मधू........डबडा ऐसपैस

Submitted by बेफ़िकीर on 20 April, 2016 - 06:49

"मधु वेडाय"

कुजबुजत मालनने मला सांगितले आणि माझी दृष्टी मधुवर खिळली. तो आमच्यापेक्षा बराच मोठा होता. खरे तर आधीच्या पिढीतला होता. चट्ट्यापट्ट्याचा पायजमा आणि सुती शर्ट घालून तो सोसायटीच्या आवारात कुठेतरी उभा राहायचा. कोणा दामल्यांचा लांबचा नातेवाईक होता तो! त्याला कोणीच नसल्यामुळे दामल्यांनी त्याला जवळ ठेवून घेतला होता. बहुधा निरुपद्रवी असावा म्हणून ठेवला असावा. नाहीतर त्या जमान्यात एक खाणारं तोंड कोण बाळगणार, सामान्य परिस्थितीत?

आम्ही मुले सुट्टीत सकाळी दहा ते रात्री नऊ फक्त खेळायचो. दहा ते बारा लंगडी किंवा रुमालपाणी! बारा ते एकच्या दरम्यान सगळे जेवून परत जमायचे. दोघातिघांकडचे कॅरम, एखाद्याकडचा बुद्धीबळाचा सेट, व्यापार, सापशिडी असे प्रकार वयानुसार व आवडीनुसार खेळायला घेतले जायचे. उरलेल्यांसाठी पत्ते! रोज कोणाच्या ना कोणाच्या घरी धिंगाणा असायचा. पण आया ओरडायच्या नाहीत. साडे तीन चार वाजले की सगळे घरी जाऊन काहीतरी तोंडात टाकून आणि चहा घेऊन परत खाली यायचे. पाच ते सहा क्रिकेट! तेव्हाही मुली क्रिकेट खेळायला यायच्या. नंतर चोर पोलीस! ह्यावेळी मुली अंधार पडायची वाट बघत बसायच्या आणि मुले चोर पोलीस खेळायची. अंधार पडू लागला की डबडा ऐसपैस! ते बोर्नव्हिटाचं डबडं किती वर्ष लाथा खाऊन तगलं होतं कोण जाणे! डबडा ऐसपैस रंगात आलं की हटकून कोणा ना कोणा दोघातिघांना पालक हाका मारून बोलवायचे. रोज कोणालातरी बाहेर जायचेच असायचे. ते दोघे तिघे गेले की किंचित ओसरलेला उत्साह पुन्हा प्रस्थापित व्हायचा आणि मग इस्टॉप पार्टी सुरू व्हायची. खेळ साधारण तसाच, फक्त डबडे नाही. जिन्यात लपणे, दुसर्‍याचा शर्ट घालून उगाच खांदा बाहेर काढून दाखवणे वगैरे!

नऊ वाजले की हाकांचे सपाटे सुरू व्हायचे. एकेक करून सगळे घरी पळायचे. रात्री उशिरा मग अगदीच मोठी मुले फक्त खाली यायची आणि फिरायला जायची.

ती फिरायला गेली की मधुला कोणीतरी हाक मारायचे. सोसायटीतील विषण्ण प्रकाश देणार्‍या दिव्यांच्या उजेडात मधुला प्रथमच जाणीव व्हायची की आपल्याला भूक लागलेली असणार. मग तो सरसर जिने चढून चौथ्या मजल्यावर जाऊन गुडूप व्हायचा. मी मोठ्या मुलांबरोबर अनेकदा फिरायला जात असल्यामुळे हे मी पाहिलेले होते.

मधुच्या चेहर्‍यावर गबाळेपणा, निरर्थक तोंडभर हास्य आणि आपण कोणीतरी जिवंत मनुष्य आहोत ही जाणीव अश्या तीन गोष्टींचे मिश्रण विलसत असे. मधु वेडा आहे हे वेडा नसलेल्या कोणालाही पहिल्या क्षणीच समजू शकत असे. मालन लहान होती म्हणून तिने मला कुतुहलाने सांगितलेले होते की मधू वेडा आहे. त्यावर मी पूर्वी तसे म्हणालो की 'मला माझी आई जे सांगायची' तेच मी तिला म्हणालो होतो.

"श्श! असे म्हणायचे नसते"

मालन गपचूप बसली होती.

अचानकच कधीतरी मधू एखाद्या खांबाला चिकटून उभा असलेला दिसायला लागला. सतत तोंडभर हसत असायचा. त्याची मान उगीचच नकारार्थी हलत असायची. डोळ्यांमध्ये वेडाची झाक स्पष्ट दिसायची. पण तो निरूपद्रवी होता. पाच सव्वा पाच फूट उंच आणि कृश होता. गबाळाच राहायचा. मुले खेळायला खाली आली की प्रचंड खुष व्हायचा. प्रत्येक खेळ, प्रत्येक मुलगा, मुलगी अगदी निरखत असायचा. कोणी डबडं उडवलं की हसत बसायचा. त्याच्या वेडसरपणाचा काही जणांना एक वेगळाच फायदा होऊ लागला होता. डबडा ऐसपैस आणि इस्टॉप पार्टी ह्या खेळांमध्ये जे लपून बसले असतील त्यांच्या दिशेला बघून मधु तोंडभरून हसत असायचा. त्याला मजा वाटायची की कोणाचेतरी काहीतरी गुपीत त्याला समजलेले आहे. त्याच्याकडे बघून मग राज्य घेणारा लपलेल्यांना शोधू शकायचा. निदान कोणत्या दिशेला काही मंडळी लपली आहेत इतके तरी समजायचे.

हळूहळू मधूचा हा निरुपद्रवी चेहरा आणि लपलेल्यांच्या दिशेला बघणे हे उपद्रवी असल्याचे काहींच्या लक्षात आले. राज्य आलेला मुलगा आता बाकी काही प्रयत्न करायच्या आधी मधुलाच खाणाखुणा करून विचारायचा. मधु एक अक्षर बोलायचा नाही पण बोटाने दिशा दाखवून गबाळ्यासारखा हसायचा. तिकडचे कोणी पकडले गेले की मधुला परमवीरचक्र मिळाल्याचा आनंद व्हायचा. पण लपलेल्यांना आता मधू त्रासदायक वाटू लागला. आता दुहेरी जबाबदारी आली त्यांच्यावर! राज्य घेतलेल्यालाही आणि मधूलाही समजू नये की आपण कुठे लपलो आहोत ह्या प्रयत्नात ते लपू लागले. ते काही जमेना! आता ह्यावर उपाय काय?

मधूला भीती वाटणे आता आवश्यक झाले. नाहीतर तो असेच भांडाफोड करत बसला असता. मग दोन तीन मुलांनी मधूला दरडावून पाहिले. लपलेल्या मुलांकडे बघायचे नाही असे दटावून सांगितले. तरी येडं नकारार्थी मान हलवत हसतच बसलं. मग एक नवीन उपाय शोधला गेला. राज्य घेणारा आकडे मोजायला गेला की एक मुलगा मधूचेच डोळे मिटून उभा राहायचा. राज्य घेणारा परत आला की मग तो मधूचे डोळे उघडायचा. मधूला सुधरायचे नाही की पोरे लपली कुठे? मग तो हसत हसत राज्य घेणार्‍याकडेच बघत बसायचा.

हळूहळू डबडा ऐसपैस म्हणजे काय हे अगदी किंचितच प्रमाणात मधूच्या टाळक्यात घुसले. ही प्रक्रिया सुमारे दोन अडीच महिने चाललेली असावी. 'उडवावेसे वाटले की डबडे उडवायचे' असे त्याचे आकलन झालेले असावे. त्याचे असे झाले, की एकदा डबडं जागेवर ठेवून राज्य आलेला दहा वीस फूट लांब जाऊन लपलेल्यांचा शोध घेत असताना तिथे जवळच उभा असलेला मधू अचानक झपाटल्यासारखा पळत सुटला आणि त्याने येऊन डबडे उडवले. फारच जोरात उडवले ते डबडे त्याने! डबडे गेले कुठे इकडे मात्र कोणाचेच लक्ष राहिले नव्हते. कारण जे आधीच बाद झालेले होते ते तिथेच उभे होते. ते मधूचे हे रूप पाहून अवाक झाले होते. मधू जोरजोरात हसत होता. पण हसण्याचा आवाज नाही. मान नकारार्थीच हलत होती. त्यातच डबड्याचा आवाज झालेला पाहून लपलेल्यांना वाटले की कोणीतरी डबडे उडवले. त्यामुळे ते बाहेर आले आणि राज्य आलेल्याने त्यांना पटापटा बाद केले. पण ह्या सगळ्या घोळात दोन प्रकार झाले.

एक म्हणजे, मधूला खेळ समजल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला आणि मधूला डबडा ऐसपैसमध्ये सामील करून घेण्यात आले. मधूच्या चेहर्‍यावर अतीव आनंद दाटलेला होता. प्रथमच त्याच्या निरर्थक जगण्याच्या अंधारात एक क्षुल्लक अर्थ एखाद्या तिरीपीसारखा शिरला होता. मधूला 'आयला आपण ह्यांच्यात असू शकतो होय' असे काहीतरी नक्कीच वाटले असावे असे भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते.

आणि दुसरी गोष्ट भीषण झाली होती. मगाशी मधूने उडवलेले डबडे इतक्या जोरात उडाले होते की ते दुसर्‍या मजल्यावरच्या अभ्यंकरांच्या गॅलरीतून आत जाऊन त्यांच्या आजोबांच्या छाताडावर आपटलेले होते. त्या आजी आणि काकू नेताजी पालकरच्या आवेशात ते डबडे घेऊन खाली उतरल्या होत्या. त्या दोघींनी सोसायटी डोक्यावर घेतली तरी मधू त्यांच्यासमोर त्यांच्या नाकावर टिच्चून नकारार्थी मान हलवत हसत उभा होता. मुलांनी दोघींना सांगितलेलेही होते की आज ह्याने पहिल्यांदाच डबडे उडवले आणि तेही इतक्या जोरात! दामले खाली आले. 'कुठून खाली यायची बुद्धी झाली आणि आपण खाली आलो' असे दामल्यांना वाटावे अशी झाप पडली त्यांना अभ्यंकर आजींकडून! लांबवर उभ्या राहिलेल्या मुलामुलींना हसावे का रडावे तेच कळत नव्हते. दामले मधूला आता काहीतरी करणार अशी भीती आम्हाला मुलांना वाटत होती. तर उलटेच झाले. मधूने एका उडीत अभ्यंकर काकूंच्या हातातले डबडे हिसकावले आणि कोणाला काही कळायच्या आत तिसर्‍याच दिशेला लाथेने भिरकावले. ते डबडे गेले रस्त्यावर! त्या काळात रस्त्यावर बोंबलायला दिवसाच कोणी नसायचे तर अंधार पडायच्या वेळी कोण असणार? पण मधूचा तो अवतार पाहून दोन्ही नेताजी पालकर नखशिखांत हादरले आणि 'बाईगं, माणूस आहे का भूत' असे म्हणून त्या दोघी घरी निघाल्या. दामलेही हादरलेले होते. त्यांनी मधूला चुचकारून वर नेले. जाताना मधूने आमच्याकडे एक वीररसयुक्त कटाक्ष टाकून रुंद स्माईल दिले. आम्हीही हात वगैरे करून हसलो.

काहीही विशेष प्रयत्न न करता सोसायटीतील खिजट मनोवृत्तीच्या प्रौढांना वचक बसवेल असे एक व्यक्तीमत्त्व आम्हा मुलांना लाभले. दुसर्‍याच दिवशी 'मधूची डबडे उडवण्याची ताकद' ही बातमी कर्णोपकर्णी होऊन काही घाबरट ज्येष्ठ बायका मधू दिसताच पाच पावले लांबून जाऊ लागल्या.

पण आता मधूमध्ये बदल घडू लागले होते. त्याच्या निरागस मनाला अभ्यंकरीण बाईंच्या डोळ्यातील 'भय इथले संपत नाही' ही भावना नीट समजली होती. 'आपल्याला कोणीतरी घाबरते' ही जाणीव किती लाखमोलाची असते! मधू आता खांबाला टेकून उभा न राहता गबाळ्यासारखा सोसायटीतून फिरू लागला होता. दुपारी मुले कोणाच्यातरी घरी गेली की मात्र तो पुन्हा खांबापाशी उभा राहायचा किंवा बसून राहायचा. मधू दुपारी जेवायचा की नाही हे आम्हाला कधी समजलेच नाही.

पण दुसर्‍या दिवसापासून डबडा ऐसपैसमध्ये मधू समाविष्ट झाला. आता एक निराळीच समस्या निर्माण झाली. चुकूनमाकून ह्या मधूला खरंच डबडं उडवायचा चान्स आला तर हा लेकाचा त्या डबड्याची चाळणी करेल अशी भीती आम्हाला बसली. पण त्यावेळची बरीच कार्टी बोर्नव्हिटा किंवा ओव्हल्टीनवर फोफावत असल्यामुळे ही काळजी विशेष टिकली नाही.

पण मधूचे लपणे हा एक स्वतंत्र अध्याय होता. राज्य आलेला मुलगा आकडे मोजायला लागला आणि मुले लपायला पळू लागली की मधूला समजायचे की आता त्यानेही पळून कुठेतरी लपायला हवे. त्याची ताकद इतकी अमाप की दोघा तिघा मुलांचे शर्ट धरून त्यांना मागे खेचून स्वतः पुढे जाऊन तो पहिला लपायचा. ह्या प्रकारात दोन तीन मुले आपटली. पण मधूवर राग धरावासा कोणालाच वाटला नाही. त्यावर उपाय योजला गेला तो म्हणजे आधी मधूला लपू देणे! मधूला खेळातील मुख्य गोम बहुधा समजलेली नसावी. राज्य घेणारा थोडा लांब गेला की हळूच बाहेर पडून डबडे उडवले तर त्याच्यावर पुन्हा राज्य येते हे त्याला नीटसे लक्षात आलेले नसावे. एकदा त्याने राज्य घेणारा डबड्यावर 'शिकारीत मारलेल्या वाघावर पाय ठेवून फोटो काढून घेतात' तसा पाय ठेवून उभा असताना त्याच्या डोळ्यादेखतच धावत येऊन डबडं उडवलं! ते पोरगं इतकं हबकलं होतं की त्याला वाटलं डबड्याच्या जागी ते स्वतःही असू शकलं असतं. दोन चार दिवसांनी मधूने असेच उगाचच उडवलेले डबडे एका पाठमोर्‍या आजोबांच्या कानाजवळून सणसणत गेले. त्यांनी शांतपणे मागे वळून पाहिले आणि ते तिथून निघून गेले. आम्ही एका जिन्यात जाऊन स्वतंत्र हसलो.

मधूची बुद्धी आणि ताकद ह्यांचे आमच्यापेक्षा असलेले विपरीत प्रमाण पाहून त्याला इस्टॉप पार्टीत घेण्याचा निर्णय सर्वानुमते नाकारण्यात आला. इस्टॉप पार्टीत राज्य घेणार्‍याच्या पाठीवर थाप मारून 'धबका' असे म्हणायचे असते. मधूच्या थापेने एखादे पोरगे जे आडवे झाले असते ते पुन्हा उठलेच नसते. हाच प्रकार क्रिकेटच्या बाबतीतही ठरला. ह्याने दिला भिरकावून बॉल तर काय घ्या?

पण डबडा ऐसपैसमुळे एक झाले. मधू आमच्या सोसायटीचा एक अविभाज्य भाग झाला. दिवसातील बहुतांशी काळ तो सोसायटीत खाली उभा सतो ह्या गोष्टीची आता सगळ्यांना सवय झाली. 'हा वेडा चक्क खेळतो' असेही लोक घरी आल्यागेलेल्यांना सांगू लागले.

एक दिवस दामले आजी माझ्या आईला भेटायला घरी आल्या. दोघी बरेचदा एकत्र बसून विणकाम करत असत. मधूचा विषय निघाला. दामले आजींनी मला पलीकडच्या खोलीत जाऊन खेळायला सांगितले. मला साधारण अंदाज आला की काहीतरी विचित्र अनुभव असणार मधूबाबत! जे काही थोडेफार कानावर आले त्यानुसार लकडी पुलावर दोन कॉलेजच्या मुलींमागे मधू चालत चालत चालल्याचे बघितल्याचे कोणीतरी दामले आजींना सांगितल्याचे समजले. 'म्हणजे त्यातलं कळतं त्याला' असे दामले आजींचे वाक्यही ऐकू आले. मला मधूबद्दल प्रथमच काहीतरी नकारात्मक वाटले.

त्या दिवशी संध्याकाळी खेळताना मी मधूशी नेहमीसारखा वागलो नाही. पण रात्री निराळाच प्रकार झाला. मोठी मुले व त्यांच्यापेक्षा थोडासाच लहान असलेला मी असे फिरायला निघालो होतो नेहमीप्रमाणे! आम्ही सोसायटीतून बाहेर पडलो की मधू घरी जाणार हे नेहमीचेच होते. पण आमच्यातला रमण मधूला खांबापाशी पाहून डोळा मारत हसत हसत म्हणाला........

"काय मध्या, रतन आवडली का?"

मधू प्रथमच उजवा तळहात तोंडावर ठेवून आणि डोळे विस्फारून जोरजोरात हसला. त्याच्या हसण्याचा आवाजही ऐकू आला. आणि मानही नकारार्थी हलली नव्हती.

आम्ही पुढे गेल्यावर रमणला विचारले तर म्हणाला........

"मगाशी डबडा ऐसपैस खेळताना डिसिल्व्हांच्या बागेत लपलो होतो रे आम्ही! शेजारी खंड्याची खोली! सहज डोळा लावला तर रतन उघडी! मध्याला दाखवलं तर यड्यासारखा पाहतच बसला"

खंड्या हा सोसायटीचा वॉचमन होता आणि रतन त्याची बायको! मधू तिला त्या अवस्थेत पाहून पागल झाल्याचे रमण सांगत होता. सगळी मुले हसत होती. त्यानंतरचे दोन तीन दिवस हे रात्रीचे फिरणे म्हणजे मधू आणि रतनचे काल्पनिक नाते आणि त्यासंबंधातले विनोद इतकेच होऊन राहिले होते.

मात्र एकदा मधू पुन्हा डिसिल्व्हांच्या बागेत लपायला गेलेला मी पाहिला. पण काहीच वेळात खंड्याच्या खोलीतून रतन घाईघाईत बाहेर आली आणि डिसिल्व्हांच्या बागेकडे पाहून अद्वातद्वा ओरडू लागली. खंडूने कुठूनतरी धावत येऊन प्रकरण मिटवले. पण दामलेंनी त्या रात्री मधूला खूप मारले.

जागेपणी अव्याहतपणे हसणारा मधू पहिल्यांदाच रडला. मनात कालवाकालव झाली. तेव्हा काही नीट समजत नव्हते. पण आज वाटते की त्याला समजावून सांगणारे कोणीच नव्हते. तो दामल्यांचा कोण होता हेही आम्हाला नीट माहीत नव्हते.

दुसर्‍या दिवसापासून मधू सोसायटीतून गायब झाला. तो कुठे गेला हे काही दिवस समजलेच नाही. असेच एकदा दामले आजी आईला म्हणाल्या की त्यांनी त्याला एका आश्रमात ठेवला आहे.

काही महिन्यांनी एका मोठ्या मुलाने सांगितले की मधू आता खुन्या मुरलीधरापाशी बसून भीक मागतो. आम्हाला त्याचे काहीच वाटले नाही.

सुमारे दोन तीन वर्षे झाली असावीत. अचानक काय झाले कोणास ठाऊक!

मधू पुन्हा सोसायटीत दिसू लागला. एवढ्या कालावधीत तर खंड्यानेही नोकरी सोडलेली होती. माणसेही झाला प्रकार विस्मरणात ढकलून पण काहीश्या संशयानेच मधूकडे पाहत वावरत होती. अजूनही मधूची ओळख तीच होती सोसायटीत! एक वेडा, ज्याला बायकांबाबत कसे वागावे हे समजत नाही, तेव्हा जरा जपून!

पण आता मधू खांबापाशी बसून राहायचा. मुले थोडी मोठी झालेली असल्याने पूर्वीसारखे खेळणेही होत नव्हते. मधूची मान अजूनही नकारार्थी हलायचीच. पण हसणे लुप्त झालेले होते. दामले आजी थकलेल्या होत्या.

आणि एक दिवस हृदयात कालवाकालव होईल अशी घटना घडली. संध्याकाळी मी कॉलेजमधून घरी परत आलो. मधू माझ्याकडे बघून किंचितसा हसला. मी हसलो नाही. मी वर घरी जाऊन काहीतरी खाऊन खाली उतरलो. तोवर मोठ्या मुलांबरोबर एखाद्या सिगारेटचे दोन चार झुरके कसे मारायचे ही अक्कल आलेली होती. त्या मुलांना हाका मारून ती येईपर्यंत तिथेच थांबलो.

आयुष्यात पहिल्यांदाच मधूला बोलताना पाहिले मी! त्याचा आवाज म्हणजे आवाज नव्हताच. घसा पूर्ण बसलेला असावा आणि उच्चारात फक्त हवा भरलेली असावी असे काहीतरी तो बोलत होता. मला त्याने चक्क नावाने हाक मारली. मी चरकलो. त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत अजीजी होती. म्हणाला........

"आईला म्हणाव काहीतरी खायला दे मला"

माझ्या डोळ्यांत पाणीच आले. खिळून त्याच्याकडे बघत बसलो मी. दामले आजींमुळे तो माझ्या आईला चांगले ओळखत असे. काही क्षणांनी होकारार्थी मान हलवून आणि त्याला तिथेच थांबायची खुण करून मी घरी पळालो. येताना दुपारची पोळी भाजी आणली. त्याला दिली. त्याने ती बकाबका खाल्ली. सोसायटीच्या नळावर पाणी प्यायला. मग मी विचारले. तुझ्या घरी का जात नाहीस असे.

त्यावर मधूने खिन्न डोळ्यांनी नकारार्थी माल हलवत उत्तर दिले........

"मला लाथ मारतात, डबड्यासारखी, घरी गेलो की"

मला पहिल्यांदाच कळले. अश्या लोकांबरोबर सगळे जग चोवीस तास.... डबडा ऐसपैसच खेळते!

"मधू....डबडा ऐसपैस"

=======================

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

....

....:अरेरे:

>>>>>बहुधा निरुपद्रवी असावा म्हणून ठेवला असावा. नाहीतर त्या जमान्यात एक खाणारं तोंड कोण बाळगणार, सामान्य परिस्थितीत?<<<<

हो आणि ते सुद्धा दाम'ले' .

बाकी, चांगलय.

>>>>>>आम्ही मुले सुट्टीत सकाळी दहा ते रात्री नऊ फक्त खेळायचो. दहा ते बारा लंगडी किंवा रुमालपाणी! बारा ते एकच्या दरम्यान सगळे जेवून परत जमायचे. दोघातिघांकडचे कॅरम, एखाद्याकडचा बुद्धीबळाचा सेट, व्यापार, सापशिडी असे प्रकार वयानुसार व आवडीनुसार खेळायला घेतले जायचे. उरलेल्यांसाठी पत्ते! रोज कोणाच्या ना कोणाच्या घरी धिंगाणा असायचा. पण आया ओरडायच्या नाहीत. साडे तीन चार वाजले की सगळे घरी जाऊन काहीतरी तोंडात टाकून आणि चहा घेऊन परत खाली यायचे. पाच ते सहा क्रिकेट! तेव्हाही मुली क्रिकेट खेळायला यायच्या. नंतर चोर पोलीस! ह्यावेळी मुली अंधार पडायची वाट बघत बसायच्या आणि मुले चोर पोलीस खेळायची. अंधार पडू लागला की डबडा ऐसपैस! ते बोर्नव्हिटाचं डबडं किती वर्ष लाथा खाऊन तगलं होतं कोण जाणे! डबडा ऐसपैस रंगात आलं की हटकून कोणा ना कोणा दोघातिघांना पालक हाका मारून बोलवायचे. रोज कोणालातरी बाहेर जायचेच असायचे. ते दोघे तिघे गेले की किंचित ओसरलेला उत्साह पुन्हा प्रस्थापित व्हायचा आणि मग इस्टॉप पार्टी सुरू व्हायची. खेळ साधारण तसाच, फक्त डबडे नाही. जिन्यात लपणे, दुसर्‍याचा शर्ट घालून उगाच खांदा बाहेर काढून दाखवणे वगैरे!<<<<<<<<

अगदी अगदी सेम टू सेम.

वाईट वाटतं अश्या मधुंचं. बर्याचदा आपल्यासारख्या 'शहाण्या' लोकांमुळेच त्यांच्यावर असली परिस्थिती ओढवते Sad
अगदी अगदी सेम टू सेम.+१

बेफी,

तुमच्या व्यक्तीचीत्रणाला तोड नाही हे वर बर्याच प्रतिसादांमधे म्हण्ट्ले आहेच...त्याला फक्त दुजोरा देतो !! लेखक किंवा कुठल्या ही कवींची आपापसात तुलना करणे किंवा साधर्म्य शोधणे अजिबात योग्य नाही, प्रत्येकाची शैली वेगळी असते, लिखाणाचा बाज निराळा असतो, परंतु तरी ही हे सांगु इच्छितो, की तुमची व्यक्तीचित्रणे डायरेक्ट व.पु. किंवा पु.लं. च्या तोडी ची असतात. सिम्पली अमेझींग !!
ह्यात तुमच्या लिखाणावर त्या दिग्गजांच्या लिखाणाचा प्रभाव आहे असे म्हणायचे नाहीये, तर तुम्ही त्यांच्यासारखेच अप्रतिम लिहिता असे म्हणायचे आहे ...कृ. गैस. न.

-प्रसन्न Happy

मित्रवर्य बेफी

_____________/\_____________

मी आज प्रथमच प्रतिसाद देत आहे पण मी गेल्या एक वर्षापासुन मायबोलीवरिल कथा कादम्बरी वाचल्य आहेत.
बेफ़िकीर, जव्हेरगन्ज, अमोल परब, सुरेश शिन्दे, विध्या भुतकर यन्चे लेखन विशेष आवडते.

मला मराठी टन्कायला जमत नाही अजुन... Sad

....

Pages