हाडांचे प्रार्थना स्थान म्हणजेच ऑशुअरी- नवीन

Submitted by रेव्यु on 4 March, 2016 - 07:36

माझा हा लेख २ वर्षांपूर्वी अनुभव मध्ये छापून आला होता.

हाडांचे प्रार्थनास्थान- द बोन चॅपल – कुत्ना होरा

बाहेरून दिसणारे चॅपलगेल्या मे महिन्याच्या सुट्टीत दर वर्षा प्रमाणे कुठल्या तरी अनोख्या वास्तूस भेट देण्याचे ठरवले होते . अनायसे यंदा पूर्व युरोपचा दौरा करायचे ठरवले होते. पूर्व युरोप खूपच ऐतिहासिक आणि ज्याला इंग्रजीत ओल्ड वर्ल्ड चार्म म्हणतात , तसे समृध्द आहे असे ऐकले होते. खरे अन अस्सल युरोप, तिथली संस्कृती, स्थापत्य अन चालीरिती पहायच्या असल्या तर पूर्व युरोप , विशेषत: बुडापेस्ट- हंगेरी, प्राग-झेक गणराज्य , सर्बिया, स्लोवाकिया अन त्या सभोवतालचा प्रदेश आवर्जून पहावा अशी जाणकार मंडळींकडून शिफारस देखील झाली होती.
हे सर्व ऐकून मग ठरवले की तिथे गेल्यावर देखील प्रचलित टूरिस्ट स्थळांसमवेत काही तरी आगळं वेगळं सुध्दा पहायला हवे अन मग शोधाशोध सुरू केली. गूगल बाबा, त्या देशातील पर्यटन विभागाची संकेत स्थळे यांची उलथापालथ केली. अन अचानक एका संकेत स्थळावरून नजर हटेना. झेक हंगेरीयन गणराज्याच्या प्राग या राजधानी पासून बसने अवघ्या तासाभराच्या अंतरावर एक ऐतिहासिक अन मध्ययुगिन खेडॆ असून ते एके काळी चांदीच्या खाणींसाठी सुप्रसिध्द होते, ते त्या काळात खूप समृध्द होते. त्या खेड्याचे नाव कुत्ना होरा. आजमितीस ते एक शांत अन पर्यटन व्यवसाय सोडल्यास. वीस हजाराच्या आसपास लोकवस्ती असलेले हे झोपाळू खेडे एके काळी गजबजलेले असायचे आणि युरोपातील व्यापारी येथे मोठ्या संख्येने भेट देवून स्वस्त दरात चांदीची खरेदी करीत असत. तेव्हाच्या अत्यंत श्रीमंत अशा या शहरातून शुध्द चांदीचा अव्याहत पुरवठा व्हायचा अन त्या काळातील बोहेमियन राजे तिथे वास्तव्यास असत. या शहरात इटालियन कोर्ट नावाचा राजवाडा होता. त्यास इटालियन कोर्ट हे नाव देण्याचे कारण म्हणजे खाणीतून चांदीचे उत्खनन करण्यात इटालियन कारागिर पटाईत होते अन ते मोठ्या संख्येने या शहरात येवून वसले होते. इथे चांदीची नाणी बनवण्याचा कारखाना होता. एवढे समृध्द शहर म्हटल्यावर तेवढ्याच तोर्यात मिरवणारे सेंट बार्बोराज चर्च देखील तिथे होते. तिथे तेव्हाचे वेन्चेस्लास ४था , या सारखे राजे प्रार्थनेस जात. तिथे खाणीतील मजूरही मोठ्या संख्येने जात. आणि ही सर्व माहिती वाचत असतांना आणखी एका विचित्र अन अनोख्या वास्तूची माहिती मिळाली. अन ती वास्तू म्हणजे- हाडाचे प्रार्थनाघर- द बोन चॅपेल. मी त्याची माहिती वाचली अन चाटच झालो.
या वास्तूस सेडलेक ऑशुअरी (ऑशुअरी म्हणजे मानवी हाडे शाश्वत रीत्या जतन करण्यासाठी बनवलेली इमारत , अथवा विहीर )या नावाने देखील ओळखले जाते अन ती तेथील पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण आहे. याला वर सांगितल्याप्रमाणे हाडांचे प्रार्थनाघर अथवा हाडांचे चर्च या नावाने संबोधले जाते. यात अंदाजे ४०००० लोकांची हाडे ठेवण्यात आहेत.
वरील विस्मयजनक माहिती वाचून तिथे नक्कीच भेट द्यायचे ठरवले अन १२ मे ला प्राग पाहून झाल्यावर सकाळी ८ च्या बसने मी अन माझ्या पत्नीसह कुत्ना होरास प्रयाण केले. बसमध्ये अनेक देशातील, अनेक भाषा बोलणारे अनेक पर्यटक होते. यात गंमत एवढीच होती की त्यातील अनेक जणांना हे हाडाचे चर्च पहायचे नव्हते कारण त्यांच्या मते हा एक भयावह अन विकृत प्रकार होता आणि म्हणून त्या ऐवजी त्यांना कुत्ना होरातील दुसरे चर्च अन तेथील चांदीच्या खाणीचे अवशेषच पहायचे होते, या शिवाय आणखी एक आकर्षण म्हणजे तेथील चर्चमध्ये बनवण्यात येणारी वाईन उत्कृष्ट दर्जाची असून ती दुपारी १२ ते २ च्या दरम्यान खूप स्वस्तात मिळते अशी ’ जाणकारांनी’ दिलेली माहिती देखील मी ’प्राश” केली ( अर्थात ही नेटवर कुठे दिसली नव्हती).
