वाऱ्यावर हा जन्म उभा...

Submitted by सत्यजित... on 15 March, 2016 - 20:21

हातामध्ये हात कधी जर दिलास असता...
वाऱ्यावर हा जन्म उभा थर-थरला नसता!

मवाळ जगणे सर्कशीतल्या या 'शेरां'चे...
विदूषकाचे सोंग वठवतो हसता-हसता!

एक हुंदका दिला न केंव्हा जगताना मी...
शांत रहा जखमांनो आता का ठस-ठसता!

नव्या कुळाचे नवे कायदे लागू झाले...
'माती' झाली कसणाऱ्याची कसता-कसता!

मृत्यू येतो..निघून जातो बघता-बघता...
जन्म चालला होता माझा फसता-फसता!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक हुंदका दिला न केंव्हा जगताना मी...
शांत रहा जखमांनो आता का ठस-ठसता!>>व्वा

नव्या कुळाचे नवे कायदे लागू झाले...
'माती' झाली कसणाऱ्याची कसता-कसता!>>व्वा खूप छान,

शेवटचा तर खासच !

गजल आवडली!

जबरी.