गौताळाच्या मुलुखात !

Submitted by योगेश आहिरराव on 21 April, 2016 - 03:39

गौताळाच्या मुलुखात

भाग १

भाग २ - किल्ले सुतोंडा, अंतुर आणि लोंझा.

सकाळी सकाळी जाग आली ती मंदिरात पुजारींनी केलेल्या शंखनादाने वाह.

दिवसाची सुरूवातच चांगली झाली. बनोटी गावच्या वेशीवर हिवरा नदीच्या काठावर हे सुंदर अमृतेश्वर मंदिर. सकाळच्या त्या वातावरणात तो शांत मंदिर परिसर मला तर चांगलाच भावला.

मंदिराजवळचे पाण्याचे कुंड. सर्व सोपस्कार आटोपून नाश्ता करायला शिरसाठांच्या खानावळीत गेलो, गरमागरम स्वादिष्ट पोहे पोटभर खाऊन झाल्यावर दुपारच्या १ वाजेपर्यंत जेवणाला येतो असे सांगून, पुढे अर्थातच किल्ले सुतोंडा आमची वाट पहात होता. सुतोंडासाठी बनोटीहून ३ ते ४ किमी अतंरावर असलेल्या पायथ्याच्या नायगाव या गावात जावे लागते. बनोटीतून जाणारा वाडी नायगाव रस्त्याचे काम सुरू असल्याकारणाने गाडी गावातच उभी करून शेतातल्या मधल्या रस्त्याने पायी निघालो.

मातीच्या कच्चा रस्ता आजुबाजूला शेतजमीन आणि केळीच्या बागा. गावाच्या अलीकडेच मारूतीचा पार.

तासाभरात नायगावात पोहचतो तर लगेच समोरून भोला सोनावणेचा फोन, त्याला निघताना सांगितले होते त्या प्रमाणे तो आमच्या सोबत किल्ला दाखवायला येणार होता. गावात शिरल्यावर भोलाशी भेट झाली. पाणी पिऊन किल्ल्याच्या दिशेने निघालो.

झाडीभरला सुतोंडा

किल्ल्याच्या उजवीकडून सरळ चढाईला सुरूवात केली. घसारायुक्त वाटेने अर्ध्या तासात चोरदरवाजातून प्रवेश केला.

अलीकडेच हे भंगलेल हत्ती शिल्प दिसले.

पुढे उजवीकडे जाताना काही पीर थडगी, कमानवजा ईमारत.

तसेच पाण्याच्या टाक्यांची मालिका.

काही कोरड्या तर काही काठोकाठ भरलेल्या.
आठ खाबांचे खांब टाके.

पुढे सामोरे आले हे तुटलेले खांब असलेले हे स्वच्छ आणि नितळ पाण्याचे टाके

इथे तर बराच वेळ रेंगाळलो पुन्हा कधी तरी याच जागी नक्कीच तंबू ठोकून मुक्काम करू असे ठरवले. सोबत आणलेला सुका खाऊ फस्त करून किल्ल्याच मुख्य आकर्षण असलेल्या भुयारी दरवाजाकडे निघालो.

खऱच त्या दुर्ग निर्मात्याचे कौशल्य मानावे लागेल, कातळ फोडून तयार केलेला हा दरवाजा तर लाजवाब. वर तटबंदीत शरभ शिल्प दिसते.

पुन्हा आल्यामार्गे उतरायला सुरूवात केली थोडे खाली आल्यावर भोलाने उजवीकडे वळायला सांगितले, हिच काट्याकुट्यातली, घसरडी वाट दहा मिनिटात जोगणमाईच्या लेण्यापाशी घेऊन गेली. आतमध्ये बाळाला मांडीवर घेतलेली स्त्रीची मुर्ती आहे.

लेणीची अवस्था फारच वाईट आजुबाजूला वाढलेली झाडी, आत वटवाघळांचे साम्राज्य .जोगणमाईच्या लेण्यापासून पुढे आणखी एक लेण आहे. त्यात हे दर्शनी खांब चांगलेच नजरेत भरतात

पण या लेणीतही प्रचंड अस्ताव्यस्तता. खरोखऱच एवढा सुंदर किल्ला तेवढीच दुर्लक्षित ही लेणी. वेळ पटापट जात होता. खाली उतरून नायगावातली झाडाखाली असलेली विष्णुमुर्ती पाहिली.

