सूर

Submitted by हेरंब सुखठणकर on 20 April, 2016 - 00:06

आपल्याशीच गुणगुणनारे तानपुरे, संध्याकाळची वेळ, झोपाळ्यावर बसलेल्या त्या आणि खाली चटईवर त्यांची शिष्या. मध्येच एकाधि वाऱ्याची झुळुक अंगणातल्या तुळशीजवळ लावलेल्या अगरबत्तीचा परिमळ घेऊन येत होती.
बाईंकडे अनेक वर्ष गाणं शिकणारी ती त्यांच्या घरातलीच झाली होती. पुष्कळ दिवस बेचैन करणारा प्रश्न तिने थोडासा भीतभीतच विचारला. "बाई, तुम्हाला गाण्याने सगळं काही दिलं, पैसा, ओळख, मान. तरी अजूनही कधीकधी तुम्ही बेचैन का वाटता?"
"एका प्रश्नाचं उत्तर नाही सापडलंय गं अजून, म्हणून," बाई शांतपणे म्हणाल्या.
"कोणता प्रश्न?"
"या माझ्या गाण्यातून, पुन्हा पुन्हा नेमकं व्यक्त कोण होतंय?"
स्तब्ध झालेले तानपुरे पुन्हा गाऊ लागले.

originally published in: मेंढी, वॉचमन आणि इतर लघुकथा
http://imojo.in/4kzao4

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users