“ द माइंडगेम ” (भाग १)

Submitted by रुद्रसेन on 13 April, 2016 - 05:11

थंडीच्या दिवसातील ती एक प्रसन्न सकाळ होती. मेरी आज नेहमीपेक्षा लवकरच उठली होती. उठल्याबरोबर तिने खिडकीतुन बाहेर पाहिलं. आदल्या दिवशी रात्री हिमवृष्टी झाल्यामुळे सगळीकडे बर्फाचे थर साचलेले होते.झाडांच्या पानावर बर्फ साचून एक जड थर निर्माण झाल्यामुळे ते दृष्य मोठे विलोभनीय दिसत होते. रस्त्यावर बर्फ साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून काही कर्मचारी रस्त्यावरुन साचलेले बर्फ बाजूला करत होते. रस्त्यावर पडलेलं कोवळं ऊनपाहून मेरीला जरा बरं वाटलं. सगळं आवरून मेरी ब्रेकफास्ट करायला खाली आली. मेरी टेबलावर बसली कि लगेचच रुबेलाने न्याहारीची थाळी मेरीपुढे सरकवली. संपूर्ण घरामध्ये फक्त दोनच व्यक्ती राहत असत. एक मेरी आणि तिची सावत्र आई रुबेला. हा पण रुबेला हि काही जन्मापासून सावत्र आई न्हवती. मेरीचे वडील विल्यम यांचा स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता. कामानिमित्त त्यांना सतत देशाबाहेर जावे लागत असे. युरोप मध्ये विल्यम यांनी आपल्या व्यवसायाचं जाळे पसरवून मोठा नफा कमावला होता. त्यांचं त्यांच्या एकुलत्या एक मुलीवर मनापासून प्रेम होतं. मेरीची आई मेरी दहा वर्षाची असतानाच वारली. विल्यमला कामामुळे बाहेर राहावे लागे, अशा परिस्थिती मध्ये विल्यम मेरीकडे कसे लक्ष देणार होते. मेरीला देखभालीची गरज होती, त्यामूळेच विल्यम दुसऱ्या लग्नाला तयार झाले आणि त्यांची दुसरी पत्नी बनली ती रुबेला. विल्यम ची संपत्ती पाहूनच कदाचित रुबेला तयार झाली असावी. कारण आपल्या नवऱ्याला त्याचा पहिल्या पत्नीपासून मुल आहे आणि ते आपल्याला सांभाळावे लागणार आहे हे पाहून स्त्रिया कोणाची दुसरी पत्नी व्हायला सहसा तयार होत नसत. पण तरीही रुबेलाने मेरीचा नीट सांभाळ केला, पण त्यामध्ये मेरीला कधी प्रेमाची ऊब जाणवलीच नाही. विल्यम देशाबाहेर गेले कि मेरीला नेहमी आपल्या वडिलांची आठवण येत राही. विल्यम मध्ये मध्ये त्यांना पैसे पाठवत असत मेरीसाठी काहीतरी भेटवस्तू पाठवत. रुबेलाची मात्र चंगळ व्हायची महागड्या वस्तू , पार्लर , शॉपिंग यामध्ये रुबेला यथेच्छ पैसा उडवायची. पण तिला हेही पैसे कमी पडायचे, तिच्या तुटपुंज्या पगारामध्ये तिची चैन भागायची नाही, त्यामुळे ती विल्यामकडे सारखी पैशासाठी तगादा लावायची. जगाला दाखवायला ती नोकरी करायची पण पैसा हा तिची कमजोर कडी होता. आपण फक्त नवऱ्याचापैशावर मजा मारतो असा कोणाला वाटू नये म्हणूनच तिने नोकरी सोडलेली न्हवती. बाकी मेरीला तिने त्रास वगैरे काही दिला न्हवता. तिला पैशाची चटक होती आणि तो तिला मिळत होता बाकी तिला कसलीही परवा न्हवती. त्यामुळे तिने मेरीवर कसलेही बंधन वगैरे लादलेले न्हवते. ती मेरीला तिच्या इच्छेप्रमाणे वागू द्यायची. रुबेला