प्राचिन कथा आणि शोषणाचे स्पष्टीकरण

Submitted by अतुल ठाकुर on 7 March, 2016 - 08:29

1970_13.jpg

मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागाने अलिकडेच आयोजित केलेल्या दोन दिवसाच्या सेमिनारमध्ये कथा, त्यांच्या निरनिराळ्या आवृत्त्या, त्यात कालानुरुप होत गेलेले बदल (Transmission of stories: Versions and Variations) हा विषय होता. सुरुवातीपासुनच ज्या विद्वानांनी पेपर्स वाचले त्यांचा दृष्टीकोण लक्षात येऊ लागला होता. मात्र मला संस्कृत संशोधन परंपरेचा अनुभव नसल्याने मी ऐकत राहिलो. खुप काही ओळखीचे वाटत होते. सेमिनारचा समारोप करताना डांगे मॅडमचे भाषण झाले आणि त्यात समस्यापूर्ती झाली. आम्ही समाजशास्त्रात शिकलेल्या "स्ट्रक्चरल फंक्शनलिझम" चा उहापोह आपल्या भाषणात डांगे मॅडमनी केला. समाजशास्त्रातील हा एक अतिशय महत्त्वाचा सिद्धान्त. सुरुवातीपासुन शेवटपर्यंत कुठेनाकुठेतरी याचा उल्लेख होत गेलेला. डांगे मॅडमनी आपल्या भाषणात या सिद्धान्ताशी संबंधित विद्वानांचाही उल्लेख केला होता. त्यात मॅलिनोवस्कि, इमाईल डुरकाईम, हर्बर्ट स्पेन्सर, लेवी स्ट्राऊस हे सारे होते. समाजाला एखाद्या शरीराप्रमाणे मानुन त्यावर भाष्य करणारा हा सिद्धान्त म्हणतो कि शरीराचे अवयव ज्याप्रमाणे एकमेकांशी सुसंवाद साधुन वागत असतात त्याचप्रमाणे समाजातील निरनिराळ्या संस्था काम करतात आणि समाजात शिस्त आणि सुसंवाद राखण्यासाठी या संस्थांचा उदय, अस्त होतो. तद्वतच शरीरातील निरनिराळ्या संस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था एकमेकांना पूरक अशी कार्ये करत असतात त्याचप्रमाणे समाजातील संस्थादेखिल एकमेकांशी पूरक असतात आणि त्यामुळे समाजात स्ठैर्य राहते. स्ट्रक्चरल फंक्शनलिझमचं हे अगदी ढोबळ स्पष्टीकरण आहे. मात्र त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले.

समाजशास्त्रातील या अतिशय महत्वाच्या सिद्धान्तावर प्रचंड टिकाही झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे, काय असतं याचं उत्तर देऊन हा सिद्धान्त थांबतो. फार तर हे कशामुळे आहे येथपर्यंत याची धाव असते. समाजशास्त्राचे जे अभ्यासक समाजातील शोषण लक्षात घेऊन त्यावर भाष्य करु इच्छितात, त्यात बदल घडवु इच्छितात त्यांच्यासाठि हा सिद्धान्त मदत करीत नाही. त्यामुळे या सिद्धान्ताची भलावण करणार्‍यांवर आरोप असा केला जातो कि समाजातील शोषण करणार्‍या संस्था, समजुती, परंपरा "जैसे थे" ठेवण्यात ही माणसे हातभार लावतात. "स्टेटस को" राखणार्‍या या सिद्धान्तावर त्यामुळे समाजशास्त्रात टिका झाली तर नवल नाही. मात्र संस्कृत जगतात हा सिद्धान्त जर सर्रास वापरला जात असेल तर त्याचे धागेदोरे फार लांबवर जाऊ शकतात. मुळातच टेक्स्चुअल अ‍ॅनालिसिस करताना सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणं अपेक्षित आहे का? हा प्रश्न मला पडला. तेथिल विद्वानांना हा प्रश्न विचारल्यावर मला तीन तर्‍हेची उत्तरे मिळाली. एक म्हणजे दोन्ही करता येतं, फक्त अ‍ॅनालिसिस किंवा भाष्य देखिल, कसंही हे पहिलं उत्तर. दुसरं उत्तर भाष्य करणं अपेक्षित आहे. आणि तिसरं उत्तर भाष्य करु शकता. या उत्तरांमुळे माझा गोंधळ वाढला. आणि डांगे बाईंच्या भाषणात या प्रश्नाचे उत्तर नव्हते. माझे असे मत झाले कि डांगे बाईंना कदाचित त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणे अपेक्षित नसावे. किंवा संस्कृत स्कॉलर्सच्या कक्षेत ते येत नसावं. मला मात्र याचं स्पष्ट उत्तर एकदा संस्कृत विद्वानांकडुन मिळवण्याची इच्छा आहे. कारण त्यामुळे पुढची वाट स्पष्ट होईल.

