मराठी असे आमुची मायबोली!

Submitted by इन्ना on 10 March, 2016 - 04:55

मराठी असे आमुची मायबोली .

मराठी भाषा दिन पार पडला! एका दिवसाचे जे असंख्य समर्पित दिवस साजरे (?) करण्याचे प्रस्थ , फॅशन सध्या आहे त्यात हा ही एक दिवस!

ह्या वर्षीच्या म भा दिनाच्या संयोजक मंडळात काम करताना ( माझा सहभाग त्यातही किडूक मिडूकच होता) वारंवार काही तरी बोचत होतं. एका दिवसा च्या ऐवजी चार दिवस उपक्रम ठेवले , तरी कार्यक्रम संपल्यावर मराठी भाषा दिन संपला . समारोप!
मदर्स डे ला आईला 'विश' करण्यासारखच झाल .

माधव ज्युलियन यांच्या कवितेत म्हटलय तस,
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा
नका फक्त पाहू हिच्या लक्तरां,

पण लक्तरं एका दिवसाच्या उपक्रमानी राजवस्त्र होतील का?

हिची थोर संपत्ति गेली उपेक्षे-
मुळे खोल कालार्णवाच्या तळी

ही उपेक्षा संपणार का? कशी? मराठी शाळांची रोडावणारी संख्या, पुढच्या पिढी बरोबर सैल होत जाणारे मराठीचे बंध, रोजच्या बोलण्यात वाढत जाणारे इतर भाषांतील शब्द. त्याहीपुढे जाउन , विचार करण्याची भाषा बदल्तेय का? अगदी माझ्याही बाबतीत हा बदल मला ठळक जाणावतोय.

मराठी भाषा दिनाचा हा कार्यक्रम एक दरवर्षी होणारा सोहळा ह्यापलिकडे , निरंतर चालू रहाणार्‍या उपक्रमांचा उगम व्हावा अस वाटल.
असे कोणते उपक्रम असावेत ह्याबद्दल काही कल्पना आहेत . पण त्याबद्दल ब्रेन स्टॉर्मिंग ( विचारमंथन , कल्पना विस्फोट) व्हाव म्हणून हा धागा.

मला सुचलेल्या काही कल्पना -
१)विकीपिडीयावर मराठीत लिहिणे ( हे खरतर इथे २०११ च्या मभादिनी सुरू केलेल आहे ) http://www.maayboli.com/node/24419 ह्याच धाग्यात तिथे लिहिले गेलेल्या मराठी लेखांची सुची आहे . कस लिहायच ह्याबाबत सुचना /माहितीही.

२) यंदाच्या शब्दवेध उपक्रमात सुरु केलेला प्रचलीत इंग्रजी शब्दाना चपखल मराठी शब्दां शोध

अजून काही सुचतय तुम्हाला?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा रुमाल उचलते!
ही उपेक्षा संपणार का? कशी? मराठी शाळांची रोडावणारी संख्या, पुढच्या पिढी बरोबर सैल होत जाणारे मराठीचे बंध, रोजच्या बोलण्यात वाढत जाणारे इतर भाषांतील शब्द. त्याहीपुढे जाउन , विचार करण्याची भाषा बदल्तेय का? अगदी माझ्याही बाबतीत हा बदल मला ठळक जाणावतोय.>> +१ हे असं माझं देखील होतं आहे.विशेषतः विचार करण्याच्या बाबतीत Sad

