सुध्या

Submitted by satishb03 on 21 April, 2016 - 15:05

वस्तीतला सुद्या म्हातारा झालाय. आता रोज साडी घालत नाही, दाढीही रोज करत नाही. गालावर पांढरे खुंट दिसतात. गरीब गरीब वाटतो .सुद्या म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी येऊन आमच्या वस्तीत स्थिरावलेला. गोरापान उंचापुरा, देखना तरतरीत हिजडा.
आमच्या कित्येकांच्या ह्यानं टाळु भरलेल्या, ढुंगणं धुतलेली, पायावर घेऊन आंघोळी घातलेल्या. काखेत घेऊन जोगवा मागितलेला. वस्तीतल्या समवयस्क बाप्यांसाठी कायम चेष्टेचा विषय.
पण बायकात इज्जत भारी. दारु पिऊन मारझोड होणार्या बायांसाठी सुद्या म्हणजे दांडगा आधार. नवराबायकोच्या भांडणात थेट मधे पडुन बाई वाचवणे. वेळप्रसंगी पुरुषाच्या गोट्या आवळणे.हे अत्यंत आवडीचे छंद. दारुड्या पुरुषाला नामोहरम करण्यात जबरी हातखंडा. वर दुसर्यादिवशी हाणलेल्या पुरुषाला वीस रुपयाचा हातभट्टी मलम. म्हणजे बायकोला मारणार नाही या कबुली जबाबावर दिलेली वीसची नोट. नकळत्या वयातच आम्हा पोरांना त्याला काय म्हणावं हा प्रश्न पडलेला मावशी का काका ? सुद्या हेच कुणी न देता मिळालेलं थेट उत्तर.
वस्तीत गेलं कि हा डायरेक्ट जवळ ओढतो. आकाळावरुन बोटे फिरवुन कडकड मोडतो.गालाचा मुका घेतो. कौतुकाने डोळे भरुन पाहतो. गालावरच्या मुक्याचा, गोव्या माव्याचा ओला वास पुसला तर दटावतो सुद्धा! हितंच जेवतोस का आज ? आणु का पार्सल म्हणुन खरा आग्रह धरतो.
तर हा एक दिवस काँलेजमधे आला. स्टाफरुममधे बसुन राह्यला माझी वाट पाहत. मी गेलो त्याला पाहिल्याबरोबर पोटात गोळाच आला माझ्या .त्याच्या अडाणी मायेचा आदर करुनही, हा मुका घ्यायचा कार्यक्रम करतो कि काय ही दहशत बसली. त्याला दारातुनच म्हटलं, चल बाहेर जाऊन बोलु. गडी आज धोतरात होता ही एक समाधानाची बाब.
म्हटला चल लौकर. पोलीसचवकीत जायचय. वस्तीतली पाशा चाचाची शबाना पळुन गेलीय मनुहार आबाच्या शंकर्या बर. आन चाचा कुणाचीबी नावं घिऊन पोरं डांबायलाय. मी मधे पडले तर भाड्यानं मलाबी मारलंय. चवकीत तुझ्या वळकीचं कोण कि हाय म्हणं, तर तिथं यिऊन सांग. आमाला काय ठावं न्हाई उगं त्रास दिउ नका म्हणावं.
वस्तीतली शबाना म्हणजे दहावी फेल आँक्रेस्ट्रात नाचणारी चुणचुणीत मुलगी. उर्मिला मातोंडकरची गावठी काँपी. आणि शंकरराव म्हणजे काळाठिक्कर दिपक शिर्केचा डुप्लीकेट. वस्तीतलं त्याचं टोपन नाव वडर. त्याला हे नाव घरातनंच भेटलय. वस्तीनं फक्त पुढे चालवलं. शंकर राव बारावी नापास. ऎन परीक्षेत ह्याचा बाप वारला आणि ह्याची परीक्षा बुडली. पुन्हा परीक्षा द्यावी वाटलीच नाही ह्याला.कामात बुडाला. आता प्लंबरच काम करतोय. याआधी डमी बसायचा. ह्यानं हुशारीचं वितरण बारावीच्या पोरात दोन तीन वर्ष नेमानं केलं. नंतर एच एस सी बोर्डानं ह्याच्या हुशारी वितरण उद्योगाला आळा घातला.झटका बसला. गडी सुतासारखा सरळ झाला.
शबाना आणि शंकरची मोहब्बत शाहिद करीनाच्या जब वी मेट पासुन वस्तीच्या ध्यानात आलेली .स्टार प्लसवर पिक्चर चालु असताना वस्तीतल्या बोळात, अत्यंत हिरवट दत्तुबप्पाला ही जोडी दिसली आणि आजतक चँनलच्या जलद माहिती प्रसारण कार्यप्रणालीला लाजवेल, अशा विद्युत वेगात बातमी वस्तीत पसरली.
