जाहले आता शहाणे लोक सारे ...

Submitted by बाळ पाटील on 14 April, 2016 - 01:18

जाहले आता शहाणे लोक सारे
राहिले नाही कुणी रागावणारे

घास तू कोणासही भरवू नको पण
तू तुझ्या ताटातला तो नीट खा रे

या कुणीही नागवे वाटेल तैसे
सोडली आहेत आम्ही मुक्त द्वारे

लाजही येथे जरा लाजून गेली
आश्रमी तुटतात कैसे वृध्द तारे

तू असा खुर्चीत डुलकी काय घेतो
बघ तिथे मेले किती वाहून भारे

पैजरा मारून तुकया काय साधे
नर असूनी ' हाय ' हे करती इशारे

-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users