एक गोष्ट मला शब्दवेध उपक्रमाच्या वेळेला जाणवली की मला सुचलेल्या पर्यायी मराठी शब्दाने बरेचदा माझं समाधान होत नव्हतं. मला वाटायचं की अरे यार अजून चांगला चपखल शब्द नाहीच आहे का? मग माझ्या लक्षात आलं की आपण अतिविचार करतो आहोत Happy
आपल्याला मराठीला एका नव्या साच्यात बसवायला हवंय. इंग्रजी भाषा इतकी पटकन रुळते कारण ती खूप प्रवाही आहे आणि लवचिक आहे. उदा. To google असं क्रियापद आधी नव्हतं पण ते आता आपोआप तयार झालं आहे आणि अंगवळणी देखील पडलं आहे. ही लवचिकता आपल्या भाषेत यायला हवी. (मला वाटतं की क्रियापदांच्या बाबतीत ही लवचिकता आपल्याकडे आहे. उदा. रंग लावला आणि क्लास लावला ह्या दोन्ही ठिकाणी लावला हेच क्रियापद वापरले तरी आपल्याला संदर्भाने त्याचा वेगवेगळा अर्थ कळतो.)
जेव्हा आपण बोलताना एखाद्या इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द शोधतो तेव्हा तो त्या शब्दाच्या अर्थाच्या अधिकाधिक जवळ जाणारा असावा असा आग्रह आपण सोडून द्यायला हवा. त्याच वेळी आपल्या भाषेतल्या शब्दांना जो अर्थ आहे त्याहून वेगळा अर्थ प्राप्त करून देता यायला हवा. मला काय म्हणायचं आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट करते. संगणकाच्या code/program ला मराठीत संकेतप्रणाली किंवा संकेतआज्ञावली असं लांबलचक आणि अवघड नाव आहे. त्या ऐवजी नुसतं संकेत (=code, to code = संकेत बनवणे) म्हटलं तर काय हरकत आहे? तसेही इंग्रजीतले अनेक शब्द हे आलटून पालटून वापरले जातात. आणि त्यांचे अर्थ हे आपण संदर्भानेच लावतो. उदा. key म्हणजे किल्ली पण keyword म्हणजे मराठीत काय? आपण पटकन किल्लीशब्द म्हणणार नाही! आपण काहीतरी संकेतशब्द वगैरे त्या इंग्रजी शब्दाच्या अर्थाच्या जवळ जाणारा शब्द शोधायला जाऊ! त्या ऐवजी किल्लीशब्द का नाही म्हणायचं? शिवाय मराठीत पर्यायी शब्द शोधताना इतकी ताठ भूमिका घेणारे आपण इंग्रजीत पर्यायी शब्द शोधताना एकदम सूट घेतो! उदा. तांदुळाच्या खिरीला rice pudding म्हणताना आपल्याला चूकीचं (odd) वाटत नाही!
हे असं का होतं याचा विचार केला तेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्ही भाषा येतात त्याचा हा एक तोटा आहे. माझ्या मित्राची बहिण एका खेडेगावात मुलांसाठी संगणकाचे वर्ग घ्यायची. तिने सांगितलेला किस्सा - एकदा सुरुवातीला वर्ग संपल्यावर एका मुलाने तिला येऊन विचारले होते - "ताई, कांप्यूटर इझवू (विझवू) का?" तिला कळलंच नाही तो काय म्हणतोय मग लक्षात आलं की तो विचारत होता की computer shut down करू का?! आता त्या मुलाला shut down हे शब्द माहिती नसल्याने त्याने त्याच्या भाषेत त्याला किती सुंदर प्रतिशब्द शोधला! हा किस्सा ऐकल्यापासून आम्ही मजेने आता मी कॉम्प्यूटर विझवते असे म्हणायचो!
थोडक्यात इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द निवडताना साधे सोपे आणि सुटसुटीत शब्द निवडा (जोडाक्षरे टाळून) जे कदाचित अर्थाने थोडे दूर असतील पण शेवटी आपण मराठीत अनेक गोष्टींचे संदर्भाने लावतो तसे त्यांचेही लावू आणि माझी खात्री आहे की त्याने मराठी भाषा अधिक समृद्धच होईल!
अजूनही काही कल्पना आहेत पण ह्या रुमालाची आता चादर झाली आहे तेव्हा एका वेगळ्या प्रतिसादात लिहिते!