आणखि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्यांचे मत प्राचिन भारतात तंत्रज्ञान, विज्ञान परिपूर्ण झाले होते असे आहे, तो भारताचा सुवर्णकाळ होता असे आहे किंवा आजच्यापेक्षा कितीतरी पुढारलेले असे पूर्वीचे जग होते असे आहे त्यांच्यासाठी "स्ट्रक्चरल फंक्शनलिझम" हा सर्वात सोयिस्कर सिद्धान्त आहे असे मला वाटते. या मुळे जे काही पूर्वी होते ते सारे समाजधारणेसाठी योग्यच होते. त्यात अन्याय्य अशी व्यवस्था नव्हतीच हे आपोआपच सिद्ध होते. दुसरे म्हणजे याही पुढे जाऊन त्याला विज्ञानाचे नियम लावुन काही जण अनेक चालिरितींना वैज्ञानिक आधार देखिल शोधतात. या सार्‍या बाबींमध्ये "पॉवर" ही समाजात कशी काम करत असते. शोषण हे कशा तर्‍हेने होत असते, एखाद्या गटाला नेस्तनाबुत कसे केले जाते, त्याला आपले विचार स्विकारायला भाग कसे पाडले जाते आणि ते ही इतक्या सूक्ष्मपणे कि जणु त्या गटाला आपले होणारे शोषण देखिल नैसर्गिकच वाटावे या सर्व गोष्टी विसरल्या जातात. यालाच ग्रामशीने "हेजेमनी" म्हटले आहे. मात्र मुळात संस्कृत संशोधनात हे सारे मांडणे अपेक्षित आहे काय याबद्दल मला फारशी माहिती नाही त्यामुळे यावर मला काहीही भाष्य करता येत नाही. सेमिनारमध्ये जे पेपर वाचले गेले त्यात डॉ. चिन्मयी देवधरांचा पेपर या दृष्टीने मला महत्त्वाचा वाटला. वेदातील इंद्र या देवतेच्या संदर्भात कालानुरुप घडत गेलेल्या बदलांना त्यांनी आढावा घेतला होता. युद्धाशी संबंधीत, अतिशय शूर असे वर्णन वेदात असलेल्या या देवतेबद्दल पुढे कामी, कुणीही तप केल्यावर आपली गादी जाईल म्हणुन घाबरणारा अशा तर्‍हेच्या कथा प्रसुत झाल्या. याबद्दल त्यांनी सामाजिक अंगाने मत मांडले होते.

समाजात आर्यांना स्थैर्य आले नव्हते. युद्धे सुरु होती. स्थानिक लोकांना पराभूत करावे लागत होते. भूमी संपादन करावी लागत होती. तोपर्यंत युद्धाचे प्रतिक अशा अतिशय शूर अशा इंद्राची आवश्यकता होती. पुढे शत्रु पराभुत झाला. जमिनी मिळाल्या. शेती सुरु झाली, स्थलांतरण थांबले. जिवनाला स्थैर्य आले. यानंतर युद्धाची फारशी अशी आवश्यकता उरली नाही. त्यामुळे युद्धसंबंधी असलेला महत्त्वाचा प्रमुख देव इंद्र मागे पडला. त्याचे महत्त्व पूर्वीसारखे उरले नाही. हा विचार मला मोलाचा वाटला. यादृष्टीने मला प्रा.शकुंतला गावडे यांचाही पेपर महत्त्वाचा वाटला. फेमिनिस्ट सकट निरनिराळ्या दृष्टीकोणातुन रामायणातील शूर्पणखेच्या कथेचा मागोवा घेताना त्यांनी प्राचिन भारतातील पुरुषसत्ताक पद्धती हा शब्द न वापरता बरेच काही त्या अंगाने सूचित केले. मात्र मर्यादा पुरुषोत्तम रामाने एखाद्या स्त्रीला मुळात कुरुप समजणं, तिला स्पष्टपणे नकार देऊन मोकळं होण्यापेक्षा आधी रघुकुलातील सूर्यवंशी, महाप्रतापि अशा दोघा भावांनी तिची थट्टा करुन त्याचा आनंद घेणं, त्यानंतर थट्टा अंगाशी आल्यावर तिचे नाक, कान कापुन तिला कुरुप करणं यावर शकुंतला गावडे यांनी सूचना केली असली तरी स्पष्ट भाष्य नव्हते. वाल्मिकी रामायण काय किंवा नंतर आलेल्या अध्यात्म रामायण किंवा भावार्थ रामायण काय, या सार्‍यांमध्ये मर्यादापुरुषोत्तम रामाने केलेली थट्टा सगळीकडे सारखिच आहे. शिक्षाही सारखिच आहे. फक्त पुढे त्यात नाक, कानासकट शूर्पणखेचे स्तनसुद्धा कापल्याच्या वाढीव शिक्षेचे उल्लेख आहेत. स्वच्छंदी स्त्री पाहिल्यास अवयव विच्छेदनाची शिक्षा द्यावी असा उल्लेख असलेली एखादी स्मृती तपासायला हवी असे वाटते कारण शिक्षेची पद्धत अगदी सगळीकडे सारखिच आहे. बाकी शूर्पणखेला जीवनदान मिळाले, ती फक्त नाक कानावर सुटली असा सूर लावणारे धन्यच म्हणायला हवेत. स्त्रीसाठी अवयव विच्छेदन करुन जगत राहण्याची शिक्षा कदाचित मृत्युपेक्षाही भयंकर असेल. 'ढोल गवाँर सूद्र पसु नारी। सकल ताड़ना के अधिकारी' म्हणणार्‍या तुलसीदासांकडुन या कथेच्या बाबतीत फार वेगळी अपेक्षा ठेवता येत नाही.

