डोंगरावरचा देव… (१)

Submitted by विजय पुरोहित on 7 February, 2016 - 10:56

डोंगरावरचा देव…

जूनचा महिना आता संपत आलेला होता. आकाशात काळे ढग भरुन आलेले दिसत सारखे. भर दिवसा देखील संध्याकाळ असल्याचं वाटत असे. पण ते बरसत काही नव्हते अजून. मे महिन्यात वादळवार्‍यासहित जोरदार हजेरी लावलेला पाऊस आता मात्र दडून बसलेला होता. पेरणीची कामं केलेले शेतकरी आभाळाकडे बघून हात जोडून जोडून देवाजीचा धावा करत होते.

तो पण त्याच गर्दीतला एक सामान्य माणूस. गावच्या पारावरुन संध्याकाळच्या गप्पा आटोपल्यावर घराकडे चालत निघालेला. शेती आणि पावसाच्या अखंड चिंतेत बुडालेला. गावच्या रस्त्यावर आडवे येणारे खाचखळगे, गटारे सरावाने चुकवत चुकवत घाईघाईत घराकडे निघालेला. उद्या त्याला पहाटे लवकर उठून देवदर्शनाला जायचं होतं.

दोनच दिवसांपूर्वी आठवडी बाजाराला तो तालुक्याच्या गावी गेलेला होता. तेव्हां तिथल्या मंदिरातील गुरवानं त्याला घराण्याच्या कुळदैवताचे दर्शन घेण्याचा सल्ला दिलेला होता. शेतीतलं सततचं अपयश आणि कर्जबाजारीपणा यांनी तो खचत चाललेला होता. पदरात दोन लहान मुलं आणि आत्ताच ही अवस्था वाट्याला आलेली. पुढचं कसं होणार? मुलांची शिक्षणं, लग्नं कशी पार पडणार? चित्त सैरभैर होत चाललेलं त्याचं दिवसेंदिवस. ज्या गावात लहानाचे मोठे झालो तिथेच असं दयनीय जीवन वाट्याला येण्यापेक्षा त्याला मरण पत्करणं बरं वाटत होतं.

घर आलं. बायको दरवाजापाशीच उभी राहून वाट पाहत होती. तो दिसताच ती समाधानानं आत वळली. तिचा कृश, काळासावळा, चिंतांनी ग्रासलेला चेहरा पाहून त्याला गलबलून आलं. त्याही परिस्थितीत ती त्याच्या घरी येण्याची काळजी करत होती. आत घरात कंदिलाचा अंधुक प्रकाश पडलेला होता. रात्रीचे आठ वाजत आले होते. चटईवर मुलगा आणि मुलगी वाहणारे नाक पुसत अभ्यास करत होते. आजारी होते दोघे म्हणून तर त्यांना उद्या त्याच्याबरोबर येता येणार नाही अशी त्यांची समजूत त्याने काढलेली होती. खरे तर सगळ्या कुटुंबाच्या तिकिटाचा खर्च परवडणार नसल्याने त्याने एकट्यानेच जायचा निर्णय घेतला होता.

कोपर्‍यातील अंधार्‍या मोरीत जाऊन त्याने हातपाय धुतले. तोवर बायकोने गरमागरम जेवण वाढलं. ज्वारीची कडकडीत भाकरी, लसणाचे तिखट आणि बटाट्याचे खमंग कालवण. वाह! अप्रतिम चव होती. सर्व काळजी, चिंता कुठल्या कुठे दूर पळाल्या त्याच्या.

भराभर जेवण उरकून मोरीत हात धुऊन तो वाकळेवर आडवा झाला. बायको मोरीत भांडी घासता घासता अडचणींचा पाढा वाचून दाखवू लागली. त्याला आता खरं तर झोप येऊ लागलेली होती. पण ऐकणं भाग होतं. त्या अडचणी त्यांच्याच होत्या, त्यांच्या दोघांच्या मिळून होत्या. शेवटी झोप असह्य होऊ लागली तसा तो उठून बसला. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे उठून बायकोला पुरणाचा नैवेद्य देवासाठी डब्यात करुन द्यायचा होता. त्याची तयारी करावी असा विचार त्याने केला. तयारी करत करत तो बायकोशी गप्पा मारु लागला. तिने सांगितल्याप्रमाणे त्याने हरभरा डाळ चिपट्याने बाजूला मोजून काढली आणि चुलीवर शिजवायला ठेवली. भज्यासाठी बेसनपीठ स्वतंत्र भांड्यात काढले आणि उभा कांदा चिरुन ठेवला. कटाच्या आमटीसाठी एक कांदा आणि छोटासा खोबर्‍याचा तुकडा चुलीत काळसर भाजून घेतला. देवस्थानचा कोतवाल म्हसोबाकरिता खास वड्यांसाठी उडदाची डाळ अगोदरच वेगळी भिजवलेली होती. ती त्यानं जरा भरड-भरड वाटून घेतली.

