माझ्या वाईट सवयी ६ - थापा मारणे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 February, 2016 - 16:11

 

सवयीत घुसायच्या आधी काही कन्सेप्ट क्लीअर करू इच्छितो.

थापा मारणे आणि बाता मारणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. थापा या कोणालातरी फसवण्यासाठी मारल्या जातात तर बाता या स्वताची टिमकी मिरवण्यासाठी मारल्या जातात.

थापा मारणे आणि अप्रामाणिकपणा यातही माझ्यामते एक मूलभूत फरक आहे. अप्रामाणिकपणा हा कोणाचे तरी नुकसान करण्याच्या हेतूने दाखवला जातो, किंवा त्यात कोणा दुसर्‍याचे नुकसान होतेच.

पण थापा या नेहमीच एखाद्याला धोका देण्यासाठी असतात असे गरजेचे नाही. त्यात निव्वळ मनोरंजनही शोधता येऊ शकते.

त्यामुळे मी देखील माझा प्रामाणिकपणा कायम जपत थापा मारायचा आनंद आजवर उचलत आलोय.

अर्थात, आपला हेतू नसतानाही आपल्या थापेमुळे कोणी फसवणूक झाल्याच्या भावनेने दुखावला जाण्याची शक्यता असतेच, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे थापा मारण्याच्या सवयीचे कोणतेही समर्थन न करता मी त्याला माझ्या वाईट सवयी या सदराखाली घेतले आहे. तसेच माझ्या इतर वाईट सवयींप्रमाणेच ही देखील तुम्ही आपल्या पदराखाली घ्याल अशी अपेक्षा करत आहे.

 

माझी पहिली थाप मी वयाच्या कितव्या वर्षी मारली हे नेमके सांगता येणे शक्य नाही. पण ईतर वाईट सवयींप्रमाणेच नक्कीच वयवर्षे आठवणीपलीकडे मारली असावी. त्यामुळे आठवतेय तिथपासून काही रोचक थापा सांगतो. डोण्ट वरी, या लेखात नाही थापा मारणार..

 

तर,

माझ्या शाळामित्रांमध्ये मी खुबीने एक अफवा पसरवली होती. की माझे आजोबा, पणजोबा व तत्सम पूर्वज स्वातंत्र्यपुर्व काळात जुन्या दक्षिण मुंबईतील वतनदार होते. मुंबई ज्या बेटांची बनली होती त्यातील अर्धे एखाद बेट आमच्या मालकीचे होते. आज मुंबईत जिथे एकेका फ्लॅटची किंमत करोडोंत आणि ईमारतींची अब्जांत आहे, तिथे अश्या कित्येक वसाहती ऊभ्या राहतील एवढी जागा आमच्या मालकीची होती. आजही तशीच राहिली असती तर त्या वडिलोपार्जित संपत्तीतील माझा हिस्सा म्हणून किमान पंधरा-वीस ईमारतींचा तरी मी मालक असतो. पण भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि संस्थानांचे विलीनीकरण झाले तसेच आमची मालमत्ता देखील जप्त झाली. सरकारी नियमाप्रमाणे काहीबाही किंमत लावत मोजक्याच पैश्यात आमची बोळवण करण्यात आली. क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि एकेकाळचे वतनदार रस्त्यावर आले. पण अजूनही कोर्टात आमची केस चालू आहे. खुद्द भारत सरकारविरुद्ध. त्यामुळे जिंकायची आशा कमीच आहे. पण चुकून जिंकलोच तर माझ्या वाटणीचे दोनचारशे करोड कुठे गेले नाहीत Happy

 

तर, या थापेने कोणाचे नुकसान काही व्हायचे नाही. पण फायदा असा व्हायचा की चारचौघात नकळत एक ईज्जत मिळायची. तीच ईज्जत जी या देशात एखाद्या धनिकाला मिळते. ती मला मध्यमवर्गीय असूनही मिळायची. त्यामुळे एक गोष्ट मी लहानपणीच शिकलो, पैश्याचे सोंग घेता येत नसले तरी ढोंग घेता येते. आणि ते देखील बरेच फायदेशीर असते.

 

काही थापा मजेशीर असतात. फेकणार्‍यालाही मजा येते तर झेलणार्‍याही. अशीच माझी एक फेमस मजेशीर थाप म्हणजे शेजारची मुलगी. माझ्याच वयाची. माझ्यासारखीच एकुलती एक. मग काय, कधी ती माझ्या घरी यायची, तर कधी मी तिच्या घरी जायचो. आणि यातूनच पौगडावस्थेतील किस्से रंगायचे. तितक्याच चवीने ते सांगितले आणि चघळले जायचे. मला गुरू महागुरू अशी ओळख मिळवून देण्यास या किश्यांचाही बराच हातभार होता. प्रत्यक्षात मात्र माझ्या शेजारच्या पाजारच्या पुढच्या मागच्या चारही घरात अशी कोणतीही मुलगी नव्हती.

