फुसके बार – २३ फेब्रुवारी २०१६ उमर खलिद व त्याच्या वडलांची नौटंकी, नीरजा - पोष्टर गर्ल, भारताचा शून्याचा शोध

Submitted by Rajesh Kulkarni on 22 February, 2016 - 15:04

फुसके बार – २३ फेब्रुवारी २०१६ उमर खलिद व त्याच्या वडलांची नौटंकी, नीरजा - पोष्टर गर्ल, भारताचा शून्याचा शोध
.

१) बिर्लाचे केमिकल प्लॅट प्रोजेक्ट आणि वास्तुशास्त्र

बिर्ला कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करत असताना हमखास येणारा अनुभव. प्रोजेक्टचे काम कितीही पुढे गेलेले असले की कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर हळूच एक पिल्लू सोडून देणार. पूर्ण प्लॅंटचा लेआऊट बदलण्याचे.

या सगळ्याबदलांमागे कारण काय, तर वास्तुशास्त्र. कंपनीने कोणत्या तरी वास्तुतज्ज्ञाला गाठून ‘तोडफोड न करता वास्तुशास्त्र’ किंवा ‘अमुक अमुक बदल केले नाहीत तर या वास्तुमध्ये तुमच्यापैकी कोणीतरी हमखास मरेल’ अशी धमकी देणारे या दोन्हीपैकी कुठल्यातरी प्रकारचे बदल करायला सांगणे. बहुतेक वेळा ते बदल दुस-या स्वरूपाचेच असत. झाले. आधीच प्रोजेक्टच्या इंजिनियरिंगचे काम बरेच पुढे गेलेले. त्यात वास्तुशास्त्राच्या आधारावर आमुलाग्र बदल करायचे म्हणजे तोपर्यंत केलेले बरेचसे काम वाया जाणार. शिवाय जे बदल करायचे त्यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होण्यास उशीर होणार. पण काहीही असो, हे बदल करण्याची ऑर्डर अगदी वरून आलेली असल्याने कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचे हातही बांधलेले.

या कंपनीचा प्रोजेक्ट असेल तर प्लॅंटलेआऊटवरील चर्चेमध्ये कंपनीच्या कंपनी व कंसल्टंटच्या इंजिनियर्सबरोवर कंपनीच्या वास्तुतज्ज्ञालाही बोलवा असे उपहासाने बोलले जायचे.

अमेरिका-योरपमध्ये असली थेरे न करताही त्यांचे प्लॅंट दशकानुदशके व्यवस्थित चालू असतात, तेथेही अपघात होतात, येथेही तुम्ही प्लॅंटची वास्तुपरीक्षा केलीत तरी त्यात अपघात होणारच. मग हा भलताच व तर्काच्या पलीकडे काहीतरी भलतेच करायला लावणारा सोपस्कार कशाना हा प्रश्न त्या कंपनीच्या सुशिक्षित वरिष्ठांना विचारूनही हे करावे लागायचेच. किंबहुना हा प्रश्न विचारण्याचा प्रश्नच नसे.

२) लातूर जिल्ह्यातल्या पानगावमध्ये शिवजयंतीला भगवा झेंडा फडकवण्यावरून वाद झाला. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या एका भागात भगवा झेंडा फडकवण्याला पोलिसांनी विरोध केला. जमावाने पोलिसांविरूद्ध घोषणा दिल्या व पोलिसांना मारहाण केली. त्यातला एक हवालदार ५५-५६वर्षीय मुस्लिम अहे. त्याच्याबरोबरीने आणखी एका हवालदारालाही मारहाण केली गेली.

आता तो जखमी झालेला मुस्लिम हवालदार सांगतोय की लोकांनी त्याला मारहाण करताना त्याच्या हातात जबरदस्तीने भगवा झेंडा धरायला लावला. एमआयएमचा आमदार तेथे जाऊन याला धार्मिक रंग देऊ पहात आहे. ते खरे आहे की नाही कल्पना नाही, तरीही पोलिसांना मारहाण होणे हेदेखील अतिशय धक्कादायक आहे.