साधारण ९ पर्य़ंत आम्ही तिथे पोहोचलो अन आमच्या सहपर्यटकांनी दिलेली ’माहिती’ ध्यानात घेवून सेंट बार्बोराज चर्चला दुपारी १२ नंतर भेट देण्याचे ठरवले. आम्ही थेट बोन चर्चच्या दिशेने कूच केली अन द्वारापाशी उभ्या असलेल्या गाईड बाईंनी स्वागत केले. ही ऑशुअरी अथवा बोन चॅपेल म्हणजे एक लहानसे रोमन कॅथॉलिक प्रार्थनाघर असून ते एका सिमिट्री म्हणजे कबरस्थानाच्या खालच्या अंगास आहे. यात ४० ते ७०००० मानवी हाडांपासून बनवलेल्या ’कलाकृती’ असून त्या चॅपलची सजावट पूर्णपणे फक्त हाडांपासूनच केली आहे. हे सर्व ऐकत असतांना आश्चर्य, भय, किळस इत्यादी अनेक प्रकारच्या उद्गारांनी चॅपल गजबजले होते. मी अन ही तर दिङमूढ होवून हा सगळा प्रकार पाहत होतो. ही वास्तू पहातांना तळघरात २५ एक पायर्या उतरून जावे लागते. जिन्याच्या दोन्ही बाजूस मानवी शरीरातील असंख्य अवयवांची असंख्य हाडाच्या , अक्षरश: खचातून , कलात्मक पणे बनविलेली झुंबरे आहेत. आत येतांना आमच्या हातात एक माहिती पत्रक देण्यात आले होते . त्यातील मजकूराप्रमाणे इथे काय घडले त्याची माहिती अशी.
१४ व्या शतकांत ब्लॅक प्लेग नावाच्या साथीत मृत्युमुखी पडलेल्या हजारो प्रेतांना या दफनभूमीत दफनले गेले होते. या पूर्वी १३ व्या शतकात या दफनभूमीच्या बाजूसच असलेल्या सेल्डिक मोनॅस्ट्रीतील एक प्रचारक जेरुसलेमला गेला होता व त्याने परत येतांना तेथील पवित्र भूमीची माती आपल्या बरोबर आणली . परतल्यावर त्याने ती त्या दफनभूमीच्या जमिनीवर शिंपडली अन अशा प्रकारे कुत्ना होराच्या त्या दफनभूमीचे येशू ख्रिस्ताचा जेथे जन्म झाला त्या जेरुसलेमच्या पवित्र भूमीशी थेट नाते जुळले. संपूर्ण देशातील अन आजूबाजूच्या राजे, धनाढ्य़ लोकांची आपल्या आप्तस्वकीयांचे दफन करण्यासाठी अहमहमिका लागली. ते स्थळ म्रूत्यूनंतरच्या वास्तव्यासाठी त्यांची अगदी आवडीची जागा- प्राईम लोकेशन बनली. १७ व्या शतकात तीस प्रदीर्घ वर्षे चाललेल्या युध्दात बळी पडलेल्या राजघराण्यातील लब्ध प्रतिष्ठितांना पुरण्यास ही जागा कमी पडू लागली. १३व्या शतकात प्लेगमध्ये बळी गेलेल्या अन तिथे पुरण्यात आलेल्या सामान्य नागरिकांच्या थडग्यांची तिथे आधीच गर्दी झाली होती.अन त्या मुळे ती जुनी थडगी उकरण्यात आली अन ४० ते ७०००० लोकांची हाडे बाहेर आली. आता या थडग्यांचे काय करायचे हा प्रश्न भंडावू लागला. किंवदंता ही आहे की एका अर्धवट आंधळ्या ख्रिश्चन साधूस वेड लागले आणि त्याच सुमारास त्या थडग्यांतून हाडे उकरून काढून ती जमा करण्यास सुरुवात झाली होती. त्याने बाजूच्या प्रार्थनाघरात ती हाडे भूमितीय आकारात रचण्यास सुरुवात केली. त्या नंतर १८७० साली फ्रॅन्टिसेक रिंट नावाच्या एका लाकडी कोरीव काम करणार्या सुताराला हे कुणालाही नकोसे वाटणारे काम करण्यास नेमेले गेले व त्याने त्या हाडांपासून सजावट आणि शिल्पे बनवण्यास सुरुवात केली.
एव्हाना आम्ही त्या प्रार्थनाघरात प्रवेश केला होता. आजूबाजूस नजर टाकल्या बरोबरच एक अस्वस्थ करणारी शांतता अन दिसत असणार्या अप्रचलित कलाकुसरीच्या प्रशंसेची भावना यांचे संमिश्रण मनात दाटले होते. आत स्वत:वर लादून घेण्यात आलेली शांतता दडपण टाकत होती.फोटो फ्लॅशवर, हाडांवर परिणाम होवू नये म्हणून बंदी होती. आम्हाला आमच्याच हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्या अस्थींत कालाच्या ओघात विलीन झालेल्या, भूमीत विरघळलेया पण नियतीच्या फटक्याने पुन: अवतीर्ण झालेल्या त्या व्यक्ती दिसत होत्या, त्यांना आपला वापर करून कलाकृती निर्माण केल्या बद्दल वैषम्य व खेद नक्कीच असला पाहिजे अन म्हणून मी एका बघ्याची वा पर्यटकाची भूमिका निभावतांना ओशाळलो होतो. कालाच्या ओघात जे घडले होते ते मला एका झंझावातासारखे हादरून सोडत होते.