रामायणातील शबरीवर पेपर सादर करणार्‍या विद्वानांनी "पॉवर" विषय सूचित तर केला पण स्पष्ट भाष्य करण्याचे टाळले. त्यावरुन बहुधा संस्कृत संशोधन परंपरेमध्ये याची आवश्यकता किंवा अपेक्षा नसावी असे मला वाटले. वास्तविक मातंग समाजातील शबरीला क्षत्रिय कुळातील राम जवळ करतो ही घटना उल्लेखनीयच आहे. त्यातही या कथेला "पोल्युशन आणि प्युरीटी" चा ही पदर आहे कारण तिने आणलेली बोरे, आधी चाखुन पाहिली होती असा काही कथांमध्ये उल्लेख आहे. रामाला भगवंताचा अवतार मानले तर "देवासमोर कुठलेही भेदभाव नाहीत. देवाला सर्व सारखेच" ही भक्तीमार्गाची भूमिका समोर येते. मात्र जिला रामाने स्विकारले त्या शबरीला नंतर सर्व समाज स्विकारेल का या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर देता येत नाही. कारण देवासमोर सर्व सारखेच असले तरी व्यवहारात ही समानता येते काय हा प्रश्न तसाच शिल्लक राहतो. मात्र स्ट्रक्चरल फंक्शनालिझम समोर ठेवला तर बहुतेक पेपर्स त्याच अंगाने जाणारे होते असे माझे मत आहे. काही पेपर्स माहिती म्हणुन सुरेख होते मात्र सेमिनारच्या विषयाशी फटकुन होते असे म्हणावे लागेल. तर काही पेपर्समध्ये कथावाचनाची लांबण जास्त होती असे वाटले. या सर्व पेपर्समध्ये कथेच्या लेखकाची सामाजिक, राजकिय भूमिका ओळखुन त्या अंगाने त्याने कथेत केलेला बदल कुणी फारसा मांडला नाही हे मात्र जाणवले. प्राचीन लेखकांबद्दल कदाचित हे अवघड असेल पण अलिकडल्या लेखकांच्या बाबतीत हे करता आले असते असे माझे मत आहे. ययातीच्या कथेत तर हे फारच जाणवले. हा पेपर सादर करणार्‍या बाईंनी वि.स. खांडेकरांच्या ज्ञानपीठ विजेत्या "ययाती" कादंबरीचा आधार घेतला होता मात्र भाऊसाहेबांनी आपल्या कुठल्या राककिय आणि सामाजिक तत्त्वज्ञानावर या कादंबरीची उभारणी केली होती आणि त्यामुळे या कथेत त्यांनी कसे व का बदल केले याचा धांडोळा घेतला नाही. गुरुवर्य नरहर कुरुंदकरांनी यावर अतिशय मूलभूत व सविस्तर विवेचन आपल्या लेखात केले आहे.

आपल्या 'ययाती" या लेखात कुरुंदकरांनी भाऊसाहेब खांडेकरांचे मन हे समाजवादाने प्रभावित झालेल्या एका गांधीवाद्याचे मन आहे या कळीच्या मुद्द्यावर बोट ठेऊन ययातीबद्दल विवेचन केले आहे. ययाती ही कादंबरी खांडेकरांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी कादंबरी आहे असे ते म्हणतात. त्याच कचाचे पात्र हे गांधीवादाने प्रभावित असलेले समाजवादी विचारसरणीचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. मला कथेवर घडणारे संस्करण आणि कालानुरुप निरनिराळ्या लेखकांनी कथेमध्ये केलेल्या बदलाचे कारण शोधण्याचा हा मार्ग अतिशय महत्त्वाचा वाटतो. हा मार्ग चोखाळण्याचा कुणी फारसा प्रयत्न केलेला दिसला नाही.

एका संस्कृत सेमिनारमुळे असे अनेक प्रश्न मनात उमटले ज्यांचा उहापोह वर केला आहे. मात्र हे प्रश्न एका संस्कृतचा अभ्यास करणार्‍या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याचे आहेत हे जर लक्षात घेतले तर संस्कृतच्या विद्वानांना माझ्या मांडणीतील त्रुटी जाणवतील आणि त्या ते दूर करु शकतील असा मला विश्वास वाटतो. कारण एक विद्यार्थी म्हणुन मनात आलेल्या गोष्टी मी जरी वर मांडल्या असल्या तरी संस्कृतचे प्राथमिक ज्ञानही मला नाही याची मला नम्र जाणीव आहे आणि त्यामुळे मी केलेल्या धारिष्ट्याबद्दल ही ऋषितुल्य मंडळी मला क्षमा करतील अशी आशा आहे. मला पडलेले प्रश्न हे प्रामाणिक आहेत त्यामुळे त्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे. अशी उत्तरे मिळवतच माझा संस्कृतचा प्रवास सुरु राहणार आहे असे मला वाटते. लेख संपवताना माझी वर्गमैत्रिण कोमल हिने केलेल्या किर्तनाचा उल्लेख आवर्जुन करावासा वाटतो. अतिशय आखिव, रेखिव, नेटका, बंदिस्त आणि देखणा नाट्यप्रयोग पाहावा असा हा अनुभव होता. तिचा आवाज, तिने केलेला पेहराव, तिचे दिसणे, गाणे सारेच विलोभनीय. पेटीवर दुसरी मैत्रिण अदिती होती आणि तबल्याच्या साथीला आणि एक सहकारी. कार्यक्रम सुरेख रंगला. कसलाही फापटपसारा नसलेला हा किर्तनाचा कार्यक्रम मला एखाद्या अतिशय रेखिव नेटकेपणाने सादर केलेल्या पेपरप्रमाणे वाटला आणि काही पेपर्स हे किर्तन केल्याप्रमाणे पाल्हाळीक वाटले. या संपुर्ण सेमिनारसाठी संस्कृत विभागात निरनिराळे कार्यक्रम ठेवणार्‍या विभागप्रमुख डॉ. माधवी नरसाळे यांचे मला येथे खुप खुप आभार मानावेसे वाटतात. मोडी लिपिच्या तज्ञांपासुन ते शबरीवर बोलणार्‍या विद्वानांपर्यंत अनेकांना त्या विद्यार्थ्यांसमोर आणतात. माझ्यासारख्या सतत झोळी घेऊन हिंडणार्‍याला काय घेऊ आणि काय नको असं होऊन जातं.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शकुंतला गावडे यांचा निबंध मलाही आवडला.
मला असं वाटतं की एक तर भूतकाळातल्या साहित्याचा अभ्यास त्या काळाशी समरस होऊन केला जात असणार. त्यामुळे कळत नकळत त्या काळाबद्दल, व्यवहारांबद्दल पुन्हा कळतनकळतच किंचित सहानुभूती आणि काही ठिकाणी मूल्यप्रेमही निर्माण होत असणार. शिवाय कोणते बदल झाले हेच फक्त मांडायचं होतं; का, कसं याचं स्पष्टीकरण अपेक्षित नव्हतं असं काही प्रश्नोत्तरांवरून वाटलं. छद्दंतकथेतले बदल फार तपशीलवारपणाने नोंदले होते. पण असे असे बदल झाले हेच सांगितलं गेलं. आजच्या परिप्रेक्ष्यात (सोपा शब्द सुचवा बुवा.) हे बदल तपासणं हे उद्दिष्टच नव्हतं बहुधा.
आपला लेख आवडला.