एव्हाना दहा वाजत आले होते. तयारी करुन झाली होती त्याची. बायको देखील भांडी आवरुन आली आणि तयारीवर नजर फिरवू लागली. तिने गंमतीने त्याच्याकडे बघितले. थोडीशी अभिमानाची झाक होती तिच्या नजरेत. काहीतरी कौतुकाचे शब्द तिला बोलायचे होते. पण लगेच विषय टाळण्याच्या हेतूने तो म्हणाला, “झोप आता लवकर. उद्या पहाटे ३ वाजता उठायचंय.”
“बरं, ठीक आहे.”
त्याने कंदिल मालवला. झोपेची पांघरुणं दोघांच्याही डोळ्यावर चढली.

****

बायको पहाटे बरोबर तीन वाजता उठली. त्यालाही उठायचं होतं. पण ती म्हणाली, “मी अगोदर नैवेद्याचं उरकून घेते. मग उठवते तुम्हांला. निवांत झोपा. दिवसभराचा प्रवास आहे.” कंदिलाची ज्योत मोठी झाली. एखाद्या वाघिणीसारखी ती कामावर तुटून पडली. आता झोप लागणं अवघड होतं. वाकळीवर निवांत पडून तो विचारात हरवून गेला.

बरोबर साडेचार वाजता बायकोने त्याला उठून आवरायला सांगितलं. साडेपाचची शहराची बस गावातून पकडायची होती. तिथून मग देवस्थानाकडे जाणारी गाडी साडेसहाची. एकूण अंतर सुमारे दीडशे किलोमीटर. जायला चार तास यायला चार तास. एसटीच्या वेगावर अवलंबून थोडाफार फरक पडणार. शहरातून अडीच-तीन तास सहज लागत. देवस्थान अगदी पश्चिमेला. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेलं. अगदी निसर्गरम्य ठिकाणी. बस पायथ्यालाच थांबणार. तिथून पुढच्या दगडी पायर्‍या भक्ताने चढून जायच्या.

प्रवासाचा विचार करत करत त्याने भराभर आह्निके आटोपली. बायकोने भराभर तीन वेगवेगळे डबे बांधून दिले. एका डब्यात कुळदैवताचा पुरणपोळीचा नैवेद्य, दुस-या डब्यात म्हसोबासाठी उडदाचे वडे, गुळाचा खडा आणि थोडं दही, तिसरा डबा त्याचा स्वतःचा. सोबत पाण्याची बाटली भरून दिली. निघण्यापूर्वी त्याने पांघरुणात गुरफटून झोपलेल्या छोटुकल्यांकडे नजर टाकली. आज त्यांना पण नेता आलं असता तर किती मज्जा आली असती? त्यांच्याकडे पहात पहातच तो घराच्या बाहेर आला. अजून अंधारच होता. पण त्या अंधारातही बायकोच्या चेहे-यावरील व्याकुळता त्याला स्पष्ट जाणवली.
“अहो, देवाला आपल्या सर्व अडचणी बोला स्पष्टपणे.”
“होय गं. न बोलताच का येणार आहे? एवढ्या लांबून जातोय तर.”
“सगळ्या अडचणीतून बाहेर काढ म्हणावं एकदाचं.”
“हं.”
“बरं चलतो आता. उशीर होतोय.”
निळसर काळपट आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या अस्पष्ट होत चाललेया पाठमोर्‍या आकृतीकडे ती बराच वेळ पहात राहिली.

