आकांक्षा

Submitted by विद्या भुतकर on 29 March, 2016 - 19:47

आईच्या आवाजाने मधुराची झोप चाळवली. तरी ती तशीच पडून राहिली. आई कुणाला तरी सांगत होती,"हो आलीय कालच मधु. आता आहे आठवडाभर, अजून १५ दिवसांनी निघेल अमेरिकेला जायला. "

"ही आई पण ना सगळ्या जगाला सांगत बसते सगळं", मधुने मनात विचार केला.

आईची बडबड चालूच होती," आज तू कसा काय आलास दूध घेऊन?"

तिकडून उत्तर आलं,"आज गडी आला नाही. वाट बघून शेवटी मीच निघालो. लोकांचा खोळंबा होतो ना? सॉरी हां, उशीर झाला जरा आज."

आई," अरे चालतंय आम्हाला. असंही ही मधु घरी आली की उठायचं नाव घेत नाही."

'आता हे पण सांगायला हवं का?', सकाळ सकाळी मधु वैतागली. अजय होता तो. तिचा शाळेतला बारावी पर्यंतचा क्लासमेट. अगदी पहिलीपासून दोघेही एकाच वर्गात आणि पहिलीपासून मार्क आणि नंबरसाठी त्यांची चढाओढही. तसे घरचे एकमेकांना ओळखायचे पण शाळेत असताना कधी बोलणं व्हायचं नाही. ती इंजिनियरिंगला घरातून बाहेर पडली त्यानंतर फारसा काही संबंधही राहिला नाही.

दूध देऊन अजय बाहेर पडल्यावर मधु खोलीतून बाहेर आली.

"उठलीस, नशीब आमचं", आई बोलली. "अजय आला होता आज दूध घेऊन. तुझ्याबद्दल विचारत होता. "

मधु नुसतंच, 'हं' बोलली. पण आईच ती, बोलत राहणारच.

"अलिकडेच त्यानं ग्रीन हाऊस बांधून घेतलं आहे. मस्त फुले येतात. मी मागवून घेते त्याच्याकडून. किती सुंदर रंग आहेत फुलांचे त्याच्याकडे. म्हणाला तुम्हाला घेऊन जातो एक दिवस. तू येतेस का? जाऊन बघून येऊ आपण."

घरी आले की मधूला अजिबात बाहेर पडायची इच्छा व्हायची नाही. गावात उगाच जीन्स घालून जायला तिला चांगलं वाटायचं नाही. त्यात आता तर काय ती वर्षं- दोन वर्षं अमेरीकेला जाणार होती. मग आहेत ते चार दिवस फक्त घर अंगात मुरवून घ्यायचं हाच तिचा उद्देश. तिने नकारार्थी मान हलवली, ब्रश करता करता.

"तू पण ना आळशी आहेस नुसती. जाऊ दे मीच जाईन एकटी.", आई बोलली. एकदम तिला आठवलं," तुला सांगितलं का गं? लग्न झालं त्याचं." ही माहिती मधुला नवीन होती. आपण जायच्या गडबडीत बऱ्याच गोष्टी बोलायचे राहून जातोय हे तिला लक्षात येत होतं.

तिने उत्सुकतेने विचारलं,"कधी?".

"झाला एक महिना. इथे वडूजची मुलगी आहे, छाने दिसायला. मी गेले होते लग्नात. २०१ चं पाकीट दिलं हातात. " आईला मुलीचं नाव सांगण्यापेक्षा, आहेर कितीचा दिला हे सांगणं महत्वाचं होतं.

"काय करते मुलगी?" मधुने विचारलं. तिलाही नावापेक्षा, ती काय करते यात रस जास्त होता.

"आकांक्षा नाव आहे. किती शिकलीय काय ते माहित नाही. पण त्याचे बाबा बोलत होते मध्ये एकदा, की शेती, डेअरी त्यामुळे खूप काही शिकलेल्या मुली नाही मिळत आहेत म्हणून. काय माहीत." आई विचार करत जेवण बनवायला निघून गेली. इकडे मधुही चहा घेता घेता ८-१० वर्षं मागे गेली.

इतके वर्षं शाळेत असून कधी बोलले नाहीत. बाहेर पडल्यावर तिच्यात तसा मोकळेपणा आला पण तो मात्र अजूनही तिला 'अहो, जाओ' करत बोलायचा. ११-१२ वी मध्ये कधीतरी तिच्या मनात अभ्यास सोडून, त्यानेही जरा शिरकाव केला होता. शाळेची शेवटची ट्रिप म्हणून केलेल्या, पुणे-मुंबईच्या ट्रिपमध्ये तो, 'तेरे नाम …. मैने किया है …' गाणं म्हणत असताना, तिची नजर कावरी-बावरी झाली होती नक्की. मैत्रिणीसोबत इकडे तिकडे फिरतानाही चोरून त्याच्याकडे गेलेली नजर होतीच. रात्री उशिरा गल्लीच्या कोपऱ्याला सोडल्यावर, तिला घरी पोचतं करायची जबाबदारी सरांनी त्याला दिली होती. चुकून लोकांनी बघितलं तर काय म्हणतील हा विचार करत ५-६ फूट अंतर ठेवूनच चाललेले ते. काय बोलावं की नाहीच असा विचार करत गप्प चालणारी ती आणि अजूनही 'तेरे नाम …' गुणगुणत रस्त्यातले खडे पायाने उडवत जाणार तो. केवळ नजरेनेच मी जाते म्हणून केलेलं बाय आणि ती रात्र कधीतरी आठवायची तिला. आजही आठवली. पण आयुष्य खूप बदललं होतं. शिक्षण, नोकरी, पुढे जायची आकांक्षा हे सगळं होतंच. आणि 'असंही त्या वयात जे काही 'ते' असतं त्याला काही अर्थ असतो का खरंच?' , मधु विचार सोडून घरून घेऊन जायच्या सामानाची यादी करू लागली. आठ दिवसात खूप कामं संपवायची होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी अजय पुन्हा एकदा आईशी बोलताना कानावर पडला. आज मात्र आईने मधुला आतून बाहेर यायला सांगितलं. मधु जरा वैतागत बाहेर आली. तिच्या अवताराकडे आईने एक वाकडा कटाक्ष टाकलाच.

"अगं अजय त्याच्या बागेतली नवीन द्राक्ष घेऊन आलाय, बिनबियांची आहेत म्हणे. "

"कशा आहात? " अजयने तिला विचारलं. 'अजूनही नीटनेटकाच राहतो हा', तिने विचार केला.

"मी मजेत. तू कसा आहेस?", मधु.

"हां मस्त चाल्लय. काकूंनी सांगितलं काल तुम्ही आहे चार दिवस म्हणून. म्हणून द्राक्ष घेऊन आलो. गोड आहेत एकदम." तो उत्साहात सांगत होता. त्याचा तो बोलण्यातला उत्साह तिला खुलवून जायचा.

"कुठे जाणार आहे अमेरीकेत?" त्याने विचारलं.

"अटलांटा ला जातेय." मधु.

"हां हां. आता भूगोल काही आठवत नाही विशेष. पण थंडी असते ना तिथे? " तो हसून बोलला.

"नाही इतकी पण नाहीये मी जातेय तिथे." मधु.

"बाकी काय? खूप फिरून घ्या. तिकडची शेती पध्दत बघायची आहे मलापण. पण आपण मुंबईच्या पुढे काही गेलो नाहीये अजून. ", तोच उत्साह.

तिने नुसतीच मान हलवली. ते दोघे बोलतच होते तोवर आई बाहेरून आली.

"अरे हे काय? तुझी बायको बाहेरच उभी आहे? बरं बघितलं तरी मी. " आई दामटून बोलली.

तो जरा ओशाळला, जरा लाजला आणि म्हणाला, "हां मीच म्हणलं होतं. येतो पाच मिन्टात, थांब म्हनून. "

आईच्या मागे एक चुडीदार घातलेली मुलगी उभी होती. तीही लाजरी बुजरी, हातात दोन दोन हिरव्या बांगड्या, एका हातात घड्याळ, गळ्यात छोटं मंगळसूत्र, कपाळाला छोटी टिकली. आईने तिला बसवलं.

त्याने तिची मधुराशी ओळख करून दिली,"ही आकांक्षा. या मधुरा."

ती मुलगीही पुढे आली जराशी, हसत म्हणाली,"हो हे खूप कौतुक सांगतात तुमचं. काल पण सांगत होते अमेरीकेला जाणार आहे तुम्ही म्हणून. कसं वाटतंय तुम्हाला?"

तिने भोळ्या उत्सुकतेने विचारलं. मधुरा ला काय सांगावं कळेना. ती म्हणाली,"त्यात विशेष काही नाहीये अगं. आमच्या कंपनीत बरेच जण जाऊन आलेत."

"पण तरी एकटीने जायचं इतक्या लांब म्हणजे धाडस आहे. " तिला खूप भारी वाटत होतं आपण अगदी एखाद्या सेलेब्रिटीला भेटलो असं.

हे बोलत होते तोवर आई ओटी भरायला सामान घेऊन आली. दोघांना शेजारी शेजारी बसायला सांगितलं.

तो, "अहो काकू तुम्ही पण काय हे सगळं करत बसता?"

आई,"अरे पहिल्यांदा आलीय ती आमच्या घरी. एकतर असं तिला बाहेर थांबवलं. आम्ही काही परके आहोत का?"

आकांक्षा ने अजयकडे पाहिलं आणि हसली. आपल्या नवऱ्याला रागवत आहेत बघून म्हणाली,"लग्नानंतर मी पहिल्यांदाच ड्रेस घातला आहे ना इकडे म्हणून मीच नको म्हणत होते. "
आईंनी अजयकडे पाहिलं आणि म्हणाली, "अगं आम्हाला चालतं. सुनेने साडीच घातली पाहिजे असा विचार काही करत नाही आता आम्ही. आज काय विशेष पण ड्रेस घालायला?"
लाजत लाजत अजय बोलला," काकू असंच फिरायला जात होतो सज्जनगड वर. मीच म्हणालो, चालतोय ड्रेस घाल म्हणून. " तीही लाजलीच. त्यांचा तो नव्या संसाराचा नवेपणा त्यांच्या प्रत्येक हालचालीत दिसत होता.

ओटी भरली, कुंकू लावलं, तोंड गोड केलं. दोघांनी नमस्कार केला वाकून. मधुराला,'Happy Journey' सांगून दोघं बाहेर पडले. त्याच्या मागे बाईकवर एका बाजूला दोन्ही पाय करून त्याची बायकोही बसली आणि हलकेच त्याच्या उजव्या खांद्यावर हात ठेवला. आज पहिल्यांदाच, मधुच्या डोळ्यांत असूयेची एक बारीक छटा उमटली होती.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users