>>>> समाजाला एखाद्या शरीराप्रमाणे मानुन त्यावर भाष्य करणारा हा सिद्धान्त म्हणतो कि शरीराचे अवयव ज्याप्रमाणे एकमेकांशी सुसंवाद साधुन वागत असतात <<<<<
पुरुषसुक्त अजुन वेगळे काय सांगते ?

निरनिराळ्या जुन्या पुराणातील कथांचा आधार घेऊन शोषित व शोषणकर्ते असे विभाजन केले जाते, ते एक गोष्ट विसरतात की या कथा कसलीही लपवाछपवी न करता, समर्थन वा विरोध न करता मांडलेल्या आहे, वाचकाने आपापल्या अकलेप्रमाणे बोध घ्यावा... घेतातही.

छान लिहीलंय. शेवटच्या परिच्छेदात तुम्ही मांडलेल्या शंका विचारप्रवर्तक आहेत. इथे उत्तरं मिळतील अशी आशा करतो.

निरनिराळ्या जुन्या पुराणातील कथांचा आधार घेऊन शोषित व शोषणकर्ते असे विभाजन केले जाते, ते एक गोष्ट विसरतात की या कथा कसलीही लपवाछपवी न करता, समर्थन वा विरोध न करता मांडलेल्या आहे, वाचकाने आपापल्या अकलेप्रमाणे बोध घ्यावा... घेतातही.
-*-*-
या सिद्धान्ताची भलावण करणार्‍यांवर आरोप असा केला जातो कि समाजातील शोषण करणार्‍या संस्था, समजुती, परंपरा "जैसे थे" ठेवण्यात ही माणसे हातभार लावतात. = माझे फेस्बुकवरील गटगकर मीत्र.
-*-*-
ज्यांचे मत प्राचिन भारतात तंत्रज्ञान, विज्ञान परिपूर्ण झाले होते असे आहे, तो भारताचा सुवर्णकाळ होता असे आहे किंवा आजच्यापेक्षा कितीतरी पुढारलेले असे पूर्वीचे जग होते असे आहे त्यांच्यासाठी "स्ट्रक्चरल फंक्शनलिझम" हा सर्वात सोयिस्कर सिद्धान्त आहे असे मला वाटते. या मुळे जे काही पूर्वी होते ते सारे समाजधारणेसाठी योग्यच होते. त्यात अन्याय्य अशी व्यवस्था नव्हतीच हे आपोआपच सिद्ध होते. दुसरे म्हणजे याही पुढे जाऊन त्याला विज्ञानाचे नियम लावुन काही जण अनेक चालिरितींना वैज्ञानिक आधार देखिल शोधतात. या सार्‍या बाबींमध्ये "पॉवर" ही समाजात कशी काम करत असते. शोषण हे कशा तर्‍हेने होत असते, एखाद्या गटाला नेस्तनाबुत कसे केले जाते, त्याला आपले विचार स्विकारायला भाग कसे पाडले जाते आणि ते ही इतक्या सूक्ष्मपणे कि जणु त्या गटाला आपले होणारे शोषण देखिल नैसर्गिकच वाटावे या सर्व गोष्टी विसरल्या जातात.

-*-*-

हा बोल्ड आहे तो या लेखाचा गिद्दू आहे. Wink

इथून पुढे सुकाणू हरवला.

या लेखामध्ये अनेक तर्कांच्या अनेक धाग्यांची टोके आहेत. ही टोके पकडून खूप दूरवर आणि खोलवर जाता येण्यासारखे आहे. एका इंद्रकथेच्या परिवर्तनातून आर्यांचे आक्रमण झाले की इंटर-मिंग्लिंग झाले इथपासून हराप्पाचा काळ कोणता, आर्य-आगमनाचा काळ कोणता, वैदिक काळ कोणता असे अनेक उपप्रश्न उद्भवू शकतात. कथेची पार्श्वभूमी सांगायची असेल तर हे सर्व उल्लेख येणे अपरिहार्य आहे. त्या काळची समाजस्थिती, जी या साहित्यातून दिसते, तीही मांडणे आवश्यक आहे. यातून जो निष्कर्ष निघेल, तो त्या काळची समाजलक्षणे समजून मान्य करता यावा खरे तर. पण जर तो आजच्या मूल्यांशी सुसंगत नसेल, तर निदान त्या काळी अश्या प्रथा होत्या, ठीक आहे त्या काळी भौतिक प्रगती नव्हती, भौतिक गोष्टीत आपण प्रिमिटिव होतो असे खुल्या दिलाने मान्य करणे एका मतप्रवाहाला जड जाते. एके काळी सगळे जगच प्रिमिटिव होते आणि त्या त्या प्रदेशांतले बहुतांश लोक ते मान्यही करतात. तीनचार हजार वर्षांच्या काळात जगण्याची सर्व अंगे, सर्व संदर्भ बदलतात. हा बदल जगण्याच्या सोयीनुसार सर्वत्र घडलेला आहे म्हणूनच ती प्रगती आहे; हे सरळ मान्य केले की मग संभ्रमाला,अवगुंठणाला जागा उरत नाही.

पुरुषसुक्त अजुन वेगळे काय सांगते ?

लिंबुजी, खरं तर मायबोलीवर या वादात पडु नये असं मला वाटतं म्हणुन मी जास्त लिहित नाही. पुरुषसूक्ताची भूमिका वेगळी आहे असे माझे मत आहे. समाजशास्त्राच्या सिद्धान्तात 'ग्रेडेड हायरार्कि' नाही.

समाजातील संस्था एकमेकांशी संलग्न राहून स्थापनेमागील हेतूंचे कार्य करीत असतात ही तर सर्वसामान्यांनी स्वीकारलेली एक रचना आहे. यामुळे समाजात स्थैर्य राहत असेल वा राहते असे समाजशास्त्री म्हणत असतील तर हजारो वर्षापासून शक्तीच्या बळावर एकमेकावर कुरघोडी करून युद्धाद्वारे याच समाजावर आपला अंमल दाखल करण्यामागील कारणे काय असतील हे इतिहासतज्ज्ञ सांगत असतात. समाजाच्या जडणघडणीत चढउतार अपरिहार्य आहेत आणि वेळोवेळी ते आपल्याला दिसत असतात, हे सेमिनारमध्ये आपले पेपर्स सादर केलेल्यांनीदेखील सांगितले असेलच. "प्राचीन भारतात तंत्रज्ञान, विज्ञान परिपूर्ण झाले होते असे आहे, तो भारताचा सुवर्णकाळ होता असे आहे किंवा आजच्यापेक्षा कितीतरी पुढारलेले असे पूर्वीचे जग होते असे आहे" हा एक विचार या लेखात अतुल ठाकुर यानी मांडला आहे. मला वाटते ही समजूत सर्वमान्य अशीच आहे. सामाजिक स्थिती संदर्भात जेव्हा तुलनेचा काटा समोर येतो त्यावेळी सहजपणे आपल्या मुखातून जातेच "पूर्वीच्या काळी किती भरभराट होती आपल्या इथे. सोन्याचा धूर निघत असे...विमान होते...देवदेवता नेहमीच भारतभूमीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे रामायण महाभारत घडले....." वगैरे. बरे वाटते असले चित्र नजरेसमोर आणायला. पण पूर्वीचे जे काही होते ते सारे समाजधारणेसाठी आणि जनकल्याण विकासासाठी योग्यच होते. "सबब त्यात अन्याय्य अशी व्यवस्था नव्हतीच हे आपोआपच सिद्ध होते", हे विधान किंचित धाडसाचे वाटते अतुल. समाज म्हटला की त्यात डावेउजवे, लहानथोर, उच्चनीच अशा स्थिती येतातच, त्याला नाईलाज आहे. खोलवर जाण्याची गरज नाही इतका हा विषय ठसठशीत आहे शिवाय मूळ मुद्यापासून दूर खेचणारा असल्याने त्याबाबत इतकेच म्हणावे लागेल की ज्या समाजात न्याय आहे असे आपण म्हणतो तिथेच अन्याय असणे ओघानेच येते. हे कुणी घडवून आणत नाही, ती समाजप्रक्रियेचाच दुसरा भाग असतो. समाजातील दुबळे म्हटले जाणारे अनेक गट आहेत आणि त्यांचे शोषण होत होते, आजही होताना दिसते. आज निदान त्या विरोधात आवाज तरी उठविला जातो; पण सुवर्णकाळाच्या युगात अशा शोषितांना ते भाग्य नव्हते....तुम्ही म्हणता तसे जणु त्या गटाला आपले होणारे शोषण देखील नैसर्गिकच.

सेमिनारमध्ये झालेल्या वा मांडलेल्या अनेक विषयांबाबत खूप उहापोह करता येईल असे दिसत्ये आहे. मुद्दे आले म्हणजे त्यावर मते आलीच....आणि ही मते कधीच सर्वानुमते मान्य होत नाही. समाजशास्त्राचा हा एक नियमच आहे. मंथन होत राहते विविध कलम आणि उपकलमांवर. प्रश्न आहेत तर उत्तरेही आहेत. पण ती कधीच एकमुखाने मान्य होणे हे समाज जीवनात घडत नाही. तरीही तुम्ही मांडलेल्या अनेक प्रश्नांचा या क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ निश्चित करतील याचा मला विश्वास आहे.

अतुलजींनी विषय स्पष्ट करावा असे वाटते. त्यांनी अर्क काढून त्यावरच्या शंका समोर ठेवल्या आहेत. त्यामुळे लेख स्केप्टीक वाटण्याची शक्यता आहे. (हल्ली स्केप्टीक या शब्दाला महत्व आले असल्याने तो वापरला).

