जिगरवाला मन्सूर

Submitted by बावरा मन on 16 March, 2016 - 00:05

झाडून सगळ्यांनीच महत्त्वाकांक्षी असलं पाहिजे, असा एक संकेत रूढ होत चालला आहे. म्हणजे, सगळ्यांनीच सहा आकडी पगार कमावला पाहिजे. सगळ्यांनीच उत्साहीपणे सण वगैरे साजरे केले पाहिजेत. सगळ्यांनीच विकेंडला मॉल आणि मल्टिप्लेक्सला गर्दी केली पाहिजे. सगळ्यांनीच मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणात राहून स्वतःची जबरी प्रगती करून घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे, मी महत्त्वाकांक्षी आहे, हे सिद्ध करण्यासाठी एका न संपणाऱ्या रेसमध्ये ऊर फुटोस्तर पळलं पाहिजे. जो माणूस यातलं काहीही करायचं नाकारून आपल्या अटींवर आयुष्य जगतो, त्याला हे सगळे महत्त्वाकांक्षी लोक एक लेबल लावतात, ‘पलायनवादी’! अशा लोकांना सहसा नात्यांमधल्या कार्यक्रमात फारसं महत्त्व मिळत नाही, मित्रांच्या गेट-टुगेदरमध्ये यांना गृहीत धरतात, आणि यांची बायको यांना आजूबाजूच्या महत्त्वाकांक्षी लोकांची उदाहरण देते. पण काही लोक हा ‘पलायनवाद’ असा काही निभावतात की वाटतं, वा! क्या बात है. असाच एक माणूस म्हणजे, मन्सूर खान. कोण हा मन्सूर खान? आपलं एेन भरात असणारं फिल्म इंडस्ट्रीमधलं करिअर सोडून, महानगरीय जीवनशैली सोडून एका खेड्यात राहायला गेलेला माणूस म्हणजे, मन्सूर खान...
आमीर खानचा भाऊ किंवा नासीर हुसेनसारख्या दिग्गज निर्माता आणि दिग्दर्शकाचा मुलगा इतकीच मन्सूर खानची ओळख कधीच नव्हती. फिल्मी परिवारातून असला तरी मन्सूर हा नेहमीच स्वयंप्रकाशित तारा होता. विलक्षण मनस्वी, उन्मेषी, प्रसंगी कठोर, पॉम्पस. पेशाने दिग्दर्शक असणाऱ्या या माणसाने, इनमिन चार चित्रपट दिग्दर्शित केले. प्रत्येक चित्रपटाला भरपूर वेळ द्यायचा, ही याची पद्धत. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामधून आमीर खान नामक धुमकेतू अवतरला. आमीरला फिल्म इंडस्ट्रीमध्ये भक्कम बेस मिळवून देणारा हा चित्रपट मन्सूरचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर त्याने केलेला ‘जो जीता वो ही सिकंदर’ हा चित्रपट नव्वदच्या दशकात वाढलेल्या प्रत्येकाच्या नॉस्टॅल्जियाचा अविभाज्य हिस्सा आहे. पण हा लेख मन्सूरच्या चित्रपटक्षेत्रातल्या योगदानाबद्दल नाही. ते बहुतेकांना माहीत आहे. आपल्या आयुष्याच्या एका वळणावर मन्सूरने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई सोडून तो अजून दुसऱ्या कुठल्याही महानगरात शिफ्ट झाला नाही. त्याने निवड केली, तामीळनाडूमधल्या कुनुर या निसर्गरम्य जागेची. मुंबई सोडण्याचा निर्णय घेण्याअगोदरच त्याने बॉलीवूडमधलं जोरात चाललेलं करिअर संपवण्याचा निर्णय घेतला. त्याचा शेवटचा ‘जोश’ (शाहरुख खान व ऐश्वर्या राय अभिनित) आपटला असला तरी मन्सूर हा एक प्रतिभावान दिग्दर्शक आहे, याबद्दल कुणाचं दुमत नव्हतं. शिवाय आमीरसारखा सुपरस्टार बंधू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मग हा टोकाचा निर्णय मन्सूरने का घेतला?