***

साधारण साडेनऊ पावणेदहा वाजता बस देवस्थानाच्या पायथ्याशी पोहोचली. हा सर्व प्रवास थोडा झोपून अणि थोडा जागे राहून त्याने केला. पश्चिमेस जसजशी गाडी जाईल तसतसे वातावरणात पडणारा फरक ठळक होत गेला. इथे बर्‍यापैकी पाऊस होत होता. हिरवळ चांगलीच डोळ्यांना सुखावणारी होती. देवस्थानचा तो उत्तुंग डोंगर तर हिरवळीने अगदी आच्छादून गेलेला होता. वरती थोडे थोडे ढग ओठंगून आल्यासारखे दिसत होते. सार्‍या डोंगराला वरच्या बाजूने धुक्याने वेढलेले होते. काही काही ठिकाणाहून छोटे छोटे झरे जोमाने खळाळत खाली उतरत होते. एकदम मन प्रसन्न झालं त्याचं. पण आत्ता आपले कुटुंब आपल्यासोबत असायला पाहिजे होते याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. आणि पुन्हा त्याच्या मनाला खिन्नता धुक्यासारखी वेढून राहिली.

डाव्या हातात जेवणाची दुडकी दुडकी हलणारी डब्यांची पिशवी सांभाळत त्याने दगडी पायर्‍यांकडे मोहरा वळवला. नुकताच पाऊस पडून गेला असावा. पायर्‍या स्वच्छ पण ओलसर-निसरड्या झालेल्या होत्या. कुठे कुठे सुरेख पोपटी शेवाळाचे थर देखील जमलेले होते. आजूबाजूच्या गवतात अनेको, शेकडो रानफुले दिमाखात उमललेली होती. क्वचित कुठेतरी वरून खळाळत येणारे पाण्याचे छोटेछोटे प्रवाह आपल्या क्षणभंगुर आयुष्यात देखील दिमाखाने मिरवून घेत होते. पायर्‍या चढायला सुरुवात केली असेल नसेल तेवढ्यात भुर् भुर् पावसाला सुरुवात झाली. सोबत जोमाने वाहणारा भन्नाट वारा.

एक चाळीस पन्नास पाय-या चढून गेल्यावर देवाच्या अश्वाचा चौथरा समोर आला. पायर्‍यांच्या मधोमधच एक मोठा चौथरा दगडात बांधून काढलेला होता. त्यावर देवाच्या अश्वाची सुरेख पितळी हातभर उंचीची मूर्ती. त्यावर ठायी ठायी गुलाल वाहिलेला. नुकतीच कुणीतरी सुगंधी उदबत्ती लावलेली. त्यातून निघणारी धुराची वलये वार्‍याबरोबर इतस्ततः पसरत होती. कुणीतरी भाविक माणसानं देवाचा अश्व पावसात भिजू नये म्हणून त्याला छत्र करुन घेतलेलं होतं. छत्रावर साचलेले पाण्याचे थेंब वार्‍याच्या जोरदार झोतानिशी भराभर उधळले जात होते. त्याने बायकोने पुडीत बांधून दिलेला गुलाल चिमूटभर काढला आणि अश्वाच्या पायावर वाहिला. उदबत्तीच्या पुड्यातून एक उदबत्ती बाहेर काढली. काडेपेटी ओल्या हवेने सादळलेली होती. बरीच घासाघास करुन शेवटी त्याने उदबत्ती कशीबशी पेटवली. भक्तिभावाने अश्वाला ओवाळली आणि देवापर्यंत जायचा आपला मनोदय सांगितला. त्याचा आशिर्वाद मागितला. पुढे ठेवलेली खडीसाखर चिमूटभर उचलून खाल्ली आणि पुढे पायर्‍यांवर मार्गस्थ झाला.

आज अगदी शुकशुकाट होता. क्वचितच कुणीतरी माणूस चढता-उतरताना दिसायचं. बरोबर आहे, आत्ता या दिवसांत कोण येणार इथे? हा काही जत्रेचा मोसम नव्हे. त्यात इथे पाऊस पण सुरु झालेला. ज्याला त्याला आपापल्या शेतीची कामे होतीच ना शेवटी? पण तो मात्र मुद्दाम हीच वेळ साधून आलेला होता. जत्रेच्या वेळीस त्याला अगदी नकोनकोसं वाटायचं गर्दीत. आज मात्र फार शांत आणि सुंदर वातावरण होतं.