कामावर जायची त्यावेळी मेरी घरीच असायची. तीच शिक्षण पूर्ण झालेलं होतं. पदवीच्या शेवटच्या वर्षी असताना तिने सादर केलेल्या क्रिमिनल सायकोलॉजी या प्रबंधाला तर प्रोफेसर सिम्सन यांनी तर “ए” श्रेणी दिली होती. रसायनशास्त्र यातसुद्धा तिला चांगली गती होती. मेरीला कॉलेज मध्ये बरेच मित्र होते, कॉलेज झाल्यावर मित्रांची कधी फारशी भेट झाली नाही. फक्त डॅनिअल कधी मधी भेटत होता, बाकी तिला जवळचे मित्र असे कोणी न्हवते. दिवस असे बरे चाललेले असतानाच अचानक एक दिवस बातमी आली, मेरीच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटका येऊन निधन झाला होतं. मेरीला आता खूप एकट एकट वाटायला लागलं, तीचं तिच्या वडिलांशिवाय कोणी आपलं असं न्हवत, रुबेलाने तर फक्त नावालाच सांत्वन केलं मेरीला ते खूप कृत्रीम वाटलं. रुबेला जेव्हा कामाला जायची तेव्हा मेरी घरीच असायची, घरामध्येच काही बाही करत बसायची रुबेलाला यायला कधी कधी उशीर व्हायचा तोवर मेरी झोपी जायची. आज सकाळी निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणामुळे मेरीला जरा उत्साह वाटत होता, दोन दिवसापासून तिच्या अंगात जरा कणकण तिला जाणवत होती. नाश्ता झाल्यावर मेरी आजचं वृत्तपत्र चाळत बसली.
“मेरी आज मला यायला जरा उशीर होईल असा वाटतंय, रात्री जेऊन घे आणि दार वगैरे व्यवस्थित लावून झोपी जा.” आपली जाडजूड पर्स सावरत रुबेला दाराबाहेर पडली.
मेरीने तिचा फक्त ऐकून घेतलं आणि परत वृत्तपत्र चाळू लागली. त्यातल्या एका बातमीने तिचा लक्ष वेधून घेतलं. शहरामध्ये काही भागात चोर आणि लुटारूंचा सुळसुळाट वाढला होता, रात्री अपरात्री रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना धाक दाखवून लुटलं जात होतं. मेरी ती बातमी वाचून काहीशी अस्वस्थ झाली, रुबेलाच उशिरा घरी येणं आजकाल जास्तच वाढलं होतं, आणि मुख्य म्हणजे रुबेला आजकाल वेगळ्याच तंद्रीत असायची घरात देखील कधीकधी लक्ष नसायचं तीच. कामच्या व्यापामुळे होत असेल असं मेरीला वाटून गेलं.पण त्यादिवशी रुबेला जरा वेगळीच वाटली, एकदा जेवणाच्या टेबलवर मेरी आणि रुबेला जेवण करत होत्या. त्यावेळी अचानक रुबेला म्हणाली ” मेरी, तुझं कोणत्या बॅंकमधे खाते आहे “खाते कधी काढले कसे काढले असले काही बाही प्रश्न ती विचारात होती. मेरीला जरा आश्चर्य वाटलं, कारण रुबेलाने असली विचारणा या आधी कधी केली न्हवती. एकदा दोघी घर आवरत होत्या पसारा आवरत असतानाच रुबेलाला पती विल्यामच्या काही वस्तू मिळाल्या, आणि ती आठवणीत काहीशी हरवून गेली. आणि अचानकपणे म्हणाली” मेरी तुला आजकाल झोप नीट लागते ना” त्यावर मेरी “ हो ” असा म्हणाली खरी पण तिला तिचा आश्चर्य लपवता आलं नाही.
“ असं का विचारलं “ मेरीने प्रतिप्रश्न केला.
“काही नाही सहजंच, म्हणजे परवा तुला बरं वाटत न्हवत ना ” रुबेला म्हणाली.
