ताठ होता अन्यथा माझा कणा

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 February, 2016 - 11:21

सोयरा भासे जरी हा मी पणा
ओसरीवर ठेव त्याला पाहुणा

काळजावर नांव त्याचे कोरले
मिटवल्या जातात वाळूच्या खुणा

उघडताना टोपली घे काळजी
आठवे फुत्कारती काढुन फणा

पूर्व मानावी उताराची दिशा
एक हा गुणधर्म पाण्याचा उणा

भार नात्यांचा न पेलुन वाकला
ताठ होता अन्यथा माझा कणा

संकटे हल्ला अचानक बोलती
काळजीचा नित्य वाजे तुणतुणा

नांदते वर्षानुवर्षे अंतरी
आपुल्यांमध्येच दुःखाला गणा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>संकटे हल्ला अचानक बोलती
काळजीचा नित्य वाजे तुणतुणा

नांदते वर्षानुवर्षे अंतरी
आपुल्यांमध्येच दुःखाला गणा<<<

चांगले शेर!

बोन्सायचा शेरही नावीन्यपूर्ण आहे पण त्यात गफलत आहे. शब्दरचनेची! मुळात बोन्साय आणि कणा ह्यांचे काही खास नाते असले तर ते माहीत नाही.

कृपया गैरसमज नसावा, पण हे सुचले.

वाकण्याची साधली कारागिरी
ताठ होता अन्यथा माझा कणा

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

बोंसायचे स्वरूप देताना त्याची वाढ खुरटवल्या जात असल्याने स्वाभिमानावर गदा येते असे काहीसे म्हणायचे होते पण ते तितकेसे जमलेले नाही असे वाटत होतेच !

मनःपूर्वक धन्यवाद सुचवणीबद्दल !

सुप्रिया

सुप्रिया जाधव,

माझ्या गझलविषयक सुचवण्या कोणी स्वतःच्या गझलेत थेट समाविष्ट करण्याइतका मी सिद्धहस्त गझलकार नव्हे. मुळात तुम्ही चांगल्या गझलकारा आहात, तेव्हा तुम्हाला मूळतः जे सुचले ते तसेच ठेवत गेलात तर ओरिजिनॅलिटी मेन्टेन करू शकाल.

-'बेफिकीर'!