 

या गुरू महागुरू वरून आठवले, वाईट सवयींची माझ्या अंगात कमी नसली तरी एखादे तगडे व्यसन मला कधीच नव्हते. अगदी आजही मला माझी वाह्यात ईमेज जपताना मी दारू पित नाही हे एखाद्याला सांगायची चिक्कार लाज वाटते. त्यामुळे मित्रांबरोबर पार्टीला जेव्हा केव्हा चकणा खायला बसतो तेव्हा हळूच त्यांचा ग्लास आपल्यापुढे सरकवत एक फोटो काढून घेतो. तो फोटो सोशलसाईटवर टाकून थोडी फुशारकी मारून घेतो. शाळेत असताना देखील आपला मोठेपणा जपायला मला माझ्या नसलेल्या व्यसनांबद्दल खोटे खोटे मिरवणे गरजेचे व्हायचे. त्या वयात कोणीही मित्र पिणारा नसल्याने त्यांच्यासमोर इंग्लिश दारूची मोठमोठी नावे फेकणेही पुरेसे ठरायचे.

 

असो, तर आता एक कॉलेजची गंमत सांगतो. माझ्या डब्यात नेहमी भातच असायचा. पिवळा भात, तांबडा भात, पांढरा भात, मसाले भात, कधी पुलाव तर कधी बिर्याणी. परवडून जायचे. बोर नाही व्हायचे. कारण किमान दहाबारा जण तरी नेहमीच जेवायला एकत्र असायचो. याच्या त्याच्या डब्यातील चपाती भाजी खाल्ली की शेवटी माझा भात हा ठरलेला मेनू. कधी आमचे नशीब उघडले की मुलीही जेवायला बरोबर असायच्या. कालांतराने त्यातील काही चाणाक्ष मुलींनी हेरले की या रुनम्याच्या डब्यात नेहमी भातच असतो. तशी विचारणाही केली. मग काय, उत्तरादाखल मी मारली थाप. माझ्या आईला चपात्या बनवता येत नाहीत. म्हटले तर किती निरुपद्रवी थाप. पण बाप, अचानक चिमित्कार घडल्याप्रमाणे त्या मुलींना माझ्याप्रती एक सहानुभूती वाटू लागली. मुलींची सहानुभूती मिळवणे हे देखील प्रेम मिळवण्यापेक्षा काही कमी नाही असे वाटायचे ते वय. त्यामुळे ती थाप कायम रेटली जाईल याचीच काळजी मी घेतली. त्यातल्या एका मुलीने तर कहर केला. ही गोष्ट आपल्या हॉस्टेलवरच्या मैत्रीणींना देखील सांगितली. तसे त्या सर्व जणींना माझ्या वडिलांचेही कौतुक वाटू लागले, जे त्यांनी एका चपात्या न येणार्‍या बाईबरोबर लग्न केले. एवढी वर्षे सुखाचा संसार केला. माझ्याबद्दल त्या नेमका काय विचार करत होत्या नेमकी कल्पना नाही, पण थाप ईतकी हिट होती की मी एखाद्या मुलीला विचारले असते की माझ्यासाठी चपात्या बनवशील का, तर तो प्रपोज झाला असता.

 

एक माणूस एका वेळी एकाला थापा मारून फसवू शकतो पण दरवेळी सर्वांनाच थापा मारून फसवू शकत नाही, असे काहीतरी सूत्र आहे. कालांतराने ‘हा तर बघावे तेव्हा फेकतच असतो’ अशी इमेज तयार होतेच. लांडगा आला रे आला होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे काही वेळा आपण खरेच बोलत आहोत हे समोरच्याला पटवून द्यायला आपण शपथेचा सहारा घेतो. तुम्ही सज्जन लोकांनीही कैक वेळा शपथ घेतली असेलच. त्यामुळे मला तर उठता बसता शपथ खाण्याची गरज पडत असणार हे समजू शकता. तर या कामासाठी मी एक सोयीचा देव पकडला होता. त्या देवाची शप्पथ मी धादांतपणे खोटी घ्यायचो आणि यासाठी मला माझे नास्तिकत्व बळ द्यायचे. त्या देवाचे नाव ईथे घेऊन कोणाच्या भावना दुखवायच्या इच्छा नाही, पण हा ऊपाय काम करायचा. जर कोर्टात गीतेची खोटी शप्पथ घेतली जाते तर सीतेची आणि रामाची घेतली तरी काय चुकले, हा विचार लहान वयातही तारून न्यायचा. माझ्यासाठी माझा देव माझी आई होती. त्यामुळे तिची खोटी शप्पथ कोणी घ्यायला लावू नये म्हणून ‘आईची खरी शप्पथही कधी घेऊ नये’ असे तत्व मी माझ्यापुरते बनवले होते.