आपल्या मुलांबरोबर मराठीत आणि मराठीवर खुप काम करायला हवंय. फक्त आपल्याच नाही, सगळ्यांच्या. कोणत्याही माध्यमात असतील तरी. रोजच्या व्यवहारात मराठीचा सहज वापर करतील अशी गोडी त्यांना लावायला हवी.
कारण माझा मुलगा मराठीत कितीही छान रमला तरी बोलायला त्याला सोबत कुणीतरी लागणार. ती कुठून आणायची?
प्रवाह पुढे वाहता ठेवणारी आपली मुलं आहेत.

यासंदर्भात काही उपक्रम सुचवले गेले तर खुप मदत होईल.

मराठी भाषा दिनाचा हा कार्यक्रम एक दरवर्षी होणारा सोहळा ह्यापलिकडे , निरंतर चालू रहाणार्‍या उपक्रमांचा उगम व्हावा अस वाटल.

ह्याला अनुमोदन

जिज्ञासा रूमाल काय चादर घे.

प्रतिशब्द शोधणे आणि ते अतिवास म्हणतायत तसे गुगल ट्रान्स्लेटरवर इंग्रजी-मराठी आणि मराठी-इंग्रजी शब्दात समाविष्ट करणे.

जिज्ञासा रुमाला ची व्हॅलिडीटी कधी संपणार Happy
अतिवास , कल्पना छ्हान आहे. मी हेडर मधे नोंदवत जाते नविन कल्पना.

गूगल ट्रान्स्लेटरवर इंग्रजी-मराठी आणि मराठी-इंग्रजी शब्द देणे. >>> हे एकदम कमी वेळ द्यावा लागणारं काम आहे. मी मध्यंतरी नेटानं रोज जेवणाच्या सुट्टीत एक-दोन शब्द टाकण्याचं काम केलं पण कधी तरी खंड पडला. आता पुन्हा सुरू करेन.

विकिपिडियावर वेगवेगळ्या फळ-फुल-पिकांच्या जातींची मराठीत यादी टाकण्याचं एक करू शकतो. आंब्याचा मौसम आहे तर त्यानेच सुरूवात करावी Happy

मायबोलीवर लेख किंवा पाककृती लिहिताना आवश्यकतेपेक्षा जास्त इंग्रजी शब्द न वापरणे हे पण करू शकतो.

सईने सुचवल्याप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागायला हवी. मग हे प्रतिशब्द शोधण्यासाठी मुलांचीच मदत का घेऊ नये? त्यांना माहिती असलेल्या, वापरातल्या मराठी शब्दांमध्ये इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द मिळाले तर मजा येईल. प्रतिशब्दांसाठी अजून महत्वाच्या व्यक्ती म्हणजे ज्यांना इंग्रजी फारसं येत नाही असे लोक आणि जुनी पुस्तकं - ज्यात विस्मरणात गेलेले शब्द सापडतील.
खरंतर ह्या गोष्टीची चळवळ झाली पाहिजे. झी मराठी किंवा अशाच लोकप्रिय मराठी वाहिनीवर ह्यासाठी मर्यादित भागांचा खरा खेळ (reality show) करता येईल का? म्हणजे ५ इंग्रजी शब्द द्यायचे. मग ३/४ स्पर्धक गट त्या शब्दांना पर्यायी नवीन शब्द सुचवतील. प्रेक्षकांनी मतदान करून विजेते शब्द ठरवायचे. अशाने नवीन शब्द समोर येतील आणि त्याचवेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचतील सुद्धा! हा एक खेळ झाला. असे अनेक कल्पक खेळ खेळता येतील.
अजून कल्पना:
१. कुठल्याही ग्राहक सेवा केंद्राशी बोलताना मराठी भाषा निवडायची. हे मी नेहमी करते. (त्या सेवा केंद्रावर मराठीतून सेवा तेव्हाच सुरु राहील जेव्हा त्या सेवेचा लोक लाभ घेतील.) दुसरं जिथे जमेल तिथे अभिप्राय नोंदवावा.
२. एका वर्षात किमान १२ (महिन्याला १ ) मराठी पुस्तके विकत घ्यायची. मला माहिती आहे की आपल्या पैकी अनेक जण ह्याहून अधिक खरेदी करतात पण जे घेत नसतील त्यांनी घ्यायला सुरुवात करावी.
३. तसंच किमान एका मराठी मासिकाचे वर्गणीदार व्हा किंवा मराठी ग्रंथालयाचे वर्गणीदार व्हा.
४. सिंडरेला यांनी सुचवल्याप्रमाणे आपण मायबोलीवर कमीत कमी इंग्रजी शब्द वापरून लिहिण्याचा प्रयत्न करू शकतो. तसेच दुर्दैवाने आजकालच्या सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांमधल्या लेखांत इंग्रजी शब्दांचा भडीमार असतो. त्याबद्दल आपण संपादकांना किंवा लेखकांना विनंती/सूचना करू शकतो.

