नवीन साली मिळो उभारी----

Submitted by निशिकांत on 8 April, 2016 - 12:31

( आज गुढी पाडवा. नववर्षाच्या निमित्ताने एक कविता. गुढी पाडव्याच्या सर्वांना हर्दिक शुभेच्छा. )

श्वास भरूनी धेय दिशेने
करू तयारी उडावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

जे सरले, गंगेत मिळाले
नको बेरजा वजावटीही
आळवूत या नवीन गाणे
नवे ताल अन् सुरावटीही
असोत स्वर वादी संवादी
सुरेल गोडी जपावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

नको फुलांचे अन् पानांचे,
तोरण लाऊ माणुसकीचे
"फक्त जगावे अपुल्यासाठी"
धोरण बदलू वागणुकीचे
नको मुखवटे, आस जागवू
सभ्य माणसे बनावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

डोळ्यामध्ये तेल घालुनी
सावध सारे सचेत राहू
अत्त्याचारा विरुध्द लढण्या
स्फुरण पावू दे सदैव बाहू
हिंमत होवो कधी न कोणा
कळ्या कोवळ्या खुडावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

मी न कधीही ईशकृपेचा
केला गाजावाजा आहे
कुठे पोंचलो? काय जाहलो?
शिल्पकार मी माझा आहे
भाळावरची नशीब रेषा
उगाच का मग बघावयाची?
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

कधी फुलांची शेज नव्हे हे,
जीवन म्हणजे एक लढाई
सदैव तत्पर संकटावरी
निर्णायक करण्यास चढाई
बघावयाची वाट कशाला?
पुन्हा नौबती झडावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users