जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग ६): अमृतसर - लखलखते सुवर्णमंदीर

Submitted by आशुचँप on 27 March, 2016 - 18:09

http://www.maayboli.com/node/58148 - (भाग ५): पठाणकोट - निवांत सुरुवात

==================================================================

दिवस दुसरा -

पठाणकोटचे हॉटेल कंफर्ट नावाप्रमाणेच कंफर्टेबल होते. फार काही पॉश वगैरे नाही पण मस्त होते. मुळात आंघोळ उत्तम झाली त्यामुळे फार मस्त वाटत होते. अनेकदा असे होते की गरम पाण्याचा शॉवर कधीही आपल्याला हव्या त्या तपमानाला येत नाही. कधी एकदम कढत, कधी कोमट. पण इथला शॉवर झकास होता, एकदा सेट झाल्यानंतर इतके सुखद वाटत होते. बाहेर कुडकुडायला लावणारी थंडी आणि आत मस्त गरमा गरम वाफाळता शॉवर...तेही दिवसभर सायकल चालवून आल्यावर....आहाहा सुख सुख म्हणतात ते हेच.

त्यामुळे सकाळी निघण्याआधी अन्हिके उरकताच पटदिशी पुन्हा एकदा शॉवरबाथचा आनंद घेतला आणि निघालो.

कालच्या मानानी आज बरेच सेट झाले होते सगळे आणि पटापटा पॅनिअर्स लाऊन झाली. तेवढ्यात काकांच्या लक्षात आले स्पेअर टायर खोलीतच राहीला. हेम मग तातडीने जाऊन घेऊन आला पण त्यात नाही म्हणले तरी थोडा वेळ गेलाच.

खालीच एका टपरीवर चहा बिस्किटे हाणली. इतक्या पहाटे देखील मोठ्या टोपात भाई काहीतरी तयार करत होते. विशेष म्हणजे, त्याने जॉन डीयर चा शर्ट घातला होता. John Deere ही कृषीविषक उत्पादने मुख्यत्वे ट्रॅक्टर तयार करणारी जागतिक दर्जाची कंपनी. त्याची टीशर्ट एखाद्या पंजाबातल्या शेतकऱ्याने चहावाल्याला दिला असावा, पण मला लक्षात राहण्याचे कारण म्हणजे माझा एक बालमित्र पुण्याला याच कंपनीत कामाला आहे. रोज भल्या पहाटे फुल फॉर्मल्स घालून बिचारा ड्युटीला पळतो, त्याला हा फोटो दाखवायला म्हणून काढला तर चहावाला भाई लईच खुष झाला ना.

तिथे अजून पण गमती जमती होत्या. रत्नागिरी नावाची फरसाणाची पाकिटे विकायला होती. म्हणलं, बघा आपले कोकण कुठपर्यंत पोचलयं....

दरम्यान, इतक्या सायकली, त्यावरचे बोर्ड, झेंडे पाहून स्थानिकांची गर्दी जमा झाली. एकेकाला उदंड चौकश्या. जम्मुच्या मानाने इथले लोक जास्त मोकळे होते आणि क्यो पाजी, किधर जा रहे हो करत गप्पा सुरु करत. त्यात लष्कराचे जवानही अपवाद नव्हते. सगळेच्या सगळे बोर्डवर लिहूनही तेच विचारायचे.

...

"अच्छा जम्मुसे आये हो?"

"ओहो, तो आप पुने जाओगे, वो भी सायकल पर?"

"कल शुरु किया क्या, और पोहचेंगे कभी....?"

"इतने दिन सायकल चलाते रहोगे, रात को कही रुकेंगे नही?"

तोंडाला फेस येईपर्यंत आम्हाला बोलत रहावे लागायचे.

त्यात कहर म्हणजे, पुण्यावरून जम्मुला येऊन पुन्हा पुण्याला जाण्यामागचे लॉजिक कुणालाही झेपायचे नाही. शेवटी शेवटी आम्हालाच आपण काहीतरी गंडलोय का काय असे वाटायला लागायचे.

"आप जम्मुसे आ रहे हो?"

"और पुने जाओगे, तो वापीस जम्मु कभी आओगे?"

"नही, वापीस क्यो आयेंगे, हम ते रहने वाले पुणे के ही है"

"तो जम्मु किस लीये आये थे.."

"अरे ये सायकल राईड जम्मु से पुणे है इसलीये..."