भोलाचे आभारप्रदर्शन करून, भर उन्हात ऑक्टोबर हिटचा तडका जाणवला, घामाने चिंब भिजून पुन्हा पायी पायी त्याच वाटेने बनोटीत आलो. दुपारचे दोन वाजले होते ठरल्यावेळेनुसार एक तास उशीर शिरसाट आमची वाटच पहात होते. वरण भात, कोबीची भाजी चपाती दही आणि शेवटी ताक असे दुपारचे मस्त जेवण करून अगत्यशिल शिरसाठांचा निरोप घेण्याची वेळ आली. नियोजनानुसार सायंकाळच्या आत आम्हाला अंतुर किल्ल्यावर पोहचायचे होते. आमचा आजचा मार्ग.

भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास आम्ही बनोटी सोडले. गाडीचा बॉयलर झाला होता. ए सी ची पॉवर चांगलीच आजमावता आली. त्यात बनोटी ते नागद रस्ता तर कहरच, गाडीचा खुळखुळा होतोय की काय अशी शंका मला यायला लागली. अक्षरश: एक ते दिड तास नागद पोहचायला लागले. नागद ते सायगव्हाण तो रस्ता पण यथातथाच,चांगल्या रस्त्याची कुठे आशाच नव्हती. या रस्त्याच्या डावीकडे गौताळा अभयारण्याची अजिंठा डोंगररांग समांतर धावत होती. डावीकडे मुख्य रांगेत अंतुर सहज ओळखता आला. पण तिथे आम्ही या रांगेतला औट्रम घाट चढून नागापूर खोलापूर मार्गे जाणार होतो.
सायगव्हाणहून डावीकडे औट्रम घाटाकडे वळून अधिकृतरित्या गौताळा अभयारण्यात प्रवेश केला.

१०-१२ किमी चा बरेच वळणावळणाचा तो घाट, समोरून गाववाले बाईकवाले तर थेट अंगावर गाडी घालत, काही महाभाग तर बायका पोरांसोबत इंजिन बंद करून तो तीव्र उताराच घाट सुसाट उतरत होते. शेवटी शेवटी तर, मलाच गाडी चालवत चक्कर येईल की काय असे वाटत होते.

घाट चढून आल्यावर हि वन विभागाची पाटी.
अलीकडे गाडी थांबवून आम्ही पण फोटू काढला.

अभयारण्यातले जंगल बर्यापैकी टिकून आहे, डावीकडे सीताखोरी धबधब्याचा पॉईंट होता, उद्या येताना पाहू असे म्हणून पुढे निघालो. वळणदार जंगलातल्या रस्त्यानंतर काही वेळातच पठारावर छोटी खेडी पार करत डावीकडे अंतुर किल्ल्याची पाटी दिसली. पाटीचा रंग फिक्कट असल्याकारणाने फोटो नाही घेता आला. आता मात्र कच्चा रस्ता लागला.

गौताळाचा स्वामी किल्ले अंतुर
घड्याळात पाहिले तर साडेपाच वाजले होते. २-३ किमी अंतरावर नागापूर हे छोटेखानी खेडं लागल. परत तो ओबडधोबड खरबडीत कच्चा रस्ता पार करत हळुहळु पुढे जातोच तर एक पाण्याचा एक ओढा सामोरा आला. आता मात्र खरी पंचाईत झाली. आधीच हा मातीचा कच्चा रस्ता त्यात मध्ये हा प्रकार.

सायंकाळ होत आलेली मुक्कामाला काहीही करून अंतुर गाठायचाच होता. मागे राहिलेले नागापूर गावातही मुक्कामाची काहिच सोय नाही. बरं इथे या अश्या अरूंद रस्त्यात गाडी ठेवणार तरी कुठे. बरं गाडी पाण्यात घातली समजा फसली तर काय मदत आख्खी रात्र इथेच काढावी लागेल. मला तर दुरदुर पर्यंत अंतुर कुठेच दिसत नव्हता. एक वेगळेच निराशेचे मानसिक मळभ माझ्यावर दाटून आले. तो पर्यंतअंकल लागलीच गाडीतून उतरून एक काठी सोबत घेऊन त्या पाण्यातून सरळ चालत गेले. अंकल पलीकडे गेल्यावर मला जरा हायसे वाटले. ते मला म्हणाले, " कुछ नही है जादा डीप नही है!’’
मी : “ अंकल, नीचे का रस्ता कैसा है ? ’’
(कारण पाण्याखाली चिख्खल, दगड धोंडे असतील तर गाडी कशी पास होईल.)
अंकल: “ कुछ नही होगा, मै खुद पानीमे चलके आया से आया हू ! जादा सोचो मत, तुम गाडी निकाल पाओगे!’’
खऱच अंकलचे बोल ऐकून मला जरा बरे वाटले, एव्हाना मिलिंद पण त्या ओढ्यातून पलीकडे आरामात चालत गेला. विवेक पण गाडीच्या बाहेर ओढ्याच्या सुरूवातीला उभा होता.
चला जे होईल ते चांगलेच होईल, असे मनाशी बोलत. मी एकटाच गाडीत बसलो. किंचित काचा खाली घेतल्या. पहिल्या गिअरवर गाडी रेस करत डायरेक्ट पाण्यात घालून, प्रचंड फवारा उडवून गाडी पलीकडे नेली.
आधीच रस्त्याची कृपा त्यात गाडी फर्स्ट- सेंकड करत बरीच गरम झालेली. थोडेफार पाणी बोनट च्या आत गेले असनार, गाडीतून वाफा यायला लागल्या. थोडा वेळ व्यवस्थित सर्व तपासून पुढच्या मार्गाला लागलो. आता पूर्ण रस्ता कच्चा आणि विरळ जंगलातून होता. एके ठिकाणी भला मोठा चढ आणि मध्ये फक्त दगडी, रस्ता? होता की काय हि शंका. लगेच बाकीच्यांना उतरून गाडीच्या बॉटम चा अंदाज घेत हळूच गाडी वर घेतली. बराच वेळ झाला तरी किल्ल्याचे दर्शन काही होत नव्हते. सुर्य पश्चिमेकडे झुकला होता. डोंगराला वळसा घालून डावीकडे वळालो तेव्हा उजवीकडे दरी आणि समोर दुरवर आमचा आजचा अंतुर दिसला.

हळूहळू वाट थोडी चढणीला लागून पुढे सरकत होती. सावकाश गाडी हाकत एकदाचे वनविभागाच्या चौकीपाशी पोहचलो. नीट निरखुन पाहिले तर पुढे अगदी किल्ल्याजवळ दुसरी एक चौकी होती. मग काय तिथपर्यंत गाडी नेली. एव्हाना सुर्यास्त झाला होता.

(फोटोत गाडी उभी केली त्या ठिकाणाहून उजवीकडे अंतुर किल्ल्याचा बुरूज स्पष्ट दिसतोय.)
गाडी व्यवस्थित उभी करून, मुक्कामाचा लवाजमा घेऊन निघालो. संधी प्रकाशात पटापट क्रॉंक्रिटच्या वाटेने पायरा चढून गडाचे बुलंद दरवाजे पार करून २० मिनिटात गडावर प्रवेश केला. वर आल्यावर देवडी दिसली. पुढे जाताच तलाव त्यालागूनच असलेला दर्गा दिसला. दर्गात जाऊन पाहिले तर नुकतेच रंगकाम केलेले असल्याकारणाने इतर कचरा पडलेला होता. त्यामुळे दर्ग्यात मुक्काम शक्य नव्हता. मग आता अंधुक प्रकाशात मुक्कामी जागा शोधणे अवघडच, बरं परत मागे येऊन देवडीत मुक्काम करावा तर पिण्याचे पाणी जवळ नाही. तलावाचे पाणी तर पिण्यासाठी अशक्यच. त्यात मग ओंकारला फोन करून चर्चा केली, त्याने कड्यावरची पाण्याच्या टाक्याजवळची जागा सुचवली. त्यानुसार दर्गा आणि उजवीकडील बाजूची इमारत या मधून सरळ जात. थोडे कड्याच्या दिशेने खाली उतरलो, पुढे वळून थेट पाण्याच्या टाक्याजवळच आलो. कड्याची तटबंदी आणि टाके यामधल्या मोकळ्या मस्त जागेवर तंबू ठोकला.

आत्ता या क्षणी तरी सर्व चिंता मिटली होती, दिवसभराची दगदग आणि ड्रायव्हिंग त्यामुळे आलेला क्षीण त्यावेळी मस्तपैकी तयार केलेल्या मनच्यॉव सुप मुळे कुठच्या कुठे गेला.

तंबू ची जागा खुपच रमनीय होती, जवळच टाक्यातले पिण्यायोग्य पाणी, बाजूलाच तटबंदी सारखे संरक्षक कठडे. पलीकडे औट्रम घाटाच्या बाजूची दरी आणि दुरवर खाली उद्याचा लोंझा किल्ला. शेफ असलेल्या विवेक ने तर आज शाही मेनू तयार केला होता. ‘दावत- ए- अंतुर’ - व्हेज पुलाव, बटर पनीर माखनवाला, लोणचा, मसालापापड साथीला ग्रीन सलाड खऱच जेवण करून तृप्त झालो. सर्व आवराआवरी करून तंबू जवळ त्या अगणित तारांच्या नभांगणाखाली मनसोक्त गप्पा हाणत बसलो, आत्तापर्यंतचे दोन दिवस खुपच मजेशीर गेले होते. त्या पूर्ण किल्ल्यावर फक्त आमची दुर्गवेड्यांची चौकडी. जुन्या ट्रेकचे किस्से अंकलचे हिमालयातले अनुभव, काही पुढच्या ट्रेकची प्लानिंग पहाता पहाता रात्रीचे साडेअकरा होऊन गेले. आता झोपायलाच हवे, उद्या सकाळी लवकर उठून पूर्ण किल्ला पाहून आल्यावाटेने परत खाली उतरून उद्या लोंझा करून चाळीसगाव मार्गे कल्याण परत हा देखील बराच लांबचा पल्ला होता. स्लीपिंग ब्याग मध्ये शिरल्यावर लगेच झोप लागली.

सकाळी अंकलने दिलेल्या पहिल्या हाकेलाच उठलो.तंबु बाहेर येतो तर नुकतेच तांबड फुटत होत. ट्रेकची सकाळ त्यात मुक्काम एखाद्या किल्ल्यावर अथवा डोंगरावर असेल तर विचारायलाच नको. आदल्या दिवशी केलेले सारे श्रम विसरून एका नव्या उमेदीने आपण ताजे तवाने होतोच होतो. अंतुरवरची हि सकाळ पण अशीच प्रसन्न. मग काय सकाळच्या वातावरणातच किल्ला पहायला निघालो.

चौकोनी बुरूजावरून सुर्योदय पाहिला.

इथुन बरासचा किल्ला पूर्ण टप्यात नजरेत येतो.

तलावाजवळच्या भल्या मोठ्या ईमारतीच्या भिंतीवर पिंपळाच्या झाडाने आपले मुळ घट्ट रोवले होते.

छोटी मशिदीसारखी दिसनारी गोल घुमट वास्तु.

पुढे गेल्यावर ही महिरपी तटबंदी.

फोटो काढत असताना अचानक मिलिंदचा एस एल आर क्यामेरा एरर दाखवायला लागला. काहीतरी फोकस लेन्स सेन्सर ची गडबड होती. पुढे त्याची क्यामेराशी खटपट सुरू झाली बरेच अवशेषांचे फोटो आता घेता येणार नव्हते सहाजिकच निराश व्हायला झाले. मग काय कठिण समयी मोबाईल कामी येतो. शक्य तितके फोटो मोबाईल मधून घेतले. पुढे किल्ल्याच्या दक्षिणेकडच्या बुरूजाकडे निघालो.

वाटेतली हि भली मोठी तटबंदी.

तटबंदी अलीकडे पहारेकराची देवडी

पलीकडे गैबन शा बाबा चा दर्गा.

शेवटी मोबाईलला मर्यादा आली, बॉटरी लॉ चा अलार्म. बुरूजाकडचे फोटो काही घेता आले नाही. बरेच अवशेष संपन्न असा सुंदर किल्ला पहाताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही. सुर्यदेव चांगलेच वर आले होते.

दिवसभराचा नियोजीत कार्यक्रम आठवत माघारी तंबू जवळ आलो. सर्वात पहिले काम मोबाईल पावर सेट मध्ये चार्जिंगला लावला. कालच्या संधीप्रकाशात येताना दरवाजाचे फोटो घेतले नव्हते. सकाळचा पोटभर नाश्ता करून सामानांची आवरा आवरी करून निघालो.
किल्ला सोडताना खुपच जीवावर येत होत. अस वाटत होते थांबावे इथेच अजुन थोडा वेळ या रमनीय किल्ल्यासोबत घालवावा. पण मग लोंझा आणि पुढचे सगळा प्लान विस्कटणार. पुन्हा दोन दिवस पुर्ण वेळ काढुन येणारच असा मनोमन ठरवुन निघालो.
हिच ती देवडी

पुढे फार्सी शिलालेख असलेला हा दरवाजा.

हा दुसरा बुलंद दरवाजा

जंग्या आणि शिल्प असलेला हा पहिला दरवाजा.

