माझे २६ प्रपोज - भाग पहिला

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 March, 2016 - 17:14

क्या तुमने कभी किसी से प्यार किया है ....
क्या तुमने कभी किसी को दिल दिया है ..

कर्ज चित्रपटातल्या ओम शांती ओम गाण्यात जेव्हा रिशी पकूर ओरडून विचारतो तेव्हा आपण आपल्याही नकळत येस्स बोलतो. एखादा चेहरा आपल्यालाही आठवतो. त्यातील नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णाव टक्के लोकांना ‘न मिळालेले प्रेम’च आठवते. माझ्याबाबतीत म्हणाल तर काय आठवू आणि काय नको असे होऊन जाते. कारण नकारांची एक भली मोठी यादीच माझ्या गाठीशी आहे. याला जबाबदार मी स्वत:ही आहेच. कारण माझे तत्व खूप सोपे होते. प्रेमात पडायचे आणि बिनधास्त भिडायचे तर ते अश्या मुलीला, जी पटली तर लाईफ सेट होऊन जाईल. भले असेना ती आपल्या आवाक्याबाहेरची, पण एकदा तिचा नकार ऐकायची मनाची तयारी केली की त्यापुढे वाईट काही होत नाही. आता नाही म्हणायला काही नतद्रष्ट मित्र दात काढतात, चिडवतात, टिंगल उडवतात. पण एकदा का तिचा नकार पचवून दुसरीच्या मागे फिल्डींग लावायला सुरुवात केली, तर तेच मित्र आपल्याला त्या दुसरीच्या नावाने चिडवायला लागतात आणि आपल्या नव्या फिल्डींगमध्ये मदतही करतात.

नमनालाच घडाभर तेल असे वाटत असेल, पण फिलॉसॉफी सुरुवातीलाच क्लीअर केलेली केव्हाही चांगले. नाहीतर हल्ली मी काहीही लिहिले तरी लोकांना मी फेकतोय असेच वाटते. अगदी माझे नाव ऋन्मेष आहे आणि फायनली मला एक गर्लफ्रेंड आहे अगदी यालाही लोकं खोटे बोलायला कमी करणार नाहीत.. तर ते एक असो, थेट मुद्द्यावर येतो. माझा पैलावैला परपोज.. ईयत्ता पैली, नाहीतर पाचवी.. असेच काहीतरी तुम्हाला वाटले असेल.. पण नाही, वाईट सवयी अंगीकारायला मी अगदी लहान वयातच सुरुवात केली असली तरी प्रेमाच्या कबूलीसारख्या चांगल्या सवयी अंगीकारायला पाणी नाकाशी यायची वाट बघितलेली.

तर ती माझे पहिले प्रेम, माझे पहिले अ‍ॅट्रेक्शन, माझे पहिलेवहिले क्रश होती, अगदी असेच काही म्हणता येणार नाही. कारण त्या आधीही कित्येक प्रकरणे मनातल्या मनातच संपली होती. पण हे पहिलेच जे मनाच्या बाहेर आले होते.

ती माझ्याच बिल्डींगमध्ये राहायची. आणि मला ईंग्लिश विषय शिकवायची. येस्स, ती माझी टीचर होती, मी तिच्याकडे क्लासला जायचो. मी ईयत्ता सातवी, तर ती ईयत्ता नववी. मी मराठी माध्यम, तर ती ईंग्लिश मिडीयम. पण प्रेमाचे मात्र एकच माध्यम. हाल्फ पॅंटमध्ये न लाजता ट्यूशनला तिच्या घरी जायचे वय ते. पण तरीही चोरून बघताना लाज वाटायची वय ते. कोणाकडे मन मोकळे करावे तर त्याचीही चोरी, उगाच कोणी चुगली केली तर दिड पायाचा कोंबडा. रोज क्लासला जायला मजा तर येत होती, पण आतल्या आत घुसमट वाढत होती. पौगंडावस्थेत स्साला हाच प्रॉब्लेम असतो. भावनांचा निचरा करायचा की ईज्जतचा कचरा करायचा याच गुंतागुतींत पाखरं उडतात. पण आता. ठरवलं. बस्स! वय वर्ष बारा, बसचे फुल्ल तिकीट लागू झाले म्हणजे आता ऑफिशिअली आपण हाल्फ चड्डीतून फुल्ल पॅंटमध्ये आलो आहोत. येत्या टीचर्स डे ला ती आपल्या मनगटाला दोरा गुंडाळत शिष्य बनवून टाकायच्या आधीच आपण प्रपोज डे उरकून टाकायला हवा. पण कसे? प्रश्न ईतकाच होता. नव्हे तो एक ‘ए बिग प्रॉब्लेम’ होता. कारण ती माझ्याशी फक्त ईंग्लिश मधूनच बोलायची. आणि मला ‘आय लव्ह यू’ च्या पलीकडेही बरेच काही बोलायचे होते. एकाच दमात भावना व्यक्त करायच्या होत्या. जे परकीय भाषेत निव्वळ अशक्य होते.

पत्र नव्हे मित्र! उगाच म्हणतात का हे. संकटात कामाला येतो तोच खरा मित्र. याच मित्राची मदत घ्यायचे ठरवले. माझ्या आयुष्यातील पहिलेवहिले लव्हलेटर लिहायचे ठरवले. माझ्या पहिल्यावहिल्या प्रपोजसाठी. अर्थात ईंग्लिशमध्येच. दुसर्‍या कुठल्याही भाषेतला कागद तिने तिथेच माझ्या तोंडावर भिरकावला असता.

पण सोपे नव्हते हे. काय लिहायचे हे डोक्यात होते. पण मराठीत होते. त्याचे ईंग्रजी भाषांतर करायचे बाकी होते. आणि इथेही मदतीला कोणी येणार नव्हते. मग स्वत:च मराठी-ईंग्रजी शब्दकोषाची मदत घेत, तिच्याकडूनच आजवर शिकलेले सारे ईंग्रजी पणाला लावत, जे काही डोक्यात होते त्याचा पानभर सारांश खरडवला. दुसर्‍या दिवशी पंधरा मिनिटे लवकरच ट्यूशनला गेलो. आणि ईतर कोणी हजर होण्याच्या आधीच थरथरत्या हातांनी ते लव्हलेटर तिच्या हातात थरथरवले.. सॉरी सरकवले.

पुढे पुर्ण क्लास तिच्या नजरेला नजर देण्याची माझी हिंमत होत नव्हती. तरीही डोळ्यांच्या कडांना बघायचा मोह आवरत नव्हता. ती वाचत होती. हसत होती. लाजत होती. मध्येच काहीश्या विचारांत हरवत होती. वाचून झाल्यावर ते पत्र घेऊन ती आत गेली. बाहेर बसल्याजागी माझ्या सर्वांगाचे पाणीपाणी झाले होते. क्लास सुटल्यावर तिने सर्वांना जायला सांगितले, आणि मला एकट्याला थांबायला सांगून पुन्हा आत गेली. जर त्यांच्या घराचे फ्लोरींग संगमरवरी दगडाचे नसते तर एवढ्या वेळात मी पायाच्या नखांनी ते कुरतडलेच असते.

बाहेर आली तेव्हा तिच्या हातातही एक पत्र होते. माझ्या लव्हलेटरचे उत्तर होते. माझ्या हातात देत हसून म्हणाली, "हे घे, घरी जाऊन वाच. क्लास सुटलाय ना आता ..."
क्लासबाहेर पडताच मी घराकडे धूम पळत सुटलो, अगदी जो जीता वही सिंकदर मधल्या आमीरखान स्टाईल बॅग भिरकावून दिली आणि अधाश्यासारखे ते पत्र, ते उत्तर वाचायला घेतले..

माझेच पत्र होते ते. पण सुधारीत आवृत्ती होती. तिने चेक करून परत दिले होते. एकोणीस स्पेलिंग मिस्टेक आणि व्याकरणाच्या अडतीस चुका. मार्कही दिले होते. दहापैकी तीन. प्रेमाच्या पहिल्याच परीक्षेत मी अर्ध्या मार्कांने नापास झालो होतो.

वाईट एकाच गोष्टीचे वाटले. एवढे करून ते लेटर तिच्या साठी होते हे तिला कधी समजलेच नाही. अर्थात, यामागेही माझीच चुकी होती. लेटर इंग्लिशमध्येच लिहायचे या भावनेने मी ईतका पछाडलो होतो की तिचे ‘प्रिया’ हे नावही ‘माय डीअर लवली’ असे लिहिले होते.

