"शेक्सपीयर कुठे चुकला?"

Submitted by अमेय२८०८०७ on 11 February, 2016 - 09:02

(वैधानिक इशारा: प्रस्तुत लेखनात शेक्सपीयर वगैरे- हल्लीच्या कवींच्या आपसांतील मैत्रीसारखा- 'नावा'पुरताच आहे. केवळ पब्लिक जमवण्यासाठी हे शीर्षक उपयोजले आहे, हे चाणाक्ष ताडतीलच, इतरांना आता सांगितलेच!)

आपले नाव आपलेच हे कधी कळायला लागते? लहानपणी बहुतेक नाद ओळखीचा वाटतो म्हणून आपण नावाला प्रतिसाद देऊ लागतो आणि पुढेपुढेे नाव कसे त्वचेसारखे व्यक्तित्वाला चिकटते.
इतरांच्या लेखी आपली पहिली नोंद म्हणजे नाव असते. स्वभावविशेष, गुण-दोष हे सर्व त्या नावाच्या खात्यावर मांडून ठेवलेले असतात.

कारण माहीत नाही पण मला लहानपणी 'चिचू' आणि भावाला 'बब्या' म्हणायचे. कदाचित आईबाबा बंगाली साहित्याचे वाचक असल्याने त्यांच्या डाकनाम ठेवण्याच्या प्रथेचे अनुकरण झाले असावे. समज येताच आमच्या प्रभावी तेजसामर्थ्यामुळे आम्ही या अर्थहीन नामांतराविरोधी यशस्वी चळवळ उभारली; तेव्हापासून अमेयचे 'अमू' आणि क्वचित लडीवाळ प्रसंगी 'अम्या(गाढवा)' वगळता नावाची फार चिरफाड झाली नाही.

फिरंगी समालोचक भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे चॉकलेट सोलल्यागत उच्चारायचे. त्यांच्या तोंडून 'टेनडॉलकर', 'घ्यांघुली' किंवा 'कुंबली' ऐकल्यावर यांची जीभ नक्की का वळत नाही? असा प्रश्न पडायचा. पु लंच्या 'अपूर्वाई'तील त्यांच्या नावाची गोऱ्यांनी लावलेली विल्हेवाट वाचून ही मंडळी आपले नाव कसे घेतील याची सुप्त उत्सुकता फार आधीपासून होती. सुदैवाने अमेरिकन (उत्तर आणि दक्षिण), ब्रिटिश, सिंगापुरीयन, ऑस्ट्रियन, ऑस्ट्रेलियन, स्पॅनिश आदी जिभांनी 'अमेय पंडित'चा घाट बऱ्यापैकी समर्थपणे चढून दावला; 'नाव' ठेवण्यासारखे काही केले नाही. पु लंचे भोग आपल्या नशिबात नाहीत याबद्दल मी स्वतःचे अभिनंदन करू लागलो.

'नियती' नावाची क्रूर चेटकीण गालात हसत बसली होती. अजून माझा फ्रेंचांशी 'रांदेव्हू' (चु भू दे घे) झाला नव्हता (पहिल्यांदा हा शब्द म्हणजे कोल्हापुरी शिवी वाटायची, त्याचा खरा उच्चार नि अर्थ कळेपर्यंत कित्येक शँपेनच्या बाटल्या मोकळ्या झाल्या). गोळ्यांची पूर्ण पिशवी दाखवून खायला एखादीच गोळी देणाऱ्या कोणा कंजूस नातलगाप्रमाणे, लिहिताना शब्दांची मालगाडी लावणारे फ्रेंच उच्चारात पार काटकसरी! चारपाच अक्षरांच्या छोट्या शब्दांतही एखाद-दुसरा सायलेंट ठेवला नाही तर त्यांना 'वाईन' गोड लागत नाही, अशातील स्थिती. फ्रेंचांनी माझ्या नावाचे पार 'नॉर्मन्डी' केले. एssमे, आssमी, प्वांssदे, पांssदी अशी त्यांनी केलेली विविध संस्करणे ऐकून ते लहानपणीचे चिचु भलते नादमय आणि प्रासयुक्त होते (म्हणजे आजच्या सॉल्लीड पुरोगामी कवितेच्या विरुद्ध) असे वाटून आणि अशा नावाचा त्याग केल्याबद्दल मला भयंकर हळहळ वाटू लागली.

