वो फिर नही आते !

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 March, 2016 - 22:57

जगाच्या पाठीवर कुठेही गेलोत तरी त्या त्या प्रहराला हृदयाला हात घालून गेलेल्या त्या त्या गोष्टी हमखास आठवतातच ! हा त्याची तिव्रता कमी अधिक प्रमाणात बदलू शकते हे अगदीच मान्य !

उदा - भर रणरणत्या दुपारी खिड़कीतून येणारी एखादी वार्याची थंडगार झुळूक सोलापुराच्या कंबरतलावाच्या सूर्यकिरणात चमकत्या पृष्ठभागाची आठवण करून देते.

एखादा पवित्र घन्टानाद कानी पडला की माहेर आणि त्याच्या शेजारच गणपतीच मन्दिर डोळ्यासमोर येत.

कातर संध्याकाळी पुण्यातल्या टेरेसवरून नाईलाजास्तव निरोप घेणारा...बघता बघता गायब होणारा सूर्याचा केशरट तांबडा गोळा आठवतो .

पहाट आणि पाऊस मात्र नाशिकच्याच आठवणी जाग्या करतो !

शाळेसाठी पाचचा गजर लावलेला असायचा मात्र तो कधीच व्हायचा नाही तो व्हायच्या आधिच बेडरुमच्या खिड़कीबाहेर भारद्वाजाची गुटगुटीत जोड़ी आपल ठरलेल काम न चुकता बजावायला हजर राही ! इतरवेळा सखरझोपेतुन उठायला अजिबात तयार नसलेली मी यांच्या दर्शनासाठी मात्र धडपडून उठून बसत असे !

आधिच उठून बसलेला तू... ही माझी उडणारी धांदल गालातल्या गालात हसून पहात असे कारण मी उठले आहे म्हणजे तुझी चहाची तल्लफ़ पूर्ण होण्याच चिन्ह ! नाहीतर तुझ्या दहा लाडिक हाकांना आणि तितक्याच प्रेमळ चाळ्याना न बधणारी मी !!

हो सकाळचा पहिला चहा तुला माझ्याच हातचा लागायचा त्यामुळे का होईना जगाच्या पाठीवर कुठेही कामानिमित्त गेल्यावर तुला माझी सकाळी सकाळी आठवण तर यायची !

तर ते एक असो !

आजही पहाटेची सुरवात अशीच झाली .....त्या आवाजाने धड़पडत उठले ...धावत पळत बाहेर आले...आवाजाच्या रोखाने पाहते तर एकच गुटगुटीत भारद्वाज समोरच्या गच्चीच्या लेंटलवर मान पुढेमागे करत आर्त हाका मारत येरझार्या घालत होता...त्याच पूर्ण लक्ष मात्र खाली होत.

मी ताडल की तो त्याच्या सोबत्याला बोलावत असणार ! आता माझीही नजर तितक्याच् व्याकुळतेने त्याचा शोध घ्यायला लागली...कंपोंडवोलवरून हळूच डोकावून पाहते तर....दुसरा भारद्वाज मस्तपैकी गवतातले कीड़े खाण्यात मशगूल....ह्याच्या हाकेकडे पूर्ण दुर्लक्ष करून !

आता पुढे काय ही उत्सुकता मला परतू देईना.... शेवटी लेंटलवरचा अस्वस्थ भारद्वाजच पायउतार झाला नि गवतात चालू लागला.

हम्म ! अशी यशस्वी माघार घेण्यातही केवढ सुख असत नै !

नाहीतर बरच काही सुटत जात काळाच्या ओघात हेच खर !!

कल तड़पना पड़े याद में जिनकी..

रोक लो.. रूठकर उनको जाने न दो !

बाद में प्यार के चाहे भेजो हजारो सलाम....वो फिर नही आते ...वो फिर नही आते !!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users