“हम्म” एवढचं मेरी बोलली. खरंतर रुबेला एवढी आस्थेवाईकपणे बोलत होती ती कधीच बोललेली न्हवती, त्याचा मेरीला आनंद व्हायला हवं होता पण तो काही झाला नाही. एके रात्री मेरी झोपेतून अचानक उठली तिला तहान लागली होती, वरच्या खोलीतून मेरी खाली आली. बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता, रुबेला आली होती बाहेर थंडी असल्यामुळे ती गरम पाण्याचा शॉवर घेत होती, मेरी पाणी पिऊन माघारी वळाली, तेवढ्यात तिची नजर टेबलावरच्या रुबेलाच्या पर्स कडे गेली. मगरीच्या कातडीपासून बनवलेली ती जाडजूड पर्स रुबेला कशी बाळगत असेल याचा मेरीला आश्चर्य वाटलं, पर्स पाहत असतांनाच मेरीला अचानक ती पर्स चाचपण्याचा मोह झाला. रुबेला अजूनही बाथरूम मधेच होती, मेरीने हळूच पर्सची चैन उघडली आतमध्ये रुबेलाचं मेकअप चं समान होतं.लिपस्टिक, रुमाल आणि इतर गोष्टी. पर्स च्या तळाशी काहीतरी असल्याचं मेरीला जाणवलं. दिवे बंद असल्याने तिला व्यवस्थित ते काय आहे ते कळलं नाही, मेरीने हात घालून हळूच ती वस्तू बाहेर काढली आणि तिने आश्चर्याने आ वासला. आपण की पाहतोय यावर क्षणिक तिचा विश्वासच बसेना, ,कारण ती वस्तू म्हणजे एक छोटंसं पिस्तूल होतं. मेरीला नाही म्हटलं तरी धक्का बसला होता, रुबेला आपल्या पर्स मध्ये पिस्तूल का बाळगून आहे. मेरीने ते पिस्तूल पर्स च्या तळाशी आहे असा ठेवलं आणि इतर वस्तू जशास तशा ठेवल्या पर्स बंद केली आणि सावकाशपणे आपल्या खोलीमध्ये येऊन बेडवर पडली. मेरीला राहून राहून ते पिस्तुलंच सारखं आठवत होता, रुबेला ते पिस्तुलं का बाळगते याचाच तिला प्रश्न पडला होता. ति त्या पिस्तुलाचा वापर तर नाही ना, अरे देवा, म्हणजे लोकांचे मुडदे पाडते का काय हि, रुबेला एका खाजगी कंपनी मध्ये काम करते हे तिला माहित होतं, पण ते सोडून ती इतर काय काय करत असेल? असे एक ना अनेक प्रश्न तिला भेडसावू लागले तेवढ्यात तिला आठवलं कि शहरात आजकाल लुटमारीच प्रमाण वाढलं आहे. त्यात हि बया अपरात्री घरी येते त्यामुळे संरक्षणाच्या हेतूने ति ठेवत असेल पिस्तुलस्वतःजवळ त्यात काय एवढं. मेरीला हा स्वतःचा हा तर्क पटला, आपण पण ना सुतावरून स्वर्ग गाठतो असा तिला वाटलं.