"प्राचीन भारतात तंत्रज्ञान, विज्ञान परिपूर्ण झाले होते असे आहे, तो भारताचा सुवर्णकाळ होता असे आहे किंवा आजच्यापेक्षा कितीतरी पुढारलेले असे पूर्वीचे जग होते असे आहे" हा एक विचार या लेखात अतुल ठाकुर यानी मांडला आहे>>

नाही हो अशोककाका.
हा विचार सर्वमान्य असला तरी चुकीचा आहे असा विचार मांडला आहे अतुल यांनी.

<<सबब त्यात अन्याय्य अशी व्यवस्था नव्हतीच हे आपोआपच सिद्ध होते", हे विधान किंचित धाडसाचे वाटते अतुल. >>
अशोककाका, हे अतुल यांनी सार्कॅस्टीकली लिहलेय. किंवा लोक असे समजतात पण ते चुकीचे आहे असे त्यांना म्हणायचेय.

कथेच्या कालानुरुप बदललेल्या आवृत्यांवर भाष्य करताना त्यात बदललेले राजकिय, सामाजिक, आर्थिक , धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भ आणले तरीही, "पॉवर" कुठे आणि कशी काम करते, त्यामुळे या कथेची निरनिराळी स्पष्टीकरणे कशी दिली जातात यावर जर काहीच सांगीतले जात नसेल तर बाकी स्पष्टीकरणाचा नक्की उपयोग काय? कथेत बदल घडण्यासाठी नक्की कुठल्या गोष्टी कारणीभूत झाल्या, त्यामुळे कुणाचे हितसंबंध राखले जात आहेत हे देखिल त्यात यायला हवं असं मला वाटतं. मुळात आधी सर्व संदर्भांपर्यंतच मंडळी फारशी पोहोचली नाहीत. फक्त कुठले बदल घडले हेच बहुतेक जण मांडत बसले.

असं काही नाही हो. मुळात कथेच्या निरनिराळ्या आवृत्त्या निरनिराळ्या काळात का आल्या याचे स्पष्टीकरण करताना काय काय अपेक्षित आहे हे कुणीतरी संस्कृत संशोधकाने सांगायला हवं.

मला निव्वळ टेक्स्चुअल अ‍ॅनालिसिस हे निष्फळ वाटतं. कंपायलेशन इतकंच त्याचं महत्व. दहा ग्रंथ तपासावेत आणि त्यातुन बदल हुडकुन लिहुन काढावेत. बरेच जण हेच करतात.

अर्थात माझं मत हे सर्वांना पटेलच असं नाही.

साती....धन्यवाद. मी ते विधान अनेक तज्ज्ञांनी तसेच प्राचीन भारताचा इतिहास लिहिणार्‍यांनी वेळोवेळी मांडले आहे, त्या अनुषंगाने सकारात्मक लिहिले....तसेच हा सिद्धांत अतुल ठाकुरही मान्य करतील. अन्य ठिकाणी त्यानी आपल्या लेखनात सरकॅझमचा वापर केला असेल तर ते वाचन ओघात माझ्याकडून हुकले हे निर्विवादपणे मी मान्य करतो.

हे राम-कृष्ण वैगरे खरोखरच होऊन गेलेत का? गेले असतिल तर त्यांचा उल्लेख फक्त संस्कृत साहित्यातच का?
इतर कुठल्या भाषेत का नाही? उदा-पाली भाषेत
सम्राट अशोकाचा काळ जसा त्यांच्या शिलालेखात वैगरे लिहिला आहे जो अजुनही उत्खनना मधे सापडतो आहे तसे रामायन महाभारत का नाही?

बौद्ध काळतिल बौद्धाचे वचन वाणी पाली भाषेतिल त्रिपिटक मधे संकलित आहे जी आपल्या पडौसी देशात पण जतन करुन ठेवली गेली आहे तसे रामायन महाभारत का नाही?

पांडव लेण्यां म्हणुन जे सांगितल्या जातात ते तर सगळे बौद्ध कालिन स्तुप आणि विहारे आहेत भले पांडवलेण्या म्हणत असतिल.

आजकालच्या शोधनिबंधांचे स्वरूप निव्वळ कम्पाय्लेशन इतकेच असते असे वेळोवेळी दिसते. एक तर हे सेमिनारमध्ये वाचले जाणारे शोधनिबंध बहुतेक तरुण विद्यार्थ्यांकडून आलेले असतात. त्यांना मिळालेला वाचनसंशोधनासाठीचा कालावधी त्यांच्या तरुण वयामुळे फारसा मोठा नसतो.अयुश्यभर एकाच विषयात कामकरनार्‍या ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि वयोवृद्धांची मते त्यांच्या उत्तरायुष्यात बरेच वेळा बदललेली दिसतात ती यामुळेच. दुसरे म्हणजे अनेकांची अशी भूमिका असते की 'इति ह आस'-असे असे होते- हेच सांगावे. आणि तरुण निबंधकर्त्यांनी जर निष्कर्ष काढले आणि ते तपोवृद्ध पूर्वसूरींच्या विरुद्ध गेले तर सभेत कालवा होतो, भरपूर उलटसुलट प्रश्न विचारले जातात. मग डिफेन्स अवघड जातो.
म्हणून तरुण निबंधकर्ते या सगळ्याला बगल देतात. एक उदाहरण घ्या (प्रतिसाद लांबणार, पण..)-घट, मंगलकलश हे एक पवित्र प्रतीक आहे, ते सुफलनाचे प्रतीक आहे, हे आज जवळजवळ सर्वमान्य आहे. पण जर एखाद्याने असे मांडले की केवळ पाण्याची गरज पुरी करणे हाच या प्रथेचा आद्य हेतू होता, स्त्री-पुरुष एकरूपत्व हे त्यावर आरोपिले गेले आहे तर किती गहजब होईल. कल्पना करा, लग्नाची वरात लांबवरून थकूनभागून येतेय अथवा सैन्य एखाद्या युद्धासाठी निघतेय अथवा परत येतेय तर त्यातली माणसे किती तहानलेली असतील. मग डोक्यावर घडे घेऊन बायका (अर्थात सुवासिनी-कारण लहान पाचसातवर्षांच्या बालिकांना घडे पेलवणार नाहीत आणि विधवा तर वर्ज्यच) सामोर्‍या याव्यात हे किती सहज आहे. आणि रीत अशी की पुरुष युद्धावर जातात किंवा अन्य काही महत्त्वाची कामे करतात. 'पनियाभरन को' शेकडो वर्षे बायकाच तर जातात. पुढे सांगायचे म्हणजे संकल्प करून पूजाकार्य आरंभले की मध्ये उठता येत नाही. तेव्हा कार्य सुरू होण्याआधीच अठरा (त्या काळच्या भल्यामोठ्या) पळ्या पाणी केशवाय नमः माधवाय नम; करीत पिऊन घ्यावे. (साधाणतः एका ग्लासमध्ये पाण्याचे मध्यम असे बारा-चौदा घोट होतात.) आजूबाजूला स्वच्छ कलश नेहमी पाण्याने भरून ठेवावे. बोहोल्यावर घड्यांची उतरंड रचावी. करवल्यांनी म्हणजे कर्‍हेवाल्यांनी- घडे धारण करणार्‍यांनी खूपसे पाणी नवरदेवाच्या किंवा नवरीच्या बरोबर बाळगावे, कारण पूर्वी दूरदूरच्या गावांना पायी जावे लागे. अशावेळी पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून. नारळ हा सुद्धा पाणीयुक्त असतो. नारळाइतके पाणी इतर कोणत्याही फळात नसेल. शिवाय ते दीर्घकाळ टिकते, नासत नाही. असो. तर असा निव्वळ उपयुक्ततावाद कोणी मांडला तर तो डिफेंड करताना ऋषितुल्य अशा किती मान्यवरांना दुखवावे लागेल, किती त्रेधातिरपीट उडेल, नकोच ते.
हा प्रतिसाद म्हणजे निव्वळ कम्पाय्लेशनच करण्याच्या कृतीचे समर्थन नाही. निबंधकर्त्याची अगतिकता (आणि चातुर्यही ) दाखवायचे होते.

सकुरा, रामायण-महाभारताचे कथानक वेगवेगळ्या रूपात अनेक देशांत, अनेक भाषांतून आढळते. ते घडले की नाही हा वाद सोडून दिला तरी काव्य-कथा म्हणून ते आग्नेय आशियाच्या संज्ञाप्रवाहात झिरपले आहे.
बौद्ध धर्माला भारतात उतरती कळा लागल्यानंतर बौद्ध स्तूप/लेणी नित्य वापरात राहिली नाहीत आणि तिथल्याच स्थानिकांनी बदललेल्या प्रथांनुसार तिथे उपासना सुरू केली. 'बळकावण्या'चा प्रकार त्या काळात कदाचित घडला नसेल. आज मात्र घडू शकतो, घडतो. एक तर आज जमिनीला आलेली किंमत आणि दुसरे म्हणजे पूजास्थानांची वाढते उत्पन्न. असो . हा वाद वाढवू नये ही विनंती.

सकुरा,

रामजन्माबाबत मध्यंतरी रामायणाचा काल शोधनाचे संशोधन होउन रामायणाचा काल ( सुमारे ७००० वर्षे ) पुर्व एका शास्त्रीय संशोधन करणारी संस्था ( दिल्ली स्थित ) याने शोधुन जाहिर केल्याचे वर्तमान पत्रात आले होते.

http://www.riseforindia.com/i-serve-research-on-indian-history-and-vedas/

असेच संशोधन पुण्याचा एका एम बी बी एस डॉक्टर साहेबांनी केले आहे. त्यांचे नाव तथाकथीत पुरोगामी मंडळींनी इतके बदनाम केले आहे की त्यांच्या केवळ नावाने बाफ वहातो. त्यांचे म्हणणे इतकेच होते की वाल्मिकी रामायणात रामाची जन्मकुंडली आहे. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा जेव्हडा युनीक तितकीच कुंडली सुध्दा युनीक असते. ही जन्मकुंडली कोणत्या सालातली आहे हे गणिताने समजते कारण त्यातले ग्रहयोग रिपीट होत नाहीत. पुण्यातल्या डॉक्टर साहेबांनी दिल्लीतल्या संस्थेने रामायणाचा काल शोधन करण्यापुर्वीच आपल्या पुस्तकात हा काळ शोधुन छापुन त्याला अनेक वर्षे लोटली आहेत. सुदैवाने दिल्लीच्या संस्थेचे संशोधन आणि डॉक्टर साहेबांनी केलेले संशोधन जुळते आहे.

सबब राम नावाची व्यक्ती अस्तित्वात होती की काल्पनिक हा वादच नाही.

आता तुमचा प्रश्न.७००० वर्षांपुर्वी फक्त किंवा मुळ रामायण ( वाल्मिकी रामायण ) लिहले गेले त्या काळात संस्क्रुत शिवाय अन्य भाषा अस्तित्वात/ प्रचलीत नसणार ह्यामुळे हे घडले असावे.

संस्कृत विभागातल्या सेमिनारमध्ये कुठल्या भाषेतले शोधनिबंध मुख्यत्वे अपेक्षित असतात?

बाबासाहेबांची कम्युनिस्टांबद्दलची मतं कुठली पटत नाहीत हे सांगितलं की कळवतो.
माझा प्रश्न अतुल ठाकूर यांचेसाठी आहे. त्यांना शंका असेल तर पुढचे..

जाऊ द्या.
लेख पुन्हा वाचा. संस्कृत विभागाने आयोजित केला होता सेमिनार. त्याचा विषय समाजशास्त्र असा होता. प्रतिसादात त्या पुढे गाडी गेलेली आहे ( शोधनिबंध कसे सादर होता इत्यादी इत्यादी ) बाकी तुमची मर्जी !

अतुलजी,

आपंण प्रांजळपणे हे लिहले आहे या बद्दल आपले आभार. ( ते खाली बोल्ड केले आहे )

महाराष्ट्रात एक विचारधारा अशी आहे की तत्कालीन समाजव्यवस्था यांचे आकलन न करता काही गृहीतके मांडुन पुराणातल्या / प्राचीन कथातल्या व्यक्तीरेखांचे माध्यमातुन मुळनिवासी आणि बाहेरुन आलेले आर्य असा भेद केला जातो. कम्युनिष्टांचा आवडता शब्द प्रयोग म्हणजे " शोषण ". मग प्रत्येक प्राचिन कथेला त्या कम्युनिष्टी भिंगातुन पाहुन त्यातला " शोषण " हा भाग शोधुन समाजातल्या एका विभागावर बिंबवला जातो.

कर्णाला कसे वर्ण विद्वेशाला सामोरे जावे लागले, एकलव्याला कसे त्याच्या शक्तिंपासुन वंचित करण्यात आले इत्यादी. हे सर्व सांगताना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर "गृह, अर्थ आणि रेव्हेनु या महत्वाच्या खात्याचे महाराष्ट्राचे कॅबीनेट मंत्री असुन मुख्यमंत्री पदापासुन अनेक वर्षे वंचीत असलेले सुशीलकुमार शिंदे यांना हेच सर्व भोगावे लागले का ? याचे उत्तर कोणी शोधत नाही. कारण या उदाहरणात ते राजकारण आहे.

अतुल साहेब,

असे लेख लिहायला हरकत नाही. पण सोबत जर आपण अनेक लेखकांनी या विषयावर केलेल मराठीतले किंवा अन्य भाषातले संशोधन पुर्ण लेखन वाचले तर आपले लेखन समृध्द होईल. देवदत्त पटनाईक तर या प्राचिन कथांना प्रश्नपत्रीका म्हणतात. याची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

एका संस्कृत सेमिनारमुळे असे अनेक प्रश्न मनात उमटले ज्यांचा उहापोह वर केला आहे. मात्र हे प्रश्न एका संस्कृतचा अभ्यास करणार्‍या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याचे आहेत हे जर लक्षात घेतले तर संस्कृतच्या विद्वानांना माझ्या मांडणीतील त्रुटी जाणवतील आणि त्या ते दूर करु शकतील असा मला विश्वास वाटतो. कारण एक विद्यार्थी म्हणुन मनात आलेल्या गोष्टी मी जरी वर मांडल्या असल्या तरी संस्कृतचे प्राथमिक ज्ञानही मला नाही याची मला नम्र जाणीव आहे आणि त्यामुळे मी केलेल्या धारिष्ट्याबद्दल ही ऋषितुल्य मंडळी मला क्षमा करतील अशी आशा आहे. मला पडलेले प्रश्न हे प्रामाणिक आहेत त्यामुळे त्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे.

कपोचे, सेमिनार मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने आयोजित केला होता. त्याचा विषय 'Transmission of Stories: Versions and Variations' असा होता. 'समाजशास्त्र' हा नव्हता. बहुतेक निबंध इंग्लिशमध्ये वाचले गेले. एक हिंदीत होता. संस्कृताशिवाय अन्य अनेक भाषांतून संदर्भ घेतले गेले होते. उदा. पाली, जैन प्राकृत, गुजराती, मराठी, तमीळ्, कन्नडा, इंग्लिश, तोखारिअन, उइग्युर, चिनी (आणि मला वाटते सिंहलीसुद्धा?) वगैरे. या धाग्यात शोधनिबंध कसे सादर होतात यावर गाडी गेली कारण श्री अतुल ठाकुर यांनी पुष्कळसे शोधनिबंध हे कम्पाय्लेशन च्या पातळीवर होते, त्यात अ‍ॅनॅलिसिस फारसे नव्हते अशा साधारण अर्थाचे विधान केले, जे खरेच होते. अशा तर्‍हेने निव्वळ कम्पायलेशन का होते, यावर मी थोडेबहुत लिहिले. म्हणून या माझ्या एका प्रतिसादापुरती गाडी तिकडे वळली. पण घसरली मात्र नाही हे नोंदवीत आहे.

संस्कृताशिवाय अन्य अनेक भाषांतून संदर्भ घेतले गेले होते. उदा. पाली, जैन प्राकृत, गुजराती, मराठी, तमीळ्, कन्नडा, इंग्लिश, तोखारिअन, उइग्युर, चिनी (आणि मला वाटते सिंहलीसुद्धा?) वगैरे.>>>>

हिरा धन्यवाद. साती यांना उत्तर मिळाले असेल. तुम्ही पण होता का तिथे ?

Pages