शब्दपुष्पांजली: मला भावलेले गोनिदां. माझ्या वडीलांच्या नजरेतुन

Submitted by मुग्धटली on 28 February, 2016 - 08:05

सर्वप्रथम मराठी भाषा दिवस या उपक्रमाअंतर्गत लेखन करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी सर्व संयोजकांचे आभार मानते. मराठी भाषा दिवस साजरा करताना संयोजक मंडळाकडुन शब्दपुष्पांजली या उपक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध लेखक श्री. गो. नि. दांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या संदर्भात लिखाण करण्याचे आवाहन मायबोलीकरांना केले. विषय वाचल्यावर मनाने आधी उचल खाल्ली पण नंतर एक पाउल मागे आल कारण त्यांची पुस्तकं खूप लहानपणी वाचलेली होती, त्यांना प्रत्यक्ष भेटले आहे ते ही अगदी लहान असताना त्यामुळे त्यांच्याविषयीच्या आठवणी माझ्याजवळ अशा नाहीतच. गड, किल्ले फिरण्याच म्हणाल तर तिथेही नन्नाचाच पाढा. पण माझे बाबा श्री. मुरलीधर वामन दांडेकर यांच्याकडुन ते जेव्हा त्यांच्या घरी शिकायला राहिले होते त्यावेळच्या त्यांच्या अनेक आठवणी ऐकल्या होत्या. या आठवणी प्रकाशित करण्याविषयी संयोजक मंडळाकडे विचारणा केल्यावर त्यांनी होकार दिला. बाबांकडुन त्यांना जेवढ्या आठवतील तेव्हढ्या आठवणी गोळा केल्या आणि त्याच तुमच्यासमोर मांडते. आठवणी बाबांच्या, शब्द माझे.

बाबा आणि आप्पा उर्फ गो. नो.दां ची पहिली भेट

१९५९ साली गो. नि. दां उर्फ आप्पा त्यांच्या काकांच्या घरी दापोलीजवळील गुडघे या गावी आले होते. त्यावेळी मी इयत्ता ८ वीची परिक्षा देउन दाभोळहुन मे महिन्याच्या सुट्टिसाठी म्हणुन घरी आलो होतो. आप्पांना गावात आणि आसपास फिरण्यासाठी कुणाच्यातरी सोबतीची आवश्यकता होती. माझ्या शाळेला सुट्टी असल्याने मी ही मोकळाच होतो. मग आम्ही गावाजवळील बालेपीर या डोंगरावर फिरायला गेलो. त्यावेळी गप्पा मारता मारता सहजच त्यांनी माझी चौकशी केली. काय करतोस? कुठे शिकतोस? कितवीत आहेस? वगैरे वगैरे, बोलता बोलता तु शिक्षणासाठी माझ्या घरी तळेगावला येशील का? अस विचारल आणि मी त्यांच्याबरोबर तळेगावला आलो. अशी झाली माझी आणि आप्पांची पहिली भेट.

त्यांच्याबरोबर फिरलेला पहिला किल्ला

१९६० साली माझी परीक्षा संपल्यावर आम्ही सर्वांनी १० दिवस सिंहगडावर मुक्कामाला जाव अस आप्पांनी ठरवल. त्याप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबिय म्हणजे आप्पा, त्यांच्या पत्नी सौ. निराकाकु व कन्या वीणा, शिवाय काही आप्त जसे की श्रीनिवास कुलकर्णी, मोहन वेल्हाळ आणि विख्यात भावगीत गायक बबनराव नावडीकर यांची बहीण प्रभा असे आम्ही सर्व सिंहगडावर मुक्कामासाठी म्हणुन गेलो. सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या बंगल्यात आम्हा सर्वांची मुक्कामाची सोय करण्यात आली होती. आम्ही गेल्यानंतर साधारण दोन्/तीन दिवसांनी लोकमान्य टिळकांचे नातु मा. जयंतराव टिळक आणि त्यांच्या पत्नी सौ, इंदुताई टिळक हे सुद्धा आम्हाला सामिल झाले. आमचे सिंहगडावरच्या वास्तव्याचे दहा दिवस अतिशय मजेत गेले.

तेव्हापासुन सुरु झालेली आप्पांबरोबरची दुर्गभ्रमंती

१९६१ साली मी आप्पा व प्रा, पद्मा नित्सुरे रायगडावर मुक्कामासाठी गेलो होतो. रायगड किल्ला बघता बघता आप्पांकडुन त्याबद्दल माहितीही होत होती. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात रायगडावरील प्रसिद्ध जागेचा, टकमक टोकाचा उल्लेख झाला. शिवाजीमहाराजांच्या राज्यात गंभीर गुन्ह्यासाठी सुनावल्या गेलेल्या कडेलोटाच्या शिक्षेची अंमलबजावणी या जागेवरुन व्हायची. त्यामुळे हि जागा नक्कीच खूप खोल असली पाहिजे हे लक्षात येत होत, पण ती जागा नक्की किती खोल आहे हे पहाण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसु देत नव्हती. शेवटी मी आप्पांना सांगितल की मला टकमक टोक किती खोल आहे ते बघायच आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला उपड (पालथ/पोटावर) झोपायला सांगितल आणि माझे पाय घट्ट धरुन ठेवले. मी हळुहळु पालीसारखा सरपटत गेलो आणि जोपर्यंत माझ्या मनाच समाधान झाल नाही तोपर्यंत आप्पा माझे पाय धरुन बसले होते.

मनात घर करुन राहीलेली, कधीही विसरता न येणारी आप्पांची एक आठवण

मी तळेगावच्या शाळेत असताना देवीची लस देण्यासाठी स्थानिक आरोग्यविभागातील कर्मचारी आले होते. त्यावेळी मला लस देताना त्यांच्याकडुन ती चुकीच्या ठिकाणी दिली गेली आणि त्याचा मला अतिशय त्रास झाला. मला होणारा त्रास बघुन आप्पा आणि त्यांच्या पत्नी सौ, निराकाकु हे दोघेही आळीपाळीने माझ्या जखमा फुलवातीने शेकत बसले. जवळपास तीन रात्र हे उभयता माझ्यावर घरगुती उपचार करत माझी शुश्रुषा करत होते. या घटेनेने खरतर मी भावनिक दृष्ट्या त्या उभयतांच्या जवळ गेलो.

१९५९ साली जेव्हा त्यांनी मला तळेगावला येण्याबद्दल विचारल तेव्हा खरतर माझ्या वडिलांची इच्छा नव्हती मला तळेगावला पाठवण्याची. पण आईने पुढाकार घेउन मला त्यांच्याबरोबर जाउ दिल. आता विचार करताना अस वाटत की त्यावेळी आईने पुढाकार घेउन तळेगावला येउ दिल नसत तर आप्पांबरोबर गड किल्ले पहाण्याच्या सुंदर आणि सुखद अनुभवाला मुकलो असतो. त्यांना गडकिल्ल्यांबद्दल असलेली माहीती, ते जतन व्हावे याविषयी असलेली आस्था हे सर्व त्यांच्या तोंडुन ऐकण हा एक वेगळाच अनुभव होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! या उपक्रमा च्या माध्यमातून गोनिदांचे असेही रूप पाहायला मिळालं , !!! खूप छान वाटलं!!

.

मस्तच. तुमच्या बाबांना गोनीदांचा एवढा बहुमोल सहवास लाभला. आणखी आठवणी वाचायला नक्कीच आवडतील.

चांगले लिहिले आहेस मुग्धे. दुर्गभ्रमणगाथेत राजा दांडेकर म्हणून उल्लेख येतो, तेच का वडील?
अजून वाचायला आवडेलच, सध्या वेळेअभावी शक्य नसेल तर पुन्हा कधीतरी नक्की.

मुग्धा कित्ती सुंदर, अजुन लिहीना. छान वाटलं वाचायला. तुझ्या बाबांना खरंच छान सहवास मिळाला. अजून वाचायला आवडेल.

लेख अजून थोडा मोठा हवा होता.
तुमच्या वडिलांना गोनीदांचा सहवास लाभला हे छानच!
+१

अरे वा....मुग्धटली समवेत गो.नी.दांडेकरांच्या संदर्भात मागे एकदा चर्चा झाली होती त्यावेळी तिचे त्यांच्यासमवेत असलेले हे नात मला फ़ार भावले होते. आज तिने आपल्या वडिलांच्या स्मरणी असलेले गोनीदा या संदर्भाने केलेले हे लिखाण वाचताना खूप समाधान झाले.

त्यांच्या हाताला झालेल्या त्रासाबाबत खुद्द गोनीदा रात्रभर त्यावर उपाय करत होते हे वाचून तर त्यांच्याबद्दलचा आदर आणखीन दुणावला.

मुग्धा, छान लिहिलंयस. शक्य असेल तर तुझ्या बाबांचं नाव लिहीता येईल का?

गुडघ्याच्या परिसराबद्दल थोडंसं, पडघवलीत आलेली वर्णने आणि गुडघं अगदी तसंच्या तसं सारखं आहे का, गोनीदांचं घरगुती व्यक्तिमत्त्व, त्यांच्या लेखन करतानाच्या काही सवयी असतील तर त्या, त्यांना भेटायला येणारी उंबरे-भिकुले ते मंगेशकर ह्या अफाट विस्तारातली माणसं, तुझ्या वडिलांना त्यांनी काही संथा दिली का, ते किती वर्षे त्यांच्यासोबत रहात होते, असं आणखी काही वाचायला मिळालं तर आनंद होईल.

दुर्गभ्रमणगाथेत राजा दांडेकर म्हणून उल्लेख येतो, तेच का वडील? >>>> नाही अमेय. माझ्या बाबांना अण्णा म्हणुन हाक मारतात सगळेजण.

गुडघ्याच्या परिसराबद्दल थोडंसं, पडघवलीत आलेली वर्णने आणि गुडघं अगदी तसंच्या तसं सारखं आहे का >>>> हो सईताई बर्‍यापैकी तेच वर्णन आहे.

Mugdha khup sundar lihilayes he. Ek gtg karuyat na. Tyat fakt tu bolashil. Mala anakhi aikayala avadel tyanchyabaddal. Lucky manas g hi.
Tuzya babanitaki shrimat kadhi honar mi?

व्वा...... वडील नशिबवान तुमचे, खरच. Happy
>>>>> १९६१ साली मी आप्पा व प्रा, पद्मा नित्सुरे रायगडावर मुक्कामासाठी गेलो होतो <<<<
यास पण अरे व्वा........ आमच्या कुलातील कोणीतरी गोनिदांच्या इतके जवळ होते.... Happy
तरीच १९८६/८७ चे सुमारास मी त्यांना तळेगावात भेटलो तेव्हा माझे आडनाव ऐकल्यावर त्यांनी कोण कुठले वगैरे विचारले होते. (त्यावेळेस माझी अशी अगत्याने विचारपुस करावी इतका वयानेही मोठा नव्हतो, कर्तुत्वाने तर नाहीच नाही, शिवाय दिसायलाही किरकोळ काडी पैलवान...... तेव्हा आश्चर्य वाटलेच होते, आता कारण कळले,
शिवाय पेशवाईच्या इंग्रजांविरुद्धच्या ऐन धामधुमीतील काळात तळेगाव पासुन पुढे जवळच असलेल्या लोहगड किल्ल्याचे किल्लेदार आमच्याच कुलातील... तेव्हा हे ठाऊक नव्हते, पुढे गोनिदांच्याच दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकातून पान ३४४/४५ वर संदर्भ मिळाला. Happy

