स्फुट ५ - शनीच्या चौथर्‍यावर

Submitted by बेफ़िकीर on 9 April, 2016 - 10:38

स्फुट - शनीच्या चौथर्‍यावर
===================

अचानक पाणी गेले

अर्धनग्नावस्थेत
चेकाळून
आरोळ्या देत
नाहत असलेली माकडे
झेपावली त्यांच्या ध्येयावर
कैक दशकांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आनंदात

बघे हादरले
बघ्यांमधील बायकांनी पाठ फिरवली
एकमेकींकडे बघत
पदराने चेहरा झाकत
पळ काढायचा प्रयत्न करत

बघ्यांमधील पुरुषांनी विस्फारले डोळे
नको ते दिसणार की काय
हवे ते झाकले जाणार की काय
ह्या विचाराने

तेवढ्यात आला एक कॅमेरा

हा कॅमेरा करणार होता कैद
प्रत्येक कृत्य, प्रत्येक हालचाल, प्रत्येक उद्देश
आणि दाखवणार होता
ते सगळे ह्या देशाला

तो कॅमेरा पाहिल्यावर मात्र
माकडे खाली उतरू लागली

सगळी माकडे खाली उतरली
आणि त्या शनीच्या चौथर्‍यावर
उरल्या फक्त तिघी
अक्का महादेवी, मीरा आणि लल्लेश्वरी

===========

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users