दर्शनमात्रे

Submitted by टोच्या on 5 April, 2016 - 07:09

‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ति चारी साधियेल्या’ अश्‍ाी संत ज्ञानेश्वरकृत हरिपाठाची पहिलीच ओवी आहे. देवाचे अगदी क्षणभराचे दर्शनही चारी मुक्ती देण्यास समर्थ असते, असा विश्वास ज्ञानदेव पहिल्याच ओवीत देतात. मात्र, ते मनोभावे असले पाहिजे. सध्या शनिदेवाच्या दर्शनावरून सुरू असलेल्या वादामध्ये हा हट्ट करणारांची ही श्रध्दा आहे की, हटवाद असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, तर दुसरीकडे देवस्थानचे विश्वस्त मंडळ आणि गावकऱ्यांकडून प्रथा परंपरेला छेद न देण्यासाठी सुरू असलेला आटापिटाही कितपत योग्य आहे, याविषयीही सामान्य भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्यास ते चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही.
देशातील कोणत्याच मंदिरात महिलांना दर्शनास बंदी घालता येणार नाही, असा निर्णय हाय कोर्टाने दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शनीच्या चौथऱ्यावर जाण्यापासून पोलिस आणि खुद्द गावातील महिलांनीच रोखले. यानंतर झालेला गोंधळ, धक्काबुक्की, पळापळ माध्यमांद्वारे घरोघरी पोहचली.
सर्व देवांमध्ये शनिदेव कोपिष्ट असल्याचे मानले जाते. इतर सर्व देवांबरोबरच साक्षात महादेवाच्याही राशीला शनिदेव आले होते, अशी आख्यायिका आहे. शनिदेवाची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून महादेवाला लपून बसावे लागले होते, असाही पोथ्या-पुराणांत उल्लेख आढळतो. ज्योतिषशास्त्रावर विश्वास असणाऱ्यांनासुध्दा सर्वाधिक भिती वाटते ती शनिदेवाच्या साडेसातीची. त्यामुळे शनीच्या वक्रदृष्टीपासून वाचण्यासाठी अनेक प्रकारचे विधी केले जातात. भारतीयांमध्ये एवढी दहशत असलेल्या शनिदेवावर सध्या सामाजिक संघटनांची (वक्र?)दृष्टी पडली आणि आता शनिदेवालाच कुठे जाऊन लपावे, असा प्रश्न पडला असेल.
तीन महिन्यांपूर्वी एका महिलेने शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्याची बाब चॅनलद्वारे समोर आली आणि महिला संघटनांना विषय मिळाला. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश मिळवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला, मात्र तो गावकऱ्यांनी सफल होऊ दिला नाही. माध्यमांनाही यातून चघळायला नवीन विषय मिळाला. त्यावर चर्चेच्या फेऱ्या झडल्या. वादविवाद झाले. हा विषय अधिवेशनात गाजला. मुंबई हाय कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मात्र आता महिलांना दर्शनाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रथा-परंपरा बदलणे एका दिवसाचे काम नक्कीच नाही. श्रध्दा आणि धर्मासाठी साम-दाम कुठलाही मार्ग अवलंबण्यास अनुयायी तयार असतात. त्यामुळेच भूमाता ब्रिगेडला चौथऱ्यावर पोहचू न देण्यास गावकऱ्यांनी आणि महिलांनीच केलेल्या विरोधाला वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
आजपर्यंत शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, तरीही दररोज हजारोंच्या संख्येने महिला शिंगणापूरला येऊन शनीदेवाचे दुरून का होईना मनोभावे दर्शन घेऊन जात होत्या. चौथऱ्यावरूनच दर्शन घेतले पाहिजे, असा कुठल्या महिलेने हट्ट धरल्याचे ऐकिवात नाही. शिंगणापूरच नव्हे, तर वेरुळचे घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातही गाभाऱ्यात महिलांना प्रवेश दिला जात नाही. याविषयीही कुणाला काही आक्षेप नव्हता. पण, शिंगणापूर प्रकरणामुळे आता सगळ्याच देवस्थानांमध्ये महिलांनी प्रवेशाचा हक्क मागितला आहे. आता तो कायद्यानेच मान्य झाल्यामुळे देवस्थानांना माघार घ्यावी लागणार आहे. महिलांना देवदर्शनासाठीही समान अधिकार मिळाला पाहिजे, यात चूक काहीच नाही. सगळीकडे महिलांना समान अधिकार मिळत असताना देवाच्या दारात तरी भेदभाव का, हा युक्तिवादही योग्यच आहे. तथाप‌‌ि, भाविकांच्या पूर्वापार चालत आलेल्या श्रध्दांना यामुळे तडा जाता कामा नये, याचाही विचार होणे गरजेचे आहे. वाद-विवादांमुळे देवस्थानांच्या शांततेला, प्रसन्नतेला गालबोट लागत असेल, तर भाविकांमध्ये याविषयी काय प्रतिक्रिया उमटतील आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतील, याबाबतही विचार करायला हवा.
दर्शन घेणे हा खरेतर श्रध्देचा भाग. मग ते जवळून असो, दुरून असो. मनात श्रध्दा असली की झाले. त्यामुळे देवाच्या पायालाच हात लावला पाहिजे किंवा जवळच जाऊन बसले पाहिजे, हा भक्तांचा अट्टाहासही अनाठायी आहे. ज्यांना देवाच्या कोपाची भीती असते, असे भाविक देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा आटापिटा करतात, कर्मकांडावर विश्वास ठेवतात. मात्र, ज्यांना केवळ दर्शनाने तृप्त व्हायचे आहे, त्यांना कुठल्या कर्मकांडात अडकण्याची गरज वाटत नाही. आता कोर्टाच्या निर्णयामुळे आज नाहीतर उद्या महिलांना चौथऱ्यावर किंवा मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश द्यावाच लागेल. पण यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या श्रध्देमध्ये कितीसा फरक पडणार आहे? महिलांनी चौथऱ्याखालून दर्शन घेतले काय किंवा पुरुषांनी चौथऱ्यावर जाऊन तेल वाहिले काय, शेवटी श्रध्दा महत्वाची. तसेही सर्वच देवस्थानांच्या ठिकाणी सुरू असलेला भ्रष्टाचार, भ‌ाविकांची लुटालूट आणि संपत्तीचा मोह हे सगळ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसते. तरीही भाविक अशा देवस्थानांना जातातच आणि दर्शन घेतात. सामान्य माणसाला फक्त शांततेने देवदर्शन होणे महत्वाचे असते. त्याला इतर गोष्टींशी फारसे देणे-घेणे नसते. त्यामुळे जरी शिंगणापूरला आता महिलांना प्रवेश देण्यात आला तरी तो फक्त महिला संघटनांच्या जिद्दीचा विजय ठरेल. केवळ ‘दर्शनमात्रे’ सुखावणाऱ्या सामान्य भाविकांना याच्याशी काही देणे-घेणे असणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तथाप‌‌ि, भाविकांच्या पूर्वापार चालत आलेल्या श्रध्दांना यामुळे तडा जाता कामा नये, याचाही विचार होणे गरजेचे आहे. वाद-विवादांमुळे देवस्थानांच्या शांततेला, प्रसन्नतेला गालबोट लागत असेल, तर भाविकांमध्ये याविषयी काय प्रतिक्रिया उमटतील आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतील, याबाबतही विचार करायला हवा. >> एकदम असहमत. पुर्वापार चालत आलेल्या श्रद्धांचाच विचार केला असता तर अजूनही सूर्य पृथ्वी भोवती फिरतो, पाव खाल्ल्याने धर्म भ्रष्ट होईल, विधवा विवाह होता कामा नये, पतीनिधनानंतर स्त्रियांनी सती जावे अशा सर्व प्रथा एकविसाव्या शतकात पण चालू राहिल्या अस्त्या.

दर्शन घेणे हा खरेतर श्रध्देचा भाग. मग ते जवळून असो, दुरून असो. मनात श्रध्दा असली की झाले >> मग याच न्यायाने इतर व्यक्तींनी दर्शन कुठूनही घेतले तर काय फरक पडतो ? देवळात सर्वांना समान प्रवेश / वागणूक असली तर काही लोकांनाच त्याचा का त्रास होतो.

मेधा,
देव, धर्म, श्रध्दा- अंधश्रध्दा या गोष्टींना शतक एकविसावे असले काय आणि इसविसनपूर्व असले काय, काही फरक पडत नाही. आणि जर श्रध्दा पाळायच्या असतील तर त्यासंदर्भातील परंपरांचाही आदर ठेवला पाहिजे. सगळ्याच ठिकाणी विज्ञानवादी दृष्टिकोन आला तर मग देव आणि दर्शन या गोष्टींनाही काय अर्थ राहतो? मग तो केवळ दगड. त्या दगडासाठी कशाला हवा वाद? अपवाद वगळता बहुसंख्य मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश आहेच की.

ल तर त्यासंदर्भातील परंपरांचाही आदर ठेवला पाहिजे >> सातत्याने आदर ठेवून जुन्याच परंपरा पाळल्या असत्या तर जीन्स, टी शर्ट , स्नीकर्स , एवढंच काय दुचाकी / चारचाकी गाड्या, फ्रीज, मिक्सरचा वापर हे सुद्धा टाळायला हवं मग. घोडागाडी, बैलगाडी अथवा पायी प्रवास करावा. समुद्र उल्लंघून जावू नये. टॉमेटो, बटाटा, हिरवी मिरची खाऊ नये . हे सर्व कराल तुम्ही ? या सर्व परंपरा का नाकारल्या ?

काही मोजक्याच लोकांना हव्या असलेल्या परंपरांचा आदर , अन एरवी सोयीस्कर त्या नव्या परंपरांचा स्वीकार हे काय ?

काही मोजक्याच लोकांना हव्या असलेल्या परंपरांचा आदर >> ज्यावेळी एखादी परंपरा निर्माण होते, त्यावेळी ती बहुसंख्य लोकांनी स्वीकारलेली असते आणि मोजक्यांचा तिला विरोध असतो. कालौघात मोजके, बहुसंख्य यांचे प्रमाण इकडे-तिकडे होत असते. त्यामुळे परंपराही पडत, मोडत असतात.

गोष्ट आहे औरंगजेबाची
दिल्लीत औरंगजेबाच्या सैनिकांनी काही नागा साधूंबरोबर मारामारी केली. संतप्त नागा साधू हातात तलवारी घेऊन लाल किल्ल्यावर चालून गेले त्यांचा आवेश बघून मोगल सैनिक घाबरले कोणीच प्रतिकार करेना. बातमी औरनग्जेबापर्यन्त गेली. सगळे चिंतीत होते. नाग साधूंचा जथ्था किल्ल्यात घुसला. औरंगजेब हात बांधून त्यांना समोर गेला आणि त्यांची माफी मागितली. बिनशर्त माफी , नागा साधू आनंदित झाले आणि परत निघून गेले.
ह्या गोष्टीवरून उजव्या विचार सारणीच्या लोकांनी बोध घ्या . प्रत्येक वेळी विरोध केलाच पाहिजे असं काही नाहीये . पहिल्याच निदर्शन वेळीस भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना दर्शन घेऊन दिला असता तर त्यांच्या विरोधाची हवाच गुल झाली असती.
काही वेळेस औरंगजेब बना.

सहिच किस्सा..! Lol

औरंगजेब कुणा समोर तरी हात बांधून उभा राहत होता. हे पहिल्यांदाच कळाले.
शिवाय सेक्युलर औरंगजेबाचे चरित्र लिहिणार्‍या जादुनाथ सरकार यांनी देखिल वरिल प्रसंगाचे वर्णन त्यांच्या कोणत्याच ग्रंथात केले नाहि हे विशेष वाटते.

काही वेळा औरंगजेब बना.. >> खरंय… काही क्षुल्लक गोष्टींचंही महत्व त्यांना विरोध केल्यामुळे विनाकारण वाढत जातं आणि निरर्थक वाद सुरू होतात.

आणि बाय द वे ‘नंगे से खुदा डरता है’ या म्हणीचा आणि औरंगजेबाच्या या किश्श्याचा काही संबंध असावा का?

ती नागा साधुंची आणि औरंगजेबाची स्टोरी खरी आहे.
पुरावा मागाल तर तो काही माझ्याकडे नाहीये.
पण एच्च मंगेशकरांनी सांगितली होती एका कार्यक्रमात.
समर्थ रामदास जेव्हा दिल्लीमधे होते तेव्हा त्यांनी स्वतः हे पाहिले होते.
आणि मग त्यावर आनंदून त्यांनी "आनंद वन भुवनी" लिहिले.