प्रत्येकाला भोवत असते नशीब ज्याचे त्याचे

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 March, 2016 - 00:40

जातो कोठे सांगितले ना सांगितले येण्याचे
सताड़ उघडे टाकून गेला दरवाजे घराचे

शिल्पकार आला नि वेडा उचलून घेउन गेला
महत्प्रयासाने केलेले काळजास दगडाचे !

कधी बसावे फांदीवरती उडून जावे केव्हा
वेळापत्रक ठरले नसते कुठल्याही पक्ष्याचे

लाटेवरती स्वार होउनी दौड़त येतो वारा
हार घेउनी किनार्यावरी कोण तिष्ठते ह्याचे ?

कधी उंच तर कधी ठेंगणे जाड़े वा मरतुकडे
आरश्यावरती अवलंबून भविष्य प्रतिबिंबाचे

आयुष्याच्या प्रवासात वळणावळणावर पाटी
'अपघात-प्रवण आहे रस्ता...वळण पुढे धोक्याचे !'

प्रत्येकाला साधत नसते मनाजोगते जगणे
प्रत्येकाला भोवत असते नशीब ज्याचे त्याचे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users