पण या सर्वाचा एक फायदा तर झाला. आता माझ्या हातात एक परीपुर्ण इंग्लिश लवलेटर होते जे मी कोणत्याही मुलीला फिरवू शकत होतो. साईड बाय साईड एक बबली नावाची मुलगी माझ्या नजरेत होती. माय डीअर लवलीच्या जागी खाडाखोड करून माय डीअर बबली असे केले असते तर पुन्हा पुर्ण पत्र लिहायचा त्रासही वाचला असता. पण ही बबली माझ्यापेक्षा वयाने तीन वर्षे लहान होती. एकदा दोन वर्षे मोठ्या मुलीला प्रपोज करून झाल्यावर आता बबलीला भिडायचे म्हणजे मला बालप्रपोज वाटू लागले होते. त्यात तिचीही ईंग्लिशची बोंब होती. मग ती शिकणार कधी, माझे पत्र वाचणार कधी, आणि मला उत्तर देणार कधी, आणि कधी आम्ही... श्या! म्हणून मग मी वर्गातल्या मुली न्याहाळायला सुरुवात केली. पण आपल्या वर्गातल्या मुलींपेक्षा शेजारच्या वर्गातील मुली छान भासतात हा नियम तेव्हाही प्रचलित होता. दोन तुकड्या सोडून एक सापडली. आता चिठ्ठीचपाटी न करता तोंड उघडायचे ठरवले. कारण आता प्रेमाचेच नाही तर भाषेचे माध्यमही समान होते. पण थेट मुलीच्या समोर उभे राहत बोलायचे कसे हा प्रश्न होताच. मग ठरवले की दुरूनच बोलायचे. ती भडकल्यास लागलीच तिच्या हाताला आपण लागणार नाही असे एका हाताचे सुरक्षित अंतर ठेवून बोलायचे. पण दुरून बोलायचे ठरवल्यास तिला ऐकू जायला मोठ्याने बोलावे लागले असते, जे आणखी चारचौघांना ऐकू जाण्याची शक्यता होती. आणि एकदा का ही बातमी गावभर पसरली असती की हा ऋनम्या येता जाता मुलींना प्रपोज करत फिरतो, तर पुढे मागे दुसर्‍या कोण्या मुलीशीही जमायचे वांधे झाले असते. म्हणून मग दूरध्वनीचा वापर करून दुरून बोलायचे ठरवले, जे थेट तिच्या आणि फक्त तिच्याच कानात ऐकू गेले असते.

तिचा नंबर मिळवण्यापासून तिला फोन करायची योग्य वेळ कोणती याचा सारा अभ्यास करून झाला होता. पण नशीबाने इथेही दुसराच कान दाखवला. फोन तिच्या आत्येने उचलला. गावाहून आली होती की कायम तिच्याच घरी तळ ठोकून बसणारी होती याची कल्पना नाही. पण मी इथून कोण बोलतेय विचारल्यावर समोरून आत्या बोलतेय असे उत्तर आले. आता एक बाई एखाद्या अनोळखी व्यक्तीला थेट आत्या बोलतेय असे कसे सांगेल? अरे काय आत्या, कोणाची आत्या, मै किसी आत्या को नही जानता, असा प्रश्न पडणार की नाही त्याला? पण बहुधा त्या आत्येला मी आवाजावरून त्यांचाच कोणीतरी फॅमिली मेंबर वाटलो असावो, असे मला वाटले..... आणि मी याचाच फायदा ऊचलत म्हणालो, "आत्या जुईला फोन दे ना..."

"थोबाड फोडून हातात देईन मेल्या. याद राख पुन्हा इथे फोन केलास तर ......."
टुईंईईऽऽऽऽऽऽऽऽ .. एक लांबवर आवाज कानात घुमला. माझे मलाच समजले नाही की कधी माझ्या हातून फोन कट केला गेला.

आत्येचे हे उग्र रूप अनपेक्षित होते, पण अनाकलनीय नव्हते. बहुधा जुईला फोन करून प्रपोज करणार्‍यांची लॉंग लिस्ट होती. आणि या लिस्टीत रांग मोडत शिरलेलो मी उगाचच आज शहीद होणार होतो. खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बाराण्णा करत मला माझ्या लवलाईफची सुरूवात करायची नव्हती. जुईला त्याचक्षणी टाटाबाईबाई करत मी हे प्रकरण केवळ एक रुपया नुकसानीतच संपवले.

काही हरकत नाही. एक रुपया गेला, पण त्या दिवशी एक गोष्ट मला समजली...

तीच जी मी पुढच्या प्रपोजच्यावेळी वापरली ..

क्रमश:
ऋन्मेष:
माझे सव्वीस प्रपोज ! (मुलामुलींची नावे बदलून)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, बालिष्टर नाही झालो पण हा डायलॉग ऐकतच लहानाचा मोठा झालोय. खरेच झालो असतो तर हा डायलॉग ऐकण्यातील गंमत संपली असती Happy

टिचर वाला किस्सा कंटाळा आणतो यार..
सर्वांना पहिले टिचरच का आवडते कोण जाणे..

लिहिलस मस्त बाकी.
आणि गफ्रे ने प्रपोज केल्यावर तू तेव्हाच्या तेव्हा हो म्हटलस कि पत्राला उत्तर देण्याइतका वेळ लावला Wink

अरे कुणीतरी आवरा या मुलाला.....

नाहीतर कृपया ऋबोली नावाची नवीन साईट उघडा कुणीतरी.
बाळ ऋन्मेषचे सगळे चिमखडे बोल, रांगायच्या, दुडुदुड धावायच्या गोष्टी, काऊचिउच्या गोष्टी सगळे येईल...

मग वाईट सवयी, प्रपोज वगैरे झाले की

रुमाल कुठला घ्यावा वगैरे पण त्यात टाकता येईल....

मला उगाचच पुलंच्या नानू सरंजामेची आठवण येत आहे.

टीना,
सर्वात पहिले टीचर नाही तर नर्स आवडलेली. पण तेव्हा बोलता येत नसल्याने तिला प्रपोज केले नव्हते. Happy

बाकी ग'फ्रेंडला हो म्हणायला वेळ घेतलेला. तिला फेरविचार करायला वेळ दिलेला. Happy
मधल्या काळात मैत्री कायम होतीच..

मनस्मी, सारेच लिहिले तर 26 होतील. पण सारेच लिहेनच याची ग्यारंटी नाही. शेवटी मी पण एक माणूस आहे. लोकांचे 26 गुणिले शिव्याशाप घेत नाही जगू शकत Happy

आशूचॅम्प, माफ करा पण मी पुलंचे नानू सरंजामे वाचलेले नाहीये. त्यामुळे यावर त्यांचा प्रभाव आहे असे नाही म्हणता येणार. तरी तसे असल्यास तो एक योगायोग समजा. बाकी हे वाचून पुलंचे काही आठवणे याला मी माझा गौरवच समजतो. Happy

बाकी हे वाचून पुलंचे काही आठवणे याला मी माझा गौरवच समजतो. स्मित

नाही रे नाही...मी सपेशल माफी मागून शब्द माझे मागे घेतो.....

:डोक्यावर हात मारून घेणारी बाहुली:

अन्जू, मी ईंजिनीअर साईड बाय साईड झालोय. ईंजिनीअरींग हे माझे पॅशन किंवा ध्येय कधीच नव्हते. किडे करायचे पैसे मिळत असते तर मी करोडपती झालो असतो आणि मग पोटापाण्यासाठी ईंजिनीअरींग करायची मला गरज पडली नसती, असे कोणीतरी मला नेहमी म्हणते Happy

मला कौतुक वाटलं कारण मी शाळेत असताना माझा पहिला क्रश रवी शास्त्री होता तर अभ्यासातून लक्ष उडालं (बाकी माझे क्रश असेच खेळाडू, अभिनेते etc), आजूबाजूच्या कोणाशी नाही, त्यांना महत्व नव्हते ;).

म्हणून तुझं साईड बाय साईड इंजिनीअर होणं म्हणजे अजूनच कौतुकाची गोष्ट, सोपं आहे का ते.

धनश्री, अर्थात, हो Proud

अन्जू वाह रवी शास्त्री, सही .. मी मुलगी असतो आणि त्या काळातली असतो तर कदाचित मीही नंबर मध्ये असतो. मला तो आजही सही वाटतो. कोहलीबरोबर उभा राहिला की त्याचा मोठा भाऊ वाटतो.

माझ्याही अश्या क्रशची लाँग लिस्ट आहे. डोळ्यासमोरून एक पट्टी तरळून गेली. नवीन धाग्याचा विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या आठवणीत पुन्हा रमायलाच हवे Happy

अर्रर उगाच लिहिलं :(, तुला नवीन धाग्याचा विषय सुचला. मागेपण मी तुला तुझा नवीन धागा लपेटणे (खोटं बोलणं) आहे का विचारले तर तू फार मनावर घेतलेस आणि मोठी वातावरणनिर्मिती करून तो धागा काढलासच थापेबाजीचा.