आज मेरीने घरच्या पुढच्या भागात बागकाम करायचं ठरवलं होतं, बाजूच्याच भागात्त राहणाऱ्या ऑलिव्ह कडून तिने छानशी रोपं आणली आणि जमिनीमध्ये खड्डे केले, माती मोकळी केली आणि आणलेली रोपं एक एक करून त्यात लावून टाकली. अशी कामे करण्यात मेरीला मोठी मौज वाटायची, पण एवढ्याशा कामानेदेखील तिला थकायला झालं. रात्री ती न जेवताच झोपी गेली, रात्री तिला जाग आली तेव्हा तिला भुकेची जाणीव झाली, किचन मधे जाऊन तिने खाऊन घेतलं, रुबेला आलेली दिसत होतं, आल्या आल्या ती झोपी गेली होती. जेवण करून मेरी आपल्या खोलीमध्ये मध्ये आली, सहज म्हणून तिने खिडकीचा पडदा जरा बाजूला केला आणि बाहेर पाहिलं. बाहेर सगळीकडे अंधार दिसत होता, रस्त्याचवरचे दिवे अंधुकपणे लुकलुकत होते, रस्त्याच्या पलीकडे झुडूप आणि झाडी असल्याने तिहे काहीसा अंधार होता. मेरी पडदा सरकवून आपल्या बिछान्यावर जाणारच होती कि तिला पलीकडच्या झाडीमध्ये एक लालबुंद ठिपका दिसला, डोळे बारीक करून तिने पहिला पण तिथे पुरेसा प्रकाश नसल्याने तिला स्पष्ट दिसेना. मेरीला तो लाल ठिपका ठराविक अंतराने गडद होताना दिसत होता म्हणजे कोणीतरी तिथे सिगारेट ओढत होतं तर, तो लाल ठिपका म्हणजे सिगरेटच टोक होतं, कोणीतरी त्या अंधारात सिगारेट ओढत उभा होता. मेरीच्या छातीत धडधडायला लागलं.तरी मेरी तशीच उभी राहून पाहत होती, रात्रीच्या काळोखात तिथ सिगारेट ओढण्यात तिथे कोणाला स्वारस्य असणार होतं काही कळतंच न्हवते, काही वेळाने तो ठिपका विझला, तिथे जे कोणी होतं ते मागच्या मागे निघून गेलेलं असणार कारण नंतर तिथे काहीचं दिसलं नाही. मेरीच्या मनात विचारांचं काहूर दाटलं होतं. कोण होतं तिथें? आणि जे कोणी असेल ते रात्री तिथे सिगारेट ओढत का उभं असेल? बराच वेळ मेरीला झोप लागली नाही. त्या रात्री पाहिलेली ती गोष्ट मेरीने कोणालाच सांगितली नाही, आपला मित्र डॅनिअलला हि घटना सांगावी का असा तिला प्रश्न पडला पण नंतर तिला वाटलं कि असा काही सांगितलं कि डॅनी उगाचंच आपली थट्टा करेल. आणि इथलाच एखादा रहिवासी तिथे सिगारेट ओढत उभं नसेल कशावरून. त्यामळे मेरीने कोणालाच काहीही सांगितलं नाही. बागेतल्या रोपांची निगा राखण्यात आणि साफसफाई करण्यात दिवस कसा गेलं ते मेरीला कळलच नाही. रात्र झाली थंडी वाढली होती मेरीने हिटर वाढवला आणि खिडकीतुन बाहेर पहिल, वातावरणात खूप शांतता होती. पडदा सरकवून मेरी झोपायला वळाली. रात्री कसल्यातरी आवाजाने मेरीला जाग आली कसल्यातरी करकरण्याचा आवाज होता तो. रुबेला आली असेल म्हणून मेरी तशीच पडून राहिली.तेवढ्यात तिला आपल्या खोलीच्या बाहेर कसलीतरी चाहूल जाणवली. मेरीने आपले कान टवकारले, खोलीबाहेर हळूहळू पावलं टाकत असल्यासारखा तिला जाणवलं. तिच्या कपाळावर एवढ्या थंडीत देखील घाम आला, तिने पांघरून घट्ट धरून ठेवलं. आणि शांतपणे पडून कानोसा घेत राहिली. नाही म्हटल तरी तिला भीती वाटतच होती.काहीवेळ कसलीच हालचाल जाणवली नाही. मेरीचे कान बाहेरचं आवाज घेण्यासाठी आसुसलेले होते. पावलांचा आवाज परत आला. बाहेर जे कोणी होतं ते जिना उतरून खाली गेलं होतं. मेरी अजून पांघरून घट्ट पकडून होती. तिची छाती अजून धडधडतच होती, भीतीने तिचा अंग गारठल्यासारखं झालंहोतं. कोण होतं बाहेर तिला काहीच अंदाज न्हवता. रुबेला होती का? जर ती असेल तर ती असं चोरून का येईल? नाना प्रश्न मेरीला पडू लागले होते.तिने बाजूच्या घडयाळात पाहिलं दोन वाजून वीस मिनिटे झाली होती...
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users