सावल्या लांबल्या

Submitted by निशिकांत on 1 April, 2016 - 01:26

सावल्या लांबल्या

आठवांच्या लाटा
येता न थांबल्या
संध्या छाया येता
सावल्या लांबल्या

वळवाचा पाऊस
आला आणी गेला
थंड गारव्याचा
पांघरला शेला
मनीच्या भावना
पल्लवीत झाल्या
संध्या छाया येता
सावल्या लांबल्या

शब्द गवसले
गवसला सूर
आनंदाचे डोही
होता महापूर
अंगवस्त्री लक्ष
चांदण्या कोंदल्या
संध्या छाया येता
सावल्या लांबल्या

सोनियाचा धूर
आवती भोवती
आनंदाचे आम्ही
रहिलो सोबती
लक्ष्मी सरस्वती
एकत्र नांदल्या
संध्या छाया येता
सावल्या लांबल्या

कोण्या दारी हत्ती
असतील झुलले
माझ्या दारी मोराचे
पिसारे फुलले
सांगण्या शब्दांच्या
राशीही संपल्या
संध्या छाया येता
सावल्या लांबल्या

असे नाही कांही
सुख सदा साथी
दृष्ट लागू नये
मना होती भिती
हसर्‍या चेहर्‍यावर
वेदना गोंदल्या
संध्या छाया येता
सावल्या लांबल्या

रात्र येता दारी
सावल्यांचा शोध
संपलय सारं
मना झाला बोध
पैलतिरी आता
नजरा लागल्या
संध्या छाया येता
सावल्या लांबल्या

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users