मैथिली

Submitted by जव्हेरगंज on 19 April, 2016 - 00:12

हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं.
हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं.

" हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच.
"कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय?

तेवढ्यात झुडपात झोपलेली रानडुक्करीण जागी झाली. " काय रं हात्तीभाव, बाजारला गेला नव्हता काय आज?" राणडुक्करीण आळोखंपिळोखं देत हत्तीघराकडं येत म्हणली.

मग मात्र हत्तीला जरा बरं वाटलं. रानडुकरीणीचा त्याच्यावर लय जीव. काय बी संकट आलं की ती त्याच्या पाठीशी उभी राहायची.
"काय सांगायचं तुला डुकरीणकाकू, येवढ्या उन्हाचं बाजारला गीलतू, पण उन्हात काय चालणं हुईना गड्या, तरीबी पिशवी खच्चून भरुन बाजार आणला हुता " हत्तीनं उठून फॅनचं बटत दाबून पलंगावर पडी मारत रानडुकरीणीला म्हणलं.

"मग गीली कुठं म्हणायची पिशवी?" पिसाळलेली हत्तीणबाई आतल्या आत धुसमत हुती.

"आगं जरा दम धर, सांगतुय नव्ह त्यो, त्यझं आयकून तरी घी" रानडुकरीणीनं तंबाखूची पिशवी काढून बार भरायला घेतला.

ढेरपोट्या हत्ती पोटावरनं हात फिरवतं कायतर आठवल्यासारखा म्हणला," त्येझं काय झालं म्हायत्येय का, मी पिशवी घीऊन वाटंनं चालत होतू, पण तळ्याजवळ भान्याकुत्रं माझ्यावर भुकलं, मग तिथंच कुठंतर पाण्यात पडली आसंल, मी आपला जीव खात पळत आलुय हितवर"
हत्तीणबाईनं कपाळावर सोंड मारून घेतली. रानडुकरीणीला मात्र यात निराळाच वास येत हुता.

तेवढ्यात भानू कुत्रं दरवाज्यात येऊन टपाकलं. "हायतं का भाव घरात?" म्हणून उंबऱ्यातच बूड टेकवून बसलं. भानूला बघताच हत्तीनं पांघरुन घेतलं
"भान्या, कुत्तरड्या, आपल्या माणसावर भुकायला तुला लाज तर कशी वाटली न्हाय?" रानडुकरीण चवताळली.
"येहे, म्हातारे, याडबिड लागलं का काय? म्या नुसतं म्हनलं, देशी का इंग्लिश? तर ह्यानं मला पिशवीच फिकून मारली बघ "

"आस्सं ?"

" न्हायतर काय, पिऊन आलाय ह्यो गश्टेल"

तसा रानडुकरीणीनं वला फोक काढला. हत्तीणबाईन तर फुकारीच फेकून मारली. त्या दिवशी हत्तीला लय तुंबला.

दुसऱ्या दिवशी हत्ती जेव्हा सहज चक्कर टाकायला म्हणून वाटंला लागला तेव्हा हळून पाठीमागणं गाढव आलं.
"काय वो हत्तीराव, काल लय धुतलं म्हण तुमास्नी!" गाढवानं वरची गालफाडं खिदळवत विचारलं.

" तर काय, त्या भानू कुत्र्यानं घात केला वो, पण बरं की नुसतंच दारुबद्दल बोलला"

"म्हजी? मैथिलीबद्दल काय सांगितलंच न्हाय म्हना की " गाढवानं कान टवकारुन इचारलं.

"मैथिलीचं त्येला म्हायीत आसंल तर सांगल ना?" हत्तीनं उगाचच्या उगाच सोंड ताठ केली.

" काय सांगता, म्हजी आजपण मैथिलीकडं जायचं म्हणा की, तसा तमाशा काय रोजरोज थोडाच यीतुय? घ्या मजा मारुन " गाढवानं डोळाच हाणला.

" बाकी समदं खरंय गाढवशेट, पण आज दारु न्हाय प्यायची, नुसता धुमाकूळ घालायचा, द्या हजार पाचशे उसने " हत्ती डिगीडिगी चालत गाढवाला टाळी दिली. गाढव पाय झाडत खिकाळत राहिलं.

मागून वास काढत भानू कुत्रं पण येत होतं. आज त्याच्या बियरची व्यवस्था झाली होती. झालंच तर मटण फ्राय, फिश करी अन सोबतीला खिमापाव पण असणार होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy