जादू

Submitted by जयदीप. on 19 April, 2016 - 13:13

जादू सगळ्या दुनियेसाठी आहे
मला वाटते हातचलाखी आहे!

बुडला आहे रस्ता त्याच्या पुढचा
डोळ्यांमध्ये त्याच्या पाणी आहे

अवघड नाही आहे काही इतके
दिसते तितके सोपे नाही आहे

स्पर्श नकोसा आहे थोडासुद्धा
गर्दी इथली माणुसघाणी आहे

कोणी आहे दिली फोडणी आता
शिळी बातमी झाली ताजी आहे

रस्ता बनवत आला आहे इथवर
पोचत आला एक प्रवासी आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users