पावसाचा जोर आता वाढू लागला. सोबत छत्री घ्यायला पाहिजे होती असं त्याला वाटू लागलं. पण हा देखील एक वेगळा अनुभव होता. अगदी हृदयाला खोल खोल स्पर्श करणारा. एका विराट-अफाट-चिरंतन सत्तेला कडकडून मिठी मारल्यासारखा! साधारण पाऊण एक तासानंतर गडवाट चढून तो वरच्या अरुंद पठाराच्या अगदी जवळ पोहोचला. इथेच पठाराच्या थोडंसं खाली पायवाटेच्या उजव्या बाजूला एक मोठं पिंपळाचं झाड होतं. चांगलं डेरेदार. पानांची दाटी इतकी होती की खाली अगदी अंधार पडल्यासारखी सावली. पठारावरील वेगाने वाहणार्‍या वार्‍यामुळे पाने जोरजोरात सळसळत होती. पानांवर साचलेले पावसाचे थेंब कड्कड् ताशा वाजल्यासारखे खालच्या फरसबंदीवर बेफाम कोसळत होते. जणू एक चिरंतन अस्तित्व तिथं स्वतःची जाणीव करुन देत होतं.

गोलाकार फरसबंदीच्या मधोमध एक छोटीशी पंचकोनी घुमटी. जेमतेम माणूस आत जाऊ शकेल इतकी. आतमध्ये देवस्थानाचा कोतवाल म्हसोबा त्याच्या गणांसहित विराजमान झालेला. मुख्य देवाला भेट देण्यापूर्वी पहिले दर्शन घेण्याचा मान त्याचा. त्याने परवानगी दिल्याशिवाय कुणालाच पुढे प्रवेश नाही. शेंदराने माखलेली ओबडधोबड मूर्ती. त्याला आता देवस्थानाने चांदीची दृष्टी बसवलेली होती. आत दिवसाउजेडीदेखील मिट्ट अंधार कायमचा. दिवा लावला तरी देखील पठारावरील वार्‍यामुळे फारसा टिकणार नाही.

येथील निसर्गासारखी ही देवता देखील रांगडी. गोंडस उपचार मानवणार नाहीत. नवस बोलणारे लोक येथे कोंबडा कापत. तो काही वर्षांपूर्वी बापाबरोबर येथे आलेला होता तेव्हां त्याच्या बापाने देखील येथे कोंबडा कापलेला होता. त्याचे चुलते वगैरे बरेच जण होते. फक्त पुरुषमंडळी. बळी देतेवेळीस शक्यतो स्त्रिया नसत. पोराटोरांनी पठारावर मस्त हैदोसहुल्ला केलेला होता. आणि मग जेव्हा दंगा करुन करुन भूक लागली तेव्हां घुमटीशेजारी पेटवलेल्या चुलीच्या धगीला निवांत मांजरासारखे उबेला पडून राहिले. चुलीवरुन मटण शिजल्याचा खमंग दरवळ येत होता आणि नाकातून आत जाऊन पोटातल्या भुकेला अगदी उचकून उचकून पेटवत होता. थोरली मंडळी मधूनच बाजूला जाऊन ग्लासातून काहीतरी पीत होती. पण ते पहायची किंवा चाखायची मुलांना परवानगी नव्हती. कधीतरी मग ते सगळं प्रकरण शिजलं. घरातील पुरुषांनी एका पत्रावळीवर देवाचा नैवेद्य काढून ठेवला आणि दुसरं मानाचं पान काढलं तिथल्या पुजार्‍याचं. मग पुजार्‍याने देवाची भाकणूक केली, नैवेद्य दाखवला आणि मगच सर्वांनी सोबत आणलेल्या पत्रावळ्या मांडून जेवायला सुरुवात केली.

आज इतक्या वर्षांनंतर देखील हा प्रसंग आठवून त्याला अगदी नकळत हसू फुटलं. किती सुंदर असतो लहानपणीचा काळ. काही काही घाबरवणारं नसतं तेव्हां. काय विपरीत वाटलं की थेट आईबापाच्या कुशीत शिरुन दडून बसायचं. कशाची काळजी नाही, फिकिर नाही. आपलं पोट आपला बाप नक्कीच भरेल हा कसला दांडगा विश्वास असतो अशा वयात? पण आता सर्व काही बदललेलं होतं. पाठीवर मायेने फिरणारा कुठलाच वडीलधारा हात आता राहिलेला नव्हता. उद्याची काहीच खात्री राहिलेली नव्हती.