आपल्या मायबोलीवर अनेक विषयांवर माहिती हवी आहे असे धागे येतात. बरेचदा ती माहिती म्हणजे एखादी वस्तू/सेवा/जागा कशी वाटली ह्या स्वरूपाची असते. असे अभिप्राय नोंदवण्याची सोय अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे (amazon, flipkart, zomato, trip advisor) पण तिथे तुम्ही भारतीय भाषांमध्ये अभिप्राय नोंदवू शकता की नाही ते माहिती नाही. पण जर अशी सोय असेल तर ह्या ठिकाणी मराठीतून माहिती/अभिप्राय नोंदवता येईल जेणेकरून आंजावर त्या विषयांवर मराठीतून विदा उपलब्ध होईल.

भाषांतर
आता अनेक आंतरजालावरच्या सुविधा 'localization'/स्थानिकीकरण करू बघत आहेत. त्या स्थानीय व्यक्तिंच्या भाषांतरांवर विसंबून आहेत. यात गूगल, थोपु पासून वर्डप्रेस, सर्व मुक्तस्रोत प्रणाली आहेत. आणि मुख्य म्हणजे कोर्सेरा आहे. कोर्सेरावरच्या शैक्षणिक साहित्याचे मराठीत भाषांतर का करू नये? यासाठी अनेक आधुनिक इंग्रजी शब्दांसाठी प्रतिशब्द शोधण्याचा हेतूही आपोआप साध्य होईल.

सिंडरेलाच्या अधिकाधिक लिखाण कमीत कमी इंग्रजी शब्द वापरून करण्याच्या सूचनेस अनुमोदन!

सिंडरेलाच्या अधिकाधिक लिखाण कमीत कमी इंग्रजी शब्द वापरून करण्याच्या सूचनेस माझेही अनुमोदन. उदा. शेयर कर, ती डिझर्विंग आहे हे इथे खुपदा वाचले.
जिज्ञासा, तुझ्या किल्लीशब्दाला कळीचा शब्द हे वाचले आहे बहुतेक.
ते गुगल शब्द कुठे टाकायचे ? ती कल्पना आवडली.

इन्नाने लेखात मांडलेला "...पण लक्तरं एका दिवसाच्या उपक्रमानी राजवस्त्र होतील का?..." हा प्रश्न मला तर फार सूचक आणि ज्याला उत्तर कुणी देण्यास धजणार नाही असाच वाटला....कारण शक्यता नकारार्थी अशीच आहे. तुम्ही आम्ही भाषा जगविणे आणि तिला थोर दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे असा कितीही पुकार केला तर आजची (विशेषतः ग्रामीण भागातही) भाषेच्या प्रेमाबाबतची सत्यस्थिती केविलवाणी आहे. चिंताजनक मी म्हणत नाही कारण चिंता मराठीच्या शिक्षकालादेखील नाही ही उघड आणि कठोर अशी अवस्था आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठे इथे मराठी अगदी अपरिहार्यपणे असली तरी हा विषय भाषेच्या प्रेमापोटी कितीजण घेतात आणि असावे एखादे बी.ए.च्या पदवीचे भेंडोळे म्हणून पदवीला स्पेशल विषय म्हणून निवडणारे किती असतात हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. ही झाली कला शाखेची अवस्था तर वाणिज्य आणि शास्त्र शाखेचा आणि मराठीचा संबंधच संपुष्टात आल्यासारखा आहे.

