औषधवाल्या शेख आजी!

Submitted by कृष्णा on 24 February, 2016 - 01:02

सध्या मायबोली वर डॉक्टरांविषयी चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे धागे सुरु आहेत! मी त्यात माझेही काही बरे वाईट अनुभव शेअर केलेत. पण हा मात्र अगदी शेख आजींचा आलेला दैवी अनुभव म्हणुन त्या साठी एक वेगळे लिखाण. अलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी युनानी अश्या अनेक विषयवार मंडळी अगदी जोशात भांडत असतात आपापले अनुभव मते मांडत असतात..

आमच्या औषध वाल्या शेख आजी!

नगर जिल्ह्यातील जामखेड येथे माझ्या जन्मापुर्वी वडील असताना माझी बहिण आजारी पडलेली. तेंव्हा गांव लहान गावात सुविधा नाही जास्त. डॉक्टर प्रयत्न करीत होते त्यात नागिण झाली कुणी तरी शेजार्‍यांनी गावात एक शेख म्हणून आहे. त्यांची लाकडाची वखार त्यांची पत्नी काही झाडपाल्याची औषधी देते म्हणून सांगितले. बहिणीचे वजन झपाट्याने कमी होऊ लगलेले त्यात त्या आजींकडे नेले. त्यांनी अक्षरश: मरणाच्या दारातुन ओढुन काढलेले माझ्या बहिणीला. त्या नंतर त्या आजींवर खुपच विश्वास निर्माण झालेला. त्या तर बहिणीला 'माझी मुलगी आहे ही हिला मी पुनर्जन्म दिलाय' म्हणायच्या. दरम्यान वडिलांच्या नोकरीतील बदल्यांमुळे आजींशी संपर्क तुटलेला जवळपास.
पुन्हा ८-१० वर्षांनी नगर मध्ये असतांना अचानक ह्या आजींचा पत्ता मिळाला. व छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आजींकडे जाणे सुरु झाले अगदी घरच्या सारखे असायचे कधी आई, मी आणि ही बहिण बरोबर असलो की अगं माझी लेक आली म्हणुन हिला जवळ घेऊन बसायच्या. जन्मजात स्त्रीच्या हृदयात मातृत्व असते आणि ते मातृत्व ह्या शेख आजींच्या नजरेत बोलण्यातुन अक्षरश: ओसंडत असायचे.

तर माझा अनुभव ह्या आजींचा.
नगरला सातवीत असताना डाव्या पायाच्या पिण्डरीला तव्याचा हलकासा चटका बसलेला पण दुर्लक्ष केले किरकोळ असेल तेंव्हा त्या काळात चटक्याला शाई लावणे असले प्रकार. पण जखम चिघळली सेप्टीक झाले २ सेमी लांब वर १/२ सेमी रुंद चटक्याने माझ्या लहानश्या पायावर ६ सेमि लांब आणि ४ सेमि रुंद एवढे रुप धारण केलेले फॅमिली डॉक्टरांकडे उपाचार सुरु होते जखम दिवसेंदिवस वाढत होती अत्यंत दुर्गंधी जी मला असह्य व्हायची. रोज ड्रेसिंग करुन बरी होईना. डॉक्टर म्हणाले गँगरीन झाले तर पाय कापावा लागेल ह्यात १ महिना तरी गेला असेल. तेंव्हा आईला अचानक आजींची आठवण आली आणि मला आजींकडे घेऊन गेली. आजींनी माझा पाय आणि लंगडणे पाहता क्षणी आईला विचारले. सगळे समजल्यावर भयंकर रागावले. माझ्यावर विश्वास नाही का वैगेरे तू डॉक्टर कडे नेलेच का? आणि नेले तर एवढे महिनाभर का वाट पहिलीस लवकर का नाही आणलेस. आई बिच्चारी केविलवाणी झाली.
आजीने त्या क्षणी मला जवळ घेतले आणि कुरवाळले त्या कुरवाळण्यातले ममत्व आत्मियता आजही आठवते. त्या दिवशी आजीने माझी जखम डेटॉलच्या पाण्याने धुवुन एक हिरवी पानांची भुकटी आणि एक गेरुसारखी लाल भुकटी टाकुन फ़डक्याने बांधली. नंतर रोज दुपारी आजी आमच्या घरी येऊन जखम धुणे त्यावर त्या पावडरी टाकणे आणि बांधने करीत होती विचार करा ज्या जखमेचा वास मला असह्य व्हायचा तीच जखम आजी अगदी आत्मियतेने धुत असायच्या. ३ दिवसांत जखम कोरडी पडली आठदिवसांत खपली धरु लागली. त्या ८-१० दिवसांत आजींनी जे काही केले ते केवळ एक आई आपल्या मुलासाठी करु शकते..
ह्या आजी औषधोपाण्याचे ५ पैसेही घेत नसत. जर काही औषधी आणायची असतील तरच बाहेरुन जडी बुटी आदी आयुर्वेदिक दुकानातुन आणायला सांगत शक्यतो स्वत: जवळचेच औषध देत. पण गुण ९९% आजीच्या हाताला. मला तर जेंव्हा मी घरी जायचो त्यांच्या माझ्या पायासाठी तेंव्हा बर्‍याच गमती जमती सांगायच्या. त्यांच्या यजमानांची लाकडाची वखार त्या मुळे सतत हातात लाकडाची धसकटे शिरायची ह्या आजीच त्यावर औषोधोपाय करीत.
आजींकडे ’रमझान इद' ला आम्हाला मुलांना विशेष निमंत्रण असायचे आजी आम्हाला जवळ बसुन शिरखुरमा आणि रोट खाऊ घालायच्या. ते खात असताना आमच्या चेहर्‍यावरचा आनंद तृप्तीने न्याहळायच्या. मी त्यांच्या घरी गेलो अधे मध्ये औषधासाठी किंवा आईचा काही निरोप घेऊन तर नेहमी २५ पैसे माझ्या हातात कोंबणार आणि जा जाताना बोरे घेऊन खा मस्त..