त्यातल्या त्यात एक (महिला) सहकारी पांssदीss असे आस्थेने पुकारे तेव्हा "पांदीत भेटलंस...झिनझिनाट" वगैरे कविता आठवून थोडे छानछान होई पण त्यामागे खिडकीतून दिसणारा निळा भूमध्य समुद्र, लव्हेण्डर की तत्सम सुगंध आणि धनभारित थंड हवा यांचा हात होता हे मला कळत होतेच; त्यामुळे एकंदरित फ्रेंचांवर माझा दातच आहे आणि ('ती' सहकारी वगळता) कोणी फ्रेंच कोल्हापुरात अंबाबाईचा पत्ता विचारताना दिसला तर मी त्याला मदत करेन ही शक्यता पार धूसर आहे, हे मात्र अगदी 'vérité absolue!'.

एकूणच नावाविषयी इतके ममत्व असल्याने लग्नानंतर कुणीही आपल्या पत्नीचे नाव बदलणे ही मला जरा नापसंत असलेली प्रथा आहे. आपले सगळे सहजतेने मागे सोडून नवीन वातावरणात रुजण्यासाठी येणाऱ्या मुलीचे निदान नाव तरी तिच्यासोबत असू द्यावे, असे मला आपले वाटते. तसेही बऱ्याच वेळा ते बदललेले नाव कागदावरच राहते. आता ही 'नामबदल प्रथा' बरीच कमी होत आहे हेही ठीकच!

मोठीमोठी माणसेही नाममहात्म्यावरून अटीतटीला येतात. इन्ग्रिड बर्गमनमधील 'बर्गमन'च्या स्पेलिंगमध्ये एक n आहे की दोन यावरून जी ए आणि ग्रेस यांत पत्रापत्री झाली होती. वुडहाऊसला कोणी त्याच्याविषयी वावगे छापून आलेले काही दाखवले तर तो फक्त आपले स्पेलिंग नीट जमले आहे की नाही एवढेच आवर्जून पाही आणि तसे नसले तरच संपादकाला निषेधाची तार ठोकी.

हेच नाव कधीकधी मात्र असह्य ओझे वाटू लागते. प्रसिद्धी मिळाल्यावर सामान्यांत उघडपणे वावरणे कठीण होऊन बसते, नको असलेल्या नात्यात नावही बोचू लागत असेलच. यशस्वी घराण्यातील एखादे अपत्य तितके लायक नसेल तर त्यालाही त्या नावाचा त्रासच होत असणार कारण ते नुसते नाव राहत नाही तर कौटुंबिक-सामाजिक अपेक्षांचे संमिश्र जोखड असते. आपल्याकडे तर (आड)नावावरून थेट जातिवर पोचून इतर आडाखे बांधायचा रानटी खेळ करणारी माणसेही आहेत, अशांच्या हाती नाव-आडनाव हे उघड किंवा छुप्या विद्वेषाचे हत्यार बनते त्याला काय करावे?

एकदा चारचौघात नाव झाले की मात्र त्या जोरावर सोने म्हणून चिंध्याही विकता येतात त्यामुळे वर लिहिलेले काही वाईट अपवाद वगळले तर नाममहिमा आहेच आणि प्रत्येक नावात काही 'खास बात' असतेच हे मात्र नक्की. भले शेक्सपीयर 'नावात काय आहे' म्हणून गेला असेल, त्या बेट्याला स्वतःची नाटके खपवायची होती पण, "प्रिये तुझ्यासाठी गुलाब आणलाय" ऐवजी, " प्रिये तुझ्यासाठी दगडफूल आणलेय", म्हणणाऱ्या नाठाळाच्या माथी ती प्रिया काठी (किंवा दगड) घालणार नाही का?

याच शेक्सपीयरची नाटके प्रत्यक्षात 'बेकन'नी लिहिली आहेत असे कोणी म्हणले तर मात्र हा चवताळून का उठायचा म्हणे? त्यामुळे शेक्सपीयर बाकी थोर असला तरी नामसामर्थ्याला कमी लेखणारी त्याची मते मला (साधारणत: मुक्तछंदवाल्यांना वृत्तबद्ध कविता वाटते तशी) संकुचित, अप्रसरणशील आणि प्रतिगामी वाटतात....असे जाताजाता खेदाने नमूद करून ठेवावेसे वाटते....एवढेच!

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages