फाटके आभाळ टाचू लागलो!

Submitted by सत्यजित... on 9 February, 2016 - 05:04

तू मला,मी तुला वाचू लागलो...
फाटके आभाळ टाचू लागलो!

वाहिले असतील तू अश्रू म्हणा...
आत मी तितकाच साचू लागलो!

आठवे वेचीत बसते रात्रभर...
मी म्हणे स्वप्नात जाचू लागलो!

मी कुठे होतो विलग त्यांच्यातुनी?
गुंतल्या धाग्यांस काचू लागलो!

गोठल्या होत्या जणू संवेदना...
मग निखाऱ्यांतून नाचू लागलो!

फाटके आभाळ टाचू लागलो...
तू मला,मी तुला वाचू लागलो...

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users