स्त्री-सीमंतिनी

Submitted by स्मिता द on 23 March, 2016 - 06:02

काल डायरी चाळता चाळता मला बर्‍याच वर्षांपुर्वी स्त्री या विषयावर लिहिलेल माझंच स्फूट सापडलं..आणि वाचताना वाटले गेले असतील आठ दहा वर्षे हे लिहून पण आजही स्थिती बरीचशी अशीच आहे..फारसा बदल नाही.

स्त्री
डोक्यावर पदर घेऊन निमूटपणे खाली बघत काम करणारी रांधा. वाढा, उष्टी काढा यातच रमलेली पूर्वीची स्त्री. आता मात्र जीन्स घातलेली मोबाईल, कार चालवणारी, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी झालीये. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उभी आहे नव्हे काकणभर सरसच आहे. रायफल शुटिंग, कुस्ती पासुन दही हंडी फोडणाराही महिलांचा गृप आहे. पण हे जे साजर रूप आहे ते अगदी सर्वत्र दिसतय का? खरच तळागाळातल्या स्त्रींयापर्यंत हे रुप आहे का?

स्त्री भृण हत्या थांबल्या नव्हे निदान कमी तरी झाल्या आहेत का? हुंडाबळी. पुरूषी वर्चस्वाच्या बळी पडणे कमी झालेय का. आणि फक्त तळागाळातली स्त्रीच का आधुनिक मानली जाणारी आधुनिक स्त्री तरी या सगळ्यांपासून वेगळी आहे का? कुठेतरी ती पूर्णपणे मुक्त झालीये. मुक्त म्हणजे स्त्रीमुक्तीवादी कल्पनांप्रमाणे नाही तर निदान कुठल्या गोष्टींवर ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते. पुरुषांप्रमाणे आज मला घरी यायला जमत नाहीये, आमचा ग्रूप जमालाय हे ती सांगू शकते. आणि थांबली च तर किती तोंडाना तिला तोंड द्यावे लागेल. घरातले, बाहेरचे सगळ्यांच्या चोची तिला टोचा मारायला तयार. अजूनही मुलांची बहुतांश जबाबदारी तिची, घरातली जबाबदारी तिचीच. सुट्टीच्या दिवशी मस्त उशीरा उठून गरम गरम चहा पित, पेपर वाचत, आरामात आवरुन फेरफटका मारायला, सगळ्या मित्र मैत्रीणींना भेटायला किती जणी जातात. मी हे विवाहित स्त्रियांबद्दल बोलतेय ज्या कुटुंबा समवेत रहातात. माझ भाष्य आहे हे काही ठराविक वर्गातल्या स्त्रियांसाठी नाही तर एकुणातच यच्चयावत स्त्री वर्गाबद्दल माझी ही मते आहेत.

आज कंप्युटर , मोबाईल ही सगळी मिसाईल घेऊन स्त्री सज्ज असेल पण किती जणींना अजुनही मनस्वीपणा करता येतो? बहुतांश प्रश्नांची उत्तरे नकाराथीच येतील.पुर्णपणे होकारार्थी उत्तरे मला नाही वाटत निम्मी देखील असतील.

स्त्रीला देवी मानून. मखरात बसवुन फक्त तिची पुजा करतात पण कायम देव्हार्‍यातच बसवुन. कधी त्या स्त्रीमधल्या शक्तीला ,आदीशक्तीला बाहेर पडायला वाव द्या. अर्थात वाव देण्याचा संबंध येत नाही ती शक्ती असतेच तिच्यात. अभाव आहे तिला मोकळी वाट करून देण्याचा. मोकळ्या वाटेने चालण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. सगळ्यांनी मिळुन रुढींची, समाजाची बंधने त्च्यावर लादून फक्त तीची गळचेपी केलेली आहे. माझे हे विचार अतिरेकी स्त्रीमुक्तीवादी वाटतील ही.

कोमल काया, वाचा, मनाची कोमलांगी अशी स्त्री बद्दलची धारणा कवी, लेखकांची आहे. का कोणास ठावूक मला पण ती सगली विशेषणे फसवी वाटतात. फुले समजता ना तुम्ही स्त्रियांना मग फुलासारख वागवा. फक्त निर्माल्य करुन फेकुन देण्यापुरता फुलांचा संदर्भ स्त्रियांशी जोडू नका.

आम्ही नाही तशा, आमच्यावर नाही बंधने असे मुठभर स्त्रियांना वाटले तरी सगळीकडे नाही अजुन तो बदल. माझ म्हणण कदाचित संयुक्तिक वाटणार नाही लोकांना. एक वेळ अगदी झोपडपट्टीतल्या, कनिष्ठ वर्गातील स्त्रिया काही प्रमाणात स्वतंत्र आहे. त्यांच्यावर अन्याय करणार्‍याला अरे ला कारे म्हणतात त्या. दोन देऊन, दोन घ्यायची त्यांची प्रवृती आहे. पण मध्यम वर्गातल्या किती स्त्रिया अरे ला कारे म्हणतात.

तसे बघितल तर या सगळ्या हुंडाबळी, समाजपुरुषाने झिडकारलेल्या, त्यांच्या बंदीपाशात घुसमटलेल्या स्त्रिया या बहुतांश मध्यमवर्गीय आहेत. मध्यम वर्गाची नेहमीची अवस्था त्रिशंकु सारखी आहे. मध्यमवर्गीय काहीच नाही म्हणुन किंवा खुप काही आहे त्यामुळे बेफिकीर असा कधीच नसतो. तीच अवस्था मध्यमवर्गीय स्त्रीची ही आहे.मी वर मांडलेले विचार बहुत करून त्याच संदर्भातले आहेत. मी ती घुसमट तिची जवळुन बघितली आहे आणि म्हणुनच स्त्री आधुनिक झालीये, मुक्त झालीये ही कल्पना मला पटत नाही, हे माझे विचार काहींना एकांगी वाटतील, बर्‍याच पुरुष वर्गाला अपमानास्पद वाटतील पण ते खरे आहे.

अजुनही स्त्रीमुक्तीचे विचार आहेत म्हणुन तस्लिमा नसरिनच्या मागे समाजकंटक हात धुवुन मागे लागले आहेत. स्त्रीच्या पाठीमागे लागताना, तिला संपवण्याचा ध्यास घेणार्‍यांची कीव करावीशी वाटते. अरे शतकानुशतके तुम्ही जिला बंधनात ठेवळी. तसे पाहिले तर संखेने तुमच्या इतकी (आता फरक पडलाय स्त्रीयांची संख्या घटत चाललीये) असलेल्या स्त्री जाती बद्दल कोणी एखादी बोलायला लागली तर तुम्ही तिला जीवे मारण्यासाठी टपता.

शुद्रातिशूद्रांसाठी कित्येक लोक झटले पण स्त्री उध्दारासाठी लढणार्‍यांची संख्या अजूनही कमीच आहे.
या काळाच्या कोठडीत किती स्त्रिया मरून मुक्तीची वाट पहातायेत. कुणी पातिव्रत्याच विष प्यायलेली, तर कुणी लोभाला बळी पडलेली, कुणी तिच्या चारित्र्यावर कलंक लागलेली. आहे तिथे पुरुषांची संख्या त्यांच्या बरोबरीने? या गोष्टीनी गळचेपी झालेल्या. घुसमटलेल्या किती पुरुषांचे आत्मे असतील. आता काही प्रमाणात स्त्रीमुक्तीच्या अतिरेकामुळे काही पुरुषजातीवर अन्याय होतो पण जितक्या प्रमाणात स्त्रियांवर होतो त्यापेक्षा नगण्यच आहे.

आज स्त्रिया बाहेर पडल्या , आधुनिक झाल्या. घराबाहेरचे जगही त्यांनी काबीज केले. चूल मूल. रांधा, वाढा, उष्टी काढा यातून जरी बाहेर पडल्या तरी होणार्‍या अन्यायांचे प्रकार बदलले. ते ही आधुनिक झाले. वेगवेगळ्या सोशल साईटस वर जाहिररित्या बदनामे करणे, फोटोचा दुरुपयोग करुन ब्लॅकमेल करणे, अश्लील फोटो तयार करून बदनामी करणे हे प्रकार सुरुच आहेत. अगदी आधुनिक सॉफ्टवेअर युगातली नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत काम करणरी स्त्री असु दे ती ही थोड्यान थोड्या प्रमाणात अन्यायाला सामोरी जातेच. परवाच मी माझ्या ऑफिसमध्ये एक वाक्य ऐकले" अरे बाई असुन किती मोठ्या आवाजात बोलते ही. हा प्रश्नच किती उदवेगजनक आहे. अरे तुम्ही अजुनही त्याच शृंखलात अडकवायचा का प्रयत्न करता आहात. पुर्वी एक कथा ऐकलेली गालव मुनींची. त्यांनी मागीतलेल्या अश्वांसाठी माधवी ला प्रत्येक राजाला अर्पण केले व त्या बदल्यात अश्व मिळवले.ही गोष्ट ऐकुन लहानपणी ही मी ढसा ढसा रडले होते. अजूनही ती गोष्ट आठवली की अस्वस्थ होते. एक वस्तु या पलिकडे काय किंमत केली तुम्ही स्त्रीची. गालवाला किंवा ययातीला कोणालाच या गोष्टीची घृणा नाही वाटली का.
आजही "माधवी" आहे. तिची किंमत वेगवेगळ्या प्रकारे ठरवली जाते. कधी थांबेल हे वस्तुकरण स्त्रीचे. कधी एक माणुस म्हणुन तिच्याकडे पाहिले जाईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users