लातूर जिल्ह्यात सध्या २०-२५ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याचे वाचले. शिवजयांती करताकरता हे असले धंदे करणा-यांच्या आया किंवा बायका पाण्यासाठी दाही दिशा फिरत असतील, पण या रिकामटेकड्यांना व मुर्खांना ते दिसत नसणार याची खात्री आहे.

३) कन्हैय्याकुमारला अटक झाली पण उमर खलीद फरारी झाला होता. त्याच्यासाठी व इतर चौघांसाठी पोलिसांसाठी लुकआउट नोटीसही काढली गेली होती.त्याचे वडील पूर्वी सिमी या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित होते हे तो बेपत्ता असतानाच्या काळात स्पष्ट झाले होतेच.. आता त्याचे वडील गळा काढत आहेत की ते सिमीशी संबंधित असण्यामुळे त्यांच्या मुलावर कारवाई होत असेल तर तसे करू नका. ते मुस्लिम असल्यानेही त्यांच्या मुलावर कारवाई होत असल्याचा कांगावा करायला त्यांनी कमी केलेले नाही.

त्यांच्या दिवट्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तेदेखील त्यासाठी शिफारस करणा-या जेएनयुच्या एका प्राध्यापकाची दिशाभूल करून. अमुक ेक कार्यक्रम करायचा यासाठी शिफारसपत्र मिळवून प्रत्यक्षात भलताच कार्यक्रम आयोजित केला. आता हे प्राध्यापकही मुस्लिमच आहेत बरे का – माफ करा – कोणाच्या जातीचा-धर्माचा उल्लेख करणे मला आवडत नाही. पण या दिवट्याच्या व त्याच्या वडलांच्या धर्मावर उतरण्याच्या घाणेरड्या सवयीमुळे हे सांगावे लागतेय. हे घोषणाबाजीचे प्रकरण झाल्यावर या प्राध्यापकांनीच त्यांची या उमरकडून फसवणूक झाली होती व त्यांनी असे उद्योग करण्यासाठी उमरला शिफारसपत्र दिले नसल्याचे त्याला ऐकवल्याचे टीव्हीवरही पाहिले होते.

फरारी झाल्यानंतर उमर काल पुन्हा विद्यापीठात परतला आणि बरीच डायलॉगबाजी केली. माझे नाव उमर खलिद आहे आणि मी टेररिस्ट नाही. म्हणजे यांच्य वडलांनी तो परत विद्यापीठात जाण्यापूर्वी मुस्लिम असल्याचे जे भांडवल केले, त्याचीच पुनरावृत्ती केली. याचा अर्थ फरारी असताना कोणत्या प्रकारे प्रतिवाद करायचा हे या बापबेट्याने आधी ठरवून घेतले होते.

या डायलॉगबाजीच्या दरम्यान त्याने विद्यार्थीमित्रांचे आभार मानून झाल्यानंतर ‘जितने कॉम्रेड्स फॅकल्टी में हैं’, उन को भी थॅंक्यु करना चाहता हूं’’ असेही म्हटले. एरवी जेएनयु विद्यापीठात कम्युनिस्ट प्राध्यापकांचा शिरकाव झालेला आहे असा कोणी आरोप केला, तर त्याचा लगेच इन्कार केला जातो. शिवाय या विद्यापीठातले हे कम्युनिस्ट जेव्हा भाजप-रास्व संघावर टीका करतात, तेव्हा मात्र ते गरीब बिचारे विद्यार्थी असतात. तेव्हा खरे तर हा सामना पूर्णपणे राजकीय आहे आणि त्यात कम्युनिस्ट नेते हे या विद्यार्थ्यांना उघडपणे समर्थन देताना दिसत आहेत. सगळेच विद्यापीठ नसेल तरी येथे कम्युनिस्टांची मोठी फॅक्टरी आहे हे आता कोणी नाकारणार नाही.

देशविरोधी घोषणांमधून जे काही निष्पन्न व्हायचे ते होवो, जेएनयुतल्या एका मोठ्या उघड गुपिताचा भांडाफोड झाला.

