दोन S आणि तिरका बाण !!

Submitted by विद्या भुतकर on 14 March, 2016 - 21:01

संत्याचं सपनीवर लई प्रेम. अगदी ' S' लिहिता येऊ लागला तेव्हापासून तो 'SS' आणि त्याच्या मध्ये एक तिरका जाणारा बाण काढू लागला होता. वहीसोबत, तो गेला त्या प्रत्येक वर्गातला एक तरी बेंच त्याने असा दोन S ने कोरला होता. दहावी आणि त्यापुढेही पास होण्यासाठी त्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे नापास झाला तर तिच्या सोबत वर्गात बसता येणार नाही. सपनाला बारावीला म्हणावे तसे मार्क पडले नाहीत त्यामुळे मेडिकलला अडमिशन मिळाली नाही. त्याची मोठ्ठी पार्टी घेतली त्याच्या मित्रांनी त्याच्याकडून. सातारला तिने बीएस्सी, एमेस्सीला जायला लागल्यावर त्यानेही हट्टाने बी. ए. ला अडमिशन घेतली.

त्याचा मग रोजचा शिरस्ता चालु झाला होता. तिच्यासोबत बसमध्ये जायचे, ती जाईल त्याच बसमधून परत यायचे. अगदी मंगळवार आणि गुरुवार तिचे प्रक्टिकलचे असले तरीही. ती काही भाव द्यायची नाही त्याला. एमेस्सी करून पुढे प्रोफेसर होणार होती. त्यामुळे असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे हे तिला पक्कं माहित होतं. आणि तसंही गावच्या पाटलांच्या पोराच्या नादाला कुणी लागावं?

अशाच एका गुरुवारी संध्याकाळी संत्या, सपनी घरी गेल्यावर, घरी पोचला. आला तर पाटील त्याची वाटच पहात होते.
'काय रं कुठं व्हतास?' त्यांनी रागाने विचारले.
' आज प्रक्टिकल होतं.' त्यानेही मग थाप मारली.
आपल्या पोराचं किती लक्ष आहे ते त्यांना चांगलं माहीत होतं. पण त्याचे खेळायचे दिवस जाऊदे मग काय हायेच शेती आणि टेम्पो-ट्रेक्स' असा विचार करून गप्प बसायचे.
'बरं, एक काम हाये. उद्याला माझ्यासोबत पार्टीच्या हॉपीसला यायचं हाय.'
'ह्या? त्ये कशाला ?', संत्या वैतागला. त्याला शुक्रवारी लवकरच्या बसने येता यायचं, सपनीला बघत.
'काम हाय म्हत्वाचं. सकाळी ८ ला निघायचं, तयार रहा. ' पाटील आदेशाच्या स्वरात म्हणाले.
दुसऱ्या दिवशी संत्या जीन्स आणि हाफ शर्ट घालून तयार झालेला पाहून ते वैतागले.
'काय चांगले स्वच्छ कपडे नायीत का तुमच्याकड?', त्यांचा पांढरा पायजमा, नीळ घातलेला पांढरा शर्ट आणि टोपी यापुढे त्याचे कपडे अगदीच गबाळे दिसत होते. त्याने कित्येक वर्षात यापेक्षा वेगळे कपडे घातले नव्हते. उशीर झाल्याने पाटील तसेच निघाले.
तरी बडबडतच होते, 'निदान तोंड तरी चांगलं ठेवावं. सादी दाढी बी केली नाई.'

आज त्याला तालुक्याला पार्टी ऑफिसमध्ये बोलावलं होतं. यावर्षीच्या निवडणुकामध्ये तरुण चेहरे पाहिजेत असा वरून आदेश आला होता. त्यामुळे पाटीलही आपल्या घरातल्या तरुणाला घेऊन पोचले होते. पाटलांनी पोराला सर्व कार्यकर्त्यांना भेटवलं. साहेबांशी बोलायला ते आधी त्याला घेऊन गेले. त्यांनीही,'काय करतोस? काय शिकलास?' इ जुजबी प्रश्न विचारले. संत्याला एकदम धक्का बसला होता. अचानक सर्व घडत असल्याने त्याला काय करावं सुचत नव्हतं. तिकडे सपनीची गाडी पण गेली असेल हा विचार काही मनातून जात नव्हता. मधेच त्याने मित्राला मेसेज केला, 'कुठे हायेस' म्हणून. त्यावर,'वहिनी पोचली घरी' असा निरोप परत आला आणि जरा त्याला बरं वाटलं. त्याला बाहेर जायला सांगून पाटील साहेबांशी अजून जरा वेळ बोलले. संध्याकाळी दोघेही घरी जायला निघाले. दिवसभरात तिला एकदाही पाहिलं नाही असं कित्येक वर्षात पहिल्यांदा झालं होतं.

'उद्या तयार रहा सकाळी, आनी जरा नीट आवरा', असं सांगून पाटील झोपायला गेले.
'आता अजून काय?' असं विचारायची त्याची हिम्मत झाली नाही.

सकाळी कालच्या पेक्षा जरा बरं आवरून संत्या पप्पांसोबत निघाला. सातारला कुठल्या तरी स्टुडीओ मध्ये ते दोघे गेले होते. त्याला तिथं मग सफेद कुर्ता, पायजमा नेहरू जेकेट दिलं घालायला, जरा मेकप पण केला आणि त्याचे बरेचसे फोटो काढून घेतले. पार्टीच्या जाहिरातीसाठी ते काढले होते.
'पुढल्या आठवड्यात घेऊन जातो', असं सांगून पाटील निघाले.

'संतोष, ही असली कामं तुम्हाला जमली पायजेत आता. एव्हड्या बारक्या कामांसाठी आम्ही यायचं किती दिवस ते? जरा कामात लक्ष घाला',फोनवर मेसेज करणाऱ्या संत्याला पाटलांनी सांगितलं. त्यानेही आपलं पूर्ण नावं घेतल्याने मान डोलावून होकार दिला. काम महत्वाचं आहे ते त्याला कळत होतं पण जीव सपनीमधे गुंतला होता.

लवकरच त्याचे दिवस बदलले. त्याच्या नावाचं मोठ्ठं पोस्टर गावात ठिकठिकाणी लागलं होतं. त्याच्यात त्याचा चेहरा फ़ेअर-अन-लव्हली मधला शेवटचा रंग कसा असतो तसा दिसत होता.
'काय रे संत्या, तुला आता वहिनीच्या बरोबरीनं हुभं राहयला काय प्रोब्लेम नाय बघ. एकदम गोरा दिसतोयस फोटोत', त्याच्या मित्राने त्याला चिडवलं. तिच्या आठवणीनं त्याला कसंतरी झालं. आधी तिची बसची वेळ झाली की याचा जीव तुटायचा. आता त्यावेळेत तो स्वत:ला कामात गुंतवून घ्यायला लागला. कधी कधी ती कशी दिसते असं आठवायचा प्रयत्न करायचा पण त्याची कल्पनाही कधी कधी साथ द्यायची नाही तिचं चित्र उभं करायला. काम खूप होतं. गावात माहिती पत्रक द्यायचं. नवीन कामं सुरु करायची. कुठे पाणपोई तर कुठे स्वच्छता अभियान. कुठे गरजू मुलांना वह्या पुस्तकं तर कुठे एखाद्या गरीबाची मदत. लोकांच्या जीवनात किती कष्ट असतात ते आता कुठे त्याला दिसायला लागलं होतं.

आज एक विशेष काम आलं होतं त्याच्याकडे. सपनीच्या कॉलेजमध्ये साहेब भाषण देणार होते. त्याची सर्व व्यवस्था त्याला करायची होती. स्टेजपासून पोरांना जमा करेपर्यंत. एकदम जोरदार केलं त्याने मग. कुठे ती दिसते का तेही पाहीलं. त्याचा जरा हिरमोड झाला. पण काम तर होतंच. त्याने स्टेजवर एक छोटंसं भाषणही दिलं आज. विद्यार्थ्यांना काही मदत हवी असेल, काही प्रश्न असतील, पार्टीत सहभागी व्हायचं असेल तर मला भेटा म्हणून सांगितलं. सगळं संपून घरी निघायला खूप उशीर झाला होता. सोबतीच्या लोकांना इनोव्हा मध्ये घेऊन तो परत निघाला आणि सातारच्या जकातनाक्यावर ती त्याला दिसली. 'सपनी आता इथं? तेही इतक्या रात्री? घरी कशी पोचायची?', त्याला अनेक प्रश्न पडले. गाडी थांबवावी असं खूप वाटलं त्याला, पण ती बसेल का नाही शंका होतीच. तरीही तिला असं सोडून जाणं त्याला जमणार नव्हतं.
'आज उशीर झाला काय?' त्याने गाडी हळूच तिच्याजवळ घेत विचारलं.

तशी ती दचकलीच. एक तर इतक्या उशिरा गावी जायचं म्हणजे टेन्शन. त्यात असं कुणी थांबलं तर अजून. पण आज एकतर त्या भाषणामुळे तिचं लेक्चर बुडलं आणि पुढे प्रक्टिकलही बाकी होतं. सगळं आवरून यायला इतका उशीर झाला.
'येताय का आमच्यासोबत?' त्याने जमेल तितक्या अदबीने विचारलं. पूर्वी इतकी हिम्मत नसती झाली त्याची. पण सध्याच्या कामामुळे जरा धीट झाला होता तोही. तिनेही मग विचार केला, 'शेवटच्या गाडीत गर्दी असणार आणि दारुडेही' जावं का याच्यासोबत. गाडीत मागे पाहिलं तर सगळी तिच्या गावचीच पोरं. ती विचार करत आहे म्हटल्यावर पुढच्या सीटमधलं पोरगं पटकन मागे गेलं. ती मग त्याच्याशेजाराच्या सीटवर बसली आणि त्याने गाडी सुरु केली. गाडीत बसल्यावर ती स्थिरावली. त्याने तिला पाण्याची बाटली दिली.
'काही खाल्लंय का?, त्याने विचारले.
'आता घरी जाऊन जेवणारच आहे.', ती.
त्याने मधल्या कप्प्यातून केळं काढून तिला दिलं. तिनेही मुकाट्याने ते खायला सुरुवात केली होती. तिच्यासोबत कॅन्टीनमध्ये बसून वडापाव खायची त्याची इच्छा अपूरीच राहिली होती.
'आज इतका उशीर कसा झाला ते?', त्याने पुन्हा एकदा विचारले. तिच्याबद्दल आपल्याल्या काहीच माहित नसतं याचं त्याला वाईट वाटलं.
'मैत्रिणीसोबत जर्नल लिहित होते. आज कार्यक्रम पण होता ना …' ती पुढे बोलता बोलता ती थांबली.
पण त्याला कळलं होतं तिला काय म्हणायचं आहे ते.
'चांगला झाला आजचा कार्यक्रम', तिने काहीतरी बोलायचं म्हणून सांगितलं.
'तुम्ही होता का? मला दिसला नाही ते?', त्याची चोरी पकडली गेली होती.
'हो होते, मागे एकदम', ती. 'चांगलं बोलता तुम्ही भाषणात'.
तो तसा लाजला. गाडीने आता जोर पकडला होता.….
मागे आशिकी २ ची गाणी लागली होती. 'सून रहा है ना तू... '. तिने पुढे होऊन आवाज वाढवला थोडासा. त्याला तिच्या आठवणीत रिपीट वर लावलेलं हेच गाणं आठवलं.
त्याने एकदा मागे बघून घेतलं आणि म्हणाला, 'एक सांगायचं होतं तुम्हाला', त्याने बोलू का नको विचार करत बोलून टाकलं.
तिला वाटलं,'झालं आता'.
'मी खूप मूर्खपणा केलाय या आधी. तुम्हाला खूप त्रास दिला ना?', तो.
त्याचं हे वाक्य तिला अनपेक्षित होतं. तो कितीही तिच्या मागे असला तरी असं स्पष्टं कधी बोलला नव्हता. त्यामुळे तिला काय उत्तर द्यावं कळेना. 'नाही हो, मी नाही लक्ष देत अशा गोष्टीकडे', ती काहीतरी बोलावं म्हणून बोलली.
'तो तुमचा मोठेपणा झाला ओ. पण चुकलं माझं. आता कामाला लागल्यावर कळलं गरिबाचं दु:खं काय असतं ते. आसपासच्या खेड्यात गेलो तेव्हा दिसलं खरं दु:खं. त्याच्यापुढे माझं वागणं म्हंजे माकडखेळच.' ती गप्प बसली.
'पण तुम्ही चांगल्या हाय. कधी उलट बोलला नाही. आपलं काम करत राहिलात. असंच करत राव्हा.'
थोडं अंतर गेल्यावर ती म्हणाली,'तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बरंका?'.
'अरे ?? तुम्हाला कसं कळलं?', त्याने आश्चर्याने विचारले.
'ते काय गुपित आहे का? बिलबोर्डवर दिसलं काल. ' ती हसली.
त्याला आपला हाताची घडी घातलेला बोर्डवरचा फोटो आठवला आणि त्याच्या खाली लिहिलेली ढीगभर नावंही. तीही आपल्याला तिथे पाहते हा विचार करून तो लाजला.
'त्ये होय. करावं लागतं पार्टीसाठी. बाकी काही नाही.' , तो.
तिलाही मग त्याचा 'गोरा' फोटो आठवून हसू आलं.
'अभ्यास कसा चाल्लाय?', त्याने विचारलं.
'हां, चालू आहे. आता फायनल आहे लवकरच. तुम्ही दिसत नाही ते आता. ', ती म्हणाली.
'माझं काय ओ अभ्यास आपला नावाला. उगाच हट्ट म्हणून सातारला यायचो.', आपण काय करत होतो ते तिला सांगायची काय गरज म्हणून तो ओशाळला.
'आमचं जाऊ द्या. तुम्ही अजून काय करनार हाय पुढं?', तो.
'प्रोफेसर व्हायचं आहे मला. बघू किती जमतं.' ती आग्रहाने बोलली.
'शिका, शिका. आपल्या गावच्या पोरांना पन शिकवा. लवकरच गावात १२वी च्या पुढं कॉलेज पायजे असा आग्रह करणार हाय आम्ही. तुमच्यासारख्या हुशार लोकांना मग बाहेर जायची गरज नाय पडणार.'

तिला त्याचा हा विचार ऐकून एकदम छान वाटलं. कधी विचारच केला नाही आपण या गोष्टीचा. पुढं शिकायचं तर बाहेर जावं लागणार इतकंच तिला माहीत होतं आणि प्रोफेसर व्हायला पण सातारलाच जाणार होती ती. त्याच्या बदललेल्या रुपाकडे ती जणू पहातच राहिली. बसमध्ये, शाळेत आपल्या मागे सावलीसारखा त्याला पहायची सवयच झाली होती तिला. आणि ती सावली गृहीत धरायचीही. तो मध्ये इतके दिवस दिसला नाही तेव्हा सुरुवातीला जरा बरं वाटलं होतं तिला पण थोडं चुकल्यासारखंही. आज त्याला हे असं बोलताना वागताना पाहून छान वाटत होतं तिला.
'आपल्या गावातून सातारला जाणाऱ्या-येणारया बस पण वाढवून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. बघू काय काय जमतं ते. पण प्रयत्न नक्की करणार. तुम्ही पण या की आमच्या हॉपीसमध्ये एकदा', त्याने तिला सांगितलं.
'तुमच्या सारखे शिकलेले लोक हवेत गावाचा सुधार करायला. आमी काय शिकून अडाणीच'. तिने मान डोलावली.
गाव जवळ आला तसा त्याने अजून एकदा तिची माफी मागितली आणि घराजवळ सोडलं. 'सून रहा है ना तू गुणगुणत त्याने गाडी पुढे काढली. आज कित्येक वर्षाचं स्वप्नं खरं झालं यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
तिकडे त्याचं बोलणं, वागणं याचा विचार करण्यात तिची रात्र गेली. आपणही गावासाठी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासारखं हा विचारही होताच मनात.
दुसऱ्या दिवशी सकाळी संत्याच्या पार्टी हॉपीसमध्ये एकच धावपळ उडाली होती.
'वहिनी आल्यात, वहिनी आल्यात, सभासद व्हायला.' असं कुजबुजत पोरं आवराआवर करत होती.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

मधेच त्याने मित्राला मेसेज केला, 'कुठे हायेस' म्हणून. त्यावर,'वहिनी पोचली घरी' असा निरोप परत आला आणि जरा त्याला बरं वाटलं>>+१

मला शाळेतले दिवस आठवले.
जी मुलगी मला आवडायची तिने शाळेच्या फाटकातून आत पाऊल टाकलं की मित्र लगेच ओरडायचे,"विन्या, वहिनी आल्या रे!"

मस्त वाटलं हे वाचून.त्याने इनोव्हा मध्ये लिफ्ट दिल्यावर उगीच गोष्ट वाकड्या वळणाला जाते का भीती होती, आम्ही गोष्टीतल्या लोकांवर पण विश्वास नाही ठेवत.असे जास्त कार्यकर्ते प्रत्येक पक्षाला मिळाले तर किती छान.

बाप रे ! इतक्या प्रतिक्रियान्ची अपेक्शा नव्हती. भारी वाटत आहे वाचून. ती गाडीतबसल्यावर काञ होईल याची तुम्हालच काय मला पण भीती होती. पण ही भीतीच आपल्या समाजात जे चालले आहे त्याचे प्रतीक आहे. म्हणून ही गोश्ट तरी positive रहावी अस वाटल. आवडली असेल तर माझ्या पेज वरून नक्की शेअर करा.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
धन्यवाद.

विद्या.

विद्या
स्त्री असूनही संत्याचं पात्र ज्या पद्धतीने रंगवलं त्याचं आणि अशा वर्तुळात चालणा-या गप्पा इतक्या बारकाईने लिहील्यात की कौतुक वाटत होतं वाचतानाच.

ते "वहिनी आल्या " इतकं खरं खुरं झालंय की बस्स. ऐसाच होता है असंच वाटत होतं वाचताना.

Pages