 

असो, छोटेमोठे सारेच किस्से आठवून आठवून सांगायला घेतले तर कैक किश्श्यांचे पीक निघेल. तसाही एक वैश्विक नियम आहे थापाडपणतीचा. तुम्ही जितके बोलाल तितके तुमच्याप्रती विश्वासार्हता कमी होत जाते. म्हणून इथेच थांबतो.

 

तरी जाता जाता अचूक आणि परीणामकारक थापा मारता येण्यासाठी लागणारे तीन गुण अधिकारवाणीने सांगू इच्छितो, ते ऐकाच.

 

१. आपण जे करतोय ते काही चुकीचे नाही हा विश्वास मनी असला पाहिजे.

किंवा

असेना चुकीचे काय फरक पडतो असा कोडगेपणा अंगी बाणवला पाहिजे.

 

२. कमालीची तल्लख स्मरणशक्ती हवी. थापेतील बारीक सारीक डिटेल कैक वर्षांनीही गरज पडल्यास लक्षात राहायला हवेत.

किंवा

जर स्मरणशक्ती कच्ची असेल तर वेळप्रसंगी या बोटावरची थुंकी त्या बोटावर करता आली पाहिजे.

 

३. कल्पनाशक्ती, क्रिएटीव्हिटी - हा तो गुण आहे जो थापा मारणे या प्रकाराला कलेचा दर्जा देतो.

आणि थापाड्याला कलावंत बनवतो Happy

 

आता थांबलाच आहात, तर आयुष्य जगण्याची एक फोटोशॉपीही ऐकून जाल,

जो नेहमी खरे बोलतो त्याचे आयुष्य सिंपल होते, आणि जो खोटे बोलतो त्याचे ईंटरेस्टींग Happy

आपलाच,

- ऋन्म्या

 

............................................

 

ता.क. - वाईट सवयींच्या गेल्या एक दोन भागांपासून मी या मालिकेत निव्वळ फेकाफेकी करतोय असा छुपा ओरडा सुरू झाल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बहुधा लोकांना आता "मी थापा मारतो" हे देखील मी खोटेच बोलतोय असे वाटण्याची दाट शक्यता आहे. (काहीतरी लॉजिक गंडलेल्यासारखे वाटतेय) असो, पण म्हणूनच मला थापा मारता येतात यावर लोकांचा विश्वास बसावा यासाठीच म्हणून मायबोलीवर मारलेली ही लेटेस्ट थाप संदर्भासाठी - http://www.maayboli.com/node/57593

 

चूक भूलथापा देणे घेणे

तुमचाच ऋन्मेष

 

तळटीप - यावेळी शब्दखूणात ‘लेखन थापा’ टाकेन ईतका पण मी काही हा नाहीये हां Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> कुठल्याही आय डीने एका विशिष्ट अशा मानसिक स्थितीमधे घेतलेला अखेरचा निरोप वाचून आनन्दानी हुश्श करणारा अस्सल मायबोलीकर नाही आहे. ज्यान्नी ज्यान्नी हुश्श केले असेल त्यान्ना गेली ३ दिवस किती त्रास झाला होता हे स्वतः ला सान्गा>> उदय, मी केलं होतं हो अतिशय आनंदाने हुश्श. आणि मी खरी माबोकरच आहे. काये की मला हा आयडी अतिशय इरिटेटींग वाटतो आणि डोक्यातही जातो. त्याचे बीबी न वाचणं वगैरे उपाय आहेतच. ते करतेच. पण त्याचं नाव पहिल्या पानावर दिसलं की नकळत आठ्या पडतात कपाळाला.

पण त्याचं नाव पहिल्या पानावर दिसलं की नकळत आठ्या पडतात कपाळाला.
>>
सायो, पण त्याला ईलाज नाही. कारण मी मुलगा आहे Sad
जर मुलगी असतो तर लग्नानंतर माझ्या नवर्‍याला माझे नाव बदलायला सांगितले असते ..

अवांतर - यात एका धाग्याचा विषय दडलाय. परवाच यावरून आमच्या व्हॉटसपग्रूपवर चर्चा झालेली.

<<>>

@ वत्सला
तो नाही सुधारणार आणि तो ड्यू आयडी आहे हे तो कधीही कबूल करणार नाही ..........

<<जर मुलगी असतो तर लग्नानंतर माझ्या नवर्‍याला माझे नाव बदलायला सांगितले असते ..>>
----- नाव बदलायला ऋन्मेशने मुलगीच असायला हवी होती असे नाही आहे.... ऋन्मेश मुलगाही स्वत: चे नाव मर्जीनुसार बदलू शकतो.... अनेकवेळा. नाव बदलायचे अथवा नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे... अर्थात तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

हहा... जबरा धागा...
थेंक तू जिज्ञासा न रूनमेश ... तेच्या डिस्कशन मुले धागा कळलं

Pages