४) पम्पोर घटनेमध्ये लष्कराची व त्यातही अधिका-यांची झालेली प्राणहानी पाहता अशा घटनांमध्ये उठसूट आर्मीकडेच दहशतवादाशी संबंधित घटनांची जबाबदारी सोपवण्याच्या पद्धतीमुळेच सर्वोच्च दर्जाचे कौशल्य कमावलेल्या आर्मीच्या अधिका-यांची व जवानांची प्राणहानी होत आहे असे निरिक्षण मारूफ रझा यांनी मांडले. लष्कराशिवाय इतरही जी सशस्त्र सुरक्षादले आहेत, त्यांनाही अशा कारवायांमध्ये सामील करावे असे ते म्हणाले.

त्यादृष्टीने घटनेच्या गांभिर्याप्रमाणे कोणाकडे कारवाईसंबंधीची जबाबदारी सोपवावी याबद्दल ताबडतोब निर्णय घेता येण्याची यंत्रणा उभारावी असे ते म्हणाले.

ही सूचना फार मौल्यवान आहे असे वाटते.

५) सिनेमा सिनेमा

नीरजा – सोनम कपूरचे लाडे-लाडे दिसणे काही केल्या लपत नाही. जुही चावला कशी गुलाबगॅंगमध्ये व्हिलन वाटलीच नाही, तसेच. बाकी नीरजाचे पात्र व विमान अपहरणाची घटना यापलीकडे या सिनेमाचे अपहरणानंतरच्या वास्तवाशी फार काही संबंध नसल्याचे कळते. त्यामुळे फार काही सांगण्यासारखे नाही.

पोष्टरगर्ल – सिनेमा चांगला आहे. एकाच वेळी खूप गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या विषयाला थोडे गंमतीदार प्रकारे सादर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. काही वर्षांपूर्वी ‘मातृभुमी – द नेशन’ अशा नावाचा एक हिंदी सिनेमा आला होता. त्यात मुलगी दिसायलाही कोठे नसल्याने गावाकडचे पुरूषी वळु ख-या प्राण्याबरोबर सेक्स करण्याकडे कसे वळतात हे वास्तव मांडल्याचे आठवते. मग लग्नाच्या मुलीने स्वयंवराच्या पद्धतीने खेड्यातील निरूद्योगी तरूणांना शेतीच्या माध्यमातून श्रम करण्याची शिस्त लावण्याचा प्रकार दाखवला आहे. शहरी प्रेक्षकांना हा भाग कंटाळवाणा वाटू शकतो, पण एकूण सिनेमा छान आहे. सिनेमातली लावणीही विषयाच्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. दिग्दर्शनात सफाईपणा आहे हे महत्त्वाचे. अखेर नायिका ज्याच्याशी लग्न करण्याचे ठरवते, त्याला आणखी थोडा अभिनय करता यायला हरकत नव्हती. तो पुरेसा देखणा असला तरी.

चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी स्त्री-पुरूष प्रमाण फारच विषम असलेल्या देशस्तरावरील जिल्ह्यांमध्ये आता पुणे जिल्ह्याचाही नंबर लागला आहे, म्हणजेच हे संकट आता अगदी आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे, याची जाणीव करून दिली.

गिरिश लाड हे रायजिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन ही संस्था चालवतात. त्याद्वारे ते स्त्रीभ्रूणहत्येविरोधातही काम करतात. काही वधुवर मेळाव्यांमध्ये फक्त मुलेच आलेली दिसतात, विविध कारणांनी मुली येतच नाहीत हे वास्तवही त्यांनी सांगितले. त्यांनी या सिनेमासा एक खास शो आयोजित केला होता.

६) भारताचा शून्याचा शोध

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या फेबुवॉलवरील अमोल बनकर यांच्या पोस्टप्रमाणे शून्य या भारतीय संकल्पनेचा सर्वात जुना पुरावा आता सापडतो तो मात्र कंबोडियामध्ये. तिथल्या एका शीलालेखामध्ये ६०५ या संख्येमध्ये शून्य हा आकडा वापरलेला दिसतो. सदर लेख प्राचीन ख्मेर भाषेतला आहे. यासंदर्भातला एक फोटो येथे दिला आहे. यासंबंधीच्या सविस्तार बातमीची लिंक दिली आहे.
http://www.smithsonianmag.com/history/origin-number-zero-180953392/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users