दोघांना दोन्ही पार्ट्यांनी जाम ठोकलं. आता असं ही कळलय, आन् तसंही कळलय तर करा काय करायचंय ते, असं म्हणुन, जाम चेकाळुन त्यांचं एकमेकांवर प्यार जाहिर करणं चालु झालं. पाशा चाच्यानं मोबाईलचे फंक्शन शिकुन घेऊन शबानाला मोबाईल हँड पकडण्याचा धडाका लावला. शंकरच्या मुस्काटफोडीचे किस्से वारंवार घडु लागले. अधे मधे माझ्या कानावर येऊ लागले. पण पठ्ठ्या पळुन जाईल असे काही वाटत नव्हते. मी सद्याला तात्कालिक कारण विचारत होतो. तो काही ते नीट सांगत नव्हता. त्यांच्या निघुन जाण्याने वस्तीतलं बदललेलं वातावरण सांगण्यावर त्याचा भर. शबानाची आम्मी झिंज्या तोडु तोडु घ्यायलीय. पोरीला लैच नकु नकु केलं होतं.रागं त्येगं जीवच देते म्हणली. मी लै समजीवलं. पण पोरीनं आकरीला करायचं तीच केलं. शंकर्याच्या मायची दातखीळ सारखी बसायलीय. लै मुसलमानाची लोकं यिऊ यिऊ तिला ढोसायल्यात.आन् ह्यो भाड्या मोबाईल बंद करुन कुठं भोकात जाऊन बसलाय. वगैरे वगैरे..
सुद्याची बडबड ऎकत पोलीस चौकीत पोचलो.
पी.एस.आय माझ्या एका विद्यार्थिनीचे वडील. गेल्याबरोबर बसायला सांगीतलं. चहा मागवला. त्यांना विनंती केली. दोघं सज्ञान आहेत. दोन दिवसात येतील. बाकीच्या पोरांना. त्रास देण्यात काही पाँईँट नाही. साहेबांनी ऎकलं. पोरांना परत बोलावुन दम दिला अन् सोडलं. सुद्या हे बघुन हरकला आमच्या चर्चेत खड्या बायकी आवाजात भाग घेऊ. लागला. साहेब म्हणाले ही पोरं मूर्ख आहेत का ? मला येऊन भेटायचं. त्यांचं रक्षण करणं ही कायद्यानं माझी जबाबदारी आहे. उद्या पोरगी पलटली तर कायद्याच्या विचित्र कचाट्यात अडकेल तो पोरगा.
या हिजड्याशी ओळख कशी हे साहेबाने मला विचारलं. मी सांगणार. एवढ्यात सुद्या मधे बोलला. सायेब लगीन लावून देचाल का लेकरांचं. साहेब म्हणाले हो हो पण ते माझ्याकडे आले तं पाहिजेत ? सुद्या त्यांना म्हटला दोनच दिवसात त्यांला हितं आणतो सायेब. साहेब साहेबी थाटात हसले. दोन हवालदाराला बोलावलं. सुद्याला उभं केलं आणि रक्त पडेपर्यंत मारलं. भोसडीच्या बोल कुठं आहेत ते ? सुद्या कावरा बावरा झाला. या हल्ल्याने ढेपाळला. आपल्या बरोबर हे अचानक काय कसं स्वतःलाच कळायच्या आत पत्ता सांगून मोकळा झाला. मी मध्ये पडत होतो सुद्याची ओळख सांगत होतो. साहेब ऎकूण घेत नव्हते. जबरी गालीगलोच करत होते. मला सांगत होते. हे भडवे पोरींना फुस लाऊन धंद्याला लावतात.
तुम्हाला कल्पना नाही याची. आम्हाला खुप डेँजर अनुभव येतात सर. तुम्ही बघत रहा कसं कबुल करुन घेतो भडव्या कडुन.
तुम्ही या आता मी सगळं हँण्डल करतो. एव्हाना रिक्षा आला होता. सुद्याला रिक्षात घातलं दोन हवालदार त्याला मधे घेऊन बसले. रक्त भरल्या तोंडाने सुद्या माझ्याकडे पाहत होता. माझ्या डोळ्यातलं पाणी फक्त त्यालाच दिसलं होतं. क्षीणपणे हसला रिक्षा हालली. मला दिलेला आदर आणि पाजलेला चहा कुणाच्या गांडीत घालायचा या विचारात मी चौकीतुन बाहेर पडलो. पोरांना बळकट करायचं ही खुणगाठ मनाशी बांधुन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ढिम्म समाज, पोलीस, प्रशासन , कायदा यात पिळवटून निघणा-या वस्त्यांचे ढवळून टाकणारे यथार्थ चित्रण. सुन्न करायला लावणा-या कथा. यातली पात्रं सुरक्षित जगाला ठाऊक देखील नसतील..

ढिम्म समाज, पोलीस, प्रशासन , कायदा यात पिळवटून निघणा-या वस्त्यांचे ढवळून टाकणारे यथार्थ चित्रण. सुन्न करायला लावणा-या कथा. यातली पात्रं सुरक्षित जगाला ठाऊक देखील नसतील..<<<<<<+१११११