"तो आते वक्त कितने दिन लगे...."

"आते वक्त फ्लाईटसे आये, अभी सायकल चलाते जायेंगे.."..

"अच्छा, तो जम्मु मै कौन है आपका?"

"कोई नाही, हम तो होटल में ठहरे थे"

"फिर जम्मु क्यो आये थे...?" (फिरून फिरुन पुन्हा भोपळे चौक, हे देवा) तरी शांतपणे

"हम लोग पूरा भारत घूम रहे हे, पिछले साल पुणे से कन्याकुमारी गये थे, इस बार जम्मु से पुणे जायेंगे फिर हमारा कश्मिर से कन्याकुमारी का सफर पूरा होगा" (हुश्श)

तरी त्यावर त्यांचा पावशेर असायचाच वर...

"तो ११ को पुणे पोहचके फिर कब निकलोगे वहा से...." (उठाले उठाले भगवान,... मुझे नही इन लोगोंको)

"फिर अभी इतनी जल्दी नही निकलेंगे, अगले साल शायद...."

"तो फिर जम्मु आओगे?" (इथे म्हणजे आम्ही सायकलीवर डोके आपटून घ्यायचे बाकी रहायचो)

सगळ्यात भारी म्हणजे हे कशासाठी हे त्यांना समजाऊन सांगता सांगता टाके ढीले झाले.

"आपका कौई प्रोजेक्ट है क्या?"
"आपको किसीने जबरदस्ती किये क्या?"..
.(मला वाटले एका वेळी सांगावे कुणाचेतरी नाव... हे पंजाबी मुंडे लगेच बाह्या सरसावून त्याला ठोकून काढतील)

सायकलवरून शांतीचा संदेश देण्यासाठी चाललोय, पर्यावरण टिकून रहावे इ.इ. आदर्श हेतु बहुतेकांच्या डोक्यावरून जायचा. शेवटी कामधाम नसलेली माणसे आहेत, आणि बहुदा घरी कुणी ठेऊन घेत नसेल म्हणून बोंबलत फिरत असतील असा काहीसा चेहरा करत जायचे.

अर्थात, याला अपवाद अनेक होतेच. कित्येकांनी शाबासकी दिल्या, कित्येक म्हणले की तुम्ही खूप छान काम करताय, आपल्या देशात असेच लोक पाहीजेत. पण ओव्हरअॉल आनंदच होता.

वीरांची भूमी....

अशाच गमती गमतीमध्ये पुढे चाललो होतो. पंजाब म्हणजे सधन शेतीप्रधान राज्य आणि त्याची प्रचिती संपूर्ण रस्त्यात येत होती. नजर जाईल तिथपर्यंत नुसती हिरवीगार शेती. गहु होता, मोहरीच्या पिवळ्याधमक फुलांचा ताटवा होता, उस होता, मका काय दिसला नाही बहुदा हा सिजन नसावा. शेतांमधून जाणारे पाण्याचे पाट, ठराविक अंतरानंतर दिसणारे कालवे, दुथडी भरून वाहणारे पाणी, रस्ताच्या दोन्ही बाजूला मस्त झाडी, सुरेख खड्डेविरहीत रस्ते, जागोजागी लागणारे छोटेखानी धाबे, त्यावर गरमागरम प्राठांचा, पनीरचा, दाल माखनीचा दरवळणारा वास, अहाहाहा कातिल एकदम. केरळनंतर निसर्गसौंद्याच्या बाबतीत मी पंजाबचा नंबर लावेन.

...

...

म्हणजे आता सायकलनी पंजाबात जायचे झकासपैकी अमृतसर, जालंधर, लुधीयाणा, पटीयाला हिंडायचे. वजन एक दहा बारा किलोंनी वाढवून परत यायचे असा एक प्लॅन तेव्हाच डोक्यात येऊन गेला. कारण एकतर सगळे सहकारी कट्टर शाकाहारी, त्यामुळे जसे केरळात जाऊन मासे नाही खाल्ले तसेच पंजाबात जाऊन मुर्गी नाही खाल्ली. या दोन्ही गोष्टी न केल्यामुळे पाप लागते. आणि मी तर अतिशय पापभीरू, सज्जन, त्यामुळे या दोन्ही गोष्टी आता रडारवर आहेत. या पापक्षालनासाठी तरी एकदा जावेच लागेल.

वाटेत एक एक आलुपराठा हाणला आणि भरल्या पोटी पुढे निघालो. गुरुदासपुर - विनोद खन्नाचा मतदारसंघ. ही अशी अवांतर माहीती हेम कडे बरीच असायची त्यामुळे त्याच्यासोबत राहणे हा एक व्हॅल्यु अॅडेड प्रवास होता.

बटाला बराच काळ सोबत करत राहीले. विकीपिडीयानुसार फाळणीच्या वेळी बटाला पाकिस्तानात समाविष्ट होणार होते, पण त्यामुळे अमृतसर हे तिन्हीबाजूने पाकिस्तानने वेढल्यासारखे झाले असते आणि तो धोका सुदैवाने भारतीय नेतृत्वाने ओळखला आणि बटाला, गुरुदासपुर हे भारतात समाविष्ट झाले आणि या निर्णयाचा चांगलाच मोबदला मिळाला. नुसतेच संरक्षणदृष्ट्याच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही. आयर्न बर्ड अॉफ इंडीया नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश सर्वाधिक यंत्रसामुग्री तयार करणारा म्हणून ओळखला जातो. इतकेच नव्हे तर गुरुदासपूर मधून अनेक नररत्नेही भारताला मिळाली आहेत.

त्यात परमवीरचक्र प्राप्त गुरुबचनसिंग सलारीया, अशोकचक्र प्राप्त ले. नवदीप सिंग, श्रेष्ठ तबलावादक पं. अल्लारखाँ, पं. झाकीर हुसेन, त्यानंतर चिरतरूण देव आनंद, विजय आनंद, भारतीय अॉलिंपिकवीर हॉकीपटू सुरजीतसिंग रंधवा, प्रभज्योत सिंग, क्रिकेटपटू मनप्रीत गोनी, शरीरसौष्ठवपटू प्रेमचंद डोग्रा अशी अनेक नावे.

त्यामुळे एकदम ऐतिहासिक प्रदेश जात असल्याचे फिलिंग येत होते. पण त्याच बरोबर फाळणीचा रक्तलांछित इतिहासही डोक्यात येत होता. नवनिर्मिती पाकिस्तानात हिंदुंवर झालेल्या अत्याचाराच्या बातम्या वाऱ्याप्रमाणे इथे पसरल्या आणि इथेही रक्ताचे पाट वाहीले. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार पूर्व पंजाबातून निसटून पाकिस्तानात जाणाऱ्या सुमारे लाखभर मुसलमानांना प्राणास मुकावे लागले. तर तितकेच हिंदू भारतात येण्याच्या प्रयत्नात मारले गेले. दोन्हीकडे बळी पडले ते असहाय्य स्त्रिया, लहान मुले, अर्भके, वृद्ध आणि जिंवत राहीला तो माणूसरुपी हैवान.

आजही फाळणीची वर्णने वाचली तर अंगावर काटा येतो. काय झाले असेल त्यावेळी याची कल्पनाही करवत नाही. हा मुळात प्रदेशच कायम अस्थिरतेचे चटके सोसणारा, म्हणूनच ते इतके कणखर झाले असावेत. अशा संमिश्र भावना मनात बाळगत पुढे निघालो.

बटालाच्या थोडे पुढेच एका धाब्यावर सायकली वळवल्या. तिकडे मेन्यू बघताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले. मक्के दी रोटी नि सरसोंदा साग. त्यावर लई प्रेमाने घातलेले मख्खन. सोबत लच्छा पराठा आणि बाकीही होते आणि वर तुडुंब भरलेला लस्सीचा ग्लास.

...

तव्यावरून गरमागरम पानात....काय बिशाद आहे दोन घास कमी खाण्याची

घासाघासाला लक्षावधी कॅलरीज पोटात Happy

ओहह, इतक्या जड जेवणानंतर सायकल चालवणे सोडा, सायकल पर्यंत चालत जाणेही मुश्किल झाले. तिथेच मस्त बाजली वगैरे टाकले होते, मी काकांना म्हणालोही आलोच आहोत तर एक डुलकी काढू. अजून २५ किमीच राहीले आहे, जाऊ निवांत रात्री. काय घाई आहे. पण छे ऐकतील तर ना. निघाले सगळे आपले तरातरा.