ह्या आजींची एक बहुगुणी तेल तयार केलेले जखम असो मुरगळलेले असो मुकामार असो त्यावर खुप उपयोगी. त्याची प्रोसेस आईला गुप्त औषधी म्हणून समजावलेली आणि "माझ्या आईने मला हे औषध सांगितले मी फ़क्त तुला सांगतेय हे तुझ्यपाशीच ठेव". असे बजावले देखिल;. एकदा घरी येऊन बनवून दाखविले. पुन्हा एक दोन वेळा आईने बनविले.
नंतर नगर सुटले आमचे आजींचा त्या नंतर एकदोनदा संपर्क झाला पुन्हा नाही पण आजी आजही स्मरणात आहेत. त्यांचा चेहरा मायेने ओथंबलेले डोळे आजही आठवतात.

अश्या ह्या औषधवाल्या शेख आजी! जिथे केवळ माया प्रेम विश्वास आणि माणुसकी ह्याशिवाय दुसरे काहीच नव्हते.
आजही पायावरच्या जखमेच्या व्रणाने आजींची आठवण कायम ठेवलिये....

आणि वाटते पॅथी कुठली आहे त्या पेक्षा ती वापरताना वृत्ती कुठली आहे आणि आपला त्यावर विश्वास किती आहे हे महत्वाचे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजी खरोखर प्रेमाने व मन[पासुन सेवा देतात असेच यातुन स्पष्ट होते , पण आजींचे हे ज्ञान , आजीबरोबरच निघुन जाईल की आणखी कोणाला तरी मिळून , सेवेचा हा वारसा पुढे चालू रहावा , असे होवू शकेल कां ? आजींकडून हे ज्ञान लिखित स्वरूपात कोणी आणू शकेल काय ?

छान अनुभव आहे.
शेवटी माणूस हा या निसर्गाचाच एक हिस्सा आहे म्हणून त्याला होणार्‍या सर्व आजारांचे उपचार या निसर्गातच दडलेले आहेत.

धन्यवाद श्री, जयंत शिंपी, सारिका, ऋन्मेSSष, तेजस,

पण आजींचे हे ज्ञान , आजीबरोबरच निघुन जाईल की आणखी कोणाला तरी मिळून , सेवेचा हा वारसा पुढे चालू रहावा , असे होवू शकेल कां ? >>>

शोध घ्यावा लागेल त्यांनी हे पुढे दिलयं का नाही? कारण बरीच वर्षे झाली ह्या गोष्टीला!

छान लिहिला आहे अनुभव.
असे प्रेमळ आणि निस्वार्थी लोकं जणू संपून गेलेत आता...

प्रेमळ आणि निस्वार्थी लोकं जणू संपून गेलेत आता...>>>>

अगदी!
आजही पायावरची जखमेची खूण पाहिली की ह्या आजींची आठवण येते.

छान अनुभव!

त्या तेलाची प्रोसेस अजून आठवणीत आहे का!

खूप छान लिहिलेलंय कृष्णा !

आमच्या ही गावात दोशी नावाच्या जैन काकू होत्या त्याही अश्या प्रकारची औषधे देत.. गरिबांना तर फुकटच देत ... लोकांशी बोलताना जिव्हाळा, माया असायची त्यामुळे लोक त्यांना खूप मानायचे. त्याचेच फळ म्हणून की काय त्यांच्या पुढच्या पिढीने उद्योगात नाव कमावून मोठे धन जोडले. ते ही मोठे सामाजिक कार्य करत असतात.

धन्यवाद

धन्यवाद सर्वांना!

शी नावाच्या जैन काकू होत्या त्याही अश्या प्रकारची औषधे देत.. गरिबांना तर फुकटच देत ... लोकांशी बोलताना जिव्हाळा, माया असायची त्यामुळे लोक त्यांना खूप मानायचे.>>>

अशी माणसे आता दुर्मिळ झाली आहेत एवढे मात्र खरे.

Pages