माझे परमभाग्य!

Submitted by लसावि on 16 February, 2016 - 09:18

मी भारतीय म्ह्णून जन्माला आलो हे माझे भाग्य नाही.

पण मी भारतात पुरुष म्हणून जन्मलो हे माझे भाग्यच. कारण मला आता कुठेही कधीही काहीही करण्याचा नैसर्गिक अधिकारच मिळाला आहे. उदा. करीअर का घर असले प्रश्नच माझ्यासाठी नाहीत. आणि मी कुठेही लघवी करु शकतो.

एवढे भाग्य कमी की काय म्हणून मी भारतात उच्चवर्णिय हिंदू म्हणून जन्माला आलो. काहीही संघर्ष न करता सामाजिक प्रतिष्ठा आणि मान्यता जन्मजातच प्राप्त होण्याचा दुसरा मार्ग तरी कोणता? मला माझे भारतीयत्व दरवेळा सिद्ध करुन घ्यावे लागत नाही हे ही नशिबच.

मी भारताच्या शहरी भागात जन्मलो हे ही थोरच. आता मी कधिमधी प्रदूषण, कचरा, ट्राफिक वगैरे कुरकूर करतो पण सगळ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे मनमानी शोषण करताना थोडा त्रास सहन करायला माझी हरकत नाही.

शहरी असतानाच मी भारताच्या शेतकरी कुटूंबातील नाही हे तर माझे अहोभाग्य. तुम्हाला ती सगळी रडकथा माहितीच आहे, कर्ज, गरिबी, आत्महत्या इ.इ. मी मात्र माझ्या पिपिएफ-इक्विटी-इन्शुरन्सच्या सुरक्षित कोषात आहे.

मी भारताच्या सर्वात 'पुरोगामी' राज्याच्या सर्वात 'प्रगतीशील' भागात जन्माला आलो हे लक्षात आल्यावर तर कोणालाही माझा हेवा वाटेल. आमच्याकडे ते खाप वगैरे प्रकार नाहीत. आता आम्ही आमच्यातील तथाकथित त्रासदायक विचारवंताना मारुनच टाकायला सुरु केले आहे पण एकंदरीत देशाच्या इतर भागापेक्षा इथे कितीतरी शांतता आहे हे सत्य.

अलीकडेच मला माझ्या अतुलनीय भाग्याचा अजून एक पैलू कळाला. मी भारतात जन्माला येऊनही समलैंगिक नाही हे केवढे मोठे सुदैव. कारण त्यामुळे लोक माझा तिरस्कार करीत नाहीत आणि मला स्वतःचाच तिरस्कार वाटावा असेही वागवत नाहीत.

आता असे सगळे असताना मी कशालाही विरोध न करता माझे थोबाड बंद ठेवले तर माझे हे सगळे परमभाग्य मला जन्मभर पुरेल एवढी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

जमलंय Happy आणि महापरम भाग्य म्हणजे तुमचा मुलगा किंवा जावई (मुलगी चालणार नाही) आम्रविकेत असल्याने दर दोन वर्षांनी तुम्हाला या कोशाबाहेरील लोकांना (देशद्रोही ठपका विरहित) नावं ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे.
हे परमभाग्य पुढच्या पिढीत ट्रान्स्फर होण्याचे सात उपाय लिहा की.

सरकॅझम चांगला जमलाय.असेच विचार बरेचदा मनात येत असतात.आपलं सुरक्षीत असणं किंवा समाधानी असणं हा एक जुळून आलेला योगायोग आहे असं वाटतं.

हे "परमभाग्यात" मोडतं का? स्मित<>< गंमत म्हणून कधीतरी समोरच्याला आडनाव "भलतंच काहीतरी" सांगून पहा म्हणजे कळेल.

आगाऊ, नेहमीप्रमाणेच परफेक्ट.

हे "परमभाग्यात" मोडतं का? स्मित<>< गंमत म्हणून कधीतरी समोरच्याला आडनाव "भलतंच काहीतरी" सांगून पहा म्हणजे कळेल.

सो कॉल्ड उच्चवर्णिय आडनाव समोरच्याला सांगितल्यावर वाईट अनुभवही आला आहे. त्यामुळे असं जनरलाईझ करता येत नाही.