त्या मित्रांसाठी

Submitted by विद्या भुतकर on 10 March, 2016 - 19:10

आज विचार करत होते, आपल्याकडे ही सगळी मुलं अशी का वागतात? गेल्या दोन वर्षात मी पुण्यात असताना अनेक वेळा टपरीवर चहा घेतला टीममधल्या अनेक लोकांसोबत.पण एकदाही प्रत्यक्षात टपरीवर जाउन '४ चहा' असे सांगायची वेळ आली नाही. प्रत्येकवेळी एखादा मुलगा जाउन ऑर्डर देई आणि चहा घेऊन येई. बरं ही काही पहिली वेळ नव्हती हे बघायची माझी. आज पर्यंत डोसा, पोहे, चहा, वडापाव कुठलीही टपरी असो, कॉलेजपासून नोकरीपर्यंत एकदाही मला जाऊन 'चार चहा' म्हणायची वेळ आली नाहीये. कुणी सर्व मुलांना कुठले तरी नियमांचे पुस्तक देते का की ज्यात असा नियम लिहिलेला आहे की तो अलिखित नियम आहे? असो पण आजची पोस्ट त्या टपरीबद्दल नाही. ती आहे आजपर्यंत भेटलेल्या सर्व मित्रांसाठी आहे.
तर आता स्वत;ला मुलांपेक्षा अजिबात कमी न समजणाऱ्या आणि मिळेल तिथे वाद घालणाऱ्या मला किंवा माझ्यासारख्या अनेक मुलींना टपरीवर ऑर्डर द्यायला जाणाऱ्या मित्रावर कधीच आक्षेप नसतो. कारण मला वाटतं त्यात एक प्रकारचा आदर दाखवतात हे आपले मित्र. आता टपरीवर चहा घेण्यात किंवा खाण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही. आणि स्वत: घेऊन येण्यातही. पण हे मित्र जी तत्परता दाखवतात स्वत: पुढे जाण्याची, ती भारी आवडते मला. अर्थात हे फक्त उदाहरण झाले. तिथेच टपरीवर कुणी सिगारेट ओढणारा असेल तर तिथून आपल्याला दूर घेऊन जाणारे किंवा त्या माणसाला दूर जा म्हणणारेही पहिले आहेत. असे अनेक किस्से.
आजची पोस्ट त्या मित्रासाठी जो रात्री चालत परत जायला लागले तरी होस्टेलपर्यंत चालत येतो. कधी बाईकवरून आपल्या गाडीच्या शेजारून चालतो घरी जाईपर्यंत. कधी घरी पोचले की नाही हे आठवणीने फोन करून विचारतो. बस मध्ये, ऑटोमध्ये चढताना आपल्याला पुढे चढायला लावून आत गेल्यावर एकच सीट असेल तर बसायला जागा देतो आणि स्वत: उभा राहतो. कधी गर्दी असेल तर आपल्या आजूबाजूने स्वत:च्या हाताचा किंवा खांद्याचा आडोसा देतो, बाकी लोकांचे धक्के लागू नये म्हणून. त्या मित्रासाठी, जो माझे सर्व सामान बघून 'ही एकटी बसने कशी जाईल' म्हणून मिल्वोकी ते शिकागो गाडीने आला फक्त सोडण्यासाठी. त्या मित्रासाठी, जो टोरांटोच्या बर्फात मला घरापर्यंत पोचवून मग बसने जायचा. अशा मित्रासोबत असताना अजिबात असुरक्षित वाटत नाही.
त्या मित्रासाठी जो कितीही कठोर वाटला तरी एखाद्या मुलगी आवडते म्हणून लाजत सांगेल. आणि ती मुलगी जवळची झाल्यावरही मैत्री मात्र विसरत नाही. एखादा जो आपल्याला नोकरी लागली नाही अजून म्हणून न रडता तिला मदतीला बसेल. त्या मित्रांसाठी ज्यांनी मुलगी म्हणून मदत केली तरी आदरही केला आणि सोबतही. त्या मित्रांसाठी जे आपली मैत्रीण चुकतेय माहित असूनही केवळ तिच्यासाठी, तिला सपोर्ट देतात. किंवा असेही जे पटत नाही म्हणून आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून असहमत दाखवतात पण तिला एकटीला सोडून देत नाहीत. त्या मित्रासाठी, जे प्रेम असले तरी मैत्रीला महत्व देतात आणि तिला त्याचा मागमूसही लागू देत नाहीत. किंवा तिच्यासाठी जो लग्नात आला तरी नंतर तिच्या सासरचे काय म्हणतील हा विचार करून, इच्छा असली तरी फोन करायचं टाळतात. खडसावून विचारले तर, मीच कामात होतो म्हणून उडवून लावतात. त्या मित्रासाठी जे बायकोला पटत नाही तरी मैत्रिणीला मदत नक्की करतात.
कधीकधी वाटतं की मित्र म्हणून जी काही व्यक्ती असते तिची जागा दुसरे कुणीही घेऊ शकत नाही. कितीही भाऊ, बहिण, नवरा आणि बाकी मैत्रिणी असल्या तरी मित्र खास असतातच. जे मदत नाही करता आली तरी सोबत राहतात. अनेकदा असे ज्यांनी आयुष्यात अनेक वाईट परिस्थितीत पूर्णपणे साथ दिलेली असते आणि कधी फोन केला तर आजही मदत करतील अशी खात्री असते. आणि सर्वात शेवटी अशा मित्रासाठी, जो आता नवरा असला तरी आधी जवळचा मित्र होता आणि राहीलही आयुष्यभरासाठी. तर आजची ही पोस्ट फक्त त्या सर्व मित्रांसाठी. Thank you for "Being There".

विद्या भुतकर.
My Facebook Page: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रांबद्दल छान लिहीलंय. तुमच्या ललितांची चातकासारखी आठवण बघत असतात मायबोलीकर्स.
टप-यांची छान आठवण करून दिलीत.
वाडिया कॉलेजच्या बाहेर आहेत टप-या. सप पासून जरा लांब जावं लागतं. फाईव्ह स्टार डिशेस पासून ते वडापावपर्यंत काहीही मिळतं, खिशाला परवडणेबल.

धन्य्वाद कापोचे. इथे अजुन खुप मोठे मोठे लिहिणारे आहेत त्यामुळे हे काहीच नाही. असो. पण तुम्हाला खरेच आवडत असेल तर माझ्या पेज वर आहेत भरपुर पोस्ट. इथे सर्वच टाकले जात नाहीत. तुमची कमेन्ट वाचून छान वाटल.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
विद्या.

विद्या, छान असतात तुझे छोटेसे लेख, खुप सार्‍या जुन्या आठवणी आल्या. असे मित्र वयाच्या कोणत्याही स्टेजला भेटतच असतात. I am blessed, i always had and have such fantastic friends in my life.

इथे अजुन खुप मोठे मोठे लिहिणारे आहेत त्यामुळे हे काहीच नाही. >>> तुम्ही विनयाने म्हणताहात याची कल्पना आहे. तुमच्याकडे लिखाणाचे अंग आहे. लिहीत रहावे.

खुपच छान लेख.कॉलेज चे दिवस ,टपर्या,कटींग्,सामान्,हिरवळ्,लायब्ररी,भांडण्,प्रॅक्टीक्ल्स,अफेअर्,गॉसिपिंग्,पार्कींग सगळच सगळ आठवल Happy धन्यवाद.

छान लिहिलंय.. असतात काही मित्र असे पण काळाच्या ओघात दुरावतातही. त्यावेळी आपण त्यांची आठवण ठेवायची असते.

, कॉलेजपासून नोकरीपर्यंत एकदाही मला जाऊन 'चार चहा' म्हणायची वेळ आली नाहीये. कुणी सर्व मुलांना कुठले तरी नियमांचे पुस्तक देते का की ज्यात असा नियम लिहिलेला आहे की तो अलिखित नियम आहे?>>>
हा प्रश्न मलाही कायम पडतो.

छान लिहिलय. आवडलं

एकदम मस्त.. मी तुमचे सगळे लिखाण वाचते, पण प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. असेच लिहीत रहावे. Happy

सर्वन्चे खूप आभार. य मित्रन्चि आजही आठवण येते. पण गेलेले दिवस परत येत ना।ईत याचे वाईट वाटते.

लाडु, Thank you for asking me before sharing. It would be really nice if you can share from my page. Once things get on Whatsapp etc, its really hard to check if its with my name or not. I have had many occurances recently where my poems ended up coming to me without any name to it. I hope you understand. Here is the link to my post, you can share the post from the page.

https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/976299422449593:0

THanks,
Vidya.

ऋन्मेऽऽष , तुम्ही तुमच्या मैत्रीणींसाठी नक्की लिहा. मी माझ्या मैत्रीणींसाठी इथे लिहिले आहे थोड्या दिवसापूवी.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/965473526865516:0

विद्या.