मी, हेम आणि ओबीने मात्र थोडा वेळ जरा टंगळमंगळ केली, काही महत्वाचे कार्य उरकले आणि मग पुढे निघालो. वाटेत पण किस्से. एक बाईकवाला भेटला. आधी आमच्या सायकलींगचे कौतुक केले, मग म्हणाला मी ट्रेकर आहे. ट्रेकर आहे म्हणल्यावर आमची लगेच गट्टी जमली. आता म्हणला मी यावर्षी एव्हरेस्ट करणार आहे.
मी म्हणलं, बेस कँप का, तर म्हणे बेस कँप क्यो जी, उप्पर तक जायेंगे.

आयला म्हणलं हा भारी दिसतोय, पण बघुन वाटत तर नव्हते. मग म्हणे मी गेल्या वर्षी के२ पण करून आलो. मग मला आणि हेमला संशय यायला लागला की महाराज पुड्या सोडतायत. मी मग पाकिस्तानची परमिशन कशी घेतली, काय कसे गेला वगैरे खोलात घुसलो तर थातुरमातुर उत्तरे देऊन गायबला. आम्ही मग त्यावर भरपूर हसून घेतले.

तोपर्यंत काकांचा फोन आलाच की ते अमृतसर फाट्यापाशी आमची वाट पाहत थांबलेत. मग आम्ही टंगळमंगळ न करता पॅडल हाणले आणि जाऊन ठेपलो. फाट्यापासून शहर होते फक्त ६-७ किमी. त्यामुळे अर्ध्या तासात पोहचू आणि फ्रेश होऊन सुवर्णमंदीर आणि जालियनवाला बाग बघून येऊ असा बेत ठरला.

पण, छे आपल्या योजनेप्रमाणे वागेल ती नियती कसली. त्या सहा-सात किमीने इतकी दमछाक केली जी आधीच्या ६०-७० मध्येपण झाली नसेल. संपूर्ण रस्त्यावर फ्लायओव्हरचे काम सुरु होते. त्यामुळे प्रंचड ट्रॅफिक, त्यात जागोजागी बांधकामाचे सामान पडलेले, रस्ता कधीच्या काळी अस्तित्वात असावा अशी शंका यावा इतपत खड्डे, पाणी, चिखल, त्यातच बांधकामाची वाळू, घसरडा. खड्डे तर इतके होते आणि प्रत्येक खड्ड्यात इतकी आदळत होती सायकल की बहुदा आता एक एक पार्ट हातात घेऊन जावा लागले असे वाटायला लागले. थोडा वेळ हातात घेऊन चालत जावे असे वाटायला लागले पण तेही करता येईना.

थांबत, अडथळत, ठेचकाळत कसेतरी साडेसहाच्या सुमारास हॉटेलपाशी पोहचलो. या पॅचने तब्बल आमचा दीड तास खाल्ला. हॉटेल त्यात होते अगदी सुवर्णमंदीराला खेटून. त्यामुळे तुफान गर्दी शेवटी मग मी नाद सोडून दिला आणि हातात सायकल घेऊन जायला लागलो. तर आम्हाला बघायला ही गर्दी. त्यातले चार पाच जण आले सरदार.

"आप पुणे से हो?"

'हाँ'

"मराठी बात करते हो?"

'हाँ'

"हमे भी आती है थोडी थोडी मराठी"

अरे, वाह, बोला की मग. मस्त वाटेल

"इकडे, तिकडे "

दुसरा पण लगेच - "इकडे तिकडे "

पाठोपाठ तिसरा, चौथा - गाणे म्हणल्यासारखे नुसतेच "इकडे तिकडे...."

अरे म्हणलं, पुढे पण बोला

तर म्हणे हमको इतनीही आती है मराठी

देवा रे, मी म्हणजे हसावं का रडावं या अवस्थेत....

"बहुत अच्छे, हम भी तिकडसे इकडे आये है" करत मी सायकल पुढे घातली. तरीही मागे त्यांचा इकडे तिकडेचा नामघोष सुरुच होता.

कुणी त्यांना हा एकच शब्द शिकवला असेल देवास ठाऊक.

हॉटेल सिटी इंटरनॅशनल. नावाप्रमाणेच इंटरनॅशनल होते. एकदम झॅकपक. हॉटेलला पार्किंगच नव्हते त्यामुळे सायकली रस्त्यावरच, वर्दळीच्या ठिकाणी लावाव्या लागणाऱ होत्या. अतिउत्साही पब्लिक त्याचे काय करेल याची भिती मनात होती पण पर्यायच नव्हता. जितक्या शक्य होईल तितक्या कडेला रचून पक्क्या बांधून टाकल्या आणि रुमवर गेलो.

