आठवण

Submitted by फूल on 22 April, 2016 - 23:35

"आणि तात्या काय करतायत?" माझा नेहमीचा प्रश्न. तात्यांबद्दलची म्हणजेच माझ्या बाबांबद्दलची सगळी चौकशी आईकडेच... क्वचित कधी आई म्हणजे माझी माई कामात असेल तर तात्या फोन घेऊन फक्त, "नंतर कर... ती कामात आहे" एव्हढंच सांगतात... "तू कशी आहेस? जावई बापू मजेत ना?" एव्हढं तोंडदेखलं विचारतात... यापलिकडे संभाषण नाही...

तसंही तात्या म्हणजे जमदग्निच... आता वयानुसार थोडे वरमलेत पण तरी त्यांच्याशी थेट जाऊन काही बोलावं, सांगावं असं अजूनही धैर्य होत नाही... सगळा संवाद माई मार्फतच...

आजही मी तसाच नेहमीचा प्रश्न विचारला... हा प्रश्न आला की नवऱ्यालाही कळतं आता पाचएक मिनीटात फोन संपणार.... कारण या प्रश्नापर्यंत माईचं नी माझं सगळं एकमेकिंना सांगून झालेलं असतं.. मग तात्यांची मोघम चौकशी... तब्ब्येतीची काळजी घेण्याबद्दल एकमेकिंना सल्ला आणि बोलू उद्या असं म्हणत फोन संपतो...

पण आज काहीतरी वेगळं घडलं... माईने सोडलेला नि:श्वास मला इथवर ऐकू आला... "काय गं काय झालं?" "काही विचारू नकोस बाई... अनेक दिवस सांगेन सांगेन म्हणतेय धीर करवत नव्हता आज हे नाहीयेत तसं बोलून घेते... अगं वाडा पाडायचं ठरतंय ना... मग नवीन ब्लाकात एवढी कुठली जागा? आपलं सामान हे एव्हढं... कसं मावायचं त्यात... जुनं बरंचसं टाकावं नाहीतर भंगारात द्यावं लागणार... इथवर ठीक आहे गो पण हे तर सगळंच टाकायला निघालेत... माळ्यावरची सगळी गाठोडी, माजघरातले जुने पेटारे सगळं वरच्या सदरेत घेऊन बसतात हल्ली... मला आणि राघोबाला वर जायला बंदी आहे..."

"काय सांगतेस माई... अगं माजघरातल्या पेटाऱ्यामधे मी माझं सगळं सामान बांधून ठेवून गेले होते इथे सिडनीत यायच्या आधी... अगं लहानपणीच्या कित्ती गोष्टी आहेत त्यात आठवतंय नं तुला? त्यात माझे बाहुला-बाहुली, त्यांच्या लग्नात घालायला म्हणून आज्जीने स्वत: ओवलेले दागिने... तात्यांनी फेकून देता देता त्यातल्या त्यात निवडून ठेवलेले अगदी अनोखे शिंपले... आठवतंय नं... शिवाय आज्जी-आजोबांच्याही जुन्या जुन्या गोष्टी आहेत त्यात... पितळी अँटिक म्हणवता येतील अश्या... तो त्यांचा नक्षीदार पितळी अडकित्ता तसा कुठेच बघितला नाही मी परत... आता हे सगळं तात्यांच्या हातात गेलं म्हणजे काही खरं नाही..."

"खरेच की गो... माझंही हे असलंच काही बाही आहे त्यात... सासूबाईंनी तुला आणि राघोबाला पहिल्यांदा अंघोळ घातली ते घंगाळं आठवतंय? नातवंडांसाठी जपून ठेवायचं ठरवलं होतं मी.. तुमची लहानपणीची आज्जीने भरलेली दुपटी, झबली... सगळं सगळं आहे त्यात... तुमचे लहान असतानाचे चांदिचे वाळे... चांदीच्या दागिन्यांची ती सासूबाईंची शिसवी पेटी आठवतेय नं.. अगदी तुम्ही लहान असतानाचे चांदीचे कडदोरे आणि आत्ता तुझ्या लग्नातली जोडवी... सगळं त्यातच आहे बाई... अजून चिक्कार आहे सगळंच नाही आठवत आता... मी काढून बसणारच होते एकदा सगळं... पण त्याच्या आधीच यांनी ते काम हातात घेतलंय..."

"मधे राघोबाने दोन-तीनदा सुचवून पाहिलं की एकट्याने एवढं सामान उपसत बसू नका माईला घ्या जरा सोबतीला... वर सदरेत त्यांच्याबरोबर जाऊन बसले तर त्यांची बोलणी खात का हॊइना चार गोष्टी काढून तरी ठेवेन गो... इथे खाली बसून काहीच सुचेना..."

