कोलाज...

Submitted by जव्हेरगंज on 6 April, 2016 - 09:36

तर त्या दिवशी संध्याकाळी, जिथे आहेत उंच डोंगर, हिरवी झाडी, अन एक नदी.

तिथे मी शोधत गेलो, एक गाव ओळखीचं, दुध दुभत्या गाईचं, पाणी भरलेल्या माठाचं, अन एक झाड बाभळीचं.

फुलाफुलांच्या ताटव्यात, निसरड्या ओलेत्या गवतात, रिमझिमत्या पावसात मी शोधत गेलो एक चेहरा उदास.

ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग.

मी शोधत गेलो त्या डोळ्यांतले युगायुगांचे दु:ख. त्यात दडलेला बंडखोर अन एक शून्य.

त्या डोळ्यांत मला दिसल्या भिजून गेलेल्या अश्रूंच्या कडा, भिजून गेलेली एक संध्याकाळ अन भिजून गेलेला एक सवाल रोकडा.

आभाळभर उसळल्या आनंदाच्या लाटा, त्यांच्या दु:खाच्या छटा मी मोजतच गेलो. मग ठोकत गेलो आरोळ्या अज्ञात भविष्याच्या.

तो चेहरा मला भेटला नाही.
मात्र एक बंडखोर भटकतोय काटेरी वनात, दु:खाच्या सावलीच्या शोधात... अजूनही...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users