मन्सूर हा जात्याच बुद्धिमान आणि विचारी माणूस. चित्रपटक्षेत्रात तो फक्त घराण्याचं नाव राखण्यासाठी आला होता. पण त्याच्यातल्या निसर्गप्रेमी माणसाला महत्त्वाकांक्षेच्या लालसेपायी निष्ठुर होत चाललेली मुंबई कधीच भावली नव्हती. आपण एका निरर्थक ‘रॅट रेस’चा भाग आपली इच्छा नसताना बनलो आहोत, ही जाणीव त्याला पोखरून काढत होती. मुख्य म्हणजे, वेगवान, कोंदट, शहरी जगण्याचा त्याला कंटाळा आला होता. शूटिंगसाठी तो काही वेळा कुनुरला गेला होता. त्याला ती जागा खूप आवडली होती. शिवाय तिथे त्यांचे एक पिढीजात घर होते. पण या बाबतीत बायकोला आणि दोन मुलांना कसे कन्व्हिन्स करावे, असा प्रश्न होता. तब्बल एक वर्ष मन्सूरने त्यांची मनधरणी केली. शेवटी, घरचे लोक तयार झाले. मन्सूर त्याच्या बायकोपोरांसकट कुनुरला स्थलांतरित झाला. पण हा निर्णय राबवणं तितकंसं सोपं नव्हतं. एक पूर्ण वाढलेलं झाड उपटून ते दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा हा प्रकार होता. अनेक समस्या होत्या. विशेषतः आर्थिक समस्या. मुंबईमधली आपली प्रॉपर्टी विकून मन्सूरने जमिनीचा एक तुकडा कुनुरमध्ये विकत घेतला. तिथे त्याने शेती आणि दुग्धव्यवसाय सुरू केला. पण त्यातून एक चांगलं आर्थिक उत्पन्न सुरू व्हायला काही वेळ लागला. दरम्यान मन्सूर आणि परिवाराला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण ते ठामपणे सगळ्यांना तोंड देत उभे राहिले. दरम्यान मन्सूरने साबण कसा बनवावा, ब्रेड कसा बनवावा, वगैरे आवश्यक गोष्टी शिकून घेतल्या. हल्ली बहुतेक गोष्टी ते घरीच तयार करतात. आज मन्सूर स्वतःच्या अटीवर एक अतिशय सुंदर आयुष्य जगत आहे.
मन्सूरने आपल्या या अनुभवावर चांगलं लिखाण केलं आहे. सध्या त्याच्या ‘द थर्ड कर्व्ह’ या पुस्तकाला मोठी मागणी आहे. २००८च्या जागतिक मंदीनंतर जगासमोर उभे ठाकलेले गंभीर प्रश्न आणि त्याचा तुमच्या-आमच्या आयुष्यावर होणारा परिणाम यावर मन्सूरने ‘द थर्ड कर्व्ह’ या पुस्तकात साध्या सोप्या भाषेत लिहिलं आहे. भूगर्भातल्या तेलाचे वेगाने संपणारे साठे आणि कमजोर होत चाललेली आपली बँकिंग सिस्टम यामुळे अख्ख्या मनुष्यजातीसमोर लवकरच गंभीर असे जीवनमरणाचे प्रश्न उभे ठाकणार आहेत, अशी त्याची मांडणी आहे. यावर त्याच्या मते एकच सोल्युशन आहे ते म्हणजे, आपल्या भौतिक गरजा कमी करून माणसाने निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जावे आणि निसर्ग संवर्धन करावे. आपल्या अनुभवातून तावूनसुलाखून निघालेला मन्सूर सध्या वेगवेगळ्या आयआयएम संस्था, याहूसारख्या कॉर्पोरेट संस्था, सिम्बायोसिस सारख्या शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी लेक्चर देतो. कुणीतरी मध्यंतरी त्याला विचारलं, ‘पुढचा चित्रपट कधी बनवणार?’ त्या वेळेस हसत हसत त्यानं उत्तर दिलं, ‘कधीच नाही.’
देशातल्या अनेक चळवळींना मन्सूर सक्रिय पाठिंबा देतो. मध्यंतरी आमीर खानने नर्मदा आंदोलनाला जो सक्रिय पाठिंबा दिला होता, त्यामागे मन्सूरच्या या विचाराचा प्रभाव होता. त्या बदल्यात भाजप समर्थकांनी आमीरच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे खेळ गुजरातमध्ये बंद पाडले होते. असो.
नाना पाटेकरसारखा अवलिया कलावंत याच वाटेवरून चालतो आहे. सध्या नाना पुण्याजवळ एका फार्म हाउसवर शहरी गजबजाटापासून दूर एक शांत आयुष्य जगतो आहे. पण नाना आणि मन्सूरमधला मुख्य फरक हा की, नाना अजूनही अभिनयात सक्रिय आहे. मात्र मन्सूरने शो बिझिनेसमधून पूर्ण निवृत्ती घेतली आहे. या दोघांनाही वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये तुम्ही हा निर्णय का घेतलात, या अर्थाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर नाना आणि मन्सूर यांनी त्याला दिलेली उत्तर उद‌्बोधक आहेत. नानाचं उत्तर होतं की, ‘शहरांमध्ये मला पक्ष्यांची किलबिल ऐकू येणं बंद झालं होतं.’ मन्सूरच उत्तर होतं, ‘कारण मला रात्री शांत निवांत झोपायचं होतं.’ नियती पण काय एक एक काष्ठ जमवते नाही?