मला काय बोलावं ते सुचेना... तात्यांशी कुणी आणि कसं बोलायचं... "जाऊ दे करू काहीतरी..." असं मोघमच बोलून मी फोन कसा बसा ठेवला... गळ्याशी दाटून आलेला हुंदका माईसमोर कसा बसा आवरला होता... तो आता फुटला... ५-१० मिनीटं ओक्साबोक्षी रडले... काय हक्क आहे तात्यांना आम्हाला न विचारता आम्ही जपलेल्या गोष्टींची अशी विल्हेवाट लावायचा... आजवर खूप ऐकून घेतलं... माई तर गरिब गायच.. तात्या म्हणतील तस्सं केलं अगदी सगळंच... पण आता कुणीतरी बोलायलाच हवं किती दिवस आपण तरी घाबरून राहणार... रघूदादाला तरी तोंड उघडून बोलायला काय होतं... पुरुषासारखा पुरूष पण तात्यांना घाबरतोच... अर्थात हे देसाई खानदानातच आहे... तात्या पण आजोबांना अस्सेच घाबरायचे... आणि रघूदादाची मुलंही त्याला अश्शीच घाबरणार...

किती जिवापाड जपलेल्या गोष्टी अश्या चोरापोरी जाऊ द्यायच्या... एकतर वाडा पाडतायत... तो सल कधीच भरून निघणार नाही...

किती सुंदर वाडा आहे आमचा... पणजोबांनी अगदी हौसेने पेशव्यांच्या स्थापत्यशास्त्रकाराकडून बांधून घेतलेला... श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यापासून अवघ्या ५ मिनीटावर... समुद्र किनारा मला कधीच पारखा नव्हता... लाटांच्या आवाजात झोपायची जणू सवयच लागलेली लहानपणापासून... सिडनीतलं घर तर आमच्या वाड्यापुढे इवलंसच... इथे माणसांपेक्षा भिंतीच जास्त...

याऊलट आमचा देसायांचा वाडा... दोन चौंकांचा भला मोठ्ठा वाडा... पहिला चौक बाहेरच्या लोकांसाठी आल्यागेल्यांसाठी... चौकाच्या दोन्ही बाजूला दोन कचेऱ्या पणजोबांचे कारकून बसायचे तिथे... त्याच्याच बाजूला देवघर... मग एक चिंचोळं दार... त्याच्या दोन्ही बाजूला माडीवर जायचे लाकडी जिने... पुढे डाव्या हाताला माजघर आणि मग दुसरा चौक तुळशी वृंदावनाचा... त्याच्या सभोवताली स्वयंपाकघर, जेवणघर आणि अश्याच दोन तीन खोल्या.. वर सगळ्यांच्या झोपायच्या खोल्या... आणि मधोमध एक मोठ्ठी सदर... तिथे मी लहान असताना अनेक बुवांची भजनं, किर्तनं, नाटकाच्या तालमी असं बरंच काही व्हायचं... दुसऱ्या चौकात एका कोपऱ्यात हौद आणि तिथेच न्हाणीघर... मागे धान्याचं कोठार... कोठारात उतरायला लाकडी शिडी आणि प्रकाशासाठी म्हणून पितळी कंदिल... मी आजोबांबरोबर कित्येकदा कोठार उतरलेय... सदैव तांदूळाने भरलेलं असायचं... आज्जी आम्हा नातवंडांसाठी म्हणून कोठारातले तांदूळ देऊन गहू विकत घ्यायची... आजोबा प्रचंड संतापायचे... घरचं सोनं विकून लोखंड घ्यायचे धंदे... त्यांच्या हयातीत हा वाडा पाडायचं ठरलं असतं तर त्यांनी सगळा वाडाच डोक्यावर घेतला असता...

इतका सुंदर आणि भव्य वाडा... तो आता "आहे" चा "होता" होणार हेच दु:ख अनावर आहे... आणि त्यात तात्यांचं हे असं...

कोकणातली सगळीच माणसं अशीच... समुद्र किनारे विशाल आहेत... नारळी, पोफळीच्या बागांची निसर्गाने लयलूट केलीये पण नारळ, फणस, पोफळी सगळंच बाहेरून टणक... आतला गोडवा चाखायचा म्हणजे प्रचंड मेहनत घ्यावी लागणार...

मीच हून धाडस करायचं ठरवलं... ऐकत नाहीत म्हणजे काय? मीपण तुमचीच लेक आहे म्हणावं... तुम्हाला काही आधिकार नाही आमच्या भावनांशी असं खेळायचा... अनावश्यक वस्तू द्याच की टाकून पण आमच्या आठवणी... आज्जीच्या आजोबांच्या आठवणी... त्यांनी जोडलेली आयुष्यभराची पुंजी... अशी भंगारात विकणं म्हणजे आमच्या भावनांचा अपमान आहे...

दुसऱ्याच दिवशी घरी फोन केला... अनायासे तात्याच आले फोनवर... माझा आवाज ऐकला आणि "अगं ए, लेकीचा फोन आलाय... बघतेस का?" असं म्हणून माईला हाळी दिली... मी तात्यांना सगळा धीर एकवटून सांगितलं... म्हटलं... "मला तुमच्याशीच बोलायचंय..." "बोल" एव्हढंच ते म्हणाले... आणि ऊतू जाणाऱ्या दुधावर फुंकर मारावी असं झालं... मी तात्यांना एव्हढंच विचारू शकले... "तात्या, त्या सामानाचं काय?" तात्या त्यांच्या नेहमीच्या थंड आणि जरब असलेल्या आवजात एकच वाक्य म्हणाले... "घे, माईशी बोल" ते ऐकलं मात्र आणि मी फोनच कट केला... असं काय करतात तात्या... माझ्या बालपणाचा बाजार मांडायला निघालेत आणि त्याबद्दल एकही शब्द ऐकून घेण्याची तयारी नाही... माझा प्रचंड संताप संताप झाला... मनातल्या मनात आत्तापर्यंत घोकलेल्या स्वगतांची पुन्हा उजळणी झाली... पण आता दु:ख याचं जास्त होतं की मी त्यांच्याशी बोलू शकले नाही... माझ्या सख्ख्या वडिलांशी संवाद नाही...

दुसऱ्याच दिवशी माझा वाढदिवस होता... पण एकूणच सगळं वातावरण निराशामय होतं... वाढदिवसही आहे आणि त्यात माझी ही परिस्थिती बघून नवऱ्याने मुद्दामच त्यादिवशी रजा टाकली... मलाही बरं वाटलं.. दुपारी जेवून असंच गप्पा मारत आडवे झालो होतो... तेव्हा दारावरची बेल वाजली... बघितलं तर नवऱ्याच्या नावे कुरीअर... श्रीवर्धन हून आलंय... मीही उत्सुकतेने बघायला लागले...

आतमध्ये एक खोकं... त्यात परीट घडीचं एक रेशमी वस्त्र... मी ओळखलं अश्या आखीव रेखीव घड्या फक्त तात्याच घालू शकतात... आणि त्याबरोबर एक बाहुला... मी लहानपणी बाहुला-बाहुलीचं लग्न लावायचे त्यातला बाहुला आणि ते रेशमी वस्त्र म्हणजे आमचा आंतरपाट... सोबत तात्यांच्याच अक्षरातलं पत्र... अगदी तात्यांच्याच पध्दतीने घडी घातलेलं... या सगळ्या प्रकारात माईच्या अस्तित्त्वाची एकही खूण नव्हती... नवऱ्याने पत्राच्या पहिल्या दोन ओळी वाचल्या आणि ते माझ्याच हातात दिलं...

पत्रही जावई-बापूंच्या नावाने...
आमचं सुख तुम्ही सिडनीला घेऊन गेलात... पण त्या सुखाचे काही कण या वाड्यात सांडलेत... हा बाहुलाही त्यातलाच... ते सगळे कण एकवटून ज्याचे त्याला परत करावे असं मनात आहे... तेव्हा लेकीच्या वस्तू तुमच्या कल्याणच्या रिकाम्या घरात ठेवण्याची व्यवस्था करतोय... अर्थात तुमची परवानगी असेल तर... शक्य असतं तर हा वाडाच नवीन घरात घेऊन गेलो असतो हो.. पण माझी अपुरी ओंजळ तुम्ही जाणताच... वाढदिवसासाठी कधी भेट दिली नाही आमच्या लेकीला... ती उणीव तुम्ही भरून काढता आहात हे समजते... पण ही भेट अधिक मोलाची ठरेल असे वाटते... बाहुली मात्र ठेवून घेतोय... लेकीचं बालपण जपल्याचा तेव्हढाच आपला आभास...

पुढली अक्षरं पुसट होत गेली... ही बापमाणसं अशीच असायची... पोटातली माया ओठावर आली की आपण चिंब भिजून जायचं...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी सकाळी डोळ्यातुन पाणी काढलत. मस्त आहे. काही माणस अगदी फणसासारखी असतात, वरुन पहाणार्‍याला त्यांचे काटेच दिसतात नेहमी आणि एकदाच केव्हातरी त्यांच अंतरंग बघायला मिळत तेव्हा गेलेल्या भुतकाळाचा आणि उरलेल्या आयुष्यभराचा गोडवा एकदम मिळुन जातो.

पुढली अक्षरं पुसट होत गेली... ही बापमाणसं अशीच असायची... पोटातली माया ओठावर आली की आपण चिंब भिजून जायचं... >>> इथली अक्षरे पण पुसट होत गेली. छान लिहिले आहे.

पुढली अक्षरं पुसट होत गेली... ही बापमाणसं अशीच असायची... पोटातली माया ओठावर आली की आपण चिंब भिजून जायचं... >>>>>> किती हळुवार लिहिलंय .... केवळ बाप लिखाण ....

शेवट वाचताना डोळ्यांत पाणी कधी आलं कळलंच नाही. >>>>>>+१११११११११

पुढली अक्षरं पुसट होत गेली... ही बापमाणसं अशीच असायची... पोटातली माया ओठावर आली की आपण चिंब भिजून जायचं... >>> इथली अक्षरे पण पुसट होत गेली. छान लिहिले आहे.>>>+१००

Pages