हे हवे आहे मला ते पण हवे

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 April, 2016 - 14:01

मौन ओठांचे नि संभाषण हवे
हे हवे आहे मला ते पण हवे !

एवढ़यासाठीच जाते दूर की,
भेटण्यासाठी नवे कारण हवे !

आळणी वाटेल जगणे त्याविना
कोणते ना कोणते दडपण हवे

भावना सच्ची असो किंवा नसो
पाठ केलेले तुझे भाषण हवे

जर खरा साधायचा उत्कर्ष तर
आपले अपुल्यासवे भांडण हवे !

कर्ज एकाकीपणाचे फेडण्या
आठवांचे ठेवले तारण हवे

सहन नाही होत ताटातूट ही
विरह दे पण सोबतीचे क्षण हवे !

काहिली मिटवायची असलीच तर
खोल जमिनीआतले रांजण हवे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>आळणी वाटेल जगणे त्याविना
कोणते ना कोणते दडपण हवे>>>मस्त!

>>>जर खरा साधायचा उत्कर्ष तर
आपले आपल्याशी भांडण हवे !>>>मस्तच!

<< जर खरा साधायचा उत्कर्ष तर
आपले अपुल्यासवे भांडण हवे !

कर्ज एकाकीपणाचे फेडण्या
आठवांचे ठेवले तारण हवे >>
हें तर खूप भावले ! छान.