या विस्कटले जाण्याची सावरण्याला सर नाही

Submitted by सुप्रिया जाधव. on 27 February, 2016 - 01:52

जमिनी-पाण्याइतका ह्यांचा प्रश्न भयंकर नाही
पक्ष्याना अन वाऱ्याला सीमेचा अडसर नाही !

या अजस्त्र शहरामध्ये चौफेर वाढती वस्ती
कोणाच्या मनात कोणी बांधू शकले घर नाही

फोडून उकल करण्याची तू नकोस तसदी घेवू
'नाही' या शब्दामध्ये कुठले जोडाक्षर नाही

तू ऐकवलेल्या गझला मनभर आहेत विखुरल्या
या विस्कटले जाण्याची सावरण्याला सर नाही

विश्वासाच्या पायावर नात्याचे भविष्य ठरते
तो आहे तोवर असते, कोसळला तो तर.. नाही

अर्ध्यात विझवले थोटुक ही पक्की ग्वाही देते...
तो कैफ तुझ्या ओठांचा झुरक्यात खरेतर नाही !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users