भांडण !!

Submitted by विद्या भुतकर on 25 March, 2016 - 22:28

ती उठली कधीतरी सकाळी. तो शेजारी नव्हता त्यामुळे किती वाजलेत बघण्याचं काही विशेष कारण नव्हतं. तरीही तिने पाहिलं शेजारच्या फोनमध्ये आणि परत पडून राहिली तशीच, लोळत. हे काही आज पहिल्यांदा नव्हतं. त्यांचं भांडण झालं की मग तिच्या सोबतीला यायचा, 'तो', तो म्हणजे आळस हो ! काल रात्री घातलेले वाद आठवायलाही नकोत, इतकी आळशी व्हायची ती. तशीच झाली आजही. अर्धा तास झाला, या कुशीवरून, त्या कुशीवरून, तोंड उशीत खुपसून, फोनमध्ये जरा मेसेज वगैरे पाहून झाले, सर्व करून झालं. शेवटी उठली, डोळ्यांनी धुसर दिसेल इतकेच उघडत बाथरूम मध्ये गेली. तॉईलेट वर बसून राहिली सुन्न. यंत्रवत हात फ्लशकडे गेला. उठून ब्रश केला, यंत्रवतच. बरंच काम केलं त्यामानाने.

काहीतरी केलं पाहिजे, असा विचार करून किचनमध्ये आली. भांडी सिंकमध्ये तशीच पडलेली. कालचा भातही न झाकलेला तसाच. 'शेजारची ताटली झाकायला हवी', तिने विचार केला. त्याने तिचा चहा करून ठेवला होता. साय आलेला तो चहा भांड्यात तसाच गरम केला, गाळून घेतला, आधी वापरलेल्या गाळण्यानेच. कप हातात घेऊन बाहेर हॉलमध्ये आली. पडद्याना ढकलून आत येणारा उजेड तेव्हढाच काय तो तिथे होता. बाहेर पाऊस आहे की ऊन हेही बघायची इच्छा नव्हती. सोफ्यावर बसून राहिली, शून्यात बघत. चहा संपला. कप शेजारच्या टेबलावर ठेवला. काल खाल्लेली प्लेट तिथेच होती, तिला ढकलून जमेल तितका आत सरकवला.

हॉलमध्ये पडलेल्या पसाऱ्यावर फिरता फिरता तिची नजर आपल्याच पायाकडे गेली. 'नखं वाढलीत' तिने विचार केला. 'ऑफिसला जाताना त्या एका शूज मध्ये अंगठा दुखतो तेंव्हाच लक्षात येतं, पायाची नखं कापली पाहिजेत. आता कापावी का?'. त्यात तिला पळताना ठेच लागून काळं-निळ झालेलं नख दिसलं. पळायला जावं का? किती पोट वाढलय, आज काल डाएट कडे अजिबात लक्ष देत नाही. तिने बसल्यामुळे सुटलेल्या पोटाच्या टायरकडे पाहीलं. मग बसल्या बसल्या सोफ्यावर आडवी झाली आणि पाय पोटात घेऊन तशीच पडून राहिली. किती वेळ लोटला माहीत नाही. मधेच फोन थरथरला. टेबलावरून उचलून आलेला मेसेज पाहिला. पाचेक मिनिट पहात राहिली काहीतरी विचार करत.

एकदम अंगात आल्यासारखे उठली, खिडक्यांवरून पडदे बाजूला सारले. ऊन झरर्कन आत आलं. भरभर हॉलमधले सामान आवरलं. खरकटे कप, प्लेट आत नेली आणि सर्व कट्टा चकाचक होईपर्यंत थांबली नाही. घरातली प्रत्येक खोली तिच्यासोबत रूप पालटत होती. गाणी लावण्यासाठी तिने फोन उत्साहाने हातात घेतला. मघाचा तो त्याचा मेसेज वर तसाच दिसत होता, "Sorry". तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू पसरलं. भांडण मिटलं होतं.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..मुलं नसतात तोपर्यंत खरंच अशी भांडणं, आळस वगैरे मस्त चैन करता येते. एकदा मुलं झाल्यावर मात्र जगाशी भांडण झालं असलं तरी आळस करता येत नाही की पाच मिनिटसुध्दा जास्त झोपता येत नाही!

छान Happy

"मघाचा तो त्याचा मेसेज वर तसाच दिसत होता, "Sorry". तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू पसरलं. भांडण मिटलं होतं."
खरच भांडण मिटण ईतक सोपं आहे का ?
मी गेले काही दिवस एक भांडण बघत आहे.... वेगवेगळ्या पध्दतीने दोघा नवरा- बायकोला समजावून झाले आहे. पण कुणिही नमत घ्यायला तयार नाही. घरात नुकतिच १० ला गेलेली मुलगी आहे. आपसुकच हा परिणाम तिच्यावर होताना दिसतो आहे. उद्या पुन्हा एकदा समजवण्या साठी जाणार आहोत. काही मार्ग मिळल्यास बरे होईल.
भांडणाचा मुद्द खरं तर दोघांचा अहं पणा आहे. (असे माझे मत आहे). चांगली नोकरी मिळाली म्हणुन बायको पुणे सोडून बाहेर गेली आहे. नव-याला ही गोष्ट पट्लेली नाही. बायकोनी ईथेच रहावे असे त्यांचे म्हणने पडते.
पुण्यात हवी तशी नोकरी मिळत नाही असे बायकोचे मत आहे. त्या बाहेर मिळालेली नोकरी सोडायला तयार नाहीत.
मुलीची जबाबदारी नक्की कुणी घ्यायची ह्या वरुन पण वाद चालु आहेत. अनेक प्रकारे समजावुन पण मार्ग निघत नाहिये.... अशा वेळी काय करता येईल.

मस्त!!! खुप सुरेख लिहिता तुम्ही. आज तुमचे बरेच लेख वाचुन काढले. अमेझिंग शैली आहे तुमची. लिहित्या रहा.

विद्या, खुप साधं सोपं आणि छान लिहितेस. एकदम मनातलं. हा पण लेख असाच.

हे भांडणं, सॉरी म्हणणं, त्यावर मुड्स अप-डाउन होणं हे वयाच्या सगळ्याच टप्प्यात अनुभवलं आहे. बॉयफ्रेंड, नवरा, कलिग किंवा बेस्ट फ्रेंड..... कोणाच्याही बरोबरच्या भांडणानंतर आणि सॉरी नंतर असे मुड्स असतात.

मस्त !

बॉयफ्रेंड, नवरा, कलिग किंवा बेस्ट फ्रेंड..... कोणाच्याही बरोबरच्या भांडणानंतर आणि सॉरी नंतर असे मुड्स असतात. >> +1 Happy
यासाठीच ही पोस्ट होती.

सर्वाअन्चे आभार.

विद्या.

Happy

विद्या, खुप साधं सोपं आणि छान लिहितेस. एकदम मनातलं. हा पण लेख असाच.
हे भांडणं, सॉरी म्हणणं, त्यावर मुड्स अप-डाउन होणं हे वयाच्या सगळ्याच टप्प्यात अनुभवलं आहे. बॉयफ्रेंड, नवरा, कलिग किंवा बेस्ट फ्रेंड..... कोणाच्याही बरोबरच्या भांडणानंतर आणि सॉरी नंतर असे मुड्स असतात.
मस्त !

+१ Happy