मला विसरायचे आहे तुला मी भेटल्याचे

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 February, 2016 - 10:53

मलाही नांव दे तू घेतलेल्या औषधाचे
मला विसरायचे आहे तुला मी भेटल्याचे

तुझ्या प्रेमात पडल्याने खरी समृध्द झाले
तुझे आहे तुझे नाही....नसेना काय त्याचे !!

प्रसंगांची पड़े ठिणगी धुमसत्या आठवांवर
सुरू होतात मग विस्फोट विझलेल्या मनाचे

निकट येवून आल्या पावली परतून जाती
प्रयोजन काय लाटांनी किनारा गाठण्याचे ?

असे नाहीच की माझ्यापुढे पर्याय नसतो
शरीराचे अव्हेरुन ऐकते म्हणणे मनाचे

किती उद्ध्वस्त झाले गांव याचे काय घेणे
वळुन मागे पहाणे काम नाही वादळाचे !

व्यसन जडले तुला जेव्हा तुझे अश्रू पिण्याचे
खरोखर मर्म उलगडले तुला तेव्हा जिण्याचे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येकच शेर आवडला. तुमच्या 'तू देव गाभार्‍यातला' नंतर तितकीच आवडलेली ही दुसरी गझल! किंबहुना ही जास्तच आवडली. अभिनंदन सुप्रिया!

वाह!!

>>निकट येवून आल्या पावली परतून जाती
प्रयोजन काय लाटांनी किनारा गाठण्याचे ?

किती उद्ध्वस्त झाले गांव याचे काय घेणे
वळुन मागे पहाणे काम नाही वादळाचे !
<<
अतिशय आवडले हे शेर!

मस्त !