स्फुट ९ - हा तुमचा चॉईस आहे

Submitted by बेफ़िकीर on 18 April, 2016 - 11:51

रात्रीचे शिळे अन्न फेकून दिल्यावर
काही वेळाने दिसतात त्याच्यात
वळवळणारे,
अस्वस्थ,
किळसवाणे,
किडे!

एक दुय्यम तारा म्हणून
आकाशगंगेच्या एका कोपर्‍यात
सूर्याला फेकून दिल्यावर
जशी दिसते पृथ्वी
आणि तिच्यावरचे सजीव

अख्खी निर्मीतीच असंतोषातून झाली आहे

सगळे महात्मे, संत, धर्मगुरू, देव
त्यातल्यात्यात प्रभावी किडे होते

आपल्याला शिळेच अन्न का मिळते
ह्याचा शोध कोणीच घेतला नाही

आपल्याला शिळे अन्न तरी का मिळते
ह्याचाही शोध कोणी घेतला नाही

बाकी मठ स्थापन झाले
आश्रम स्थापन झाले
मंदिरे आली
मशिदी, चर्चेस, गुरुद्वारा आले
वरकरणी शांत दिसणारा बुद्धाचा पुतळा आला

प्रभावी किड्यांनी स्थापलेल्या पंथांमध्ये झाल्या
जीवघेण्या मारामार्‍या

कमकुवत किडा वरकरणी शोषला गेला

प्रभावी किड्याला समजलेच नाही
की तोही शोषलाच गेला होता

शिळ्या अन्नाच्या थाळीत
कोणी जाळले गेले
कोणी पुरले गेले
कोणाचे लचके तोडले गिधाडांनी

कायमस्वरुपी ताजी फक्त एकच गोष्ट राहिली

असंतोष

ताज्या असंतोषाने शिळ्या अन्नावर तुटून पडायचे

की

शिळ्या असंतोषाने ताजेपणा शोधायचा

हा तुमचा चॉईस आहे

=================

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अख्खी निर्मीतीच असंतोषातून झाली आहे +१

सगळे महात्मे, संत, धर्मगुरू, देव
त्यातल्यात्यात प्रभावी किडे होते +१

>> प्रचंड अनुमोदन.
यातील असंतोषासोबतच, परिपुर्णतेबद्दलही असेच आहे. अपरिपुर्णतेतुनच हे सगळे निर्माण झाले आहे. अपरिपुर्णता आहे म्हणुन हे विश्व व आपण आहोत. सगळेच १००% परिपुर्ण असते तर काहीच अस्तित्वात नसते.
जे परिपुर्ण असते ते अस्तित्वातच असत नाही.