अचानक त्याच्या हाताला चटका बसला. तेव्हां त्याच्या लक्षात आलं की आपण उदबत्ती पेटवली आहे आणि ती तशीच जळत जळत खाली आलेली आहे. त्याने फुंकर मारुन ती विझवली. देवाला गोलगोल मनोभावे ओवाळली. पिशवीतून उडीदवड्यांचा डबा काढला. देवाच्या पुढ्यात पत्रावळ मांडून त्यावर वडे, गुळाचा खडा आणि दही ठेवलं. देवाला सांगितलं “बाबा रे! यावेळेस एवढ्यावर गोड मानून घे. जरा चांगलं स्थिरस्थावर झालं तर सगळं साग्रसंगीत करेन मी. शेतीला यश दे, घरात पैसा दे, पोराबाळांची शिक्षणं नीट होऊ देत.” त्याच्या मनाला जसं व्यवस्थित वाटलं तशी त्याने भाकणूक केली. पुजारी बहुतेक पूजा करुन निघून गेला असावा. अशा आडदिवसांत माणसे फिरकत नसल्याने त्याने दिवसभर थांबण्याची गरज नव्हती.

तिथलं दर्शन आटोपून आता तो मुख्य मंदिराच्या दिशेने चालू लागला. आता छोटीशीच पण एकदम खडी चढण. धपापा करायला लावणारी. अगदी शेवटचा टप्पा म्हणजे अरुंद फत्तरांच्या कैंचीतून जाणारी पायवाट. हा टप्पा अगदी अवघड. आता तर अगदी निसरडा झालेला पायाखालचा कातळ. अगदी सावकाशीने, काळजीपूर्वक तो वर आला आणि एकदम काहीतरी अद्भुत डोळ्यांपुढे यावे तसं ते छोटेखानी पठार त्याच्या डोळ्यांसमोर एखाद्या गालिच्यासारखं उलगडत गेलं. नजर जाईल तिकडे पोपटी रंगाचा सुरेख गवती मऊमऊ गालिचा. असं वाटावं की त्याच्यावर निवांत अनंतकाळ पडून रहावं. त्या गालिचात मधून मधून उगवलेली अगदी जोमदार जीवनशक्तीची रानफुलं. किती साधी पण किती सुंदर. अशी एकएक जमा करुन सुंदर हार तयार करावा आणि देवाच्या गळ्यात घालावा! किती सुंदर असू शकते जीवन? एका अनामिक प्रकाशाने त्याचं मन भरून गेलं.

आता भारल्यासारखा तो पठाराच्या मधोमध असलेल्या मुख्य देवालयाकडे चालू लागला. देवळाच्या चारी बाजूने कडेकोट फत्तराची भिंत. चिर्‍यावर चिरा काळजीपूर्वक बसवलेला. या भिंतींच्या आतल्या बाजूला देवळात मुक्काम करणार्‍यांसाठी ओवर्‍या ठेवलेल्या. एर्‍हवी सणावाराला त्या ओवर्‍यांत पाय ठेवायला जागा नसे. आता मात्र त्या सगळ्या ओस पडलेल्या होत्या. आत देवळाचं आवार पक्कं फरसबंद केलेलं. तुरळक एक चार-पाच माणसे इकडे तिकडे दिसत होती. मधोमध देखणं दगडी प्राचीन मंदिर उभं. छोटेखानीच पण मजबूत व देखणी बांधणी. वर निमुळता होत गेलेला कळस. भिंतींवर जागोजागी दगडी कमळफुले कोरलेली. बाहेर एक छोटासा मंडप, तोही दगडी. फत्तराच्या खांबांवर उभा असलेला. आधुनिक जगाचे कुरुप हात इथपर्यंत अजून पोहोचलेले नव्हते.

त्या छोट्याश्या मंडपात उभे राहून त्याने आतील मूर्ती पाहण्याचा प्रयत्न केला. अश्वारुढ देवाची पुसटशी आकृती त्याला दिसली. तसे त्याने भक्तिभावाने हात जोडले. भारावून गेल्याप्रमाणे नकळत उजवा हात वर गेला आणि अजस्र पितळी घंटेचा लोलक वाजला…

टण्ण… टण्ण… टण्ण…

आत सुरु असलेला कसलासा अगम्य पाठ थांबला. आत असावं कुणीतरी. मान खाली झुकवून अगदी अरुंद दरवाजातून तो त्या अंधारभरल्या गूढ गर्भगृहात शिरला. पहिल्या पहिल्यांदा डोळ्यांना काही दिसेनाच. पण काही क्षणांतच हळूहळू एकेक गोष्ट दृग्गोचर होऊ लागली. समोर अश्वारुढ देवाची पितळी मूर्ती. देवाच्या उजवीकडे ठेवलेला तेलाने, काजळीने माखलेला एक पुरातन दिवा. त्याचाच प्रकाश काय तो आत! बाकी इथे विजेचा प्रवेश नाही अजून. आत नेहमीप्रमाणे येणारा अनेक नारळ फोडल्याचा विशिष्ट वास. त्यातच कोपर्‍यात बसलेल्या माणसाच्या शेजारी लावलेल्या धूपकांडीचा दरवळ. कोण आहे हा? त्याने थोडं लक्षपूर्वक पाहिलं. कुणीतरी प्रौढ मनुष्य वाटतो. दोघांची नजरानजर झाली क्षणभरच. पुन्हा त्या माणसाने आपला पाठ चालू ठेवला.