इतका उशीर झाल्यामुळे जालियनवाला बाग बंद झाल्याचे वर्तमान कळले, आणि ती एक रुखरुख कायमची मनात राहीली. इतक्या जवळ येऊनसुद्धा पाहता न आल्याचे. पण सुवर्णमंदिरात दर्शन होऊ शकणार होते. मग पटापटा आवरून गेलो.

रात्र झाल्यामुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता, आणि तळ्याच्या सानिध्ध्यामुळे, संगमरवरी फरशी बर्फाच्या लादीसारखी झाली होती. त्यावरून चालणे हे एक दिव्यच होते. पण पहिल्यांदा त्या लखलखत्या मंदिराचे दर्शन झाल्यावर हे सगळे विसरल्यासारखे झाले. अक्षरश मंत्रमुग्ध करण्याची ताकद आहे या मंदिरात.

दोन्ही प्रचि आंतरजालावरून साभार

दिवसा त्याची भव्यता जाणवते पण आत्ता रात्रीच्या वेळी त्या तेजपुंज सुवर्णाचे प्रतिबिंब तळ्यात पडून चमकताना जे काही अदभुतरम्य वातावरण तयार होते त्याला तोड नाही. मी तर असा भारून गेलो होतो ते पाहून.

...

...

कुठेही कचरा नाही, तळ्यात निर्माल्याचा खच नाही, तेलाचे ओघळ नाहीत, शेंदूर फासून बरबटलेल्या भिंती नाहीत. सगळे कसे आखीवरेखीव, सुबक आणि शिस्तबद्ध.

सुदैवाने भाविकांसाठी जाजमासारखे घातले होते त्यावरून चालत जाता येत होते, पण ओल्या पायांनी त्यावर चालल्यामुळे तेही गारठणक झाले होते,

मी आपला जाता जात फोटो काढत चाललो होतो. मुख्य मंदिराचा गाभा सोडला तर कुठेही फोटो काढायला मनाई नाही, त्यामुळे मनमुराद फोटोसेशन झाले. अर्थात त्याही वेळी खालिस्तानवाद्यांनी कसा ताबा घेतला असेल मंदिराचा, लष्करी कारवाईच्या वेळी काय झाले असेल याच विचार येतच होता.

ग्रंथसाहिबला हात जोडून बाहेर पडतांना प्रसादाजवळ थांबवलं गेलं. शिरा होता.
डायट कॉन्शस हेम ने त्याला शक्कर है क्या विचारल्यावर नही, गुड है म्हणाला.
लगेच मग ओंजळ पुढे केली त्याने. त्या कडाक्याच्या थंडीत गरमागरम तुपाळ शिरा खाणे हेही एक सुख होते.

त्याचवेळी पालखी सोहळा सुरु होता आणि अहमिकेनी शिख भाविक पालखीला खांदा द्यायला पुढे सरसावत होते. त्यांच्या कट्टर भक्तीभावाची प्रचिती आतच आली होती. तिथे एक कुटुंब, नवरा बायको आणि दोन गुटगुटीत मुले हातात फडकी घेऊन फरशी पुसत होते. लोक ओलांडून गेली की लगेच फरशी चकचकीत करायची. त्यांच्याकडे बघूनच कळत होते की अतिशय सुखवस्तु घरातील आहेत. पण इथे ते भक्तीभावाने ते फरशी पुसत होते. मीच इतका अॉकवर्ड झालो आणि त्यांच्या स्वच्छ फरशीवर पाय देववेना. माझ्या मनातली घालमेल त्या कुटुंबप्रमुखाने जाणली, मंदसे हसून म्हणाला, कौई बात नाही, हमारा काम है, आपल जाईये.

मी पुढे जाऊन हेमला म्हणले देखील, हा माणूस खात्रीने लखपती असणार.

आता अजून आकर्षण होते ते लंगरचे. डिस्कवरीवर मेगा किचनमध्ये याची माहीती पाहीली होती. अष्टोप्रहर सुरु असलेल्या या लंगरमध्ये सुमारे लाखभर लोक रोज प्रसाद घेतात. आणि शेकड्यांनी स्वयंसेवक स्वयंफूर्तीने इथे काम करत असतात. काय कौतुक करावे तितके थोडेच.

मसुरदाल, रोटी मुगशिरा आलूफ्लॉवर भाजी असा फर्मास मेन्यु होता. कटाक्षाने पानात काही टाकले नाही. हेम नंतर म्हणाला, की त्याने त्याच्या वाटेचा लंगरातला शीरा शेजारच्या सुह्रदच्या पानात हळूच टाकला. त्याच्या ते शेवटपर्यंत लक्षात आले नाही.

आता जेवल्यानंतर थंडी जास्तच जाणवायला लागली त्यामुळे फारसा वेळ न घालवता बाहेर आलो. किरकोळ खरेदी केली. कडे, रुमाल वगैरे आणि रुमवर जाऊन पडी टाकली.

उद्या पहिली कसोटी होती १६४ किमीची. त्यामुळे लवकर निघायचे ठरले आणि दिवसभराच्या श्रमानी आणि पोटभर जेवणानी लग्गेच डोळा लागला.

==============================

...

स्ट्राव्हा काहीतरी घोळ करतयं हे निश्चित...कारण आलो तो रस्ता इतका सरळसोट आणि उताराचा नक्कीच नव्हता. एलेव्हेशन ग्राफ बघुन सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला.

============================================================
http://www.maayboli.com/node/58217 - (भाग ७): मुक्तसरसाहीब - कसोटीचा दिवस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे! तो टायर मी नव्हे, काकांनीच धावत जाऊन आणला. त्यांनाही बाघा बॉर्डर जमल्यास करायची होती..
पंजाब्यांनी तर बिवी बच्चे नही है क्या आपके ..फिर क्यूं घुमते हो?..इतपत विचारुन वात आणला होता.

मस्त वर्णन. सुवर्णमंदिराचे फोटो सुंदर.

पंजाब्यांनी नसत्या चौकश्या करून तुम्हाला फारच पिडलेले दिसते

पंजाबडी फार भोळसट असतात! मुठभर फेकता ट्रॉलीभर देणारी जमीन आहे सकस हवा आहे लढ़ाऊ वृत्ती आहे त्यामुळे सगळेच दिलखुलास आहे, मोजून मापुन काहीच नसते त्यांचे सगळे दिलखोलके , अश्या सुंदर प्रदेशाला नशेचा विळखा पडलेला वाचला की मन विषण्ण होते. बाकी ,

सरदारजी खुप हरामखोर असतात सख्ख्या भावा सारखा जीव लावतात स्कॉच ते मुर्ग मलाई टिक्का मधे मैत्री मेरिनेट करतात, आपल्यासारख्या बे एकं बे लोकांना पोटाचे नळ फुटस्तोवर हसवतात, हसायला शिकवले की एक दिवस भोसड़ीचे अकाली मरून जातात अन आयुष्यातला एक मोठा कोपरा रीता करून जातात! सरदारजी खुप हरामखोर असतात . Sad

सुवर्णमंदिराबद्दल (तखत श्री हरमंदिर साहिब ___/\__)

कुठेही कचरा नाही, तळ्यात निर्माल्याचा खच नाही, तेलाचे ओघळ नाहीत, शेंदूर फासून बरबटलेल्या भिंती नाहीत. सगळे कसे आखीवरेखीव, सुबक आणि शिस्तबद्ध.

ह्याच्याबद्दल एक आवर्जून सांगावे वाटते, की पंजाबी मधे सर म्हणजे तलाव, अमृतसर उर्फ़ अमृताचा तलाव हे ह्या सुंदर गावचे नाव ह्या हरमंदिर साहेब मधील तलावावर पडले आहे, गुरु रामदास ह्यांनी हे मंदिर स्थापन केले अन तेव्हाच अमृतसर वसले असे ऐकले होते , हा तलाव शीख बांधवांसाठी परमपवित्र आहे त्यामुळे त्याची निगा खुप काटेकोरपणे राखली जाते, जगातले एक सर्वात मोठे फिल्टरेशन अन क्लोरीनेशन सिस्टम (स्विमिंग पूल्सचे असते त्याच्या कितीतरी पट मोठे) ह्या तलावाचे पाणी कायम स्वच्छ करत असते. बाकी लंगर अन जेवणाबद्दल काय बोलणार! सर्वात पवित्र काम तेच! आर्मीचे मोठमोठे ब्रिगेडियर ते कॉर्पोरेट किंग असलेले सिख बंधू इथे सेवादार म्हणून पांढरे कपडे अन सतनामी पगड़ी धारण करून सेवा करताना दिसतात, बाकी अमृतसरात जो पुर्ण एक पराठा खाऊ शकतो अन त्यावर एक कंटर (पाऊण लीटर ग्लास) भरून लस्सी (थंडीत गरम दूध + पावशेर जिलबी) पिऊ शकतो त्याच्याबद्दल आमच्या मनात विशेष आदर असतो!

तूफ़ान लिहिताय आशुभाऊ दर लेखात आमच्या कुठल्यातरी आठवणी चाळवतात सुंदर प्रवास सुंदर लेखन!!

(पुढे राजस्थान मधे जाणार प्रवास म्हणजे आमच्या सासुरवाड़ीमधुन तिथल्या आठवणीच्या विटा तुमच्या ह्या ताजमहालास प्रसंगानुरूप लावुच म्हणा)

इकडे तिकडे Rofl फार हसवलस रे सकाळी सकाळी. बाकी प्रचि आणी अनूभव मस्त! मस्त फोटो आलाय सुवर्ण मन्दिराचा.

मस्त झालाय हा ही भाग.
सोन्याबापूंची पोस्टही छान.

गुरुद्वारात पंजाबी पुरूष सेवा करतात त्याबद्दल पंजाबी कुटूंबातच एकद स्फोटक मत ऐकलं होतं, त्याची आठवण झाली. Happy उगीच विषयांतर होईल म्हणून इथे लिहित नाही.

बहुत अच्छे, हम भी तिकडसे इकडे आये है">>>>> Lol Rofl
जबरी हसलेय या वाक्यावर .
धमाल आली हा भाग वाचताना. सुवर्णमंदिराबद्दल तिथल्या स्वछतेबद्दल वाचून छान वाटलं . देशभरातील तमाम मंदिरानी आदर्श घ्यायला हवा सुवर्णमंदिराचा..

सोन्याबापूंची पोस्टही उत्तम !

बाकी ते सरसो का सागवर एवढे बटरचे तुकडे तसेच भरभक्कम पराठे पाहून ऑ झालं अगदी
आपली काय हिम्मत होणार नाही खायची .

फिरून फिरून भोपळे चौकात वाले संवाद Rofl
मस्त चालू आहे. पटापट येऊदे पुढचे भाग.
बापूसाहेब तुम्हाला पुन्हा एकदा कडक सॅल्युट..

सुवर्णमंदिर दर्शन घडविल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. कुठेही सायकल लावली की त्यासोबत असलेल्या अनेकविध गोष्टींमुळे आजुबाजूच्या स्थानिक लोकांचे लक्ष जातेच जाते. कौतुकमिश्रित आदर असतो त्यांच्या मनी. त्यातही "पुणे" तर देशातील चार मेट्रो सिटीपेक्षाही लोकप्रिय नाव झाले असल्यामुळे तिथून ही मंडळी (तेही सायकल वापरून) आपल्या गावी आली आहेत याचाही कुठेतरी आनंद असतोच असतो.

अरे यार काय लिहिल आहेस... अन मस्त फोटो...
काय लिहिल आहेस म्हणण्यापेक्षा, कसले भन्नाट अनुभव आहेत....
(पण त्याकरता सायकलवरुन भटकावे लागते लिंबु बच्चमजी... कळ्ळ का... घरात बसुन कै होत नस्ते
>>>> शेवटी कामधाम नसलेली माणसे आहेत, आणि बहुदा घरी कुणी ठेऊन घेत नसेल म्हणून बोंबलत फिरत असतील असा काहीसा चेहरा करत जायचे. <<<< कुणी हे असे म्हणले तरी लक्ष नै द्यायचे, अगदी लिंबी वा लिंबीच्या बाबांनी म्हणले तरी ऐकुन कानाडोळा करायचा... )
वर्णन वाचुन मी तर ठरवलय बाबा, आयुष्यात एकदा तरी पंजाबमधे जायचेच Happy

>>>> पुढे राजस्थान मधे जाणार प्रवास म्हणजे आमच्या सासुरवाड़ीमधुन <<<< हे लय भारी सोन्याबापु..... Happy
नांदेडमधे अस्ताना मला राहुन राहुन वाटायचे की "कुडी पंजाबन" मुळे पंजाबी सासुरवाडी मिळणार की काय... Lol पण पंजाबन नसली तरी मावळीण सासुरवाडी मिळाली शेवटी.... ! असो.

धन्यवाद, सर्वांना....