अर्रे असे काही नाही. मी गंमतीने लिहित असतो नवीन धाग्याचा विषय. पण प्रत्येकवेळी काढतोच असे नाही. थापा मारणे ही माझी वाईट सवय आहेच, ती त्या लेखमालेत कधी ना कधी येणार होतीच. त्याचे पाप तुम्ही आपल्या डोक्यावर घेऊ नका Happy आणि वातावरणनिर्मिती देखील काही ठरवून वगैरे नव्हती केली तर काही वैयक्तिक कारणास्तव मी बिजी आणि माबोपासून दूर झालेलोच.

ऋच्यामागे कोण आहे हे जाणून न घेण्याचं ही लेखमाला आणखी एक कारण.लेखन वाचून प्रत्यक्ष भेटल्यावर अरे हाच का तो ही सर्व मजा निघून जाईल.तुझ्या वाइट सवयी ,खरेदी सर्व वाचायला फार आवडतं. शेवटचा भाग गणेश चतुर्थी २०१६ ,मायबोली,२० या दिवशी लिही.तुझ्या गर्लफ्रेंडलाही हे वाचून दाखवतोस का पॅाडकास्ट करतोस?

तुझ्या गर्लफ्रेंडलाही हे वाचून दाखवतोस का पॅाडकास्ट करतोस?
>>>
पॉडकास्टचा अर्थही मला माहीत नाही. काही लिखाण जे माझ्याशी संबंधित किस्से असतात ते तिच्या व्हॉट्सपवर टाकतो. वाचते की नाही माहीत नाही. "मला तुझ्या भूतकाळात ईंटरेस्ट नाही' असे फिल्मी डायलॉग मारते.

बाकी माझ्यामागे कोणीही गॉडफादर नाही. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. सेल्फ मेड मॅन Happy

Lol लेख आणि कॉमेंट्सही. (आता तू लिहिलेला लेख इथल्या सो कॉल्ड प्रतिथयश लोकांनी लिहिला असता तर "अय्या किती गोड" टाईप्स बोरींग प्रतिक्रिया आल्या असत्या. पण तू लिहितोस, लोक धोपटतात आणि त्यावरही तू प्रतिक्रिया देतोस त्यामुळे तुझ्या सगळ्याच धाग्यावरच्या प्रतिक्रिया अतिशय एंटरटेनिंग असतात :खोखो:)

हाहा लेख आणि कॉमेंट्सही. (आता तू लिहिलेला लेख इथल्या सो कॉल्ड प्रतिथयश लोकांनी लिहिला असता तर "अय्या किती गोड" टाईप्स बोरींग प्रतिक्रिया आल्या असत्या. पण तू लिहितोस, लोक धोपटतात आणि त्यावरही तू प्रतिक्रिया देतोस त्यामुळे तुझ्या सगळ्याच धाग्यावरच्या प्रतिक्रिया अतिशय एंटरटेनिंग असतात खो खो) >>>>> +11111

हाहा लेख आणि कॉमेंट्सही. (आता तू लिहिलेला लेख इथल्या सो कॉल्ड प्रतिथयश लोकांनी लिहिला असता तर "अय्या किती गोड" टाईप्स बोरींग प्रतिक्रिया आल्या असत्या. पण तू लिहितोस, लोक धोपटतात आणि त्यावरही तू प्रतिक्रिया देतोस त्यामुळे तुझ्या सगळ्याच धाग्यावरच्या प्रतिक्रिया अतिशय एंटरटेनिंग असतात खो खो) >>>>> +11111 हे बाकी खरं!

मो भान राजू धन्यवाद
एखादी लेखमाला सुरू केल्यावर त्यावर असा प्रतिसाद येणे खूप गरजेचे असते अन्यथा दुसरा भाग लिहायचा मूडच होत नाही. मनापासून धन्यवाद. आता मी सत्तावीस लिहून जाईन..

इतर फेसबुक वगैरे सोशल साइट्सवर आपण खातं उघडून लिखाण आणि फोटो फेकतो तसे पॅाडकास्टवर बोलणं फेकायचं असतं असं म्हणतात.बरेच जण तिकडे गेल्यावर सुरू करता येईल.जे मित्र असतील त्यांचं ऐकायचं.वाटसप'वर ओडिओ आहेच म्हणतोस ते बरोबर आहे.

#"सो कॉल्ड प्रतिथयश" - प्रस्थापित?

Pages