ग्रामीण भागातील शाळांतून तर स्वतंत्ररित्या मराठीबद्दल जागरुकतेने तास घेणारे काही शिक्षक असतीलही पण क्रमिक पुस्तकात आलेल्या छापील पानाव्यतिरिक्त जादाची गोडी लागण्याबाबत कुणी काही करत असेल यावर माझा विश्वास नाही. इकडे शहरातही "वर्गाला जे लावले आहे त्याच्यापल्याड..." कुणी काही जादाचे शिकवित असेल वा किमान प्रोत्साहन देत असतील असे चित्र असेल हे म्हणणे धाडसाचे होईल.

सई म्हणते...."...प्रवाह पुढे वाहता ठेवणारी आपली मुलं आहेत..." ~ जरूर आहेत; पण त्या मुलांना प्रवाहात नेण्यासाठी केवळ आईबाबा उपयोगी ठरत नाहीत तर त्यासाठी शिक्षक आणि शिक्षकच हवेत, तेही सक्तीचे नव्हेत तर भाषेच्या प्रेमाचे...कळकळीचे.

जिज्ञासा यानी दिलेले प्रतिसाद खूप विचार करायला लावणारे आहेत....या संदर्भात.

पुढच्या पिढीला मराठी वाचता येणं हे अतिशय महत्त्वाच आहे. जर मराठी वाचता येणारी मुलांची पिढीच निर्माण झाली नाही तर वरील उपाय व्यर्थ ठरू शकतात

जिज्ञासाचे मुद्दे उपयुक्त आणि सहज अंमलात आणण्यासारखे आहेत.
ह्या कामी मुलांनाच हाताशी घेण्याची कल्पनासुद्धा पटली. कित्येकदा खुप अडलेल्या किचकट वाटणा-या गोष्टी मुलानं चुटकीसरशी सोडवल्या असा अनुभव आहे.

मामा, शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, अगदी मान्य. मात्र अलिकडे शिक्षकांवर बाकीच्याही भारंभार जवाबदा-या असतात, मराठीच्या संवर्धनाबद्दल त्यांच्याकडून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आणखी अपेक्षा करणं अन्यायाचं होईल की काय असं वाटतं. त्यातूनही ज्यांना कळकळ असते ते काही उपक्रम करत असतीलच. त्याशिवाय शिक्षक तुलनेने मुलांबरोबर काहीच तास असतात, आई-बाबा आणि कुटुंबीय जास्त काळ असतात. शेजा-यांनाही मुलं बघत असतात. म्हणुन घरच्या पातळीवर नेटानं प्रयत्न केल्यास जास्त परिणामकारक होईल असं वाटतं. मराठी पुस्तकं, वर्तमानपत्रं वाचणं, मराठी बातम्या, चित्रपट, गाणी बघणं आणि ऐकणं, घरात एकमेकांशी, फोनवर इतरांशी, मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना भेटल्यावर, शेजा-यांशी, दुकानदारांशी, भाजीवाल्या-फळवाल्या मावशींशी सगळीकडे बोलताना आपसुक मराठीत बोलणं, असं आवडीनं झालं तर जाता येता मुलांच्या कानावर पडत राहील. अर्थात हे जितकं सहजपणे होईल तितका मस्तपैकी आनंद मिळेल, मजेचं होईल. त्यात मराठी टिकवायचा आवेश मिसळला तर तो प्रयत्न होईल, मग हळूहळू त्याचा आटापिटा होऊन, कधीतरी नकोसं वाटायला लागेल आणि बंदच पडेल.

भाषेच्या प्रेमाचे आणि कळकळीचे शिक्षक हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे पण ते कुठून आणायचे हा नेहेमीच चर्चीला जाणारा मुद्दा असतो.

तर माझा त्यावरचा उपाय
मराठीवर प्रेम असलेले आणि शिकवायची कळकळ असलेले शिक्षक संख्येने कमी असतील तरी तंत्रज्ञानातील प्रगतीचा वापर करून आपण त्यांचे पाठ / शिकवणे आवाजी स्वरुपात / चित्रफित स्वरुपात जतन करून ठेऊ शकतो.
एखादी भाषा त्यातली सौदर्यस्थळे लोकांपर्यंत पोहोचली तर जिवंत रहायला मदत होऊ शकते. अशी सौंदर्यस्थळं उलगडून दाखवणारी विवेचने / भाषणे / लेख सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत.

विकी / युट्युब सारख्या ठिकाणांमार्फत ते जगभरातील सर्वांकरता मोफत उपलब्ध करून ठेवता येईल.

माझ्या वरती लिहिलेल्या प्रतिक्रियेच्या संदर्भाने पुढे - हे सगळं सगळे करतच असतील म्हणा, त्यात नवं काहीच सांगितलं नाही मी Happy महाराष्ट्र आणि भारताबाहेर रहाणा-यांना ते तितकं सोपं नाही ह्याची जाणीव आहे.
पण माझं वैयक्तिक निरिक्षण असंही आहे, की बाहेर रहाणारी मुलं किंवा लोक तुलनेने आपल्यापेक्षा जास्त चांगलं मराठी बोलतात Happy
त्यात आपल्या मुलांना मराठी उत्तम बोलता आलं पाहिजे ह्या त्यांच्या आटोकाट इच्छेचा आणि सक्रिय प्रयत्नांचा मोठा हातभार आहे. आपण महाराष्ट्रात रहाणारी लोकं नेमके त्याबाबतीत गाफील रहातो, चालढकल करतो, असं होतंय का?

सई...

"...महाराष्ट्रात रहाणारी लोकं नेमके त्याबाबतीत गाफील रहातो, चालढकल करतो, असं होतंय का?..."

~ अगदी मला हेच म्हणायचं होतं वरील प्रतिसादात. मराठी माणूसच चारचौघात बाजारात बिग बझार कार्पोरेट ऑफिसेस, मल्टी लेअर हॉस्पिटल्स इथे मराठी बोलत नाही इतकेच नव्हे तर साध्या आईसक्रिमच्या दुकानात फॅमिली पॅक घेताना एक वडील (बरोबर सौ आणि दोन मुलेही होती...) त्या सेल्समनला "दो फॅमिली पॅक पॅक करके देना....ये कितने का है और ओ कितनेका है....!" ~ शेजारी मी आणि शैलेन्द्र होतो...मुलांची बोलणी चालू होती शेजारील खुर्च्यात बसून. आईसमवेत ती छानपैकी मराठीतून बोलत होती त्यावरून ते मराठी कुटुंब आहे हे तर उघडच झाले....आणि हे सारे पुण्यातील सांगवी भागात....जो जवळपास मराठीच आहे. तरीही मराठी प्रांतात धंदा करणार्‍या त्या सिंधी दुकानदारापुढे मराठी बोलायला ह्या मराठ्याला का लाज वाटावी हे समजण्यापल्याड होते, सई.

आता पोरांच्यासमोर बापच असे हिंदी फाडत असेल तर त्याना मराठीची किंमत नाही हे तर उघडच आहे ना. काय मुलांना हा माणूस मराठी शिकायला प्रोत्साहन देणार ?

"...महाराष्ट्रात रहाणारी लोकं नेमके त्याबाबतीत गाफील रहातो, चालढकल करतो, असं होतंय का?..."

>> खरंय. आमची एम्पीत राहाणारी भावंडं म्हणतात.. "आम्ही घरात मराठीत नाही बोललो तर घरचे खुप ओरडतात. त्यामुळे आजुबाजुला सर्वत्र हिंदी भाषिक वातावरण असूनही आम्ही मराठीतच बोलतो घरी."

आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा तिथल्या आमच्या 'भाचरांनी सखी मंद झाल्या तारका..', 'जयोस्तुते' सारखी गाणी म्हणून दाखवली आम्हाला.

एकमेकांशी हिंदीत बोलणारी दोन मराठी माणसं हा अतिशय तिडीक आणणारा विषय आहे.
मराठी डाउनमार्केट आनि हिंदी उच्चभ्रू हा समज मराठी माणसांनी का करून घेतला आहे, देवच जाणे. पण अश्यांना लेक्चर दिल्याशिवाय मी सोडत नाही Happy

जिज्ञासाचे मुद्दे उपयुक्त आणि सहज अंमलात आणण्यासारखे आहेत.
ह्या कामी मुलांनाच हाताशी घेण्याची कल्पनासुद्धा पटली. कित्येकदा खुप अडलेल्या किचकट वाटणा-या गोष्टी मुलानं चुटकीसरशी सोडवल्या असा अनुभव आहे.
>>+१

भाषा या विषयाचीच आपण गोडी लावण्यात कमी पडतो हे माझे मत. शाळेत तर भाषेचे विषय आहेत म्हणून शिकवावे लागतात अशा पद्धतीने कारभार चालतो. (खरा डो़ळा केवळ स्कोरिंग सब्जेक्ट्सवर)

बाहेर रहाणारी मुलं किंवा लोक तुलनेने आपल्यापेक्षा जास्त चांगलं मराठी बोलतात >>> अनुमोदन.
थोडे स्वानुभवाचे बोल. बर्‍याचदा असं होतं की बाहेरच रहात असल्याने, सगळे व्यवहार इंग्रजीतून होत असतातच. त्यामुळे मुलांच्या कानावर मराठी सतत पडत राहणं हे त्यांच्या आईवडीलांमार्फतच होत राहतं ... किंवा होणं गरजेचं आहे. आमच्या बाबतीत इकडे घरात, आमच्या मित्रमंडळींच्या ग्रुप मधे, फोनवरुन भारतातल्या नातेवाईकांशी आवर्जुन मराठीतून बोलणं होत राहतं. झी मराठी चालू असतंच कार्टून बरोबर. मुलं हळूहळू कोणाशी मराठीतून बोलायचं, कोणाशी इंग्रजीत / हिंदीत हे बरोबर ओळखतात. सध्या एक मात्र जाणवतंय की मराठी बोलण्या पेक्षा लिहिण्या/वाचण्यावर जास्त मेहनत घ्यावी लागणार.
एकमेकांशी हिंदीत बोलणारी दोन मराठी माणसं हा अतिशय तिडीक आणणारा विषय आहे.+१

एकमेकांशी हिंदीत बोलणारी दोन मराठी माणसं हा अतिशय तिडीक आणणारा विषय आहे.+१>>>>>..+१. कायम हिंदीतून /इंग्रजीतून बोलायचं हेच फार भूषणावह वाटतं त्यांना. बरेचसे महाविद्यालयीन विद्यार्थी/विध्यार्थिनी पण कायम हिंदी/इंग्रजीतूनच बोलतात. आणि मराठीतून बोलले तर त्यात ७५% इंग्रजी शब्द. Sad

मामा, तुम्ही सांगितलेलं उदाहरण हे सर्रासच चित्र आहे सध्या.

नंदिनी, भाषांविषयीच्या उदासीनतेबद्दल अगदी सहमत.

गूगल ट्रान्स्लेटरवर इंग्रजी-मराठी शब्द देणे >>>

हे मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करते. Happy माझं अत्यंत आवडतं काम आहे हे. (आतापर्यंत तिथे किमान २००-३०० शब्दांना प्रतिशब्द देऊन आले असेन.)

हो मी देखिल गूगल भाषांतरवर जात असतो.

मधेच विसरायला होते पण बरं झालं आता परत आठवण झाली.

ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी दुवा (अर्थात यासाठी आपले गुगल खाते असणे आवश्यक आहे)

https://translate.google.com/community

g.co/translate/community

Pages