संघाच्या गोष्टी

Submitted by satishb03 on 19 April, 2016 - 21:04

संघाच्या गोष्टी : भाग (१)

लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर माझे फार प्रेम होते . कारण टिव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या रामायण या मालिकेवर माझे प्रेम होते . तसेच दुध , केळी , श्रीखंड , शिरा यांच्यावरही नुकतेच माझे खूप खूप प्रेम जडले होते . त्याकाळी संघातल्या लोकांच्या घरी इसी वा क्राउन कंपनीच्या , खडखड वाजणारे लाकडी शटर असणाऱ्या टिव्ही होत्या . आमच्या गुरुजींच्या घरी अप्टोनिका या कंपनीचा रंगीत टिव्ही होता . तिथे आम्हाला मुश्किलीने प्रवेश मिळत असे . कारण , आम्ही तिथे रामायण पाहत नसून , मन लाऊन रामायण पाहणाऱ्या गुरुजींच्या मुलीकडे , म्हणजे वासंतीकडे पाहतो असे गुरुजींच्या पत्नीने गुरुजीस (व कल्पेश आकणकरने आम्हास) सांगितले असल्याने , आज टिव्ही बंद आहे हे ऐकून आम्हास कित्येकदा माघारी फिरावे लागत असे . त्याचे आम्हास मुळीच वाईट वाटत नसे . मग आम्ही एखाद्या शाखाबंधुच्या घरी जात असू . गुरुजींच्या घरी ज्या रविवारी प्रवेश मिळून रंगीत रामायण पाहण्याचा व तद्नंतर दुध केळी खाण्याचा योग येत असे त्यादिवशी राम माझ्यावर प्रसन्न झाला असे मी मानीत असे .
लहानपणी संघाने मला बंडखोरी व खोटे बोलण्यास नीट शिकवले त्याबद्दल मी आजदेखील कधी कधी संघाचे आभार मानतो . मी शाखेत जात नाही असे वडिलास खोटे व मी शाखेत जाणारच असे आईस बंडखोरीयुक्त खरे बोलून मी शाखेत जात असे . संघ दक्ष म्हटल्याबरोबर मी इतरांपेक्षा अधिक दक्ष होऊन संघबंधू व गुरुजींचे लक्ष वेधत असे .

मी नियमित शाखेत जातो . केवळ याच गोष्टीपोटी वर्गातल्या कैक मुलींना मी आवडत असे . व मग संघ मला अधिकाधिक आवडत असे . संघातले गुरुजी त्यांची झोळी कायम मला सांभाळायला देत असत त्यामुळे संघात माझी मोठी वट होती . जोश्या , देशपांडे , आकणकर, उत्तेकर या लोकांना झोळी सांभाळण्याचे काम कधीच मिळाले नसले तरी त्यांना त्याबद्दल कधीच वाईट वाटत नसे . याचे केवळ मलाच वाईट वाटत असे . व मी मानवतेच्या उदार दृष्टीकोनातून बळे बळे त्यांना झोळी देऊ करीत असे , व ते प्रेमाने नको नको म्हणत असत . दसऱ्याच्या दिवशी सर्व संघबंधू गुरुजींच्या पाया पडत व आशीर्वाद घेत असत . मला गुरुजी कधीही पाया पडू देत नसत . त्यामुळे मी गुरुजींच्या बरोबरीचा आहे असे मला नेहमीच वाटत असे , एकदिवस आपण नक्की गुरुजी होणारच हा आत्मविश्वास संघातल्या गुरुजींनी माझ्यामध्ये रुजविला त्याबद्दल आजही मी त्यांचे आभार मानतो . या सर्व आणि इतरही खूप कारणांमुळे लहानपणी संघ मला आवडत होता . परंतु दैवास हे देखविले नाही . एक दिवस शाखेतल्या सर्व बंधूसह आम्हास, म्हणजे मी व माझा मांगाचा दोस्त लक्ष्मण खुडे यास गुरुजी रायगडावर घेऊन गेले . व इतिहासाची माहिती देऊन . छान छान बोलले . मला व लक्ष्याला शिवकाळात गेल्यासारखे वाटले . पण जेवणासाठी वारणा श्रीखंड असल्याचे दिसल्याने आम्ही याच काळात राहणे पसंत केले . गुरुजींचे आम्ही आवडते असल्याने गुरुजींनी आम्हास सर्वांना जेवण वाढण्यास सांगितले . व सर्व शाखा बंधू व्यवस्थित जेवेस्तोर आम्हास जेवू नये नंतर पोटभर जेवावे असे सांगितले . श्रीखंड संपत असल्याचे लक्ष्या माझ्या लक्षात आणून देत होता . परंतु मी हतबल होऊन तसाच श्रीखंड वाढीत राहिलो . लक्ष्या मला सटर फटर कारणाने आईमायी वरून शिव्या देऊ लागला . तेंव्हा गुरुजींनी तिथल्या तिथे त्याला न रागावता त्याच्यावर व मी त्याच्यावर रागवू नये म्हणून माझ्यावर उत्तम संस्कार केले . हे सर्व ठीक असले तरी मला श्रीखंड न मिळाल्याने मी शाखेवर बहिष्कार टाकला . व मग अनायासे रामायणावर पण बहिष्कार टाकला . आजही मला श्रीखंड आवडते . वासंती मला आजही आठवते . लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला खूप आवडत होता . परंतु त्या लोकांना मी आवडत नसून श्रीखंड आवडत असल्याचे लक्षात आल्याने मी तिथे जाणे टाळले . मी आजही श्रीखंडासोबत कॉम्परमाईज करीत नाही . शेट तुटो वा पारंबी !

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नियमित शाखेत जातो . केवळ याच गोष्टीपोटी वर्गातल्या कैक मुलींना मी आवडत असे . व मग संघ मला अधिकाधिक आवडत असे . >>> Lol

शैली भारी आहे लिखाणाची.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत !!

शाहरुख संबंधी एक वाक्य मायबोलीवर कालच वाचले - you can like him or you can dislike him but you just cant ignore him..... मायबोलीवर संघाबद्दल इतक्या वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी जे जे काही लिहिलेय ते वाचुन अगदी संघाबद्दलही हेच वाटायला लागलेय आता. Happy

लेखकाचे नाव प्रा. सतीश वाघमारे.
त्यांचा पासवर्ड बदलला गेल्याने सध्या तरी त्यांना लॉगीन होता येत नाही. त्यामुळे नाव लिहा ही सूचना अंमलात आणता येत नाही.

शा.खाची तुलना शाखे बरोबर ? Uhoh

शाखाला तर लोकांची मदत करण्या बाबत चॅरिटी बाबत युनिस्कोचे अवार्ड मिळाले आहे. ते ही गाजावाजा न करता मदत केली आहे.
बाकीच्यांसारखे मिडीया बोलवून, फोटो सोशलमिडीयावर पसरवून, खोटे पसरवून मदत नाही केली Wink

मदत कशी करावी तर एका हाताने केलेली मदत दुसर्‍या हाताला कळू नये. या धारणेचा शाखा असल्याने त्याची तुलना चुकिच्या, मदतीचा ढिंढोरा पिटणार्या लोकांसोबत सतत होत असते.

Lol Lol Lol