महिलादिन - शोषण नावाची समस्या

Submitted by बेफ़िकीर on 7 March, 2016 - 02:43

महिलादिनानिमित्त समाजात विविध पातळ्यांवर होणार्‍या महिलांच्या शोषणापैकी हे काही सत्यप्रकार! पहिल्या चार व्यक्तिरेखांना मी स्वतः पाहिलेले आहे. पाचव्या प्रकारातील वकील स्त्रीला भेटलेलो आहे पण शोषित मुलींना नाही.

प्यारी - बंगाली सधन कुटुंबातील प्यारी ही दोन बहिणींपैकी मोठी बहिण आहे. आता ती थर्ड इयरला असेल. हा प्रसंग घडला साधारण दोन वर्षांपूर्वी. वडील बर्‍यापैकी पदावर कामाला आहेत. आर्थिक स्थिती उत्तम आहे. आई भरतनाट्यमचे क्लासेस घेते. लहान बहिण आणि प्यारी दोघीही आईकडून नृत्य शिकतात पण सध्य सगळे लक्ष शिक्षणावरच केंद्रीत आहे. दोन्ही मुलींसमोर वडील आईबरोबर चाळे करण्याचा प्रकार अनेकदा घडलेला होता. सुरुवातीला हसण्यावारी नेणे, मग लक्षच नाही असे दाखवणे आणि नंतर चौघे एकत्र असतील असा प्रसंगच टाळणे असे प्रकार करून झाले. पण वडिलांचे वागणे विचित्रच. एकदा प्यारी आईशी भांडली. प्यारीची आई दोन्ही मुलींच्या पोषाखाच्या बाबतीत अत्यंत दक्षता घेत असे. 'आम्ही मित्रवर्तुळात बावळटासारख्या दिसतो' ह्यावरून दोन्ही मुली आईशी अनेकदा वाद घालत असत. पण ह्यावेळी झालेले भांडण फक्त प्यारी आणि आईमध्ये झाले. हे भांडण जरा वेगळेच होते. प्यारीने घरात शॉर्ट्स घातली म्हणून आईने तिला झापले आणि अंग झाकून घेणारे कपडे घालायची जबरदस्ती केली. ह्यावर मात्र प्यारी भडकली आणि तिने भांडण केले. आईने तिला पुरुषांच्या दृष्टीबद्दल कितीही उदाहरणे देऊनही 'घरात काय प्रॉब्लेम आहे' ह्यावर आईला काही बोलता येत नव्हते. शेवटी हिय्या करून आईने प्यारीला सांगितले. तुझे वडीलच तुझ्याकडे तसे पाहतात. ते मला आणि तुला नक्कीच नको आहे. मुळापासून हादरलेली प्यारी त्यानंतर वडिलांच्या वार्‍याला उभी राहीनाशी झाली. एका समूपदेशक बाईकडून प्यारीच्या आईसमोर तिच्याबाबतीत घडलेला हा किस्सा ऐकताना चक्रावून गेलो होतो. त्याहीपुढचे जे आईने प्यारीला आजतागायत सांगितले नाही ते हे की प्यारीच्या वडिलांनी प्यारीच्या आईला प्यारीला 'त्या' गोष्टीसाठी 'प्रिपेअर' करायला सुचवलेले होते.