पंधरा मिनिटात गाडी जवळ पोहचलो तर सव्वादहा वाजून गेले होते. पुन्हा कसरत करून आल्यामार्गे नागद पर्यंत जाणे भागच होते.
आमचा आजचा मार्ग :

सावकाश गतीने दगडधोंडे, पाण्याचा ओढा परत सर्व सोपस्कार पार पाडून पाऊण तासात चाळीसगाव सिल्लोड रस्त्यावर आलो. अभयारण्यात घाट सुरू होण्याआधी वन विभागाच्या पॉईंट अलीकडे गाडी कडेला उभी केली आणि उजवीकडच्या पायवाटेने सीताखोरी धबधब्याकडे निघालो.

दोन तीनशे फुट सरळसोट खाली पडनारे पाणी याचे पावसाळ्यात रूप भलतेच महाकाय असनार यात शंकाच नाही. गौताळा वन विभागाने कडेला रेलिंग उभारलेले आहेत वाटेत जाणारे बरेच पर्यटक येथे थांबतात. औट्रम घाट उतरून थेट नागदला दुपारच्या जेवणासाठी थांबलो. ऐन दुपारच्यावेळी पण साधे का होईना जेवण मिळेल असे काहीच आमच्या नजरेस पडले नाही. शेवटी पुढचा पल्ला नजरेसमोर ठेऊन भुकेचा अग्नी शांत करणे गरजेचे होते. दुधाची तहान ताकावर, मग काय समोर वडापाव आणि भजीला पर्याय नव्हता. अर्ध्यातासात तिथुन लोंझा किल्ला म्हणजेच स्थानिक समजतात तो ‘महादेव टाका’ ची चौकशी करून मुख्य रस्त्याला लागलो. नागदपासुन बनोटीच्या दिशेने दिड एक किमी वर उजवीकडच्या शेतातल्या कच्च्या रस्त्याने पांगरा वस्ती अलीकडे गाडी लावली. भर दुपारी ऑक्टोबर हिटमध्ये छोटेखानी लोंझा चांगलाच घाम काढणार याचा अंदाज होताच. राजन महाजन आणि आमचे मायबोलीकर मित्र हेंमत पोखरणकर यांनी हा किल्ला प्रकाशझोतात आणला. या किल्ल्याचे भौगोलिक स्थान हे अंतुर किल्ल्याच्या दक्षिण खोर्यात येते. गौताळा अंजिठाच्या मुख्य रांगेपासून हा सुटावलेला ऊंचीने छोटासा किल्ला. पण अंतुर सारख्या मोठ्या आणि महत्वाच्या किल्ल्यावर जाणार्या मार्गावर टेहळणीसाठी नक्कीच उपयुक्त.
अगदीच सांगायचे झालेच तर आहुपे घाटावरून गोरख मच्छिंद्र जसे दिसतात अगदी तसाच लोंझा अंतुर किल्ल्याहून दिसतो. फक्त पाण्याच्या बाटल्या आणि सुका खाऊ सोबत घेऊन निघालो.

दुर्लक्षित पण सुंदर किल्ले लोंझा
खिंडीच्या दिशेने प्रशस्त पायवाटेने चढाईस सुरूवात केली. आजुबाजूचे जंगल विरळ असल्याने ऊन चांगलेच शेकत होते.

पुढे सिमेंट कॉंक्रिटच्या पायर्या लागल्या. वर गेल्यावर समोरच मोठी गुहा दिसली.

गुहेत मौनी बाबांचे वास्तव्य आहे. आजुबाजूची बरिच मंडळींची त्या निमित्ताने येथे वर्दळ असते.

पुढे उजवीकडे पाण्याची काही टाकी आहेत.

पण गुहेजवळचे खांब टाक्यातले पाणी मात्र चवीला अप्रतिम असेच.

उजव्या बाजूनेच वर चढून गेलो माथ्यावरून कालचा आमचा सोबती अंतुर दिसला. वरती एक चौथरा, मारूतीची मुर्ती आणि पीर. परत गुहेजवळ येऊन पलीकडच्या दिशेला पायरा उतरून गेलो. वाटेतली कातळाकोरीव देवी ? मुर्ती दिसली.

परत टाक्यापाशी येऊन झाडाखाली विसावा घेतला. या मोहिमेतला शेवटचा किल्ला पण मनाला चांगलाच तजेला दिला. खाली येईपर्यंत तीन वाजून गेले होते.
किल्ल्याच्या पायथ्याला असलेला तलावाच्या पार्श्वभूमीवर मागे अंतुर किल्ला सहाजिकच एक फोटू घेतला.