बायदिवे, पूर्वीही माबोवर कुठेतरी लिहिलय, परत सांगतो, तर त्यावेळेस त्यांचेकडे गेलोच का होतो?
तर माझ्या आयुष्यात केवळ अन केवळ नशिबाने आलेल्या आयुष्यास वळण/दिशा देणार्‍या विविध संधी/प्रसंग यांचेतील एक बाब म्हणजे माझा तत्कालिन मित्र (नंतर चुलत सासरा झाला) विहिप ची कॅलेंडर घेऊन घरोघर विकण्यासाठी म्हणुन घेऊन आलेला, तर यांचेकडेही जावे म्हणून मला सहज सोबत म्हणून घेऊन गेलेला.... Happy
गोनिदां हे अतिशय साधे पण ऋषितुल्य व्यक्तिमत्व, त्यांचेबद्दल बरेच ऐकलेले, वाचलेले. पण प्रत्यक्ष समोर बघुनही मला फार काही "भारावल्यासारखे" वगैरे झाले नव्ह्ते अन मनाचे आतिल कोपर्‍यातील आदर उगाचच जिथे तिथे पाया पडत वा अन्य पद्धतीने व्यक्त करण्याचे तेव्हांचे दिवसही नव्हते. केवळ नजरेच्या कटाक्षातुनही आदर व्यक्त होऊ शकायचा, व समोरील आदरणीय व्यक्ति "तो कटाक्ष" नजरेतील भाव ओळखुही शकायच्या. हल्लीच्या पुढार्या मानकर्यांसारखे जिथे तिथे हारतुरे घेउन चेहर्यावर कमावलेले लाचार हास्य खेळवत कमरेत वाकायची गरज पडायची नाही. अन तसे केले असता, गोनिदां सारख्या व्यक्तिमत्वालाही ते खपले नसते हे निश्चित.
तेव्हा फक्त निघताना वाकून नमस्कार करुन बाहेर पडल्यावर मित्र म्हणाला, अरे तुला कळले का की आपण कोणाला भेटलो आत्ता?
मी उत्तरलो... "हो, गोनि दांडेकरच ना हे? "
मित्र.... तू ओळखतोस?
मी.... त्यांना कोण ओळखणार नाही? हां, चेहरा फारसा परिचित नव्हता पण ओळखले, व ते इथे तळेगावात रहातात हे माहित नव्हते...
मित्र.... अरे पण तुला काहिच वाटले नाही? येवढी मोठी व्यक्ति भेटली.... तू काहीच दर्शविले नाहीस त्यांचेसमोर....
मी..... आता यावर काय बोलू? तसे काही "उघड प्रदर्शनीय" दर्शवायची पद्धत नै रे आमच्यात.... (मित्र देशस्थ आणि मी व दांडेकर कोकणस्थ... Proud तेव्हा इतका फरक पडणारच ना व्यक्त होण्यात? Wink )
यावर मित्र अवाक..... अन बरेच काही झाला.... !

मुग्धे, छान लिहीलयस. अजूनही असतील त्यांच्याकडे खूप आठवणी. विचार आणि लिही ना. तुझे बाबा खरचं भाग्यवान! Happy

मुग्धा, छान लिहिलंयस. शक्य असेल तर तुझ्या बाबांचं नाव लिहीता येईल का? >>>> सईताईने सांगितल्याप्रमाणे बाबांच नाव प्रस्तावनेत घातल आहे.

मस्तच. तुमच्या बाबांना गोनीदांचा एवढा बहुमोल सहवास लाभला. आणखी आठवणी वाचायला नक्कीच आवडतील. >> +१

किती छान आठवणी! गोनीदांच्या बरोबर हिंडून गड किल्ले बघताना काय मजा आली असेल! ह्या आठवणी इथे लिहून काढल्याबद्दल अनेक आभार!

Pages