" माझे व माझ्या पत्नीचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ( P.P.F. ) खाते २००५ पासून बँक ऑफ इंडिया , कांदिवली ( प. ) शाखेत आहे . राष्ट्रीयीकृत बँकांच्या कार्यप्रणालीवरील विश्वासामुळे कधीही मी व्याजाची आकारणी योग्य प्रकारे होते आहे की नाही हे पडताळून पहात नव्हतो . तथापि वित्तीय वर्ष २०१३ -१४ च्या रक्कमेवरील व्याजाच्या हिशोबाची पडताळंणी सहज करून पाहिली ,तेव्हा माझ्या असे लक्षात आले की ५ तारखेच्या आत रक्कम भरूनही त्या महिन्याचे व्याज कमी दिले आहे .
या बाबतीत बँकेतील व्यवस्थापकांकडे चौकशी केली असता त्यांनी लेखी तक्रार दाखल करण्यास सांगितले . मी लगेच लेखी तक्रार दिली व पत्राच्या शेवटी ग्राहक पंचायतीकडे प्रत पाठवत असल्याचे नमूद केले. पुराव्यादाखल ज्या खात्यातून धनादेश दिला होता त्या बँकेच्या पासबुकाची प्रत जोडली . या तक्रारीचा दोन तीन वेळा पाठपुरावा केल्यावर एक ते दीड महिन्यानंतर बँकेने मला रु. ७९७.५०/- चा कमी दिलेल्या व्याजापोटीच्या धनादेश अदा केला .
मी व्यवस्थापकांचे आभार मानले व अशी चूक का होते ,याचा शोध घेण्यास सांगितले . तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही काहीही करू शकत नाही . बँकेच्या संगणकप्रणालीमार्फत सर्व नोंदी आपोआप होतात . तेव्हा आवश्यक असे बदल संगणकप्रणालीमध्ये करण्याबाबत मी व्यवस्थापकांना विनंती केली , जेणेकरून अशाप्रकारे भ.नि.निधी खातेधारकांची भविष्यात फसवणूक होणार नाही . त्यांनी प्रणाली सदोष असल्याचे मान्य करून योग्य ती सुधारणा करण्याचे आश्वासन मला दिले .
पुन्हा पुढच्या वर्षी म्हणजे २०१४-१५ च्या व्याजाची पडताळणी केली असता रु. ११६०/- एवढे व्याज कमी दिल्याचे आढळले . सदोष संगणकप्रणालीचा फटका आम्हा दोघांच्याही खात्यात दिसून आला . या बाबतीत बँकेत चवकशी केली असता 'ये रे माझ्या मागल्या 'चाच प्रत्यय आला .व्यवस्थापकांनी यावेळीही पूर्वीचेच उत्तर दिले . मी पुन्हा एक तक्रार अर्ज दिला . अर्जाची प्रत ई -मेलद्वारे बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाला पाठवून दिली. पुन्हा अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर बँकेने आमच्या दोघांच्या पासबुकात as on date एवढाच बदल करून बँकेचा शिक्का मारून ते मला परत दिले . आता ह्यानुसार संगणकप्रणाली आपोआप व्याज जमा करेल असे सांगितले .
या सर्व त्रासाला कंटाळून माझे व पत्नीचे सा.भ. नि. निधी खाते कॅनरा बँक ,कांदिवली (पूर्व ) या शाखेत हस्तांतरित करण्यासाठी मी अर्ज दिला . कमी दिलेले व्याज ट्रान्स्फर रकमेत समाविष्ट नसल्याचे कॅनरा बँकेकडून समजल्यावर मी पुन्हा बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाकडे ई -मेलद्वारा तक्रार केल्यावर दोनच दिवसात आम्हाला कमी दिलेल्या व्याजापोटीच्या रु. ११६० /-चा प्राप्त झाला .
सर्व ग्राहकांना विनंती की ,आपण आपापल्या व्याजाची पडताळणी करून बघावी . ५ तारखेच्या आत जर आपल्या बचत खात्यातून रक्कम वजा झाली असेल तर त्या रक्कमेवर बँकेने भ.नि.निधी खात्यावर पूर्ण व्याज जमा करणे बंधनकारक आहे . हा प्रश्न माझ्यापुरता सुटला असला तरी तरी भारतीय रिझर्व बँकेने या प्रकारच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ते आदेश सर्व बँकांना देणे आवश्यक आहे ."
श्री .अरविंद जोशी या मुंबई ग्राहक पंचायतीच्या सभासदाने संस्थेला पाठवलेले पत्र त्यांच्याच शब्दात वर दिलेले आहे .त्यांची चिकाटी निश्चितच कौतुकास्पद आहे. मुळात त्यांनी खात्यावरील व्याजाचा हिशोब करण्याचा खटाटोप केला हेच दुर्मिळ आहे . कारण बहुसंख्य ठेवीदार बँकांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून निशंकपणे पासबुकातील आकडे स्वीकारतात ! त्यामुळे जोशी यांच्यासारखा एखादा ग्राहक आपली फसवणूक झाली आहे हे प्रथम शोधून काढतो आणि त्याबद्दल तक्रार करून तिचा अखेरपर्यंत पाठपुरावा करतो हे उल्लेखनीय वाटते .
मुंबई ग्राहक पंचायत ,पुणे विभाग
पूर्वप्रसिद्धी --ग्राहक तितुका मेळवावा