोचली होती. सगळा नुसता खेळ आणि गोंधळ. तो एडमंड तर थेट ऑथेल्लोमधल्या इयागोची याद देऊन गेला. अंकाच्या शेवटी रेगनकडे आलेला लीअर गोनेरीलची तक्रार करत असतानाच ती तिथे येऊन पोहोचते आणि दोघी बहिणी मिळून राजाचा पाणउतारा करतात. हे पाहून लीअरचा संताप अनावर होतो, आणि तो म्हातारा येऊ घातलेल्या वादळाची पर्वा न करता त्याच्या विदूषकाबरोबर बाहेर पडतो. हा प्रवेश बघताना माझ्या अंगावर काटा फुलला.

" How sharper than a serpent's tooth it is
To have a thankless child! "

हे तो पहिल्याच अंकात म्हणून बसला होता. त्या रागाने आता त्याला वेडे व्हायला झाले.

" You think I'll weep
No, I'll not weep:
I have full cause of weeping; but this heart
Shall break into a hundred thousand flaws,
Or ere I'll weep. O fool, I shall go mad! "

हे तो ज्या तर्‍हेने म्हणाला, ते ऐकून धास्तावलेल्या मलाच थोडे वेडावल्यासारखे झाले, इतका मी नाटकात गुंगून गेलो होतो. O fool, I shall go mad ही पुढे घडणार्‍या घटनांची नांदीच आहे.

ह्या नाटकाच्या तिसर्‍या अंकाविषयी बरेच काही लिहीले गेले आहे. बाहेरच्या वादळात सापडलेला राजा आणि त्याच्या मनाच्या वादळात सापडलेला राजा. माणूस विरुद्ध निसर्ग, निसर्गाची माणसाबद्दल असलेली अलिप्तता, जगात न्याय आहे की नाही, अशा अनेक सूत्रांचा उहापोह ह्यात होतो. त्याविषयी फार लिहीत नाही. परंतु ह्या प्रयोगात सर्वात उच्चीची गोष्ट म्हणजे ह्या नाटकवेड्यांनी अक्षरशः ओपन एअर थिएटरमध्ये पाऊस पाडला! त्या पाण्याने चिंब झालेला किंग लीअर वेड्यासारखा जणू काळाच्याच वाटेवरून चालतोय असे वाटू लागले. त्या बार्ड ऑफ एव्हनला काय कल्पना, की ४०० वर्षांनी त्याचे प्रयोग ही माणसे वेड्यासारखी भान हरपून करत असतील! त्यातून त्यांनी धुकेही निर्माण केले होते. शेक्सपीअरच्या काळात काय करत असतील कुणास ठाऊक?! बरे, ह्या अंकानंतर मध्यांतर झाले, त्यात शांतपणे माणसे येऊन स्टेजवरील पाण्याचा निचरा करून गेली. ह्यातल्या काही नटांना मी आधीच्या वर्षांमध्ये वेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले होते. बहुधा ह्या वर्षी त्यांची ही कामे करायची पाळी असेल. एवढी निष्ठा येते कुठून?

मध्यंतरानंतर नाटक गतिमानतेने शेवटाकडे 'कन्व्हर्ज' व्हायला लागते. त्याविषयी फार लिहीत नाही. ह्या नाटकातल्या प्रत्येकच पात्राला कधीनाकधी अभिनय 'दाखवायची' संधी मिळते, आणि त्या प्रत्येक कलाकाराने ती प्रचंड ताकदीने निभावली. अगदी त्या एडगरनेसुद्धा चौथ्या अंकात स्वतःला सिद्ध केले. इतका वेळ आपण जिची 'येऊन सगळं नीट करेल हो' म्हणून मनातून वाट पाहत असतो, ती कॉर्डेलिया येते. त्या मुलीने तर वर्षानुवर्षे जीव लावलेल्या खर्‍या बापावर प्रेम करावे, तसे प्रेम त्या लीअरवर केले.

" Let this kiss
Repair those violent harms that my two sisters
Have in thy reverence made. "

म्हणताना त्या मुलीचा आवाज किती निर्व्याज थरथरला! " He wakes. Speak to him. " असे ती त्या डॉक्टरला का बरे म्हणाली असेल? स्वतः का बरे बोलली नसेल लगेच? अजूनही लीअर आपल्यावर रागावलेलाच असेल तर ह्या भीतीने?

ह्या सर्वांवर कळस चढवला तो विल लायमनने नाटकाच्या शेवटी. शेवट देत नाही, परंतु शेवटाच्या प्रसंगात त्याचा आवाज तारस्वरात सुरू होऊन जो बारीक होतो, की त्या हजारो डॉलर्सच्या स्पीकरलासुद्धा पकडता न यावा! नाटक ट्रॅजेडी आहे, आणि खरेच त्याला ऐकताना डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. थांबवताच येईना. तो प्रसंग म्हणजेच मुळी शेक्सपीअरने प्रेक्षकाच्या जखमेत घुसवून फिरवलेला चाकू आहे, आणि तो इतक्या समर्थ हातांनी आपल्या हृदयापर्यंत भिडवला, ह्याबद्दल हसावे की रडावे ते समजेना. प्रयोग संपल्यावर जवळपास पंधरा मिनीटे सलग टाळ्यांचा कडकडाट चालू होता, आणि तो संपून घरी आल्यावरसुद्धा माझ्या मनात तो चालूच होता.

शेक्सपीअरला हे नट आणि ह्या कंपन्या त्यांच्या प्रयोगातून मानवंदना देतच आहेत आणि राहतील. माझ्या मायबोलीमधून पिंडाने प्रत्येक संस्कृतीचा असलेल्या ह्या बार्डला आणि त्या कसलेल्या नटांना "बाबांनो, तुम्ही खूप दिले आहे. असेच देत राहा आणि आम्ही घेत राहू" असे सांगण्याचा हा प्रयत्न. बाकी काहीच नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाटकं बघण्यापेक्षा ती वाचणं हे माझ्यासाठी थोडं जास्त आनंददायी असते. >>> यस्स! मलापण आवडतं हे Happy

शाळकरी वयात नाटकांबद्दल फारसं कळत नसताना मी माझ्या आजोबांकडची गडकर्‍यांच्या नाटकांची सगळी पुस्तकं वाचून काढली होती. मजा यायची ते वाचायला...

अवांतराबद्दल सॉरी.

VERY GOOD

फारएण्ड, गजानन, आणि सगळेच, आता तुमचे प्रतिसाद वाचले. माझा लेख शेक्सपीअरसाठी पायरी वाटू शकते म्हणून उगाच बरे वाटले. Happy

शेक्सपीअरची नाटके वाचावीत असे अनेकदा वाटले आहे. पण मनात आजवरच्या त्यांच्याविषयी उभ्या असलेल्या भव्यतेमुळे नेमके कुठून सुरू करावे आणि आपल्याला ती पेलतील का असे वाटून ते वाचणे झाले नाही. >> गजानन, मलाही असे वाटलेले सुरवातीला, पण एकदा भाषेची लय जरा बसली की तो काही प्रॉब्लेम नाही. खूप मस्त गोष्टींसारखीच ती वाचता येतात. मराठीमध्ये तर नक्की वाचा. आणि इथे किंवा वेगळ्या लेखात सांगा कसं वाटलंय ते. Happy

नाटकं बघण्यापेक्षा ती वाचणं हे माझ्यासाठी थोडं जास्त आनंददायी असते. >>> यस्स! मलापण आवडतं हे स्मित

शाळकरी वयात नाटकांबद्दल फारसं कळत नसताना मी माझ्या आजोबांकडची गडकर्‍यांच्या नाटकांची सगळी पुस्तकं वाचून काढली होती. मजा यायची ते वाचायला... >> ललिता, अगदी अगदी. मीसुद्धा! ती शैली वाचायलाच किती मजा येते! Happy

लेख अजून वाचलेला नाही, निवांत वाचायचा म्हणून ठेवला आहे. या इव्हेंट्सविषयी कदाचित माहिती असेल तुम्हाला-

http://www.centralpark.com/events/show/3289/a-midsummer-night-s-dream

http://www.centralpark.com/events/show/3139/shakespeare-in-the-park-troi...

हो, माझा एक मित्र जाणार आहे. तुलाही जमल्यास नक्की बघ. गेल्याच आठवड्यात तो 'टेमिंग ऑफ द श्रू' बघून आला न्यूयॉर्कमध्ये. तेसुद्धा खूप सुंदर झाले असे म्हणाला.

लेख अतिशय सुंदर झालाय ! चांगलं नाटक बघण्याचा अनुभव बराच काळ मनात तसाच्या तसा रहातो !
शेक्सपिअरची नाटके आधी वाचून मग बघितली पाहिजेत असं लेख वाचून वाटलं म्हणजे मग तुम्ही म्हणता ती शब्दांची जादू थोडी तरी कळेल.

धन्यवाद पारू. <<शेक्सपिअरची नाटके आधी वाचून मग बघितली पाहिजेत असं लेख वाचून वाटलं म्हणजे मग तुम्ही म्हणता ती शब्दांची जादू थोडी तरी कळेल.>> हे मलाही वाटतं.

आज शेक्सपिअरच्या जन्मदिनानिमित्त ह्या लेखाची आठवण आली आणि वर काढावासा वाटला. Happy

फक्त ग्रेट! अक्षरक्षा: नाटक अनुभवलं तुमच्यामुळे.
>>>>>>>>>आज शेक्सपिअरच्या जन्मदिनानिमित्त ह्या लेखाची आठवण आली आणि वर काढावासा वाटला.
धन्यवाद!

Pages