डावीकडून : अस्मादिक, मिलिंद, विवेक आणि नारायण अंकल
अतिशय सुंदर किल्ल्यांच्या या गौताळा मोहिमेत, सर्वात मोठा धसका घेतला असेल तर तो रस्त्यांचा त्यांच्या दर्जाबद्दल लावू तेवढी विशेषण कमी पडावी असे हे रस्ते. एकीकडे विकासाच्या 2G 3G च्या जमान्यात मोबाईलला रेंज सगळीकडे पण चांगले रस्ते आणि स्वच्छतेचा बोलबालाच.
या सर्व बाबींवर मात करून आम्हाला इच्छित स्थळी सुखरूपपणे पोहचवण्यात काहीही कुरबुर न करता आमची साथ दिल्याबद्दल गाडीला मानवंदना द्यायलाच हवी.
अशीच तुझी साथ लाभो आणि नित्य नुतन सह्ययात्रा घडतच राहो !

पुढे चाळीसगावमार्गे मालेगावहून आग्रा रोड पकडला. चार दिवस ओबडधोबड जमिनीवर झोपलेल्या माणसाला नंतर डनलॉपच्या गादिवर झोपल्यावर जसे वाटेल तसेच बहुतेक गाडीला आणि आम्हाला वाटले. पुढे नाशिकला आडगाव नाक्यावर चांगले शाकाहरी जेवण करून रात्री साडेबाराच्या सुमारास घरी पोहचलो. ऑडोमीटरची रिडींग पाहिली तर ९८८ किमी.

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशाच प्रकाश (चित्रण) यात्रा मा बो कराना तुमच्या कडून घडत राहो.

नेहमी पेक्शा वेगळे किल्ले दाखवल्याबद्द्ल आभार

मस्त लेख व मस्त फोटोज योगेश. नकाशेही सुरेख आहेत ज्यांचा निश्चित उपयोग होईल.
सुतोंड्याच्या पायथ्याच्या गांवात जी मूर्ती आहे ती विष्णूमूर्ती नाही. ती बहुधा सूर्यमूर्ती आहे. ती या भागांत कशी आली असावी हा अभ्यासाचा विषय आहे.
लोंझ्याचं वर्णन ओंकारने सविस्तर केलेलं असल्याने तू हात आखडता घेतलेला दिसतोयस. Happy

मन्या, निलुदा, हर्पेन आणि मित धन्यवाद !

@ यो, यंदाच्या पावसाळ्यात नक्की प्रयत्न कर.
सुंदर मुलुख आणि एकापेक्षा एक सरस किल्ले.

@ हेम साहेब, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आमच्या सोबत असलेला भोला सोनावणे आणि नंतर भेटलेली गावातली मुले त्या मूर्ती ला विष्णुमूर्ती म्हणत होते. तिथेच समोरच्या शेतात आणखी बर्याच मूर्तींचे अवशेष असेच पडलेले होते. त्या बाबत खुद्द स्थानिकांना ही फारशी माहिती नाही. अभ्यासाचा विषय आहे हे मात्र नक्की.
लोंझाबद्दल हाथ आखडता घेतला : खऱ सांगू तर हा दुसरा भाग फोटोंची झालेली गफलत आणि काही अन्य कारणांमुळे, अगदी दोन दिवसांपूर्वी म्हणजे ट्रेक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीने लिहून काढला. तरी जास्तीत जास्त आठवत लक्षात ठेवलेले लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ओंकारच्या सविस्तर मुद्देसुद लिखाणाबद्दल तर वादच नाही.

वा चित्र आणि वर्णन दोन्ही सुंदर.
औट्रम पार्क म्हणून सिंगापुरमधे पण एक सबर्ब आहे. इथे औट्रम नाव कशामुळे पडले काही अंदाज तुमचा?
तसेच खांब टाक्याबद्दल पहिल्यांदाच कळले. खांबांचा उपयोग कशासाठी इथे? पाण्यावर सावली रहावी म्हणून?

धन्यवाद हिम्सकुल.

धन्यवाद इंद्रा.

@ हर्ट, औट्रम नाव कशामुळे पडले >>> सध्या तरी काही सांगू शकत नाही, पण काही माहिती मिळाली तर नक्की शेअर करतो.
खांबांचा उपयोग >>> कातळात खोदलेली ही मोठमोठी टाकं छताला आधार देण्यासाठी तसेच पाण्यावर सावली राहून बाष्पीभवन कमी होणे हे असु शकते.