हेम या मधल्या मधल्या गाळल्या जागा भरत रहा बाबा, मला काही गोष्टी नाही लक्षात राहत.

पंजाब्यांनी नसत्या चौकश्या करून तुम्हाला फारच पिडलेले दिसते

पिडले असे नाही, पण आत्तापर्यंत भेटलेल्यांमधे सगळ्यात जास्त चौकस तेच होते. ते आणि खाली गुजरातमध्ये.

बापू - फारच सुरेख पोस्ट. पहिल्याच वाक्यात हरामखोर शब्द वाचून दचकलोच एक क्षण. मग पुढे वाचल्यावर त्यातली वेदना कळली. काय बोलू, शब्द नाहीत.

बाकी, हरमंदिर साहिब बद्दल बरीच माहीती नव्याने कळली.

अच्छा सासुरवाडी, अरे बापरे म्हणजे मला जरा जपूनच लिहायला पाहिजे. Happy

सुवर्णमंदिराबद्दल तिथल्या स्वछतेबद्दल वाचून छान वाटलं . देशभरातील तमाम मंदिरानी आदर्श घ्यायला हवा सुवर्णमंदिराचा..

च्यामारी, खाली केरळात स्वच्छ मंदिरे, वर उत्तरेत स्वच्छता. आपल्याच वाटेला असली दळभद्री मानसिकता का आलीये कळत नाही. आपल्याकडे नुसते देवाला कोट्यावधींचे दागिने करतील, पण लाखभर रुपये खर्चून स्वच्छता नाही ठेवणार. जसे काही स्वच्छता ठेवली तर कोपच होणार आहे देवाचा.

गुरुद्वारात पंजाबी पुरूष सेवा करतात त्याबद्दल पंजाबी कुटूंबातच एकद स्फोटक मत ऐकलं होतं, त्याची आठवण झाली. स्मित उगीच विषयांतर होईल म्हणून इथे लिहित नाही.

पराग - फार नाही होणार. हरकत नसेल तर कर शेअर इथे.

आपली काय हिम्मत होणार नाही खायची .

पोटात आग पेटल्यावर काय पण खाऊ शकतो माणूस...

"पुणे" तर देशातील चार मेट्रो सिटीपेक्षाही लोकप्रिय नाव झाले असल्यामुळे तिथून ही मंडळी (तेही सायकल वापरून) आपल्या गावी आली आहेत याचाही कुठेतरी आनंद असतोच असतो.

हा अनुभव पुढे राजस्थानात जास्त आला. पंजाब्यांना पुण्याबद्दल फारशी माहीती नव्हती असे जाणवले. पण राजस्थान, गुजरात मध्ये बरेच लोक पुण्यात येऊन गेलेले, काम करून गेलेले होते.


वर्णन वाचुन मी तर ठरवलय बाबा, आयुष्यात एकदा तरी पंजाबमधे जायचेच स्मित

नक्की जाऊन या...फारच अप्रतिम आहे. आणि नोव्हेंबर - जानेवारी याच मौसमात.

सरदारांचे संवाद Happy Happy
सुवर्णमंदिराचे फोटो खूप छान आलेत.
सोन्याबापू, जियो! सुरेख पोस्ट..

अच्छा सासुरवाडी, अरे बापरे म्हणजे मला जरा जपूनच लिहायला पाहिजे. स्मित

लिहा हो बिनधास्त!! खिक् !!! Wink

झकास चाललीये मालिका आशू.... पटापटा पुढचे भाग टाक.. जितक्या जोरात सायकल हाणलीस तितक्याच जोरात लेख पण पाड..

धन्यवाद सर्वांना ...

जितक्या जोरात सायकल हाणलीस तितक्याच जोरात लेख पण पाड.

अरे, गम्मत काय झालीये, कुणीच दिवसागणिक नोट्स काढल्या नाहीत. त्यामुळे मनाच्या सांदीकोपऱ्यातून आठवणी आणि प्रसंग शोधून त्यानुसार लिखाण करावे लागते. आणि त्याच प्रोसेसमध्ये वेळ जातोय.

कस्ले भारी लिहिलंस... फोटोही सुपर्ब ... Happy

पोट धरुन हसवता हसवता मधेच गंभीर ....... तर कधी डोळ्यांच्या कडा ओलावल्या.....

सोन्याबापूंची पोस्ट तर पार आतपर्यंत काहीतरी हलवून गेली ....

Pages