सरिता - अतिशय गरीब घरची पण सद्वर्तनी आणि सुशिक्षित अशी मुलगी! १९९३ साली मी भोसरीत एका कंपनीत कामाला असताना तिथे ही टायपिस्ट होती. मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तेव्हा स्त्रियांना फार तर हेच काम मिळू शकत असे. त्यामुळे ती एकटीच होती. लंचटाईमला ड्राफ्ट्समन, एक्साईज ऑफिसर आणि प्रॉडक्शनचा मॅनेजर ह्यांच्याबरोबर जेवायला बसायची. प्रॉडक्शनचा मॅनेजर सरदारजी होता आणि खणखणीतपणे वागणारा माणूस होता. त्याच्यासमोर ड्राफ्ट्समन आणि एक्साईजवाला काही बोलू शकायचे नाहीत. मी सेल्समध्ये जॉईन झाल्यावर मीही त्यांच्याबरोबर डबा खाऊ लागलो. नंतर जाणवले. प्रॉडक्शनचा मॅनेजर नसेल तेव्हा ड्राफ्ट्समन आणि एक्साईजवाला मुद्दाम कोणत्यातरी स्त्रीचा विषय काढून तिच्या अंगप्रत्यंगांचं किळसवाण्या भाषेत वर्णन करायचे. सरिता तेवढा काळ 'कान' नावाचा अवयव नसल्याप्रमाणे खाली मान घालून डबा खायची. हे माझ्यासमोर प्रथम घडले तेव्हा मी हबकलोच होतो. साहजिकच माझी नजर सरिताकडे वळली तेव्हा लक्षात आले की ती प्रसंग टाळणे अशक्य असल्यामुळे दुर्लक्ष करत आहे. ह्या दोघांचे हास्यविनोद चालूच होते. मी तातडीने विषय बदलला. एकंदर ग्रूपमध्ये माझी पोझिशन तुलनेने वरची असल्यामुळे विषय बदलला जाणे स्वीकारावे लागले. पण हे आणखीन एकदोनदा झाल्यानंतर एकदा सरिताच्या डोळ्यात पाणी आलेले पाहिले. हे तिला डायरेक्टर साहेबांना का सांगावेसे वाटले नाही माहीत नाही. मी तिला सुचवले की तू एकटीच डबा खात जा. त्यावर ती म्हणाली की तसे करून पाहिलेले होते. पण ह्या दोघांनी त्रास द्यायला सुरुवात केली. खोट्या तक्रारी वगैरे! सुदैवाने लवकरच दोन मुलींची भरती झाली आणि तिघी वेगळ्या बसून डबा खाऊ लागल्या. त्यानंतर सरिताला मोठी नोकरीही मिळाली.

अनिता - खरे तर मॉडेलिंगमध्ये जायच्या इच्छेमुळे भरकटलेली मुलगी! धड शिक्षण नाही धड नोकरी करण्याची प्रवृत्ती नाही. जराशी आढ्यतेखोरच! पण मागे एकदा नोकरी केलेली होती तेव्हाचा तिचा अनुभव! एक मध्यमवयीन साहेब तिला दिवसभर नुसतेच आपल्या केबीनमध्ये बसवून ठेवायचा आणि कामातील व कामाबाहेरील प्रत्येक विषयावर नुसताच गप्पा मारत राहायचा. आपल्याला पगार नेमका कसला मिळतो हाच प्रश्न अनिताला पडत असे. शेवटी त्याच्या त्या वागण्याचा वैताग आला आणि तिने नोकरी सोडली. मॉडेलिंगमधील अनुभव आणखी निराळेच! एक म्हातारा भेटला आणि म्हणाला मी पोर्टफोलिओ तयार करतो. तुला त्यातून नक्की यश मिळेल. पण माझ्याबरोबर माझ्या घरीच ड्रिंक्स वगैरे घ्यायला पाहिजेत. मगच मी अश्या गोष्टी करतो. तिने तोंडावर त्याच्या वयाची आणि अटींची खिल्ली उडवली आणि तेथून बाहेर पडली. व्यावसायिकदृष्ट्या पूर्ण अपयशी असलेल्या अनिताला हे असले अनुभव मात्र येत राहिले.

गरिमा - उच्चपदस्थ असलेली गरिमा ऑफीसमधील मूर्थीला कायम त्रास देत असे. नंतर तिने आणखी मोठी नोकरी घेतली तेव्हा मूर्थीने सुटकेचा श्वास घेतला. दर सुट्टीच्या दिवशी त्याला बोलावणे, ऑफीसमधून कोणत्याही ऑफिशियल कामाल केव्हाही बाहेर पाठवणे, त्यातच स्वतःची वैयक्तीक कामे सांगून तीही करवून घेणे, चारचौघांसमोर नियमीतपणे पाणउतारा करणे, लेट थांबायला लावणे, उशीरा घरी फोन करून कामावरून झापणे असे प्रकार ती सतत करत असे. तिचा हाच स्वभाव इतरांच्या बाबतीत दिसून येई पण अगदीच नगण्य प्रमाणात! मूर्थीला मात्र ती भरडून काढत असे. मूर्थी स्वभावाने व पोझिशननेही गरीब होता. घरी बरीच मोठी जबाबदारी एकट्यावरच असल्याने जॉबची त्याला अत्यंत गरज होती. सगळ्यांना समजत असे की मूर्थीची इतकी हॅरॅसमेन्ट पूर्ण अयोग्य आहे. हळूहळू स्टाफने मूर्थीला वाचवायला सुरुवात केली. मुळात सतत झापले जात असल्यामुळे मूर्थीच्याही चुका वाढल्या होत्या. त्या हळूहळू त्याने नियंत्रणात आणल्या. त्याने समूपदेशकाकडे जावे असे त्याला बाकीचे लोक म्हणत असत. मूर्थी नेहमीच कसनुसा हसून मान मोडेस्तोवर काम करत राही. सोडून जातानाही गरिमा मूर्थीबद्दल उगाचच वाईट बोलून गेली.

दोघीजणी - लोहगड उतरताना दोन मुलींची छेडछाड झाल्याचा प्रसंग दिड, दोन वर्षांपूर्वी झालेला आठवत असेल. ह्या मुलींना मातीवर झोपून त्यांच्या अंगावर चढून तिघाचौघांनी त्यांच्या शरीराशी नको ते प्रकार केलेले होते. पोलिस स्टेशनमध्ये पोचल्यानंतर ह्या मुलींना एक शब्दही बोलता येत नव्हता इतका त्यांच्यावर परिणाम झाला होता. एक मुलगी तर नुसतेच ओठ पिळवटून स्वतःच्याच नखांनी स्वतःच्याच ओठांची त्वचा सोलून काढण्याचा प्रयत्न करत होती इतकी घृणा तिच्या मनात निर्माण झाली होती. पण पोलिसांनी कामाची टाळाटाळ केली. पुण्यातील एका वकील स्त्रीपर्यंत हे पोचताच ती चवताळून उठली आणि तिने वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन करून तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. सुनावणीच्या दिवशी आरोपींना घेऊन पोलिस कोर्टात आले. दोन्ही मुलींपैकी एक मुलगीही तिथे फिरकली नाही. दोन तास वाट पाहून ही केस बाजूला ठेवण्याचे आदेश दिले गेले. आरोपी निर्लज्जपणे हसत वकील स्त्रीकडे पाहत होते.

(वरील नांवे काल्पनिक, सर्व सत्य घटना! लोहगडची घटना मात्र स्त्री वकिलाने जशी सांगितली तशी लिहिली आहे. त्यातील इतर खाचाखोचांचे ज्ञान मला नाही).

===========

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर आहे. ही शोषण नावाची समस्या नसुन मानसिकता नावाची समस्या आहे. या समस्यतुन इतक्यात सुटका होईल असे वाटत नाही. आपण आपले डोळे सदैव उघडे ठेऊन समाजात वावरावे, अजुन काय.

कठीणे..
आजकाल तरी बर्‍याच जणी (खरतर टक्केवारी वाढलीए अस म्हणायच आहे) निदान झाल्या प्रकाराबद्दल बोलतात तरी..पण त्यातही त्याबद्दल माहित असलेल्या कलिग्ज ने तिला सपोर्ट देण्याचे प्रकार फार कमी घडतात.. आणि मग ती एकटी राहते..जान्या येण्याच्या वेळा लक्षात ठेवून डूख धरुन बसणारे सुद्धा काही कमी नाही..

कालच मैत्रीणीने सांगितलेला किस्सा..

तिच घर जेथे आहे ती खुप सेफ कॉलनी समजल्या जाते..
घरासमोरुन काही अंतरावरुन हायवे आहे.. रहदारी सुद्धा असतेच बरीच.. काही दिवसांपूर्वी शेजारची मुलगी जेवण झाल्यावर पाय मोकळे करायचे म्हणून हायवेवर चालायला गेली तर समोरुन बाईकस्वार आले आणि जवळून फास्ट जात त्यांनी तिच्यावर वार केला.. ते एकदम जवळ आल्याने तीने हात वर घेतला म्हणुन मान वाचली.. हातावर उभा आणि खोल वार बसल्यामूळे बरच रक्त गेल. डॉक्टर म्हणाले नस कापल्या गेली आणि जखम आणखी खोल झाली असती तर खुप कठीण झाल असतं..
त्या मुलीवर कुणाचा डोळा होता का काहीही कल्पना नाही.. तिला बॉयफ्रेंड सुद्धा नाहीए..

दोन दिवसांनी परत त्याच गावात दुसर्‍या एरियामधे एका १४ वर्षीय मुलीवर असाच हल्ला झाला..

काय म्हणावं याला ? अंदाजच बांधू शकतोय आणि काहीही नाही.. लोक हादरुन गेले आहेत सगळे..
तो एक व्याक्ती असो कि वेगवेगळे आरोपी असो लवकरात लवकर पकडल्या जायला हवे..

माझे फेसबुकवरील मित्र यान्नी सान्गीत्ल्याप्रमाणे हा लेख वाचला. त्यान्नी इथे लेख छान आहे असे लिहायला सान्गीतले आहे. त्याबद्दल मी गटगकर या मित्राचे आभार मानतो. व हा लेख छान आहे.

भयानक आहे.....

अशा गरीमाचा मला अनुभव आहे..... आमच्या कडे ती पुरुषां पेक्षा बायकांना जास्त छळायची

सरीता, प्यारी, अनिता ..... अश्या खुप पाहिल्या आहेत. त्यातली एक प्यारी माझी क्लायेंट आहे. वरील प्यारी बाबत काही वाकडा प्रकार झाला नव्हता. आमच्या प्यारी ला तर वडिल व काका दोघांनाही "सहन" करावे लागले. ती आता लग्नच करत नाही. वडिल वारले. आई शी खुप भांडते. तिचा तिरस्कार करते.

सरिता च्या बाबतीत जे झालं ते तर माझ्या बाबतीत झालं आहे. एक काळ असा होता की मुली फारश्या सी.ए. करत नसत. १९९२ ला जेंव्हा मी सी. ए. करायला लागले तेंव्हा ऑडिट साठी फिरणार्‍या मुली ही एक वेगळी बाब होती. आमच्या फर्म मधे ही दोन तीन ऑडिट्स ही "लेडिज स्पेशल " होती. म्हणजे बाहेर गावी जाताना सीनीयर मॅडम आणि दोन तीन मुली, अशी टीम असायची. तिकडे जिथे ऑडिट ला जायचो तिकडे सगळा स्टाफ खुप चांगला होता.

एकदा एका नाशीकच्या ऑडिट च्या वेळेस अर्जंट कामा मुळे एका मुलाला परत यावे लागले. त्याच्या ठिकाणी सरांनी मला पाठवले. साधारण ५-६ दिवसांचा मामला होता. माझ्या ओळखिचे तिकडे अनेक असल्याने मी तयार झाले. तिकडे गेल्यावर वेगळाच अनुभव आला. एक तर सातपुर चा एकलकोंडा परिसर आणि त्यात फॅक्टरी मधले "पुरुषी" वातावरण!!!! तिथले मॅनेजर माझ्याशी फारच सलगीने वागत आहेत असे जाणवले. उगाचच हसणे, चहा ला बोलावणे, छोटी क्वेरी असली तरी स्वतः अटेंड करणे. हळुहळु माझ्या समोर त्यांनी चावट जोक मारणे सुरु केले. पहिले तर माझे ऑडिट बंधु ( बरोबर आर्टीकल्स्शीप करणारे सहाध्यायी) मला त्या मॅनेजर वरुन चिडवायचे.... निरुपद्रवी चिडवणे... मी पण लाईटली घेतले. पण नंतर जसा तो मॅनेजर लिमिट क्रॉस करायला लागला तेंव्हा मात्र आमच्या टीम मधल्या मोठ्या मुलां कडे मी तक्रार केली. मग मात्र सीनीयर मुलांनी मला हेतुपरस्पर त्याच्या पासुन लांब ठेवले. मला प्रोटेक्ट करायला लागले. मॅनेजर ने बोलावलं की कोणी इतर जात किंवा मला सोबत करत. एकदा तर सीनीयर ने सरळ त्यांना सुनावले"लडकीयोंके सामने ऐसी बाते मत करीये सर "...... तो मॅनेजर जाम पिसाळला होता. येवढ्या फॅक्टरीचा मॅनेजर पण अगदी वेड्यासारखा रीअ‍ॅक्शन देत होता.

काही लोकांना हे फ्लर्टींग वाटते. काही मुली पण हे सोडुन देतात.... पण वेळच्या वेळी थांबवले नाही तर मात्र अ‍ॅक्शन घ्यावीच लागते.

वरील सगळ्या गोष्टीं मधे एक गोष्ट कॉमन आहे...... जसे कपडे, मोबाईल तशीच स्त्री.... फक्त एक भोगाची वस्तु...

गरीमा ही स्त्री असली तरी ह्याच व्रुत्तीची शिकार......आपल्या हाती आलेल्या ला सोडायचे नाही........

मी काही अनुभव देत आहे, काही माझे आणि काही माझ्या मैत्रिणीना, कलीग्जना आलेले.माहीती नाही कि हे अनुभव 'शोषण' या व्याख्येत मोड्तात का?
१) अनोळखी पुरुशानी ट्क लावुन पाह्णे,विनाकारण बोलण्याचा प्रयत्न करणे वगैरे, यात, वाचमन, रिक्शावाले (योग्य थिकाणी मिरर अड्जेस्ट करणारे), सिग्नल थाब्म्लयावर बाइक, कारवाले, कुठ्ल्याही सार्व्जनिक जागी भेट्णारे अनोळखी पुरुश, पुरुश्याचे वय २० ते७० ....

२)चालताना धक्के मारणे आणी मग चुकुन झाले असे भासवणे.रान्गेत/लिफ्ट उभे असता मुद्दामुन जवळ जवळ सरकणे,
३) आता हा अनुभव, जिथे मी काम करते तिथला, आम्हाला क्लायन्ट मीटिन्ग जावे लागते, तिथला हेड उगाच मिटिग्ज मध्ये डोकवाय्चा,नुसता येउन बसायचा,ट्क लावुन पहायचा,सुदैवाने तिकड्च्या co ordinator ला हे लक्शत आले, तिने मिटिग्जचा व्हेनुच बदलला. त्यानन्तर हेड्चे दिसणे, अचानक मिटिग्जला येणे बन्द झाले.
४) आता शिकत असतानाचा एक बेक्कार अनुभव, पुण्यात असताना गणपतीच्या दिवसात गणपती पाहण्यास काही मैत्रिणीबरोबर गेले होते, पण गर्दीचा फायदा घेउन माझ्या मैत्रिणीना इकडे तिकडे हात लावण्यात आले. तेव्हा पासुन आजतागायत गणपती पाहणे बन्द केले.