(पुर्वप्रकशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लेख आहे मन्सूर खान याच्या निर्णयासंदर्भातील वाटचालीवरील. हटके जाऊन काही वेगळे करण्याची जिद्द असते ते एकांड्या शिलेदारामध्ये....म्हणजे जो तो निर्णय घेईल त्यानुसार पावले टाकणे आणि उभ्या आयुष्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होऊ शकतो ही शक्यताही मनी धरून हालचाल करावी लागते, याची जाणीव मनी ठेवणे. एकट्याला हे शक्य होते पण मन्सूर खान याच्या सोबतीने पत्नी आणि दोन मुले असताना त्यांच्या भवितव्याविषयीही होकारार्थी वेगळी मांडणीही बरोबरीने करायला हवी होती....ती त्यानी करून दाखविली. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला हा युवक, व्यवहारी जगातही सिनेदिग्दर्शक म्हणून देखणे यश प्राप्त केलेला, अचानक एके दिवशी सारे सोडून पछाडलेल्या अवस्थेत दूर कुठेतरी जाऊन वस्ती करतो....यशही मिळवितो. अचाट आहे हे सारे.

इतक्या सुंदर लेखाबद्दल बावरा मन यांचे आभार मानत आहे.

समर्पक शब्दात श्री. मन्सूर खान यांचा खुप चांगला परिचय करून दिलात. धन्यवाद. आपल्या सर्वांसाठी एक दर्जेदार आणि शांत, समाधानी आयुष्य जगायचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे त्यांनी.

२०१५च्या सुरूवातीला इकोलॉजीकल सोसायटीनं त्यांचं एक व्याख्यान पुण्यात आयोजीत केलं होतं, ते ऐकायला मिळालं. व्याख्यान जाहीर झाल्यानंतर मन्सूरजींना बोलावण्यामागचं कारण आणि भूमिका विशद करणारा एक परिचयात्मक लेख सोसायटीकडून सर्व सदस्यांना पाठवला गेला, त्याशिवाय 'द थर्ड कर्व्ह' बद्दलही चर्चा केली गेली. त्यामुळे व्याख्यानाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि मन्सूरजींनी यथार्थपणे त्या उत्सुकतेचे आणि उपस्थितांच्या बहुतेक सर्व शंकांचे व्याख्यानाद्वारे आणि नंतरच्या प्रश्नोत्तरांमधून निरसन केले. कुठेही तांत्रिक अवडंबर न माजवता आणि भविष्यातल्या समस्यांचा बागुलबुवा न दाखवता साध्यासोप्या भाषेत मन्सूरजी फार प्रभावी बोलतात आणि परिस्थितीचं गांभिर्य तीव्रतेने मांडतात. हे सगळं ते स्वान्त सुखाय करत असल्यामुळे त्या मागची कळकळ आणि खरेपणा जास्त पोचतो. स्वतःच्या पार्श्वभूमीचा कुठेही अनावश्यक उल्लेख नाही किंवा प्रसिद्धीचा हेतू नाही. श्रोत्यांबद्दल अतिशय आदरभाव. खरंतर इथे ह्या बाकीच्या बाबींपेक्षा त्यांच्या मुद्द्यांचा गोषवारा लिहायला पाहिजे पण त्याची साधारण रूपरेषा तुमच्या लेखात अगोदरच आली आहे. पण त्यांनी हातात घेतलेला विषय असा आहे की व्याख्यात्यानं योग्य त्या पद्धतीनं सादरीकरण केलं नाही तर विषय अतिशय रटाळ आणि कंटाळवाणा होऊ शकतो आणि मग सगळंच मुसळ केरात अशी परिस्थिती. ह्याची जाणीव ठेवून व्याख्यान देण्याची उत्तम हातोटी मन्सूरजींना आहे. तांत्रिक ज्ञान आणि वक्तृत्व ह्यांचा चांगला मेळ दिसला त्यादिवशी. तुमच्यामुळे आज हे आवर्जून सांगता आलं, त्याबद्दल पुनश्च धन्यवाद Happy

खुप सुंदर लिहिलंय.. आणि खरेच हे माहित नव्हते.
असे काही वाचले कि वाटते, आता या क्षणी हे सगळे झुगारून द्यावे.... पण नाही, तेवढी हिम्मत, बळ, आत्मविश्वास काहीच नाही आपल्याकडे.

आणि हो, शीर्षक एकदम झकास. हे असं काही पाऊल उचलायला आणि रेटून जगायला जिगरच पाहिजे!
नाहीतर मनात आमच्या तुमच्याही खुप मांडे असतात, ते प्रत्यक्षात उतरवू शकणारे खुप कमी दिसतात. ते खरंच अवघड आहे.

दिनेश Happy मी नेमकं तेच लिहायला आले परत.

मी अशा प्रकारचे 'परतोनी पाहे' यशस्वी रित्या कोण कोण केले आहे ? या शोधात असतोच.

नाहीतर मनात आमच्या तुमच्याही खुप मांडे असतात, ते प्रत्यक्षात उतरवू शकणारे खुप कमी दिसतात. +१

ह्या लेखा बद्दल धन्यवाद बावरा मन

सुंदर लेख! धन्यवाद.

असे काही वाचले कि वाटते, आता या क्षणी हे सगळे झुगारून द्यावे.... पण नाही, तेवढी हिम्मत, बळ, आत्मविश्वास काहीच नाही आपल्याकडे. >> +१ Sad

लेख आवडला. QSQT आणि जो जिता... मुळे मन्सूर खान हे नाव माहीत होतं. आताचा हा त्यांचा प्रवास मात्र माहीत नव्हता. खरंच सही वाटलं वाचून!

सुंदर लेख, मन्सूरनी एक चीजमेकिंग प्लांट पण सुरु केला आहे असं त्यांच्या मुलाखतीत वाचलं होतं..

सुंदर लेख. सिनेमातल्या लोकांबद्दल शक्यतो हा शब्द वापरावा वाटत नाही, पण मन्सूर अतिशय 'विद्वान' आहेत. त्यांच्या द थर्ड कर्व्ह या पुस्तकात 'पीक ऑईल' बद्दल विवेचन आहे. या विषयावर त्यांची PPT साईटवर आहे. येथे पाहू शकता. (मला स्वतःला या थिअरीबद्दल शंका आहेत कारण गेल्या ५ वर्षातील तंत्रज्ञान प्रगतीमुळे त्यातली बरीचशी समीकरणे आऊटडेटेड ठरली आहेत)
मी त्यांच्या फार्मवर ४ दिवस राहून आलो आहे. फार सुन्दर जागा. थंड हवा, धुकं, ढग, उतार, कुरणे यामुळं युरोपियन फील येतो. हायवे ऑन माय प्लेट चा एक एपिसोड तिथे झालाय.

सही लेख आहे! सही माणूस आहे!

हे असले काही करायची हिंमत आपल्याकडे नसतेच असे नाही, कदाचित आपल्याला शहरी जीवनाची, झगमगाटाची अन गजबजाटाची आवड जास्त आणि निसर्गाची कमी असू शकते.

पण ज्याने पैसा प्रसिद्धी यश मिळवलेय त्याचे तो मोह टाळून आवडीचे जीवन जगायला जाणे सरसच.

सुंदर लेख.

लाईफ स्टाईलच्या दोन धाग्यांवर त्या लेखिकेला हेच म्हणायचं होतं बहुतेक. मन्सूर खानने ते करून दाखवल्याने ती गरज अधोरेखित झाली.

Chan lihilay. I don't agree with these ideas completely, would like to read the book. Thank you.