भिंतीवरील एक शिल्प.
चार कोपरे
हे वाचताना भिती , अस्वस्थ वाटते ना? पण प्रत्यक्षात या भावनांची जागा विस्मयाची भावना घेते.
भिंतीवर रचलेली हाडे.

कमानी आणि भिंतींवर हाडांच्या माळा आणि झुंबरे लटकत होती.अन प्रत्येक झुंबरात मानवी शरीरातील कमीत या शिवाय इथे आम्ही अशा काही कवट्या देखील पाहिल्या ज्यात शिरलेल्या बंदूकीच्या गोळ्यांची छिद्रे स्पष्ट दिसत होती.या सर्व विचित्र, काहीशा भयावह , सुन्न करणार्या वातावरणात २ ते ३ तास कसे गेले ते कळले नाही. बारा वाजत आले होते अन पुढच्या ’कामाला’ जायचे होते. तो अनुभव , या वेगळ्या अनुभवाहून निश्चितच सुखद असणार यात शंका नव्हती.
जाता जाता मी प्रवेशद्वाराशी असलेल्या तिथे काम करणार्या एका महिला मार्गदर्शिकेस विचारले, “ तुम्हाला इथे काम करतांना, प्रकाश कमी असतांना भिती वाटत नाही का?” अगदी बिन्दासपणे हातवारे करत ती उत्तरली, “ ही तर नुसतीच बिचारी हाडे आहेत अन ते मला कधीच इजा करणार नाहीत. मला इथे येणार्या सजीवांची अधिक भिती वाटते.”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट !!
मी या स्थळाचे फोटो बघितले होते, मला नाही इथे जायचा धीर होणार. भिती अशी नाही, किळस वाटेल.
तूम्ही पिकासावरुन लिंक दिल्या आहेत, तिथे प्रत्येक वेळी साईझ सिलेक्ट करा आणि हाईड अल्बम लिंक वर क्लीक करा,म्हणाजे फोटो मोठे दिसतील आणि अल्बमचे नाव दिसणार नाही.

बाप रे!
खुप छान माहिती दिलीत.
वाचताना काही वाटत नव्हते, हाडांनी सजवले तर त्यात हादरण्यासारखे /किळसवाणे काय एवढे.
पण फोटो पाहिल्यावर लक्षात आले, की अनेक लोक घाबरतील.
एवढा शोध करुन गेलात, ग्रेट!
मी ऐकले नव्हते या चर्चबद्दल. पूर्व युरोपात अजून गेलो नाही, पण गेल्यास नक्की पाहीन हे चर्च.

लेख आवडला.
पण ती कल्पना नाही आवडली.कोणे एकेकाळी 'ते' देखील आपापल्या आप्तांचे प्रियजन असतील.
जाउ दे.पण नवीन माहिती कळली.

हे पहिल्यांदाच वाचले.
मी जवळही नाही जाऊ शकणार त्या चर्चच्या. खुप विचित्र वाटल पाहुनच.

पण ते शेवटच वाक्य त्या बाईच आवडल.

अशा प्रकारच्या अनेक ऑश्युअरीज जगात पोलंड्,झेक(आणखी एक),पोर्तुगाल,इटली,पॅरिस,सर्बिया, आणि ........ अमेरिकेत सुध्दा आहेत.
http://weburbanist.com/2009/10/30/7-wonders-of-the-undead-world-global-o...

भयानक आणि विषण्ण करणारा प्रकार आहे.
माझा नक्कीच पास असेल अश्या जागांसाठी....

---
इथली एनर्जी कशी वाटली तुम्हाला?

अनोखी माहिती..
थोडे भयानक वाटले खरं फोटो बघताना..कारण फक्त सिनेमात अशा प्रकारची द्रुश्ये पाहिलीत (आणि ती खोटी असतात ना).