असित-गिरि-समं स्यात् कज्जलं सिन्धु-पात्रे
सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी…
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम्
तदपि तव गुणानामीश पारं न याति…

अर्थ त्याला कळला नाही. पण तो पाठ ऐकायला मात्र अतिशय छान वाटत होता. त्या धीरगंभीर स्वरांचा कानांनी आस्वाद घेत त्याने भक्तिभावाने डोळे मिटले आणि देवाला अगदी मनापासून आर्त विनवणी सुरु केली. किती वेळ गेला कुणास ठाऊक? त्याच्या मनातील दुःखांचे घटच्या घट त्याने त्या ईश्वरी शक्तिपुढे रिते केले होते. काय बोलावं, कसं बोलावं ते समजत नव्हतं. पण मनातील सगळ्या जखमा त्याने उघड्या फक्त करुन ठेवल्या. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. समोर देवाला नमस्कार केला. पाठ करणारा कदाचित निघून गेला असावा. आत सर्वत्र एकदम शांतता होती.

देवाचा नैवेद्य डब्यात काढून पत्रावळीवर त्याने व्यवस्थित प्रेमाने मांडला. पान देवासमोर ठेवून नमस्कार केला, रीतसर पाणी फिरवून उदबत्ती केली आणि मग तो बाहेर आला. ओवरीत थोडा वेळ शांतपणे बसून राहिला. आता त्याला आपल्या भुकेची जाणीव झाली. बाजूच्या ओवरीत निवांत बसून त्याने आपला डबा खाल्ला. मस्तच झालेल्या पुरणपोळ्या. अगदी गडबडीत करुनसुद्धा. तसेही देवासाठी म्हणून काही केलं तर ते अगदी छान होतंच हा नेहमीचा अनुभव. एव्हाना पाऊस कमी होऊन हलके हलके ऊन पडू लागलेलं होतं. डोंगर चढल्याचे कष्ट आता कुठे जाणवू लागले. डोळ्यांवर झापड आली. पिशवीतील रिकाम्या डब्यांची उशी करुन घेऊन त्याने तिथेच ओवरीच्या कोपर्‍यात मस्त ताणून दिली.

किती वेळ गेला त्याला कळलं नाही. एका अंधारपोकळीतून तो हळूहळू भानावर आला. किती वाजले असतील? त्याने डोळे टक्क ताणून पाहिले. काही अंदाज येत नव्हता. अद्याप सगळे ढगाळ वातावरण होते. अंधारल्यागत दिसत होतं पण ते ढग दाटल्यामुळे की दिवस उतरायला लागल्यामुळे ते कळत नव्हतं. त्याच्याजवळ घड्याळ होतं पण ते नेमकं काही दिवसांपूर्वीच बंद पडलेलं. तेव्हांपासून इतरांना विचारुनच वेळ माहीत करुन घ्यावी लागत असे. आता तिथे जवळपास कुणी माणूस दिसत नव्हतं. म्हणजे होती नव्हती ती माणसं नक्कीच खाली निघून गेली असणार.

‘अरे बाप रे! बराच उशीर झाला मला! परतीची एस.टी. मिळायची का आता?’

खडाखडा रिकामे डबे वाजणारी पिशवी घेऊन तो परतीच्या वाटेवर धावत सुटला.

(काल्पनिक )

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे. लेखनशैली आवडली. सगळी दृश्यं डोळ्यापुढे उभी राहिली.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

खूप छान....
<<आपलं पोट आपला बाप नक्कीच भरेल हा कसला दांडगा विश्वास असतो अशा वयात? पण आता सर्व काही बदललेलं होतं. पाठीवर मायेने फिरणारा कुठलाच वडीलधारा हात आता राहिलेला नव्हता. उद्याची काहीच खात्री राहिलेली नव्हती.>>> खूप रूतले मनात...:अरेरे: